Exh.No.51
सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
तक्रार क्र. 06/2015
तक्रार दाखल झाल्याचा दि.16/01/2015
तक्रार निकाल झाल्याचा दि. 28/01/2016
श्री. भिकाजी शिवराम इंदप
वय वर्षे 62, व्यवसाय – शेती,
राहणार – मु.पो.कोळोशी (गावठण),
ता.कणकवली, जि. सिंधुदुर्ग. ... तक्रारदार
विरुध्द
1) श्री. सतिश दिगंबर वंजारी
प्रोप्रा. गुरुकृपा कृषी सेवा केंद्र,
वय 60 वर्षे, व्यवसाय – व्यापार,
राहणार – मु.पो.कट्टा-वराड (हडपीड)
ता.मालवण, जि. सिंधुदुर्ग.
2) किसान क्राप्ट मशीन टूल्स प्रा.लि.
32/5 सी, दसराहाळी व्हिलेज,
दसरा हाळी, मेन रोड, एच.ए.फार्म पोस्ट, हेब्बल,
बेंगलोर 560 024 कनार्टका ... विरुध्द पक्ष.
गणपूर्तीः- 1) श्रीम. अपर्णा वा. पळसुले. अध्यक्ष
2) श्री कमलाकांत ध. कुबल, सदस्य
3) श्रीमती वफा ज. खान, सदस्या.
तक्रारदारतर्फे विधिज्ञ – श्रीमती मेघना सावंत
विरुद्ध पक्षातर्फे विधिज्ञ – श्री रुपेश परुळेकर.
निकालपत्र
(दि.28/01/2016)
द्वारा : मा.सदस्या, श्रीमती वफा जमशीद खान.
1) विरुध्द पक्ष यांनी सदोष पॉवर टिलरची विक्री करुन अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला तसेच त्या खरेदी केलेल्या पॉवर टिलरसंबंधाने विक्री पश्चात सेवा देण्यात कसूरी केलेमुळे झालेली नुकसानी मिळणेकरीता तक्रार दाखल करणेत आलेली आहे.
2) तक्रारीची थोडक्यात हकीकत अशी की, विरुध्द पक्ष 2 यांच्या कंपनीचा 93 ओडी 406 सी.सी.4 स्ट्रोकचा पॉवर टिलर दि.22/6/2014 रोजी तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष 1 यांचेकडून खरेदी केला. तो मुळातच सदोष (defective) असल्यामुळे त्यात वारंवार विविध समस्या येऊ लागल्या. त्याचा कोणताच उपयोग तक्रारदार यांना शेती कामासाठी होईना. म्हणून तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष 1 यांना वारंवार फोनद्वारे संपर्क साधून टिलरच्या समस्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला. परंतु विरुध्द पक्ष 1 ने तक्रारदार यांना योग्य ती सेवा देण्याचे टाळले. दि.4/12/2014 रोजी तक्रारदार यांनी त्यांचे वकीलामार्फत विरुध्द पक्ष 1 यांस नोटीस पाठवून सदोष टिलर परत घेऊन त्यांची रक्कम परत देण्याबाबत कळविले असता त्यांनी सदर नोटीसीस खोटे उत्तर दिले आणि स्वतःवरील जबाबदारी झटकली; म्हणून तक्रार दाखल केली.
3) तक्रारदार यांनी तक्रार अर्जात सदोष टिलरची किंमत रक्कम रु.1,33,000/-, भाडयाने टिलर घेण्याकरिता रक्कम रु.4,000/-, बैलजोडी घेण्यासाठी आलेला खर्च रु.35,000/-, तक्रारदार व त्यांचे कुटूंबियांना सोसाव्या लागलेल्या मानसिक, शारीरिक नुकसान भरपाईची रक्कम रु.50,000/- आणि तक्रारीचा खर्च रु.10,000/- ची मागणी केलेली आहे. तक्रारदार यांनी नि.4 चे कागदाचे यादीसोबत पॉवर टिलरचे बील, वॉरंटी कार्ड, विरुध्द पक्ष यांस पाठविलेल्या नोटीसची प्रत, पोष्टाच्या पावत्या, नोटीशीस विरुध्द पक्ष यांनी दिलेले उत्तर अशी कागदपत्रे दाखल केली आहेत.
4) तक्रार प्रकरणात विरुध्द पक्ष 1 हजर होऊन त्यांनी लेखी म्हणणे नि.क्र.11 वर दाखल केले असून तक्रारीतील मजकुर नाकारला आहे. विरुध्द पक्ष यांचे म्हणणे असे की, तक्रार अर्जात नमूद किसान क्राफ्ट कंपनीचा 93 ओडी 406 सीसी, 4 स्ट्रोक डिझेल रोट्री टिलर विरुध्द पक्षाकडून तक्रारदार यांनी कधीही खरेदी केलेला नाही. तर तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष यांचेकडून किसान क्राफ्ट 91 ओ डी 406 सी.सी , 4 स्ट्रोक डिझेल रोट्री टिलर खरेदी केलेला आहे. किसान क्राफ्ट कंपनी ही देशातील शेती उत्पादनासाठी लागणारी अवजारे विक्री करणारी अग्रगण्य कंपनी आहे. तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष यांचेकडून खरेदी केलेल्या टिलरमध्ये विक्रीपूर्व कोणताही दोष नव्हता. तक्रारदार यांनी खरेदी केलेल्या टिलरचे प्रात्यक्षिक विरुध्द पक्ष यांचेवतीने श्री अरविंद काराणे, रा.गुरामवाडी, ता.मालवण यांने तक्रारदार यांस त्यांचे कोळोशी येथील शेतावर करुन दाखविलेले होते. तसेच कंपनीकडून वॉरंटी अंतर्गत असलेल्या बाबींची स्पष्ट जाणीव करुन देवून वॉरंटी सर्टीफिकेट क्र.27773 हे दि.22/6/2014 रोजी तक्रारदार यांस देणेत आलेले होते.
5) विरुध्द पक्ष 1 यांचे पुढे असे म्हणणे आहे की, सदरच्या टिलरच्या सहाय्याने तक्रारदार यांनी स्वतःचे शेत नांगरण्याचे पुरेपुर काम केले. तसेच स्वतः व मजुरांकरवी टिलरचे क्षमतेबाहेर जावून आडदांडपणे त्याचा वापर केल्याने आणि टिलरचे गिअर बॉक्स मध्ये पुरेसे ऑईल न घातल्याने ऑक्टोबर 2014 मध्ये टिलरच्या गिअर बॉक्सची समस्या तक्रारदार यांचे निष्काळजीपणा व बेजबाबदारपणामुळे निर्माण झाली. शेती अवजाराचा वापर करीत असतांना त्याची नियमित देखभाल करणे हे अवजारधारकाचे काम आहे. त्यास अवजार उत्पादन कंपनीस व विक्रेत्यास कधीही जबाबदार धरता येत नाही.
6) तक्रारदार यांचे टिलरच्या गिअर बॉक्सची समस्या निर्माण झाल्यास विरुध्द पक्ष यांच्या वतीने कंपनीचे मेकॅनिक श्री शंकर यांनी गिअर बॉक्स दुरुस्तीसाठी कंपनीकडे पाठविला. सदर गिअर बॉक्स दुरुस्ती होऊन येताच दि.31/12/2014 रोजी विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांस रजिस्टर्ड पत्र पाठवून दि.3/1/2015 रोजी कंपनीचे मेकॅनिक तक्रारदार यांचे घरी येत असलेबाबत कळविले होते. हे पत्र तक्रारदारास दि.2/1/2015 रोजी मिळाले. परंतु दि.3/1/2015 रोजी कंपनीचे मेकॅनिक गिअर बॉक्स बसवणेस गेले असता तक्रारदाराने गिअर बॉक्स बसवणेस नकार दिला. विरुध्द पक्षाने गिअर बॉक्स बसवून घेण्यासाठी तक्रारदार यांस टिलरच्या वापरादरम्यान उद्भवलेल्या समस्येत विरुध्द पक्षाने विक्रेता या नात्याने सहकार्य केलेले आहे. त्यामुळे तक्रारदार या ग्राहकांस सेवा देण्यात विरुध्द पक्षाने कोणतीही हेळसांड केली नाही. विरुध्द पक्ष यांचेकडून अनुचित व्यापार प्रथा अगर सेवेतील त्रुटी याबाबतचे कोणतेही कृत्य कधीही घडलेले नाही. त्यामुळे तक्रारदाराचा तक्रार अर्ज खर्चासह फेटाळण्यात यावा असे विरुध्द पक्ष यांचे म्हणणे आहे.
7) विरुध्द पक्ष 2 यांस मुदतीत नोटीसची बजावणी होऊनही गैरहजर राहिल्याने एकतर्फा चौकशीचे आदेश पारीत करणेत आले.
8) तक्रारदार यांनी पुराव्याचे कामी शपथपत्र नि.क्र.14 वर दाखल केले त्यावर विरुध्द पक्ष यांनी लेखी प्रश्नावली दिली, ती नि.18 वर आहे. तसेच विरुध्द पक्ष क्र.1 ने दाखल केलेली कागदपत्रे नि.क्र.20 सोबत आहेत. त्यामध्ये विरुध्द पक्ष यांचे गुरुकृपा कृषी सेवा केंद्र यांचेमार्फत ग्राहकांसाठी प्रसिध्द केलेल्या महत्त्वाच्या सूचना, दि.19/11/2014 चे पत्र; तक्रारदार यांस पाठविलेले नोटीसचे उत्तराची स्थळप्रत, पोस्टाच्या पावत्या, दि.31/12/2014 रोजी तक्रारदारास पाठविलेले पत्र, पावती तसेच दि.5/1/2015 रोजी विरुध्द पक्ष 1 ने तक्रारदारास पाठविलेले पत्र, पावती परत आलेला बंद लखोटा, दि.15/1/2015 रोजी विरुध्द पक्ष 1 ने तक्रारदारास पाठविलेले पत्र, पावती, पोहोचपावती इ. कागदपत्रे दाखल केली आहेत. विरुध्द पक्ष 1 ने नि.क.14 वर दिलेल्या प्रश्नावलीस तक्रारदाराने दिलेली लेखी उत्तरावली नि.क्र.22 वर आहे. विरुध्द पक्ष 1 ने पुराव्याचे शपथपत्र दाखल केले ते नि.क्र.25 वर तसेच साक्षीदार अरविंद भास्कर काराणे यांचे शपथपत्र नि.क्र.26 वर आहे. त्यास तक्रारदाराने विचारलेली लेखी प्रश्नावली अनुक्रमे नि.क्र.32 व नि.क्र.33 वर असून त्याची लेखी उत्तरावली नि.क्र.34 व 36 वर आहे. विरुध्द पक्षातर्फे साक्षीदार क्र.2 शंकर ऊर्फ नितीन भिमराव कोकणे यांचे शपथपत्र नि.क्र.38 वर आहे. त्यास तक्रारदाराने विचारलेली लेखी प्रश्नावली नि.क्र.40 वर असून त्याची लेखी उत्तरावली नि.क्र.41 वर आहे. विरुध्द पक्षातर्फे कागदोपत्री पुरावा नि.क्र.43 सोबत आहे. तक्रारदारतर्फे लेखी युक्तीवाद नि.क्र.46 वर असून नि.क्र.47 चे कागदाचे यादीसोबत नादुरुस्त पॉवर टिलरचे फोटो (4), फोटोग्राफरचे बील आणि तक्रारदाराने विरुध्द पक्ष यांना पाठविलेल्या नोटीसची स्थळप्रत दाखल आहे. विरुध्द पक्ष 1 यांचा लेखी युक्तीवाद नि.क्र. 49 वर दाखल आहे. तक्रारदारतर्फे वकील श्रीम. मेघना सावंत आणि विरुध्द पक्ष 1 तर्फे वकील श्री. रुपेश परुळेकर यांचा तोंडी युक्तीवाद ऐकला.
9) तक्रारदार यांची तक्रार, विरुध्द पक्ष 1 चे लेखी म्हणणे, उभय पक्षकारांनी दाखल केलेली पुराव्याची कागदपत्रे, लेखी व तोंडी युक्तीवाद विचारात घेता खालील प्रमाणे मुद्दे व त्यावरील निष्कर्ष पुढीलप्रमाणे.
अ.क्र. | मुद्दे | निष्कर्ष |
1 | तक्रारदार हे विरुध्द पक्ष 1 व 2 यांचे ग्राहक आहेत काय ? | होय. |
2 | तक्रारदार यांना सेवा देण्यात विरुध्द पक्ष 1 व 2 यांनी त्रुटी ठेवली आहे का ? | नाही. |
3 | आदेश काय ? | खालीलप्रमाणे. |
10) मुद्दा क्रमांक 1 – i) तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष 2 कंपनीचा पॉवर टिलर विरुध्द पक्ष 1 यांचेकडून रक्कम रु.1,33,000/- देऊन खरेदी केला असल्याने तक्रारदार हे विरुध्द पक्ष 1 व 2 चे ग्राहक आहेत.
11) मुद्दा क्रमांक 2 – तक्रारदार यांची तक्रार ही विरुध्द पक्ष 1 व 2 यांनी सदोष पॉवर टिलर विक्री करुन विक्री पश्चात सेवा देण्यात त्रुटी केली या संबंधाने आहे. तक्रारदार यांनी दि.22/6/2014 रोजी पॉवर टिलर खरेदी केल्याचे उभय पक्षांना मान्य आहे. टिलर खरेदीनंतर तक्रारदार यांनी तो सुरु करण्याचा प्रयत्न केला परंतु तो सुरु झाला नाही. विरुध्द पक्ष यांस कळविल्यानंतर आठ दिवसांनी कंपनीचा मॅकेनिक येऊन त्याने दुरुस्ती केली. परंतु टिलरद्वारे नांगरणी केली असता दाते निखळणे, स्टार्टर रश्शी तुटणे, सेटींगचे चाक तुटणे, ऑईल बाहेर येणे इ. समस्या सुरु झाल्या. विरुध्द पक्ष यांना वारंवार फोनद्वारे कळवूनही विरुध्द पक्ष यांनी त्वरीत दुरुस्ती करुन दिली नाही. सुमारे 2-3 महिन्यांनी कंपनीचा मॅकेनिक येऊन त्यांने गिअर बॉक्सला आतून समस्या असल्याचे सांगून ऑक्टोबर 2014 मध्ये गिअर बॉक्स काढून नेला तो अदयापपर्यंत सुस्थितीत बसविलेला नाही व टिलरच्या अन्य समस्याही दूर करुन दिलेल्या नाहीत असे तक्रारदार यांचे कथन आहे.
ii) याउलट विरुध्द पक्ष 1 यांचे कथन असे की, टिलर विक्रीनंतर तक्रारदार यांना प्रत्यक्ष शेतावर जाऊन विरुध्द पक्ष यांचेवतीने श्री अरविंद काराण्णे यांनी टिलर चालविण्याचे प्रात्यक्षिक करुन दाखविले. तक्रारदाराने टिलरच्या साहाय्याने स्वतःचे शेत नांगरण्याचे पुरेपुर काम केले. टिलरच्या क्षमतेबाहेर जाऊन त्याचा वापर केल्याचे आणि टिलर बॉक्समध्ये पुरेसे ऑईल न घातल्याने ऑक्टोबर 2014 मध्ये टिलरच्या गिअर बॉक्सची समस्या तक्रारदारांचा निष्काळजीपणा व बेजबाबदारपणामुळे निर्माण झाली. ती समस्या निर्माण झाल्यावर विरुध्द पक्ष यांचे वतीने कंपनीचे मॅकेनिक श्री शंकर यांनी गिअर बॉक्स दुरुस्तीसाठी कंपनीकडे पाठविला. सदर कंपनीचे वर्कशॉप बेंगलोर येथे असल्याने तो तेथून दुरुस्त होवून आल्यावर दि.31/12/2014 रोजी तक्रारदार यांस लेखी पत्र पाठवून दि.3/1/2015 रोजी मॅकेनिक गिअर बॉक्स बसविण्यास येणार असल्याचे कळविले. ते पत्र दि.2/1/2015 रोजी तक्रारदास प्राप्त झाले. दि.3/1/2015 रोजी कंपनीचे मॅकेनिक गिअर बॉक्ससहीत तक्रारदार यांचे घरी जाऊनही तकारदार यांनी गिअरबॉक्स बसवून घेण्यास नकार दिला आणि विरुध्द पक्ष यांचेविरुध्द खोटी तक्रार दाखल केली. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांस सेवा देण्यात कोणतीही त्रुटी केलेली नाही.
iii) उभय पक्षांनी केलेला तोंडी पुरावा व कागदोपत्री पुरावा विचारात घेता दि.22/6/2014 पासून लगेचच पॉवर टिलर बिघडल्यासंबंधाने विरुध्द पक्ष यांना कळविल्याबाबत कोणताही कागदोपत्री पुरावा तक्रारदाराने दाखल केलेला नाही. तसेच पॉवर टिलर सदोष (defective) होता यासंबंधाने देखील कोणत्याही तज्ज्ञाचा अहवाल तक्रारदार यांनी या कामी दाखल केलेला नाही. ऑक्टोबर 2014 मध्ये गिअर बॉक्सची समस्या निर्माण झाली ही बाब विरुध्द पक्ष यांनी मान्य केली आहे. डिसेंबर 2014 मध्ये गिअर बॉक्स कंपनीकडून दुरुस्त होऊन आल्यावर तक्रारदार यांचेशी केलेला पत्रव्यवहार विरुध्द पक्ष क्र.1 यांनी तक्रार प्रकरणात सामील केला आहे. तक्रारदार यांचे पॉवर टिलरचा गिअर बॉक्स ऑक्टोबर 2014 मध्ये विरुध्द पक्ष कंपनीचे मॅकेनिकने काढून नेला तो दुरुस्त होऊन डिसेंबरच्या शेवटच्या आठवडयात आला. या झालेल्या उशीराबद्दल विरुध्द पक्ष 1 यांचेकडे विचारणा केली असता कंपनीचे वर्कशॉप बेंगलोर येथे असल्याने तेथून तो दुरुस्त होऊन येईपर्यंत कालावधी गेला त्यास विरुध्द पक्षास जबाबदार धरण्यात येऊ नये असे युक्तीवादामध्ये विरुध्द पक्षातर्फे सांगण्यात आले. तक्रार प्रकरणामधील कागदोपत्री पुरावा आणि उभय पक्षातर्फे करणेत आलेला युक्तीवाद यांचे अवलोकन करता विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार या ग्राहकांस सेवा देण्यात त्रुटी केल्याचे अथवा अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केल्याचे सिध्द होत नसल्याने या मुद्दयाचे उत्तर मंच नकारार्थी देत आहे.
12) मुद्दा क्रमांक 3 - तक्रारदार यांचे पॉवर टिलर गिअर बॉक्समध्ये बिघाड झाल्याचे व सदर गिअर बॉक्स दुरुस्त होऊन आल्याचे विरुध्द पक्ष क्र.1 यांनी कथन केले आहे. तसेच सदर तक्रारदार यांनी सहकार्य करणेची तयारी दर्शविल्यास गिअर बॉक्स जोडून देण्याची तयारी दर्शविली आहे. तक्रारदार यानी तक्रार अर्जामध्ये नमूद केलेल्या वर्णनाचा पॉवर टिलर विरुध्द पक्ष 1 यांनी तक्रारदार यांना विक्री केलेला नाही ही बाब कागदोपत्री पुराव्यावरुन स्पष्ट होते. विरुध्द पक्ष आणि तक्रारदार यांनाही ती बाब अवगत झालेली आहे. सदर बाब अवगत झाल्यानंतरही तक्रारदाराने तक्रार अर्जात तशी दुरुस्ती केलेली नाही. परंतु विरुध्द पक्षाने देखील त्यावर जास्त आक्षेप न घेता तक्रारदार यांनी त्यांचेकडून पॉवर टिलर खरेदी केल्याचे व त्याच पॉवर टिलरचा गिअर बॉक्स तक्रारदार यांनी योग्य ती काळजी न घेतलेने नादुरुस्त झालेला होता या बाबी मान्य केल्या आहेत. वॉरंटी कालावधीमध्ये गिअर बॉक्समध्ये बिघाड झाला असल्याने गिअर बॉक्स पॉवर टिलरला बसवून पॉवर टिलर चालू स्थितीत करुन देणे हे विरुध्द पक्ष 1 व 2 यांचे विक्रेता म्हणून कर्तव्य आहे. सबब विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांचे ताब्यातील पॉवर टिलर 91 ओडी 406 सीसी, 4 स्ट्रोक यांस गिअर बॉक्स बसवून तो पॉवर टिलर वापरायोग्य करुन देणे आवश्यक आहे असे मंचाचे मत आहे. तक्रारदाराने तक्रार अर्जात केलेल्या मागणीसंबंधाने बाबी पुराव्यानिशी सिध्द केलेल्या नसल्याने त्या नामंजूर करणेच्या मताशी मंच आलेला आहे. तथापि सदर टिलरला गिअर बॉक्स बसवून तो वापरायोग्य करुन देणेचा आदेश करणे योग्य व न्याय्य होईल असे या मंचाचे मत आहे. सबब मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
- तक्रार अर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.
- विरुध्द पक्ष 1 व 2 यांनी तक्रारदार यांचे ताब्यातील पॉवर टिलर क्र.91 ओडी 406 सी.सी. 4 स्ट्रोक यांस गिअर बॉक्स बसवून तो वापरायोग्य करुन देणेचा आहे. तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष यांस पॉवर टिलर दुरुस्तीसाठी उपलब्ध करुन देणेचा आहे.
- सदर आदेशाची पुर्तता आदेश प्राप्तीचे दिनांकापासून 15 दिवसांचे आत करणेत यावी.
- तक्रारदार यांच्या अन्य मागण्या नामंजूर करण्यात येतात.
- मा.राज्य आयोग, मुंबई यांचे परिपत्रक्र क्र.राआ/महा/आस्था/-3/जि.मं.कामकाज /परिपत्रक/2014/3752 दि.05 जुलै 2014 नुसार उभय पक्षकारांनी 45 दिवसानंतर म्हणजेच दि.11/03/2016 रोजी आदेशाची पुर्तता झाली किंवा नाही हे कळवणेसाठी या मंचासमोर हजर रहावे असे आदेश देण्यात येतात.
ठिकाणः सिंधुदुर्गनगरी
दिनांकः 28/01/2016
Sd/- Sd/- Sd/-
(वफा ज. खान) (अपर्णा वा. पळसुले) (कमलाकांत ध.कुबल)
सदस्या, अध्यक्ष, सदस्य
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
प्रत तक्रारदार यांना हातपोहोच/रजि पोस्टाने रवाना दि.
प्रत विरुद्ध पक्ष यांना हातपोहोच/रजि. पोस्टाने रवाना दि.