Exh.No.29
सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
तक्रार क्र. 27/2011
तक्रार दाखल झाल्याचा दि.15/07/2011
तक्रार निकाल झाल्याचा दि.23/05/2012
श्री अभिजित पंढरीनाथ महाले
वय – सज्ञान, धंदा – नोकरी,
7/35, बॅ.नाथ पै रोड, वेंगुर्ला
ता.वेंगुर्ला, जि.सिंधुदुर्ग
सध्या राहणार बांदा, ता.सावंतवाडी
जिल्हा सिंधुदुर्ग. ... तक्रारदार
विरुध्द
श्री मुकेश म. वझे
वय – सज्ञान, धंदा – बांधकाम व्यावसायीक,
1766,उषःकाल, अनंत गंगा भवन जवळ,
सिव्हिल हॉस्पीटल रोड, सांगली,
जि.सांगली. ... विरुध्द पक्ष.
गणपूर्तीः-
1) श्री. एम.डी. देशमुख, अध्यक्ष
2) श्रीमती वफा जमशीद खान, सदस्या.
3) श्रीमती उल्का राजेश गावकर, सदस्या
तक्रारदारातर्फेः- विधिज्ञ श्री. वाय. आर. खानोलकर
विरुद्धपक्षातर्फे- विधिज्ञ श्री. एम. वाय. सय्यद
(मंचाच्या निर्णयाद्वारे द्वारा श्रीमती उल्का गावकर, सदस्या)
निकालपत्र
(दि.23/05/2012)
1) बांधकामातील त्रुटीबाबत सदरची तक्रार दाखल करण्यात आली असून या तक्रारीची नोटीस विरुध्द पक्षास बजावण्यात आली आहे. त्यानुसार विरुध्द पक्ष हे आपल्या वकील प्रतिनिधीमार्फत मंचासमोर हजर होऊन त्यांनी त्यांचे लेखी म्हणणे नि.9 वर दाखल केले. तक्रारदाराचे वकील हजर असून त्यांनी लेखी युक्तीवाद दिला तसेच विस्तृत तोंडी युक्तीवाद केला. विरुध्द पक्ष व त्यांचे वकील गैरहजर. सदरचे प्रकरण नि.1 वर आदेश करुन आज रोजी अंतीम युक्तीवादासाठी ठेवण्यात आलेले होते.
2) तक्रारदाराची तक्रार थोडक्यात अशी की, तक्रारदार हे वेंगुर्ले येथील कायमचे रहिवासी असून विरुध्द पक्ष हे व्यवसायाने विकासक व बांधकाम व्यावसायीक असून ते साईकृपा कंस्ट्रक्शन या नावाने बांधकामे करतात. गाव मौजे बांदा, ता. सावंतवाडी येथील बिनशेती स.नं.138 अ हि.नं.11 क व 138 अ हि.नं.13 मध्ये “साईमंत्र ” या नावाने निवासी संकुलाचे सामनेवालाने बांधकाम सुरु केलेले होते. सदरहू संकुलातील सदनिका क्र.’एस.डी.’ ए विंग, दुसरा मजला, क्षेत्र 552 चौ.फू. ही सदनिका तक्रारदाराने सामनेवाला यांचेकडे दि.26/01/2010 रोजी युनियन बँक ऑफ इंडिया, शाखा-वेंगुर्ला यांचेकडील चेक क्र.001563, रक्कम रु.74,520/- एवढी रक्कम भरणा करुन बुक केली. सदरहू रक्कम भरुन सदर सदनिका बुक केलेनंतर तक्रारदाराने सामनेवाला यांना एकंदरीत रक्कम रु.4,11,140/- एवढी रक्कम अदा केली. सदरहू रक्कम मिळालेनंतर सामनेवाला यांनी सदरहू सदनिकेसंदर्भात करार करणे गरजेचे होते. परंतु असे असतांना सामनेवाला यांनी सदरहू सदनिकेचे बुकींग तक्रारदारला कोणतीही कल्पना न देता रद्द केले व तसे तक्रारदार यांना कळविले. प्रत्यक्षात तक्रारदार यांनी केव्हाही लेखी किंवा तोंडी सदरहू बुकींग रद्द करणेबाबत सामनेवाला यांना सांगीतलेले नव्हते. त्यामुळे तक्रारदार यांस मानसिक त्रास, आर्थिक नुकसान सोसावे लागले. त्यामुळे तक्रारदाराने सदरहू सदनिकेचे साठेखत करुन मिळण्याकरीता तसेच आर्थिक, मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई मिळणेकरीता सदरहू तक्रार दाखल केली आहे.
3) तक्रारदाराने त्याचे तक्रारीसोबत नि.4/1 ते 4/18 वर कागदपत्रे हजर केलेली आहेत.
4) सामनेवाला यांनी नि.9 वर आपले लेखी म्हणणे देऊन तक्रार अमान्य केलेली आहे. सामनेवाला यांच्या म्हणण्यानुसार तक्रारदाराचे मागणीनुसार वादग्रस्त सदनिकेचे बुकींग त्यांनी रद्द केले आहे व तक्रारदाराचे मागणीनुसारच रक्कम रु.4,11,140/- तक्रारदारास परत केलेली आहे, त्यामुळे त्यांचेतील ग्राहक हे नाते संपूष्टात आलेले आहे, त्यामुळे तक्रारदाराची तक्रार खर्चासह फेटाळण्याची विनंती केलेली आहे. तक्रारदार यांनी नि.10 वर आपल्या पुराव्याचे शपथपत्र दिलेले आहे. तसेच नि.11 वर कागदपत्रे हजर केलेली आहेत. सामनेवाला यांनी नि.23 वर आपल्या पुराव्याचे शपथपत्र दिलेले आहे. तक्रारदाराने नि.28 वर लेखी युक्तीवाद दिलेला आहे.
5) तक्रारदाराची तक्रार, सामनेवाला यांनी दाखल केलेले म्हणणे, दोन्ही बाजूंनी दाखल केलेली कागदपत्रे व शपथपत्रे यांचे अवलोकन मंचाने केलेले आहे. तक्रारदाराने नि.4/7 ते 4/14 वर सदनिकेच्या बुकींगसाठी भरलेल्या पावत्या हजर केल्या आहेत. सदरहू पावत्यांचे अवलोकन करता तक्रारदाराने एकूण रक्कम रु.4,11,140/- एवढी रक्कम सामनेवाला यांस अदा केलेली दिसते. सदरहू अदा केलेल्या रक्कमेचा तपशील खालीलप्रमाणे आहे.
परिशिष्ट ‘अ’
अ.क्र. | रक्कम रुपये | बँक शाखा व चेक क्रमांक | दिनांक |
1 | 74520 | युनियन बँक ऑफ इंडिया शाखा वेंगुर्ले चेक क्र.001563 | 26/01/2010 |
2 | 70380 | युनियन बँक ऑफ इंडिया शाखा वेंगुर्ले चेक क्र.001565 | 26/03/2010 |
3 | 1240 | बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा बांदा चेक क्र.728025 | 30/05/2010 |
4 | 65000 | युनियन बँक ऑफ इंडिया शाखा वेंगुर्ले चेक क्र.001566 | 30/05/2010 |
5 | 150000 | सारस्वत को.ऑप बँक लि.शाखा वेंगुर्ले चेक क्र.151176 | 13/09/2010 |
6 | 20000 | बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा बांदा चेक क्र.728039 | 17/01/2011 |
7 | 30000 | युनियन बँक ऑफ इंडिया शाखा वेंगुर्ले चेक क्र.001574 | 24/01/2011 |
6) सदरहू रक्कम अदा केल्यानंतर सामनेवाला यांनी तक्रारदार यांच्यासोबत करार करणे आवश्यक होते परंतु तक्रारदार व सामनेवाला यांच्यात पूर्ण सदनिकेचा व्यवहार हा किती रक्कमेसाठी झालेला होता याबाबत कोणताही पुरावा तक्रारदाराने किंवा सामनेवाला यांनी मंचासमोर आणलेला नाही. तक्रारदाराचे वकीलांनी युक्तीवादाच्या वेळी सदरहू व्यवहार किती रक्कमेत झाला होता हे दाखवण्यास असमर्थता दर्शविली, तसेच त्यांनी आपल्या तक्रारीतील मागणी क्र.2 व 3 रद्द करीत आहोत असे सांगीतले व इतर मागण्याप्रमाणे आपली तक्रार मंजूर होणेस मे. मंचास विनंती केली. त्याचप्रमाणे मे. मंचासमोर आलेला पुरावा नि.4/4, 4/5 व 4/6 वरील कागदपत्राचे अवलोकन करता सामनेवाला यांनी तक्रारदाराची मागणी नसतांनाही वादग्रस्त सदनिकेचे बुकींग रद्द केलेले आहे असे दिसते. त्यामुळे साहजिकच तक्रारदारास आर्थिक, मानसिक त्रास सहन करावा लागला अशा निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. तसेच तक्रारदारास कोणतीही सुचना न देता सामनेवाला यांनी वादग्रस्त सदनिकेचे बुकींग रद्द केल्यामुळे सदरहू तक्रारीचा खर्च तक्रारदार यांना करावा लागला, तो ही खर्च सामनेवाला हे तक्रारदार यांस देण्यास जबाबदार आहेत, असे निष्कषापर्यत मंच आलेला आहे. तसेच तक्रारदाराने सामनेवाला यांना अदा केलेली रक्कम सामनेवाला यांनी तक्रारदारास परत केलेली आहे हे तक्रारदारास मान्य आहे परंतु सदरहू रक्कम ही सामनेवाला यांनी आपणाकडे ठेवली असलेमुळे तक्रारदारचे नुकसान झालेले आहे त्यामुळे सदरील रक्कमेवरील व्याज मिळणेस तक्रारदार पात्र आहे असे आमचे मत आहे. त्यामुळे तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्याच्या दृष्टीने हे खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहेत.
आदेश
1) तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2) सामनेवाला यांनी वर नमूद परिशिष्ट ‘अ’ तपशीलामध्ये कॉलम नं.2 मध्ये नमूद केलेल्या रक्कमेवर कॉलम नं.4 मध्ये नमूद केलेल्या तारखेपासून 9 % व्याज अदा करावे.
3) सामनेवाला यांनी तक्रारदार यांस दिलेल्या आर्थिक व मानसिक त्रासापोटी रु.15,000/- (रुपये पंधरा हजार मात्र) अदा करावेत.
4) सामनेवाला यांनी तक्रारदार यांस तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.3,000/-(रुपये तीन हजार मात्र) अदा करावी.
5) तक्रारदाराच्या इतर मागण्या फेटाळण्यात येतात.
ठिकाणः सिंधुदुर्गनगरी
दिनांकः 23/05/2012
sd/- sd/- sd/-
(उल्का गावकर) (एम.डी. देशमुख) (वफा खान)
सदस्या, अध्यक्ष, सदस्या,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
प्रत तक्रारदार यांना हातपोहोच/रजि पोस्टाने रवाना दि.
प्रत विरुद्ध पक्ष यांना हातपोहोच/रजि. पोस्टाने रवाना दि.