(मंचाचे निर्णयान्वये – श्रीमती आश्लेषा दिघाडे, सदस्या ,)
-- आदेश --
(पारित दिनांक 23 मार्च 2005)
तक्रारकर्त्याने सदर तक्रार, त्याने गैरअर्जदाराकडून घेतलेले वजनयंत्र बदलवून मिळावे किंवा वजनयंत्राची किंमत रु.11,800/- परत मिळावी याकरिता दाखल केलेली आहे.
तक्रारकर्त्याची तक्रार थोडक्यात अशी आहे की, तक्रारकर्त्याने गैरअर्जदार यांचेकडून दिनांक 1.3.2001 रोजी 20 किलोग्रॅम वजन क्षमतेचे वजनयंत्र विकत घेतले. वजनयंत्राची किंमत रु.11,800/- इतकी असून सदर रक्कम गैरअर्जदारांकडे हप्त्यानुसार जमा करावयाची होती. त्याप्रमाणे तक्रारकर्त्याने दि. 1.3.2001 ते 15.04.2002 या कालावधीत संपूर्ण रक्कम रु.11,800/- गैरअर्जदार यांचेकडे जमा केली. गैरअर्जदार यांनी तक्रारकर्त्याला वजनयंत्राची 3 वर्षाची हमी सुध्दा दिलेली होती. परंतु एक वर्षानंतर वजनयंत्र सदोष असल्याचे तक्रारकर्त्याच्या लक्षात आले. तक्रारकर्त्याने त्वरित याबाबत प्रतिनिधीला सूचना दिली. यानंतर वजनयंत्र चालू असतांनाच मध्ये बंद पडत असे आणि सरतेशेवटी वजनयंत्र कायमचे बंद पडले. तेव्हा तक्रारकर्त्याने सदर बाब प्रतिनिधीच्या पुन्हा लक्षात आणून दिली. परंतु गैरअर्जदार व त्यांचे प्रतिनिधी वजनयंत्र बदलवून किंवा दुरुस्त करुन देण्यास असमर्थ ठरले. त्यामुळे तक्रारकर्त्याला मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला. तेव्हा तक्रारकर्त्याने गैरअर्जदारांना दिनांक 17.05.2003 रोजी नोटीस दिला. परंतु गैरअर्जदारांनी नोटीस घेण्यास इन्कार केला. म्हणून नाईलाजाने तक्रारकर्त्याला सदर तक्रार मंचासमोर दाखल करावी लागली.
तक्रारकर्त्याच्या तक्रारीची नोंद घेऊन मंचाने गैरअर्जदारा विरुध्द नोटीस काढले. गैरअर्जदाराला नोटीस मिळाल्यानंतर त्यांनी घेण्यास इन्कार केला. तेव्हा दिनांक 23.08.2004 रोजी सदर दावा गैरअर्जदाराविरुध्द एकतर्फा चालविण्याचा निर्णय घेऊन तसा आदेश मंचाने पारित केला.
तक्रारकर्त्याला अनेक संधी देऊन सुध्दा तक्रारकर्ता सुनावणीकरिता मंचासमोर हजर झाला नाही. तेव्हा तक्रारकर्त्याचा तक्रार अर्ज व दाखल कागदपत्रे विचारात घेऊन गुणवत्तेच्या आधारावर सदर तक्रार निकाली काढण्याचा मंचाने निर्णय घेतला. यानुसार मंचाचे निकष खालीलप्रमाणे आहेत.-
तक्रारकर्त्याने गैरअर्जदाराकडून वजनयंत्र खरेदी केल्याचे त्याने दाखल केलेल्या निशाणी क्रं. 3 वरील कागदपत्रावरुन सिध्द होते. दिनांक 1.3.2001 ते 15.04.2002 या कालावधीत तक्रारकर्त्याने गैरअर्जदाराला रु.11,800/- इतकी रक्कम दिली असल्याचे म्हटले आहे. परंतु या पृष्ठयर्थ त्याने कोणताही लेखी पुरावा सादर केला नाही. तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या कागदपत्राचा आधार घेतला असता दिनांक 30.08.2001 रोजी रु.1,000/- व दि. 24.03.2001 रोजी रु.1,000/- म्हणजेच एकूण रु.2000/- इतकी रक्कम गैरअर्जदार यांचेकडे जमा केल्याचे त्याने दाखल केलेल्या पावत्यांवरुन सिध्द होते. त्यामुळे तक्रारकर्त्याने गैरअर्जदारांकडे रु.11,800/- जमा केल्याचे मान्य करता येणार नाही. तक्रारकर्त्याने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्याने गैरअर्जदार यांच्या प्रतिनिधीकडे पाच ते सहा वेळा वजनयंत्र सदोष असून बंद पडल्याची तक्रार केली. परंतु या म्हणण्याला पुरावा म्हणून मंचासमोर काहीही दाखल केले नाही. किंवा स्वतः हजर होऊन याबाबत खुलासा केलेला नाही. तसेच तक्रारकर्त्याने आपल्या तक्रारीसोबत स्वतःचे शपथपत्र जोडलेले नाही. तेव्हा त्याने आपल्या तक्रारीत केलेल्या कथनावर मंच विश्वास ठेवू शकत नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याने आपल्या तक्रार अर्जात केलेली रु.11,800/- परत मिळण्याची मागणी मान्य करता येणार नाही. तसेच त्याने केलेली रु.10,000/- नुकसानभरपाईची मागणी सुध्दा मान्य करता येणार नाही. कारण तक्रारकर्त्याला वजनयंत्र बंद असल्यामुळे कोणत्या प्रकारचे व किती आर्थिक नुकसान झाले याकरिता त्याने कोणताही कागदोपत्री पुरावा मंचासमोर सादर केलेला नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याने तक्रारीत केलेली मागणी ही पूर्णपणे मान्य करता येणार नाही. परंतु दाखल कागदपत्रांचा आधार घेऊन त्याची तक्रार अंशतः मान्य होण्यास पात्र आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे..
वरील सर्व विवेचनावरुन तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मान्य होण्यास पात्र आहे. करिता मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
// अं ति म आ दे श //
1 तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मान्य करण्यात येते.
2 गैरअर्जदार यांनी तक्रारकर्त्याला रु.2000/- एक महिन्याच्या आंत द्यावे.
3 गैरअर्जदार यांनी तक्रारदाराला तक्रारीचा खर्च म्हणून रु.200/- द्यावे..