रायगड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, अलिबाग. तक्रार क्र.118/2008. तक्रार दाखल दि.4-11-2008. तक्रार निकाली दि.16-3-2009.
श्री.हरेश डाहयाभाई छगनलाल. रा.बिच व्हयू, चौपाटी सी फेस, गिरगांव, मुंबई 400 007 तर्फे कुलअखत्यारी, श्री.सुजान मेहता, रा. रा.बिच व्हयू, चौपाटी सी फेस, गिरगांव, मुंबई 400 007 ... तक्रारदार.
विरुध्द
1.सुभाष प्रेमनाथ प्रभुदेसाई, रा.जि.5 शालिमार अपार्टमेंट, पागी फोंडे, मु.पो.ता.मडगांव, गोवा. 2.श्री.संजीव रघुनाथ पत्की, रा.5, वृंदावन मोगल लेन, माहिम,पश्चिम, मुंबई 400 016. 3.मे.डाऊन टाऊन डेव्हलपर्स, 20, रविकिरण तेजपाल स्कीम क्र.1, विलेपार्ले, पश्चिम, मुंबई 400 057. ... विरुध्द पक्षकार.
उपस्थिती- मा.श्री.आर.डी.म्हेत्रस, अध्यक्ष. श्री.बी.एम.कानिटकर, सदस्य. तक्रारदारतर्फे वकील– श्री.संतोष स.पवार. सामनेवालें क्र.1 व 2 तर्फे वकील- श्री.आर.बी.कोसमकर. सामनेवाले क्र.3 – एकतर्फा चौकशी. -निकालपत्र -
द्वारा- मा.अध्यक्ष, श्री.आर.डी.म्हेत्रस. 1. तक्रारदारांनी ही तक्रार ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदीअंतर्गत दाखल केली असून तिचे स्वरुप खालीलप्रमाणे आहे- सामनेवाले हे बिल्डर व डेव्हलपर असून ते सामनेवाले क्र.3 या संस्थेचे भागीदार आहेत. सामनेवालेनी मौ.गाण तर्फ श्रीगांव, ता.अलिबाग, जि.रायगड येथे शेतजमीन खरेदी करुन तिचा भूखंड तयार केला व भूखंडइच्छुक खरेदीदारांना विकण्याबाबतची योजना मंजूर केली. त्याप्रमाणे त्या गावातील ग्रामस्थांच्या जमिनी खरेदी करण्यासाठीचा करार त्यांनी केला होता. सदर योजनेप्रमाणे सामनेवाले हे तक्रारदारानी सदर जमीनमिळकत खरेदी करुन देणार होते. त्यांनी जमिनीचा लेआऊट तयार करणे, त्यासाठी छोटे भूखंड तयार करणे व त्यासाठी आर्किटेक्टची नेमणूक करणे, या आराखडयाला संबंधित खात्याकडून मंजुरी आणणे इ.चा समावेश होता. भूखंड विकसित व सपाटीकरण करण्यासाठी तसेच 30 फूटांतर्गत रस्ते तयार करणे, त्यामध्ये फळझाडे लावणे, त्याला तारेचे कुंपण घालणे, रस्त्यावर दिव्याची सोय करणे व अशा भूखंडधारकांची सहकारी संस्था स्थापन करुन किंवा प्रत्यक्ष भूखंडखरेदीदाराचे नावे भूखंड स्वतंत्रपणे खरेदी देऊन त्याची नोंदणी करणे इ.सशुल्क सेवा सामनेवालेनी तक्रारदारास देण्याचे मान्य केले होते. 2. तक्रारदारानी या योजनेपैकी दोन भूखंड सामनेवालेस संपूर्ण मोबदला देऊन खरेदी केले व त्यासंदर्भात दि.5-9-91 रोजी 2 वेगळे करार झाले. सामनेवालेना त्याचा मोबदला मिळाला असल्यामुळे त्यांनी भूखंडाचा प्रत्यक्ष ताबा तक्रारदारास दिला होता. भूखंडामध्ये विदयुतजोडणी, बोअरवेल देणे, पाण्याची जोडणी देणे, भूखंडाला तारेचे कंपौंड टाकणे, पक्का रस्ता तयार करणे व प्रत्येक भूखंडाचे 7/12 चे स्वतंत्र उतारे तयार करुन तक्रारदाराना देणे इ.बाबी देण्याचे सामनेवालेनी कबूल केले. परंतु प्रत्यक्षात सामनेवालेनी ही कामे पूर्ण केली नाहीत, ती अपु-या अवस्थेत होती. तक्रारदारानी सामनेवालेस अपुरी कामे पूर्ण करण्याबाबत अनेकदा लेखी पत्र पाठवून विनंत्या केल्या मात्र सामनेवालेनी त्याला थातूरमातूर उत्तरे देऊन कामाची पूर्तता केली नाही त्यामुळे तक्रारदारानी सामनेवालेस दि.12-3-08 रोजी रजिस्टर्ड पोस्टाने नोटीस देऊन अर्धवट कामाची पूर्तता करण्याबाबत कळविले व नोटीस मिळूनही त्यांनी अर्धवट काम पूर्ण केले नाही व स्वतंत्र 7/12चे उतारे केले नाहीत म्हणून तक्रारदाराना ही तक्रार दाखल करावी लागली. 3. सामनेवाले क्र.1 ते 3 यांनी मौ.गाण, श्रीगांव येथील 55 एकर क्षेत्र यासाठी घेतले होते. त्यांनी काढलेल्या आराखडयातील भूखंड क्र.4, सर्व्हे नं.16, हिस्सा क्र.1, क्षेत्र.4000 चौ.मी. व भूखंड क्र.6, सर्व्हे नं.16 मधील हिस्सा नं.1/अ येथील क्षेत्र 4600 चौ.मी. असे तक्रारदारानी सामनेवालेकडून एकूण रु.1,80,000/- व रु.2,20,000/- रक्कम देऊन खरेदी केले होते. रक्कम मिळाल्यामुळे भूखंडाचा ताबा तक्रारदाराना त्यावेळी मिळाला होता. सामनेवालेनी दि.5-3-93, दि.6-3-93 रोजी बंधपत्र तयार करुन भूखंडाची रक्कम मिळाली असल्याचे नमूद केले होते. त्यामध्ये त्यांनी विदयुतजोडणी, बोअरवेल, पाण्याची जोडणी, व भूखंडाला तारेचे कुंपण घालणे व पक्का रस्ता तयार करणे इ.कामे करण्याचे मान्य केले, परंतु आजपर्यंत ही कामे अपु-या स्थितीत राहिली आहेत. करारातील तरतुदीप्रमाणे दोन्ही भूखंडाप्रमाणे 7/12चे उतारे स्वतंत्र करुन तक्रारदाराना दिलेले नाहीत. तक्रारदारानी मागील अनेक वर्षांपासून लेखी पत्रे देऊन विनंती केली असता सामनेवालेनी त्याला थातुरमातुर उत्तरे दिली व पुढे पुढे ते उत्तरे देण्याचे टाळू लागले म्हणून त्यांनी दि.12-3-08 रोजी नोटीस दिली. नोटीस मिळूनही सामनेवाले क्र.1 ने ही कामे पूर्ण केली नाहीत व आपली जबाबदारी सामनेवाले क्र.2 वर ढकलली, तसेच त्यांनी 7/12चा स्वतंत्र उतारा केला नाही. 4. त्यांचे कथन असे आहे की, भूखंड क्र.4 व 6 हे 7/12 करुन तक्रारदाराच्या नावे हस्तांतरित करावेत. अपुरी कामे पूर्ण करुन दयावीत, तसेच सामनेवाले क्र.1 ने दि.27-3-08 रोजी आपली जबाबदारी सामनेवाले क्र.2 वर ढकलून उत्तरे दिल्यामुळे तक्रारीस कारण घडले आहे व ते रोज घडत आहे. त्यामुळे ही तक्रार मुदतीत आहे. 5. सामनेवालेनी मिळकत स्वतंत्र करुन तक्रारदाराच्या नावे केली नाही त्यामुळे तक्रारदार त्याचा विनियोग करु शकले नाहीत, त्यांना ती विकता आली नाही, त्यामुळे त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होऊन शारिरीक, मानसिक त्रास झाला. त्यांची अशी विनंती आहे की, रायगड येथील मौ.गाण तर्फ श्रीगांव, ता.अलिबाग, जि.रायगड मधील सर्व्हे क्र.16, हिस्सा 1/अ, या जमिनीच्या 7/12 चे उता-यावर सामनेवालेंचे नांव आहे. त्याची मोजणी शासकीय सर्व्हेअरने करुन दयावी व तक्रारदाराच्या भूखंड क्र.4 व 6 चे स्वतंत्र नकाशे व 7/12 चे उतारे तक्रारदाराच्या नावे म्हणजेच भोगवटाधारकाचे नावे यावेत यासाठी आवश्यक ती कार्यवाही सामनेवालेनी करावी. 6. तसेच करारात नमूद केलेली जी कामे अपुरी राहिली आहेत त्यामुळे ती पूर्ण करुन मिळण्याबाबत त्यांना आदेश व्हावेत. 7. इतक्या वर्षात सामनेवालेकडून काहीही न झाल्यामुळे तक्रारदाराना मिळकतीचा फायदा घेता आला नाही त्यामुळे त्यांचे जे नुकसान झााले आहे त्यापोटी, तसेच शारिरीक, मानसिक त्रासापोटी एकूण रु.एक लाख त्यांना मिळावेत अशी त्यांची विनंती आहे. तसेच अर्ज खर्चासह मंजूर करावा अशी त्यांची मागणी आहे. 8. तक्रारदारानी तक्रारीसोबत नि.2 वर आपले अखत्यारी श्री.सुजान मेहता तर्फे प्रतिज्ञापत्र दिले आहे. नि.5 अन्वये त्यांनी एकूण 12 कागद दाखल केले असून ते पान क्र.12 ते 71 अखेर आहेत. त्यामध्ये अखत्यारपत्र, दि.5-9-91 रोजी झालेल्या कराराची मूळ प्रत, तक्रारदारानी सामनेवालेना दि.13-1-92, दि.22-1-92, दि.3-2-92, दि.8-8-92, दि.4-1-93 रोजी पाठविलेल्या पत्रांचा समावेश आहे. तसेच सामनेवालेनी तक्रारदाराना दि.5-3-93 व दि.6-3-93 रोजी लिहून दिलेली बंधपत्रे आहेत, तसेच तक्रारदारानी दि.12-3-08 रोजी दिलेली नोटीस व त्याला सामनेवाले क्र.1 ने दिलेल्या उत्तराचा समावेश आहे. 9. तक्रार दाखल झाल्यानंतर सामनेवालेना या कामी नोटीसा काढण्यात आल्या. सामनेवाले नेमलेल्या तारखेला हजर झाले व त्यांनी त्यांचे म्हणणे नि.15 अन्वये दाखल केले असून नि.16 अन्वये पुरावचे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. सामनेवालेनी त्यांच्या म्हणण्यामध्ये तक्रारदारांचा अर्ज खोटा असून तक्रारीस काही कारण घडले नाही असे नमूद करुन तक्रारअर्जास ग्राहक संरक्षण कायदयाच्या तरतुदीस अनुसरुन मुदतीची बाधा येते व खोटे कारण दाखवून 18 वर्षानंतर तक्रार दाखल केली आहे, सबब ती चालणार नाही. तसेच तक्रारीस एस्टॉपल बाय कॉंडक्ट तत्वाची बाधा येते त्यामुळे ती फेटाळावी. 10. तक्रारदाराची विनंती लक्षात घेता दस्त नोंदणीकृत झाल्यावर त्या दस्ताबाबतची माहिती दुय्यम निबंधक यांनी तलाठयाला पाठवावयाची असते व त्याप्रमाणे तलाठी 7/12ला योग्य ती नोंद करतो. त्याप्रमाणे जर नोंद झाली नाही तर महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड 1966च्या तरतुदीनुसार तिकडे अपील दाखल करणे आवश्यक असते. त्यामुळे ही तक्रार या मंचात चालणार नाही. दि.5-9-91च्या करारामध्ये तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे कोणत्याही कामकाजाबाबत कसलाही उल्लेख नाही. 18 वर्षानंतर अशा प्रकारच्या मागण्या करणे व सेवा दिली नसल्याचे म्हणणे मुळातच चुकीचे आहे. तसेच 18 वर्षानंतर तक्रारदार मंचाकडे आले आहेत याचाच अर्थ ते स्वच्छ हाताने आलेले नाहीत. त्यांचा हेतू स्पष्ट नाही. भूखंडाचा ताबा घेताना त्यांनी सर्व गोष्टीची खात्री करुनच ताबा घेतला होता व 18 वर्ष ते भूखंडाचा उपभोग घेत आहेत. त्यामुळे त्यांच्या या मागण्या 18 वर्षानंतर असल्यामुळे टिकणा-या नाहीत, तसेच त्यांनी 18 वर्षामध्ये सामनेवालेबरोबर कधीही पत्रव्यवहार केलेला नाही. मुळातच नोटीस 18 वर्षानी देऊन त्यांनी तक्रार मुदतीत येत असल्याचे भासवले आहे. भूखंडाचा ताबा घेऊन त्याचा उपभोग घेऊन त्यांनी अकारण या तक्रारी केल्या आहेत. तसेच त्यांची नुकसानभरपाईची मागणीही रास्त नाही. सबब या व इतर कारणाचा विचार करुन तक्रारदारांची तक्रार फेटाळण्यात यावी असे त्यांचे कथन आहे. 11. तक्रारदार व सामनेवालेंची कागदपत्रे वाचल्यानंतर सदर तक्रारीच्या निराकरणार्थ खालील मुद्दे मंचापुढे उपस्थित होतात- मुद्दा क्र.1 - तक्रारदारांची तक्रार ग्राहक संरक्षण कायदयाच्या 24(अ) नुसार मुदतीत आहे काय? उत्तर - नाही. मुद्दा क्र.2 - तक्रारदारांचा तक्रारअर्ज मंजूर करणे योग्य ठरेल काय? उत्तर - अंतिम आदेशात नमूद केल्याप्रमाणे. विवेचन मुद्दा क्र.1 12. मुळात तक्रारदारानी जी तक्रार दाखल केली आहे ती अनरजिस्टर्ड साठेखताच्या आधारे केली असून प्रस्तुतचे दोन दस्त हे दि.5-9-91 रोजी झाले आहेत. या कामी तक्रारदारानी त्यांना ताबा मिळाला नसल्याचे कथन केलेले नाही. तसेच त्यांनी सामनेवालेस पूर्ण रक्कम दिल्याचे कथन केले आहे. सामनेवालेनीही त्यांच्या म्हणण्यामध्ये त्यांना रक्कम मिळाली नसल्याचे कथन केलेले नाही. तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीत त्यांना संबंधित भूखंडाचा ताबा केव्हा मिळाला याची निश्चित तारीख नमूद केलेली नाही. ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदीनुसार मिळकतीचा ताबा घेतल्यानंतर दोन वर्षाचे आत सदोष सेवेच्या त्रुटीबाबत तक्रारदारानी तक्रार दाखल करणे आवश्यक होते. तशी तक्रार त्यांनी या कामी दाखल केलेली नाही. तक्रार त्यांनी 18 वर्षानी दाखल केली असल्याचे त्यांच्या कागदपत्रावरुन स्पष्ट दिसते. अनरजिस्टर्ड साठेखताच्या तारखेपासून तसेच दि.5-3-93 व दि.6-3-93 रोजी जी दोन वेगवेगळी बंधपत्रे तयार केली व त्यामध्ये सामनेवालेनी रक्कम पूर्ण मिळाल्याचे नमूद केले त्या तारखेपासून तक्रार दाखल करेपर्यंत तक्रारदारानी त्याबाबत काय केले व तक्रारदारांच्या कृत्यास सामनेवालेनी काय प्रतिसाद दिला या गोष्टीवर या तक्रारीस मुदतीची बाधा येईल किंवा नाही ही गोष्ट प्रामुख्याने अवलंबून आहे. तक्रारदारानी त्यांच्या तक्रारीत आम्ही सतत मागणी करीत होतो त्यास लेखी पत्रे देऊन विनंत्या करीत होतो असे नमूद केले आहे, परंतु प्रत्यक्षात त्यासंदर्भात कोणतेही कागद दाखल केल्याचे आढळून आले नाही. याचबरोबर मंचाचे मत असे आहे की, तक्रारदारानी लेखी विनंत्या केल्या, पत्रे पाठवली असे जरी वादासाठी मानले तरी सामनेवालेनी त्यास काय प्रतिसाद दिला, त्याबाबत त्यानी त्यास लेखी स्वरुपात काय कबूल केले या बाबीचा विचारही मंचास करणे आवश्यक आहे. याबाबत असे दिसून येते की, तक्रारदार म्हणतात ती पत्रे या कामी दाखल नाहीत. तसेच सामनेवालेकडून तशा काही पत्रांना उत्तरे दिल्याचे दिसून येत नाही. केवळ एकतर्फा पत्रव्यवहार झाला म्हणून तक्रार मुदतीत असल्याचे म्हणता येईल काय याचे उत्तर नाही असे आहे. जोपर्यंत सामनेवाले किंवा विरुध्दपक्ष पत्रांना प्रतिसाद देऊन त्या गोष्टी कबूल करुन त्याची पूर्तता करण्याचे आश्वासन देत नाही तोपर्यंत एकतर्फा पत्रव्यवहाराने मुदतीच्या बाहेर गेलेली बाब मुदतीत येईल असे मंचास वाटत नाही. प्रस्तुत तक्रारीत तक्रारदारानी सामनेवालेनी त्यांना रु.45,000/- प्लॉट नं.4च्या संदर्भात रु.45,000/- ची रक्कम मिळाल्याचे लिहून दिले आहे. तसेच त्या पावतीच्या खाली सामनेवालेनी असे लिहून दिले आहे की, भूखंडामध्ये झाडे लावणे व कंपौंड करणे ही कामे एच.डी.छगनलाल याने सांगितल्यानंतर पुरी केली जातील. हे लिखाण दि.6-11-91 रोजी झाले आहे. त्यानंतर तक्रारदारातर्फे दि.13-1-92 रोजी सामनेवाले क्र.3 चे नावे तक्रारदारानी नोटीस दिली आहे व तशाच मजकुराची नोटीस 22 जानेवारी 92 मध्ये सामनेवाले क्र.1 व 2 ला दिलेली आहे. तशीच नोटीस त्याने दि.3-2-92 रोजी सामनेवाले 1 व 2 ना दिलेली आहे. त्यानंतर दि.18-8-92 रोजी पुन्हा नोटीस दिली आहे. त्यानंतर दि.4-1-93 रोजी त्याने सामनेवालेला नोटीस देऊन कामाची पूर्तता करणेबाबत कळविले, तसेच जोपर्यंत तुम्ही रस्त्याचे काम पूर्ण करीत नाही तोपर्यंत मी पैसे देण्यास बांधील नसल्याचे कळविले आहे, त्याशिवाय त्यांनी इतर मागण्याही नोटीसीत केल्या आहेत. तक्रारदारानी ज्या पध्दतीने दि.13-1-92 पासून दि.4-1-93 अखेर पाठपुरावा केला व पूर्तता करणेसाठी सामनेवालेस सांगत होते. तसा पाठपुरावा त्यांनी 1993 नंतर 2008 पर्यंत केलेला नाही. सामनेवालेनी दि.6-3-93 रोजी त्यास बंधपत्र लिहून दिले आहे व प्रपोज्ड निसर्ग हार्टीकल्चरल सोसायटी स्थापन केल्याचे कळविले आहे. त्यामध्ये त्यांना त्यात सभासद करुन घेतल्याचेही कळविले आहे. या बंधपत्रावरुन असे दिसते की, सामनेवालेकडून तक्रारदारास दि.6-3-93 रोजी शेवटची पोच दिली गेली आहे. दि.6-3-93 नंतर ही तक्रार दोन वर्षात येणे आवश्यक होते. परंतु ही तक्रार या कालावधीत मंचाकडे आलेली नाही. ती का केली गेली नाही याचा योग्य तो खुलासा तक्रारदारानी केलेला नाही. आपल्या तक्रारीत केवळ मी त्यांना अनेकदा लेखी विनंत्या केल्या त्यास तक्रारदारानी प्रतिसाद दिला नाही असे म्हणून दि.12-3-08 रोजी शेवटची नोटीस दिली व त्या नोटिसीला सामनेवाले क्र.1 सुभाष प्रभुदेसाई यांनी उत्तर दिले. म्हणून त्याची तक्रार मुदतीत असल्याचे कथन केले आहे. या कामी सामनेवाले क्र.1 ने दिलेले उत्तर म्हणजे ती राहिलेले काम पूर्ण करण्याचे आश्वासन आहे किंवा नाही हे तपासून पहाता, तसे उत्तर, त्यांनी देऊन कोणतीही बाब कबूल केलेली नाही. उलट उत्तरात ते असे म्हणतात की, त्यांनी मुंबई सोडून बरीच वर्षे झाली आहेत, ते गोव्यात वास्तव्यास होते, त्यामुळे ते त्यांच्या नोटिसीला उत्तर देण्यास असमर्थ आहेत व त्याबाबत ते संजीव पत्की यांना कळवीत आहेत. केवळ हे उत्तर म्हणजे त्याची पोच व त्याने तक्रारदारास कराराप्रमाणे काम करण्याचे वचन किंवा आश्वासन दिले असे मानून ती बाब मुदतीत येईल काय हा विचार होणे आवश्यक आहे. केवळ अशा पोच मुळे प्रस्तुत बाब मुदतीत येईल असे मंचास वाटत नाही. सामनेवाले 1,2 यांनी निश्चितपणे उत्तर देऊन वचनांची पूर्तता करणे आश्वासन देणे गरजेचे होते तरच ती बाब मुदतीत बसेल असे मंचास वाटते. केवळ तक्रारदारानी नोटीस दिली व त्या नोटिसीला सामनेवाले 1 ने वर नमूद केल्याप्रमाणे उत्तर दिले म्हणून ती बाब मुदतीत येते असे मंचास वाटत नाही. तशी निश्चित स्वरुपाची कथने सामनेवालेकडून येणे आवश्यक असल्याचे मंचाचे मत आहे. ग्राहक संरक्षण कायदयातील कलम 24(अ) नुसार जर तक्रारीचे कारण मुदतीबाहेर गेले असेल तर तक्रार दाखल करण्यास विलंब का झाला व त्याबाबतचा विलंब माफ करुन तक्रार दाखल करुन घेण्याबाबत स्वतंत्र वेगळा अर्ज प्रतिज्ञापत्रासह देऊन दाखल करण्याची तरतूद कायदयातच आहे. परंतु त्या तरतुदीचे पालन तक्रारदारानी न करता 1993सालापासून दि. 12-3-08 पर्यंत काय घडले याचा खुलासा न करता, त्याबाबत सबळ योग्य पुरावा न देता तसेच विलंबमाफीचा अर्ज न देता त्यांनी जी नोटीस दिली व त्यास आलेले उत्तर म्हणजेच सामनेवालेनी दिलेली सहमती असे कारण गृहित धरुन तक्रारदारानी तक्रार मुदतीत दाखल केल्याचे म्हटले आहे. जे कायदयाच्या तरतुदीच्या विसंगत आहे. तक्रारदारानी विलंबमाफीचा अर्ज देऊन त्यासंदर्भात योग्य ते कारण देऊन विलंबमाफी करुन घेणे आवश्यक होते, तसे त्यांनी न करता त्यांनी नोटीस दिली व आलेले उत्तर हेच कारण धरुन तक्रार मुदतीत येते असे दाखवले. ते कायदेशीर नसल्याचे मंचाचे मत आहे. एकूण सर्व कारणांचा विचार करता तक्रारदारानी कायदयाच्या तरतुदीनुसार विलंबमाफीचा अर्ज दिलेला नाही, त्यामुळे तक्रारदार म्हणतात ते कारण गृहित धरुन तक्रारदारांची तक्रार मुदतीत असल्याचे मंचास वाटत नाही. अशा प्रकारे तक्रार मुदतीत बसते असे धरणे हे कायदयाच्या तरतुदीविरुध्द आहे. सबब मुद्दा क्र.1 चे उत्तर नाही असे आहे. विवेचन मुद्दा क्र.2 - 13. मुळातच तक्रारदारांचा अर्ज मुदतीत नाही असे मंचाचे मत आहे. त्यामुळे तक्रारदारांचा अर्ज त्यांच्या विनंतीप्रमाणे मंजूर करणे योग्य होईल असे मंचास वाटत नाही, त्यामुळे या मुद्दयाबाबत विवेचन देण्याचे कारण नाही. सबब एकूण सर्व गोष्टींचा विचार करता खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करण्यात येत आहे- -ः आदेश ः- 1. तक्रारदारांचा अर्ज खर्चासह नामंजूर करण्यात येत आहे. 2. सामनेवालेनी स्वतःचा खर्च स्वतः सोसण्याचा आहे. 3. सदर आदेशाच्या सत्यप्रती सर्व पक्षकाराना पाठविण्यात याव्यात. ठिकाण- रायगड- अलिबाग. दिनांक- 16-3-2009. (बी.एम.कानिटकर) (आर.डी.म्हेत्रस) सदस्य अध्यक्ष रायगड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,अलिबाग.
......................Hon'ble Shri R.D.Mhetras ......................Post vacant ......................Shri B.M.Kanitkar | |