(पारीत दिनांक ०१/११/२०२२)
तक्रारदाराने ग्राहक सरंक्षण कायदा २०१९ चे अन्वये खालिल तक्रार दाखल केलेली आहे.
१. तक्रारदार हे संयुक्त कुटूंबात राहत असून त्यांचेवर संपूर्ण परिवाराची जबाबदारी आहे, त्यांनी स्वयंउपभोगासाठी चारचाकी वाहन विकत घेण्याचे ठरविले. विरुध्दपक्ष क्रमांक १ हा चारचाकीवाहन खरेदी विक्री करण्याचा व्यवसाय करत असून त्यांनी नुकतीच आय-२० वाहन क्रमांक एमएच-०४/जीजे६७८६ हे वाहन मुंबईवरुन आणलेले असून ती गाडी विरुध्दपक्ष क्रमांक १ हे विकरणार असे तक्रारकर्त्याला समजले. तक्रारदाराने सदर वाहन पसंत आल्यावर तक्रारदार व विरुध्दपक्ष क्रमांक १ हयांच्यात दिनांक ०७/०३/२०१९ रोजी वाहन खरेदी करण्याचा सौदा होऊन लिखापढी झाली. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रमांक १ हयांच्याशी सदर वाहन किमंत रुपये ३,७५,५००/- ला खरेदी करण्याचा सौदा केला आणी दिनांक ०७/०३/२०१९ रोजी दिनांक ३,००,०००/- नगदी विरुध्दपक्ष क्रमांक१ ला दिले व उरलेली रक्कम रुपये ७५,०००/- गाडीचे हस्तांतरण करण्याकरीता NOC मिळाल्यानंतर देण्याचे ठरले. विरुध्दपक्ष क्रमांक १ हयांनी सदर वाहन विरुध्दपक्ष क्रमांक २-विजय टेलोरे, राहणार मुंबई यांचेकडून विकत घेतलेले होते असे सांगितले. विरुध्दपक्ष क्रमांक १ हयांनी गाडीचे कागदपपत्र हस्तांतरण न केल्यामुळे प्रादेशीक वाहन महामंडळाव्दारे गाडीचे हस्तांतरण होणे शक्य नव्हते. त्याकरीता विरुध्दपक्ष क्रमांक १ हयांनी तक्रारदाराला म्हटले की, १५ दिवसांचे आत गाडीचे हस्तांतरण नाहकरत प्रमाणपत्र विरुध्दपक्ष क्रमांक २ कडून आणून देतो असे सांगून दिनांक ०७/०३/२०१९ रोजी तकारदाराला गाडीचा ताबा दिला. विरुध्दपक्ष क्रमांक १ हयांनी वाहनाचा ताबा देत असतांना फक्त वाहनाची रजिस्टर प्रमाणपत्राची व विम्याची झेरॉक्स प्रत दिली आणि मुळ कागदपत्रे हे नाहरकत प्रमाणपत्राच्या वेळेस लागत असल्यामूळे नंतर देतो असे सांगितले. उपरोक्त वाहन खरेदी केल्यानंतर तक्रारदाराने चालविले असता पोलीसाकडून उपरोक्त गाडीचे कागदपत्र व NOC ची चौकशी होऊन ते चालविण्यास मानाई करण्यात आली. तक्रारदाराला वाहन खरेदी केल्यावर लगेच १५ दिवसात वाहन घरीच उभे ठेवावे लागले. तसेच वाहनाचा विमा हा दिनांक १५/०३/२०१९ रोजी संपत असल्यामुळे त्या वाहनाचा विमासुध्दा तक्रारदाराने रुपये ८,०६६/- गुंतवून Future General Insurance या विमा कंपनीकडून काढला. तक्रारदाराला येत असलेल्या अडचणीमुळे त्यांनी विरुध्दपक्ष क्रमांक १ हयांना वारंवार फोन केला असता त्यांनी २०/०३/२०२० रोजी १५ दिवसाचेआत NOC आणून देतो अशी हमी १००/- रुपयाचे स्टॅम्प पेपरवर लिहून दिली परंतू दिनांक ०४/०४/२०२० पर्यंत NOC आणून दिली नाही. या हमीपत्रात NOC न दिल्यास वाहनाची रक्कम परत करेल असे सुध्दा विरुध्दपक्ष क्रमांक १ हयांनी लिहून दिले. उपरोक्त प्रकारे तक्रारदार हयांनी विरुध्दपक्ष क्रमांक १ कडून उपरोक्त नमूद वाहन विकत घेऊन सुध्दा त्याचे ना हरकत प्रमाणपत्र व संपूर्ण कागदपत्रे नसल्यामुळे त्यांना त्या वाहनाचा उपभोग घेता येत नसल्यामुळे तक्रारकर्त्याला मानसिक व शारिरीक त्रास सहन करावा लागला.सबब तक्रारकर्त्याने सदर तक्रारआयोगासमोर दाखल केली आहे. विरुध्दपक्ष क्रमांक२ हे उपरोक्त वाहनाचे मुळ मालक असल्यामुळे त्यांना हया तक्रारीत साधारण (Formal) पार्टी म्हणून जोडण्यात आले आहे.
२. तक्रारकर्त्याची मागणी अशी आहे की, विरुध्दपक्ष क्रमांक १ व २ हयांनी तक्रारकर्त्याप्रति न्युनतापूर्णसेवा दिली असे घोषित करुन विरुध्दपक्ष क्रमांक १ व २ हयांनी तक्रारकर्त्याला वाहनाचे संपूर्ण कागदपत्र व नाहरकत प्रमाणपत्र दयावेत अथवा विरुध्दपक्ष क्रमांक १ हे नाहरकत प्रमाणपत्र देयास असमर्थ असल्यास त्यांनी तक्रारदाराकडून घेतलेली रक्कम रुपये ३,००,०००/- ही व्याजासह परत करण्याचे आदेशीत व्हावेत. तसेच तक्रारदाराने सदर वाहनाचा विमा रुपये ८,०६६/- काढलेला असल्यामूळे ती रक्कम ही विरुध्दपक्ष क्रमांक१ हयांनी परत करावी. तसेच शारीरिक व मानसिक त्रासापोटी रुपये १,००,०००/- तक्रारदाराला दयावेत.तसेच नुकसानभरपाई रुपये ७५,०००/- मिळण्यात यावी.
३. तक्रारकर्त्याची तक्रार स्विकृत करुन विरुध्दपक्ष क्रमांक १ व २ हयांना नोटीस पाठविण्यात आले. विरुध्दपक्ष क्रमांक १ व २ हयांनी आयोगामार्फत नोटीस प्राप्त होऊन सुध्दा प्रकरणात उपस्थित न झाल्यामुळे प्रकरण त्यांचे विरुध्द एकतर्फा चालविण्यातआले.
४. तक्रारकर्त्याची तक्रार, दस्ताऐवज तसेच लेखी व तोंडी युक्तिवाद यावरुन तक्रार निकाली काढण्याकरीता खालिल मिंमासा व त्यावरील निष्कर्श कायम करण्यात आले.
कारणमीमांसा
५. सदर प्रकरणाचे अवलोकन केले असता असे दिसून येते आहे की, तकारदाराने दिनांक ०७/०३/२०२९ रोजी विरुध्दपक्ष क्रमांक १ हयांचेकडून विक्रीचा सौदा करुन करारनामा करुन प्रकरणातील नमूद गाडी रुपये ३,७५,०००/- मध्ये विकत घेण्याचा सौदा केला त्याबद्दलचे दस्ताएवज तक्रारकर्ता हयांनी नि शानी क्रमांक ४ सह दस्त क्रमांक १ वर दाखल आहे त्यात तक्रारकर्ता हयांनी सदर गाडीचे रुपये ३,००,०००/- विरुध्दपक्ष क्रमांक १ हयांनानगदी दिले व बाकीची रक्कम रुपये ७५,०००/- गाडीचे मुळ कागदपत्र व NOC दिल्यानंतर देण्याचे ठरले. परंतू विरुध्दपक्ष क्रमांक १ हयांनी ठरल्याप्रमाणे एक वर्षात मुळ कागदपत्र व गाडीची NOC तक्रारकर्ता हयांना न दिल्यामुळे तक्रारकर्ता व विरुध्दपक्ष क्रमांक १ हयांनी पुन्हा दिनांक २०/०३/२०२० रोजी नविन करारनामा करुन दिनांक २०/०३/२०२० पासून १५ दिवसाच्या आत गाडीचे मुळ कागदपत्र व NOC तक्रारकर्त्याला न दिल्यास गाडीची घेतलेली रक्कम परत तक्रारकर्त्यास देऊन गाडी परत घेईन असे करारनाम्यात नमूद केले. सदर करारनामा निशानी क्रमांक ४, दस्त क्रमांक २ वर दाखल आहे, परंतू ठरल्याप्रमाणे विरुध्दपक्ष क्रमांक १ हयांनी उपरोक्त गाडीचे मुळ कागदपत्र व NOC ना हरकत प्रमाणपत्र तक्रारकर्त्याला न दिल्यामुळे त्यांना गाडी रोडवर चालविता आली नाही. त्याशिवाय गाडीचे इंन्श्युन्स दिनांक १५/०३/२०१९ रोजी संपत असल्यामुळे तक्रारकर्ता हयांनी ८०६६/- रुपयाचा विमा काढला त्याबाबतचे दस्त तक्रारकर्ता हयांनी तक्रारीत दाखल केलेले आहे. विरुध्दपक्ष क्रमांक १ हयांनी विक्री करारनाम्यानुसार गाडीचे मुळ कागदपत्र व नाहरकतप्रमाणपत्र न दिल्यामुळे शरीरिक व मानसिक त्रास झाला ही बाब सिध्द होत आहे. विरुध्दपक्ष क्रमांक १ व २ हयांना आयोगामार्फत तक्रारीत उपस्थित राहण्याचा नोटीस प्राप्त होऊन सुध्दा प्रकरणात हजर होऊन त्यांनी तक्रारकर्ता हयांनी त्यांचे विरुध्द केलेले कथन खोडून काढलेले नाही. त्यामुळे आयोगाला तक्रारकर्ता हयांनी तक्रारीत केलेले कथन व दस्तएवजावर भिस्त ठेवून आयोग या निष्कर्षास पोहचले आहे की, तक्रारकर्ता हयांचे कडून विरुध्दपक्ष क्रमांक १ यांनी तक्रारीत नमूद गाडीची विक्री किंमत रुपये ३,००,०००/- घेवून सुध्दा गाडीचे मुळ कागदपत्र व नाहरकत प्रमाणपत्र तक्रारकर्त्यास वेळेवर न देऊन तक्रारकर्त्याप्रति सेवेत न्युनता दिली आहे. तक्रारकर्त्याने स्वतःच्या उपभोगासाठी सदर वाहन खरेदी करुन सुध्दा त्यांना त्या वाहनाचा उपभोग घेता आला नसल्यामुळे तक्रारकर्त्याला शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागला असल्यामुळे विरुध्दपक्ष क्रमांक १ हयांनी तक्रारकर्त्याला गाडीच्या विक्रीपोटी घेतलेले रुपये ३,००,०००/- परत करावे व तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रमांक १ हयांना प्रकरणात नमुद गाडी परत करावी. तसेच तक्रारकर्त्याला झालेल्या मानसिक व शारीरिक त्रासापोटी रुपये २०,०००/- तसेच तक्रारीचा खर्चापोटी रुपये १०,०००/- तक्रारकर्त्याला देण्यास विरुध्दपक्ष क्रमांक १ हे जबाबदार आहेत.
६. विरुध्दपक्ष क्रमांक २ हयांचेशी तक्रारकर्त्याचा कोणताही प्रत्यक्ष व्यवहार झालेला नसल्यामुळे विरुध्दपक्ष क्रमांक २ विरुध्द कोणतेही आदेश नाहीत.
अंतिम आदेश
१. तक्रारकर्त्याची तक्रार क्र. ६७/२०२० अंशतः मंजूर करण्यात येते.
२. विरुध्द पक्ष क्रमांक १ हयांनी तक्रारकर्त्याकडून वाहन खरेदी करण्याच्या करारापोटी घेतलेली रक्कम रुपये ३,००,०००/- तक्रारदाराला परत केल्यावर तक्रारदाराने विरुध्दपक्ष क्रमांक १ हयांना प्रकरणात नमुद गाडी आय-२०, गाडी क्रमांक MH-04/GJ-6786 परत करावी.
३. विरुध्दपक्ष क्रमांक १ हयांनी तक्रारदाराला झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासापोटी रुपये २०,०००/- व तक्रारीचा खर्च रुपये १०,०००/- दयावा.
४. विरुध्दपक्ष क्रमांक २ विरुध्द कोणताही आदेश नाही.
५. उभयपक्षांना आदेशाच्या प्रती विनामुल्य देण्यात यावेत.