(मंचाचे निर्णयान्वये, श्री विजय चंद्रलाल प्रेमचंदानी, अध्यक्ष )
(पारीत दिनांक : 23 सप्टेंबर 2015)
अर्जदाराने सदर तक्रार, ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 नुसार दाखल केली असून तक्रारीचा आशय थोडक्यात येणे प्रमाणे.
1. अर्जदार हा शेतकरी असून शेती हा त्याचा मुख्य व्यवसाय आहे, त्याव्यतिरिक्त त्याचा दुसरा कुठलाही व्यवसाय नाही. त्याचे मालकीचे मौजा भेंडाळा येथे सर्व्हे नं.325 आराजी 1.90 हे.आर. ही शेतजमीन अजल सिंचीत आहे. त्यामुळे, अर्जदाराने सदर शेत जमिनीवर दि.15.6.2014 ला गैरअर्जदाराकडून बोरवेल मारुन घेतले. त्यापूर्वी गैरअर्जदारासोबत 9 इंची बोरवेल 300 फूट खोल व 200 फुट केसींग टाकण्याचे ठरले होते. परंतु, गैरअर्जदाराने ठरल्याप्रमाणे 9 इंचीचा बोअर न मारता, 9 इंचाचा बोअर 60 फुटा पर्यंत मारला व उर्वरीत बोअर 6 ½ इंचाचा बोअर मारला, तसेच 60 फुट पर्यंतच पीव्हीसी केसींग टाकले. अर्जदाराने आक्षेप घेतला तेंव्हा गैरअर्जदाराच्या ऑपरेटरने मालकांनी सांगीतल्याप्रमाणे मी करुन दिले असल्याचे अर्जदारास सांगीतले. नाईलाजाने अर्जदारास बोरवेलचे बिल गैरअर्जदारास चुकते करावे लागले. अर्जदाराने शेतीला पाणी देण्याकरीता सबमर्सिबल मोटार दि.16.10.2014 ला विकत घेवून बोरवेल मध्ये बसविली व ती 80 फुटापर्यंत सबमर्सिबल पंप मोटार बोरवेलमध्ये टाकली आणि चालु केली असता, 15-20 मिनिटातच बोरवेल मधून गढूळ पाणी यायला लागले. म्हणून मोटार बंद करुन मोटार पंप खाली उतरविण्याचा प्रयत्न केला असता मोटार खाली जात नव्हती. सदर बोरवेल आतमधून खचलेली असल्याची माहिती गैरअर्जदारास फोन वरुन दिली व बोरवेल दुरुस्त करुन देण्यास सांगीतले. परंतु, गैरअर्जदार हे उडवा-उडवीचे उत्तर देवून टाळाटाळ करण्याचा प्रयत्न करीत आहे. अर्जदाराने बारामाही उत्पन्न घेण्याकरीता शेतामध्ये बोरवेल मारला व तो खचल्यामुळे अर्जदाराचे 120 पोते धानाचे पिकाचे नुकसान झाले. त्यामुळे, अर्जदारास जवळपास 1,20,000/- रुपयाचे नुकसान झाले. त्यामुळे, गैरअर्जदाराने अर्जदाराला नविन बोरवेल मारुन द्यावी व तसे शक्य होत नसेल तर बोरवेलची संपूर्ण रक्कम रुपये 40,500/- अर्जदारास द्यावी, अर्जदारास झालेल्या शारिरीक व मानसिक ञासापोटी रुपये 20,000/-, शेतीच्या पिकाचे नुकसान रुपये 1,20,000/- व अर्जाचा खर्च रुपये 19,500/- गैरअर्जदाराकडून अर्जदारास मिळण्याची प्रार्थना केली.
2. अर्जदाराने नि.क्र.3 नुसार 5 छायांकीत दस्ताऐवज दाखल केले. अर्जदाराची तक्रार नोंदणी करुन गैरअर्जदाराविरुध्द नोटीस काढण्यात आले. गैरअर्जदार यांनी नि.क्र.8 नुसार लेखीउत्तर व नि.क्र.9 नुसार 3 मुळ दस्ताऐवज दाखल केले.
3. गैरअर्जदार यांनी नि.क्र.8 नुसार दाखल केले. गैरअर्जदाराने त्यांच्या लेखी उत्तरात असे कथन केलेले आहे की, अर्जदाराने तक्रारीत गैरअर्जदारावर लावलेले आरोप खोटे असून त्यांना नाकबूल आहे. गैरअर्जदाराने लेखी उत्तरातील विशेष कथनात नमूद केले की, गैरअर्जदाराने अर्जदाराच्या मागणीप्रमाणे अर्जदाराचे शेत स.नं.325 आराजी 1.90 हे.आर. मध्ये दि.15.6.2014 रोजी 300 फुट बोरवेल मारुन दिली. गैरअर्जदाराला मानसिक, आर्थिक व शारिरीक ञासात टाकण्याच्या बदहेतुने दि.29.5.2015 रोजी पोलीस पाटील व सरपंच यांचे प्रमाणपञ, तसेच दि.1.6.2015 रोजी तलाठी यांचेकडून खोटे प्रमाणपञ घेूवन मंचासमोर सदरचे प्रकरण दाखल केले. अर्जदाराची बोरवेल आज सुध्दा चांगली आहे, याबाबत या दि.30.6.2015 रोजी गैरअर्जदाराने अर्जदारासमक्ष घटनास्थळाचा पंचनामा पंचाच्या उपस्थितीत करण्यात आला. अर्जदाराचा अर्ज गैरअर्जदाराच्या रुपये 25000/- क्षतीपुरक खर्चासह खारीज करण्याची विनंती केली.
4. अर्जदाराने नि.क्र.10 नुसार शपथपञ व नि.क्र.14 नुसार अतिरिक्त शपथपञ व नि.क्र.15 नुसार 7 मुळ दस्ताऐवज दाखल केले. गैरअर्जदार यांना नि.क्र.16 शपथपञ दाखल दाखल केले. अर्जदार यांनी नि.क्र. 18 नुसार पुरसीस दाखल केली. नि.क्र.20 नुसार साक्षदाराचे शपथपञ दाखल केले. अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेले लेखी बयान, शपथपञ, दस्ताऐवज, लेखी व तोंडी युक्तीवादावरुन खालील मुद्दे निघतात.
मुद्दे : निष्कर्ष
1) अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? : होय.
2) गैरअर्जदाराने अर्जदाराप्रती अनुचित व्यापार पध्दतीची : होय.
अवलंबना केली आहे काय ?
3) गैरअर्जदाराने अर्जदाराप्रती सेवेत न्युनतापूर्ण : होय.
व्यवहार केला आहे काय ?
4) अर्जदाराचा तक्रार मंजूर होण्यास पाञ आहे काय ? : अंतिम आदेशाप्रमाणे
- कारण मिमांसा –
मुद्दा क्रमांक 1 बाबत :-
5. अर्जदाराने त्यांचे शेती जमिनीवर दि.15.6.2014 ला गैरअर्जदाराकडून बोरवेल मारुन घेतले होते, ही बाब दोन्ही पक्षांना मान्य असून अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे, असे सिध्द होते. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्रमांक 2 व 3 बाबत :-
6. अर्जदाराने नि.क्र.15 वर दस्त क्र.1 ची पडताळणी करतांना असे दिसले की, गैरअर्जदाराने अर्जदाराला 300 फुट पर्यंत बोर करण्याकरीता प्रती फुट रुपये 85/- चे रकमे प्रमाणे रुपये 25,500/- तसेच पी.व्ही.सी. पाईप टाकण्याकरीता 60 फुटाचे रुपये 250/- प्रती फुट प्रमाणे रुपये 15,000/- चे देयक दिले होते. दस्त क्र.2 ची पडताळणी करतांना असे दिसले की, ग्रामपंचायत भेंडाळा यांनी दि.29.5.2015 रोजी अर्जदाराचे शेतात दि.15.6.2014 रोजी बोरवेलची चौकशी करुन पंचासमक्ष त्यांचे असे निर्देशनास आले की, 80 फुटानंतर बोर हा खचलेला आहे असे प्रमाणपञ देण्यात आले. गैरअर्जदाराने नि.क्र.9 वर दस्त क्र.1 व 2 ची पडताळणी करतांना असे दिसते की, ग्रामपंचायत भेंडाळा यांनी दि.30.6.2015 रोजी असे प्रमाणपञ दिले की, अर्जदाराचे बोर कोठेही खचलेला नसून व्यवस्थित आहे. गैरअर्जदाराने त्याच्या जबाबात असे कथन केले आहे की, अर्जदाराने दि.29.5.2015 रोजी पोलीस पाटील व सरपंच यांचेकडून खोटे प्रमाणपञ मंचासमक्ष दाखल केलेले आहे. सदर प्रकरण मंचासमक्ष दि.10.6.2015 रोजी दाखल करण्यात आले व गैरअर्जदार हे दि.1.7.2015 रोजी वकीलामार्फत मंचासमक्ष हजर झाले व लेखी उत्तर दाखल करण्याकरीता नि.क्र.5 वर वेळ मिळावे असे अर्ज मंचासमक्ष सादर केले. दि.8.7.2015 रोजी गैरअर्जदाराने मंचासमक्ष त्यांचे जबाब दाखल केले व नि.क्र.9 वर दि.30.6.2015 चे पंचनामा व सरपंच, ग्रामपंचायत भेंडाळा यांचे प्रमाणपञ दाखल केले. सदर पंचनामा व प्रमाणपञाची पडताळणी करतांना असे कुठेही नमूद नव्हते की, दि.29.5.2015 रोजी अर्जदाराला दिलेले प्रमाणपञ खोटे होते. गैरअर्जदाराने नि.क्र.20 वर श्री छञपती केशव चौधरी यांचे शपथपञ दाखल केलेले आहे. सदर शपथपाञामध्ये त्यांनी असे नमूद केले आहे की, ते 12 वर्षापासून मोटार फीटींग तसेच रिपेअरींगचे काम करुन राहिले आहे व केसींग जास्तीत-जास्त जमीन चांगली राहिली तर 80 ते 90 फुटापर्यंत केसींग टाकता येतो. परंतु, मंचासमक्ष हा प्रश्न आहे की, अर्जदाराचा बोर खचली होती की नाही ? अर्जदाराने दाखल नि.क्र.15 वर दस्त क्र.2 चे प्रमाणपञावर सरपंचासोबत सचिवाचीही स्वाक्षरी आहे. याउलट, नि.क्र.9 वर गैरअर्जदाराने दाखल दि.30.6.2015 च्या प्रमाणपञामध्ये फक्त सरपंचाची स्वाक्षरी असून त्या प्रमाणपञामध्ये दिलेले कथन ग्राह्य धरता येत नाही. तसेच, गैरअर्जदाराने मंचासमक्ष सरपंचाचे कोणतेही साक्षी पुरावा हे सिध्द करण्याकरीता दाखल केलेले नाही की, अर्जदाराला दि.29.5.2015 रोजी दिलेला प्रमाणपञ व दि.30.6.2015 मध्ये तफावत कशी आहे व पूर्वी दिलेले प्रमाणपञ खोटे आहे की खरे आहे. अर्जदाराने नि.क्र.15 वर दाखल दस्त क्र.4 पडताळणी करतांना असे दिसते की, दि.1.6.2015 रोजी तलाठी भेंडाळा यांनी असे प्रमाणपञ दिले की, अर्जदाराची बोरवेल 80 फुटानंतर खचलेली आहे. यावरुन असे सिध्द होते की, गैरअर्जदाराने अर्जदाराचे बोरवेल व्यवस्थितपणे केलेली नाही. सबब, गैरअर्जदाराने अर्जदाराप्रती अनुचित व्यवहार पध्दतीची अवलंबना केली आहे व सेवेत ञुटी केली आहे असे सिध्द झाले आहे. सबब, मुद्दा क्र.2 व 3 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्रमांक 4 बाबत :-
7. मुद्दा क्र.1 ते 3 चे विवेचनावरुन आणि अर्जदार व गैरअर्जदार दोन्ही पक्षांनी असे मान्य केल्यावर की, गैरअर्जदाराने अर्जदाराचे बोर मध्ये 60 फुटापर्यंत पी.व्ही.सी.केसींग टाकले होते. सबब, मंच खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करीत आहे.
- अंतिम आदेश -
(1) अर्जदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
(2) गैरअर्जदाराने अर्जदाराला बोरवेलची संपूर्ण रक्कम रुपये 25,500/- आदेशाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसाचे आंत द्यावे.
(3) गैरअर्जदाराने अर्जदारास झालेल्या शारिरीक व मानसिक ञासापोटी रुपये 5000/- व तक्रारीचा खर्च रुपये 2500/- आदेशाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसाचे आंत द्यावे.
(4) उभय पक्षांना आदेशाची प्रत विनामुल्य देण्यात यावी.
गडचिरोली.
दिनांक :- 23/9/2015