(आदेश पारित व्दारा -श्री विजय सी प्रेमचंदानी, मा.अध्यक्ष )
आदेश
- तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण अधिनियम 1986, च्या कलम 12 अन्वये प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे. तक्रारकर्त्याने तक्रारीत असे कथन केले आहे की, दिनांक 19.4.2015 रोजी त्यांचे घराचे हॉल स्वयंपाक घर यांना अल्युमिनीयमच्या खिडक्या बसविण्याचे ठरले त्याकरिता त्यांनी विरुध्द पक्षाला रुपये 170/- प्रती स्केअर फुट प्रमाणे काम दिले व त्याकरिता तक्रारकर्ता व विरुध्द पक्ष यांचेत तोंडी करार झाला म्हणुन तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाला अग्रीम रुपये 3000/- दिले. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला असे आश्वासन दिले होते की, दिनांक 22.4.2015 चे पूर्वी कराराप्रमाणे खिडक्याचे काम त्यांना करुन देईल परंतु विरुध्द पक्षाने तसे केले नाही, म्हणुन तक्रारकर्त्याने वारंवारं विरुध्द पक्षाकडे काम पूर्ण करण्याकरिता संपर्क साधला.विरुध्द पक्षाने त्याची दखल घेतली नाही. तक्रारकर्त्याने दुरध्वनीव्दारे विरुध्द पक्षाशी संपर्क साधला त्यावर विरुध्द पक्षाने कोणतीही दखल घेतली नाही म्हणुन दिनांक 3.5.2015 रोजी तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाशी संपर्क साधुन दिलेल्या पैशाची परत मागणी केली.विरुध्द पक्षाने त्यावर वाद निमार्ण केला व असे सांगीतले की तक्रारकर्त्याने फक्त रुपये 2000/- दिलेले आहे. विरुध्द पक्षाने सदर काम करुन दिले नाही, म्हणुन तक्रारकर्त्याला दुस-या माणसाकडुन काम करुन घ्यावे लागले, त्याकरिता रुपये 7000/- खर्च आला. विरुध्द पक्षाची सदरची कृती तक्रारकर्त्याचे प्रती अनुचित व्यवहार पध्दतीचा अवलंब असुन सदर तक्रार मंचासमक्ष दाखल करण्यात आलेली आहे.
- तक्रारकर्त्याने तक्रारीत अशी मागणी केलेली आहे की,विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला दिलेले रुपये 3000/- व्याजसह परत करावे. तसेच तक्रारकर्ता हे वयस्क व अपंग असल्याने त्यांना झालेल्या शारिरिक मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई मिळावी. अशी मागणी केलेली आहे.
- तक्रारकर्त्याची तक्रार स्वीकृत करुन, विरुध्द पक्षाला नोटीस काढण्याचा आदेश पारित करण्यात आला.विरुध्द पक्ष नोटीस मिळुन तक्रारीत हजर झाले व नि.क्रं.9 वर आपला लेखी जवाब दाखल केला. विरुध्द पक्षाने लेखी उत्तरात असे कथन केलेले आहे की, तक्रारकर्त्याने सदर तक्रार खोटी स्वरुपाची दाखल केलेली आहे व त्यांना कधीही कोणतेही काम विरुध्द पक्षाला दिलेले नव्हते व तक्रारकर्ता विरुध्द पक्षाचे ग्राहक नाही. तसेच सदर तक्रार खोटया तत्वांवर दाखल करण्यात आलेली असुन सदर तक्रार खारीज करण्यात यावी अशी विनंती करण्यात आलेली आहे.
- तक्रारककर्तीची तक्रार दस्तऐवज, शपथपत्र साक्षीदारांचे शपथपत्र विरुध्द पक्षाचे लेखी उत्तर, प्रतीउत्तर, व तक्रारकर्त्याचा लेखी युक्तीवाद व उभय पक्षकारांचा तोंडी युक्तीवादावरुन खालील मुद्दे मंचाचे विचारार्थ आले.
मुद्दे उत्तर
1. तक्रारकर्ता हा विरुध्द पक्षाचा ग्राहक आहे काय ? होय
2. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याचे प्रती अनुचित व्यवहार
पध्दतीचा अवलंब केलेला आहे काय? होय
3. आदेश काय अंतीम आदेशाप्रमाणे
कारणमिमांसा
- मुद्दा क्र.1 बाबत ः– तक्रारकर्त्याने दिनांक 19.4.2015 ला त्यांच्या घराचे खिडक्यांचे काम विरुध्द पक्षाला रुपये 170/- प्रती स्केअर फुट प्रमाणे काम दिले होते व त्याकरिता तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाला रुपये 3000/- दिले होते ही बाब तक्रारकर्त्याने दाखल तक्रार व नि.क्रं. 10 वर दाखल शपथपत्र नि.क्रं.11 तक्रारकर्ता व विरुध्द पक्षामधे झालेल्या संभाषणाची भाषंतरीत प्रत व शपथपत्र तसेच नि.क्रं.12 वर तक्रारकर्त्याचे शपथपत्र, नि.क्र. 13 वर तक्रारकर्त्याची पत्नीचे विजया नंदकिशोर शपथपत्रावरुन सिध्द होते. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाला दिलेल्या नोटीस व पत्रावरुन सिध्द होते. सबब तक्रारकर्ता हा विरुध्द पक्षाचा ग्राहक आहे ही बाब सिध्द होते. सबब मुद्दा क्रं.1 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येते.
- मुद्दा क्र.2 बाबत ः– विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याच्या घराचे खिडकी तयार करण्याकरिता रुपये 3000/- रक्कम घेतली होती हा मुद्दा सिध्द झालेले आहे व तक्रारकर्त्याने दाखल दस्तावरुन सिध्द झालेले असल्याने त्यांचे ते काम योग्य वेळेत पूर्ण करुन दिलेले नाही व त्यामूळे तक्रारकर्त्याला शारिरिक व मानसिक त्रास सहन करावा लागले असे तक्रार व दाखल साक्षी पुरावा व शपथपत्र व त्यांचे दस्तावरुन सिध्द होते. विरुध्द पक्षाने पैसे घेऊनही तक्रारकर्त्याचे काम केले नाही ही बाब विरुध्दपक्षाची तक्रारकर्त्याचे प्रती अनुचित व्यवहार पध्दतीचा अवलंब दर्शविते व सिध्द होते सबब मुद्दा क्रं.2 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येते.
- मुद्दा क्र.3 बाबतः- मुद्दा क्र. 1 ते 2 चे विवेचनावरुन खालीलप्रमाणे आदेश पारित करण्यात येतो.
- आ दे श -
1. तक्रारकर्त्याची तक्रार मंजूर करण्यात येते.
2. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याकडुन घेतलेली रक्कम 3000/- रुपये द.सा.द.शे. 18 टक्के दराने दिनांक 19.4.2015 पासून रक्कमेच्या प्रत्यक्ष अदायगीपावतो देण्यात यावी.
3. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास मानसिक व शारिरिक त्रासापोटी रुपये 3,000/-( रुपये तीन हजार फक्त)व तक्रारीच्या खर्चापोटी रु.2,000/-( रुपये दोन हजार फक्त) द्यावेत.
4. वरील आदेशाची पुर्तता विरुध्द पक्षाने आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसांचे आंत करावी
5. उभय पक्षकारांना आदेशाची प्रथम प्रत नि:शुल्क द्यावी.
6. तक्रारकर्त्याला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.