Exh.No.35
सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
तक्रार क्र. 26/2015
तक्रार दाखल झाल्याचा दि.06/05/2015
तक्रार निकाल झाल्याचा दि. 30/11/2015
- श्री राजेश आबाजी सावंत
- वय 40 वर्षे, धंदा- नोकरी,
- सौ.साक्षी राजेश सावंत
- वय 34 वर्षे, धंदा – नोकरी,
- दोन्ही राहा.वृंदावन अपार्टमेंट,
- बि विंग, दुसरा मजला, क्र.एस.3,
- घर नंबर 1151, मौजे जानवली,
- ता.कणकवली, जिल्हा- सिंधुदुर्ग
- पिन – 416 602 ... तक्रारदार
- विरुध्द
1) श्री. सुहास बाळकृष्ण सावंत
वय 39 वर्षे, धंदा – बिल्डर- डेव्हलपर,
राहाणार – फ्ल्ॅाट नं.1301, ए विंग,
सुर्यकिरण को.ऑप. हाऊसिंग सोसायटी,
लोखंडवाला कॉम्प्लेक्स, आकुर्ली रोड,
कांदिवली (पूर्व)
2) सौ. पूजा प्रविण कदम
वय 41 वर्षे, धंदा – बिल्डर-डेव्हलपर,
राहाणार ए – 304, पौर्णिमा बिल्डींग, वसंत उत्सव,
ठाकुर व्हिलेज, कांदिवली (पूर्व)
मुंबई – 400 101
3) सौ.सोनल जॉन नरोन्हा,
वय 33 वर्षे, धंदा – बिल्डर-डेव्हलपर,
राहा. बी-102, श्रीधरगंगा, चिंचोली बंदर रोड,
मालाड (पश्चिम) 400 064
4) श्रीमती वंदना बाळकृष्ण सावंत
वय 61 वर्षे, धंदा – बिल्डर- डेव्हलपर,
राहा. फ्लॅट नं.1301, ए विंग,
सुर्यकिरण को.ऑप.हाऊसिंग सोसायटी,
लोखंडवाला कॉम्प्लेक्स, आकुर्ली रोड,
कांदिवली (पूर्व) ... विरुध्द पक्ष.
गणपूर्तीः- 1) श्री कमलाकांत ध. कुबल, प्रभारी अध्यक्ष
2) श्रीमती वफा ज. खान, सदस्या.
तक्रारदारतर्फे विधिज्ञ – श्री. डी. वाय. भोईटे.
विरुद्ध पक्षातर्फे विधिज्ञ – श्री. व्ही. बी. कदम.
निकालपत्र
(दि.30/11/2015)
द्वारा : श्री कमलाकांत ध. कुबल, प्रभारी अध्यक्ष
1) प्रस्तुत तक्रारीत विरुध्द पक्षाने अभिवचन देऊन व जादा पैसे घेऊनही तक्रारदाराच्या मागणीप्रमाणे कामांची पूर्तता न केल्याने मंचासमोर दाखल करण्यात आलेली आहे.
2) सदर तक्रारीचा थोडक्यात तपशील खालीलप्रमाणे ः-
तक्रारदाराने वृंदावन अपार्टमेंटमधील विरुध्द पक्षाकडून सदनिका खरेदी केलेली आहे. प्रस्तुत सदनिका ज्या इमारतीत आहे, त्या ठिकाणच्या इमारतीचे व विहिरीचे काम, कचराकुंडी तयार करुन देणेसंबंधी, इमारतीस सुरक्षा भिंत चोहोबाजूस तसेच इमारतीस मेनगेट व बिल्डींगचे वर पावसाची झड येऊ नये म्हणून कौले या तत्सम साधनांन्वये सोईसुविधा उपलब्ध करुन देण्याविषयी अभिवचन देऊन देखील मागील एक ते दीड वर्षापासून वास्तव्यास आल्यापासून वारंवार विनंती व निवासीधारकांच्या बैठकांमधून कैफियत मांडून देखील त्याची पूर्तता विरुध्द पक्षाने केलेली नाही. सदनिकेमध्ये पावसाचे पाणी येऊ नये म्हणून सदर वृंदावन अपार्टमेंट सोसायटीच्या गच्चीवर पत्रे किंवा कौले घालून त्यासाठी उपाययोजना करु असे सांगून रु.50,000/- विरुध्द पक्षाने तक्रारदार यांचेकडून जादा स्वीकारले. मात्र त्याची पूर्तता केलेली नाही ही सेवेतील त्रुटी आहे असे तक्रारदाराचे म्हणणे आहे. तसेच सदर इमारतीत 3 सदनिकाधारकांनी मिळून रु.70,000/- स्वतः खर्च करुन कौले घालून घेतली आहेत असेही तक्रारदाराचे म्हणणे आहे. सदर सदनिकेचे अंतीम खरेदीखत हे दि.28/06/2013 रोजी झालेले असलेने सदर तक्रार दोन वर्षाच्या आत आहे. विरुध्द पक्ष मुंबई निवासी असले तरी सदरहू बिल्डिंगचे ते बिल्डर व विकासक (developer) आहेत. तक्रारदाराने आपल्या मागणीमध्ये विरुध्द पक्ष यांनी जादा कामाचे घेतलेले रु.50,000/-, नोटीसचा खर्च रु.500/-, झेरॉक्स टायपिंग खर्च रु.500/-, मनस्ताप व प्रलंबित ठेवलेल्या कामाचे रु.1,00,000/- असे एकूण रु.1,51,000/- वसुल करुन मिळावेत असे नमूद केले आहे.
3) तक्रारदाराने आपल्या तक्रारीच्या पुष्टयर्थ नि.4 वर एकूण 3 कागदपत्रे व नि.19 वर एकूण 6 कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच नि.20 वर इमारतीचे व छपराचे 3 फोटोग्राफ्स दाखल केले आहेत.
4) विरुध्द पक्ष 1 ते 4 यांनी नि.17 वर आपले म्हणणे दाखल केलेले असून सदरची तक्रार खोटी, बनावट, खोडसाळपणाची आणि वस्तुस्थितीला धरुन नसलेने ती मान्य व कबुल नसलेचे म्हटले आहे.
विरुध्द पक्षाने आपल्या लेखी म्हणण्यात त्यांनी खालील मुद्दे प्रकर्षाने मांडलेले आहेत.
i) तक्रारदार हे विरुध्द पक्षाचे ग्राहक कसे होतात ? हे तक्रारीत नमूद केलेले नाही.
ii) तक्रारीतील ज्या सोईसुविधा उपलब्ध करुन देण्याचे तक्रारदाराने म्हटलेले आहे तसे अभिवचन कधीही विरुध्द पक्षाने तक्रारदारास दिलेले नाही.
iii) विरुध्द पक्षाने रु.50,000/- जादा स्वीकारलेले नाहीत.
iv) विरुध्द पक्ष 1 ते 4 बांधकामाचा व्यवसाय करत नाही व कधीही केलेला नाही.
v) विरुध्द पक्ष मंचाचे कक्षेत वास्तव्यास नाहीत.
vi) तक्रारदाराने दाखल केलेली तक्रार मुदतीत नाही.
vii) खरेदीखतातील कलम 7 ते 11 नुसार विरुध्द पक्षाचा नमूद बाबींशी आता कोणताही संबंध राहिलेला नाही.
viii) तक्रारदाराने पुरावा म्हणून सादर केलेले कागदपत्र बनावट व खोटे आहेत.
ix) त्यामुळे हानीकारक भरपाई म्हणून तक्रारदाराकडून रु.50,000/- विरुध्द पक्षाला मिळावेत.
5) तक्रारदाराची तक्रार व तक्रारीच्या पुष्टयर्थ सादर केलेले लेखी पुरावे, फोटोग्राफ्स, विरुध्द पक्षाचे त्यावरील म्हणणे, दोन्ही विधिज्ञांचा युक्तीवाद ऐकल्यावर मंच खालील निष्कर्षाप्रत येत आहे.
अ.क्र. | मुद्दे | निष्कर्ष |
1 | तक्रारदार हा विरुध्द पक्ष 1 ते 3 यांचा ‘ग्राहक’ आहे काय ? | होय. |
2 | विरुध्द पक्ष 1 ते 4 यांनी जादा रक्कम स्वीकारुन तक्रारदारास दयावयाच्या सेवेत त्रुटी ठेवली आहे काय ? | अंशतः होय. |
3 | आदेश काय ? | खालीलप्रमाणे. |
6) मुद्दा क्रमांक 1 - तक्रारदाराने विरुध्द पक्षाकडून सदनिका खरेदी केल्याचे प्रकरणात हजर केलेल्या खरेदी खतावरुन (नि.4/1) स्पष्ट होते. तसेच तक्रारदाराकडून विरुध्द पक्ष क्र.1 ते 4 यांनी सदनिका विक्रीपोटी मोबदला स्वीकारल्याचे नि.19 सोबत हजर केलेल्या कागदपत्रांवरुन दिसून येते. त्यामुळे तक्रारदार व विरुध्द पक्ष यांचेमध्ये ग्राहक व विक्रेता हा संबंध प्रस्थापित होतो. पर्यायाने तक्रारदार हा विरुध्द पक्ष यांचा ‘ग्राहक’ आहे; त्यामुळे मुद्दा नं.1 बाबत हे मंच होकारार्थी निष्कर्षाप्रत येत आहे.
7) मुद्दा क्रमांक 2 व 3 – i) तक्रारदाराने विरुध्द पक्षास रक्कमा दिलेल्या पावत्यांचे अवलोकन केले असता त्या करारातील रक्कमेपेक्षा अधिक असल्याचे दिसून येते. ती वाढीव रक्कम विरुध्द पक्ष क्र.1 ते 4 यांनी का स्वीकारली याचे स्पष्टीकरण त्यांना करता आलेले नाही. त्यामुळे करारात नमूद रक्कमेपेक्षा जास्त रक्कम स्वीकारली व तक्रारदार यांना दयावयाच्या सेवेत त्रुटी ठेवली असे तक्रारदाराचे म्हणणे मंचाला मान्य करावे लागते. तसेच विरुध्द पक्ष यांनी याबाबत कोणतेही स्पष्टीकरण केले नसल्यामुळे तक्रारदाराच्या म्हणण्यास पुष्टी मिळते.
ii) विरुध्द पक्ष हे मुंबईस्थित असलेतरी व्यावसायिक म्हणून ते जिल्हा मंचाच्या कार्यकक्षेत कार्यरत आहेत. त्यामुळे सदर प्रकरण सिंधुदुर्ग ग्राहक मंचाच्या न्यायकक्षेत येते. त्यामुळे सदर प्रकरण चालवण्याचा व फैसला करण्याचा या मंचाला पूर्ण अधिकार आहे.
iii) विरुध्द पक्षाने तक्रारदाराने हजर केलेल्या पावत्या बनावट व खोटया असल्याचे म्हटले आहे. मात्र त्याबाबत सहयांची शहानिशा करण्यासाठी हस्ताक्षर तज्ज्ञाकडे पाठवण्यासाठी विरुध्द पक्ष आग्रही राहिलेले नाहीत. त्यामुळे सदर रक्कमा विरुध्द पक्षानेच स्वीकारल्या हे मंचाला गृहीत धरावे लागते. तसेच काही पावत्यांवरील सहया वेगवेगळया असण्यांची कारणेही स्पष्ट होतात. साठेकरारावर करार केलेल्या काही व्यक्ती मयत असल्यामुळे अंतीम खरेदीखतावर त्यांच्या वारसांच्या सहया आहेत. त्यामुळे संबंधितांच्या मृत्यूनंतर वारसांच्या सहया असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे सहयातील भिन्नता मंच मान्य करीत आहे आणि विरुध्द पक्षाला रक्कमा दिल्याचा तक्रारदाराचा पुरावा हे मंच मान्य करीत आहे.
iv) तक्रारदार व तीन सदनिकाधारकांनी रु.70,000/- खर्च करुन वादग्रस्त इमारतीला छप्पर म्हणून कौले घातल्याचे नमूद करुन त्या इमारतीचे फोटोग्राफ्स हजर केलेले आहेत. तसेच सदर खर्च केल्याचे तपशीलवार बील त्याच इमारतीतील अन्य तक्रारदारांनी (तक्रार क्र.24/2015, तक्रार क्रमांक 25/2015) खर्चाची पावती जोडलेली आहे. मात्र सदर इमारतीवर कौले घालण्यासंदर्भात कोणतीही अट खरेदीखतात नमूद नसल्याने विरुध्द पक्ष सदर काम करण्यास बांधील नव्हता असे मंचाला वाटते.
v) तक्रारदाराने तक्रार अर्जात मांडलेल्या मागण्यांचा उल्लेख बहुतांशाने खरेदीखतात अथवा साठेखतात उल्लेखित नाही. त्यामुळे त्याची पुर्तता विरुध्द पक्षाने करुन दयावी हे म्हणणे न्यायोचित ठरणार नाही. मात्र विरुध्द पक्षाने तक्रारदाराकडून जादा रक्कम घेतल्याचे पावत्यावरुन व दाखल पुराव्यावरुन सिध्द होते. सदर रक्कम कशासाठी स्वीकारली याचा अन्वयार्थ लावतांना तक्रारदार व विरुध्द पक्षासाठी आपापसातील mutual understanding ने कराराव्यतिरिक्त वाढीव बाबी करण्यासंदर्भात मतैक्य झाले असावे व त्याकरिताच वाढीव रक्कम तक्रारदाराने दिली असावी या मतापर्यंत मंचाला यावे लागते. तक्रारदाराने रु.50,000/- वाढीव रक्कम दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. मात्र कागदोपत्री पुराव्यावरुन रु.2,22,000/- वाढीव रक्कम तक्रारदाराकडून घेतल्याचे दिसून येते. खरेदीखतात नमूद रक्कमेपेक्षा जादा रक्कम घेण्याचे प्रयोजन काय ? हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. तक्रारदाराने आपल्या तक्रारीत रु.50,000/- जादा घेतल्याचे म्हटले आहे आणि तेवढयाच रक्कमेची मागणी केलेली असल्याने प्रस्तुत प्रकरणात संदेह निर्माण होतो. मात्र विरुध्द पक्षाने घेतलेल्या रक्कमेपेक्षा तक्रारदाराची तक्रार अर्जातील मागणी रक्कम कमी असल्याने सदर रक्कम व्याजासह देणे विरुध्द पक्ष क्र.1 ते 4 वर बंधनकारक आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे.
vi) उपरोक्त सर्व बाबींचा विचार करुन हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
- तक्रारदाराची तक्रार अंशतः मान्य करण्यात येते.
2) विरुध्द पक्ष क्र.1 ते 4 यांनी तक्रारदाराकडून घेतलेली जादा रक्कम रु.50,000/- (रुपये पन्नास हजार मात्र) द.सा.द.शे.10 % दराने दि.28/06/2013 पासून तक्रारदारास परत करावी.
3) तक्रारदाराला झालेल्या शारीरिक, मानसिक त्रासापोटी व प्रकरण खर्चापोटी रु.10,000/-(रुपये दहा हजार मात्र) वि.प.1 ते 4 यांनी दयावेत.
4) विरुध्द पक्ष 1 ते 4 यांनी वरील आदेशाची अंमलबजावणी 45 दिवसांच्या आत न केल्यास तक्रारदार विरुध्द पक्ष यांचेविरुध्द ग्राहक संरक्षण कायदा कलम 25 व 27 अन्वये दंडात्मक कार्यवाही करु शकतील.
5) मा.राज्य आयोग, मुंबई यांचे परिपत्रक्र क्र.राआ/महा/आस्था/-3/जि.मं. कामकाज/परिपत्रक/2014/3752 दि.05 जुलै 2014 नुसार उभय पक्षकारांनी 45 दिवसानंतर म्हणजेच दि.14/01/2016 रोजी आदेशाची पुर्तता झाली किंवा नाही हे कळवणेसाठी या मंचासमोर हजर रहावे असे आदेश देण्यात येतात.
ठिकाणः सिंधुदुर्गनगरी
दिनांकः 30/11/2015
Sd/- Sd/-
(वफा ज. खान) (कमलाकांत ध.कुबल)
सदस्य, प्रभारी अध्यक्ष,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
प्रत तक्रारदार यांना हातपोहोच/रजि पोस्टाने रवाना दि.
प्रत विरुद्ध पक्ष यांना हातपोहोच/रजि. पोस्टाने रवाना दि.