-ः निकालपत्र ः- द्वारा- मा.अध्यक्ष,श्री.आर.डी.म्हेत्रस. 1. तक्रारदारांची तक्रार खालीलप्रमाणे- ते नागपूरचे रहिवासी असून त्यांना सामनेवालेनी काही पुस्तके खरेदी करणेसाठी पत्रव्यवहाराने सूचित केले. सामनेवालेनी तक्रारदारास रु.50,000/- प्रत्येक आठवडयास एक याप्रमाणे एकूण रु.2,50,000/- देण्यात येतील कारण तुम्ही प्राईज विनर झाले असल्याचे कळवले. त्या पत्रानुसार त्यांनी सामनेवालेच्या सर्व अटी पूर्ण केल्या आहेत व तुम्ही कबूल केल्याप्रमाणे बक्षिसासाठी पैसे देण्यासाठी 13-12-08 रोजी कळवले. त्याची पोच या कामी दाखल आहे. सामनेवालेनी दाद दिली नाही म्हणून तक्रारदारानी आपले वकील नरेश के.सिददम यांचेतर्फे नोटीसही दिली. परंतु सामनेवालेनी त्यास दाद दिली नाही म्हणून ही तक्रार दाखल केली आहे. 2. तक्रारीसोबत तक्रारदाराने स्वतंत्र प्रतिज्ञापत्र न देता तीच तक्रार नोटराईज्ड करुन दिली आहे. 3. याकामी सामनेवालेना नोटीस पाठवणेत आली. सदरची नोटीस अनक्लेम्ड म्हणून परत आली म्हणून मंचाने त्यांचेविरुध्द एकतर्फा चौकशी आदेश पारित केला. तक्रार आजरोजी सुनावणीसाठी आली असता तक्रारदार गैरहजर असल्याचे दिसून आले. म्हणून मंचाने कागदपत्रावरुन निकाल देण्याचे ठरवले. कागदपत्राचे अवलोकन केले असता असे दिसते की, तक्रारदार व सामनेवालेदरम्यान कोणतेही ग्राहकाचे नाते कायदयातील तरतुदीनुसार निर्माण होत नाही, तसेच तक्रारदार हे सामनेवालेनी त्याना जाहीर केलेंल्या बक्षिसाची रक्कम वसूल करुन मागत आहेत, हा व्यवहार ग्राहक संरक्षण कायदयांतर्गत येत नाही, तसेच हा ग्राहक वाद होत नसल्याचे मंचाचे मत आहे. तसेच तक्रारदाराने सामनेवालेस कोणत्याही प्रकारे कन्सीडरेशन दिलेले नाही, तसेच तशा प्रकारे मोबदला म्हणून किती रक्कम देण्याची होती याचा खुलासा तक्रारीवरुन होत नाही. केवळ आपण मोबदला देण्यास तयार आहोत म्हणून तो ग्राहक होईल असे मंचास वाटत नाही. 4. सबब या कारणास्तव ही तक्रार नामंजूर करावी या निष्कर्षाप्रत मंच आले आहे. . सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करण्यात येत आहे. -ः आदेश ः- 1. तक्रारदाराची तक्रार वर नमूद केलेल्या कारणास्तव खर्चासह निकाली करण्यात येत आहे. 2. सदर आदेशाची सत्यप्रत उभय पक्षकाराना पाठवण्यात यावी. ठिकाण- कोकण भवन, नवी मुंबई. दि. 6-4-2011. (ज्योती अभय मांधळे) (आर.डी.म्हेत्रस) सदस्या अध्यक्ष अति.ठाणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, नवी मुंबई.
| Hon'ble Mrs.Jyoti A.Mandhle, MEMBER | Hon'ble Mr. R. D. Mhetras, PRESIDENT | , | |