Exh.No.24
सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
तक्रार क्र.17/2015
तक्रार दाखल झाल्याचा दि.20/03/2015
तक्रार निकाल झाल्याचा दि.04/11/2015
श्री बाळकृष्ण गोविंद कदम
वय वर्षे 73, व्यवसाय- निवृत्त,
सध्या राहणार – मु.पो. कलीमठ,
ता.कणकवली, जिल्हा – सिंधुदुर्ग ... तक्रारदार
विरुध्द
- श्री मंगेश मोहन शिरवलकर
वय वर्षे 26, व्यवसाय – ठेकेदार,
राहणार – मु.पो. शिरवल,
ता.कणकवली, जिल्हा – सिंधुदुर्ग
2) श्री अमिरुद्दीन उस्मान शेख
वय वर्षे -35 व्यवसाय – ठेकेदार,
राहणार – मु.पो. कलमठ (मुस्लिमवाडी),
ता.कणकवली, जिल्हा – सिंधुदुर्ग
3) श्री रोशन परशुराम वारगांवकर
वय वर्षे 24, व्यवसाय – ठेकेदार,
राहणार – मु. पो.जामसंडे,
ता.देवगड, जिल्हा – सिंधुदुर्ग
4) श्री यशवंत मोहन शिरवलकर
वय वर्षे 28, व्यवसाय – ठेकेदार,
राहणार – मु.पो. शिरवल,
ता.कणकवली, जिल्हा – सिंधुदुर्ग ... विरुध्द पक्ष.
गणपूर्तीः- 1) श्री कमलाकांत ध. कुबल, प्रभारी अध्यक्ष
2) श्रीमती वफा ज. खान, सदस्या.
तक्रारदारतर्फे विधिज्ञ – कु.मेघना सावंत.
विरुद्ध पक्ष 1 ते 4 – एकतर्फा गैरहजर.
निकालपत्र
(दि.04/11/2015)
द्वारा : मा.सदस्या, श्रीमती वफा जमशीद खान.
1) तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष यांचेकडून घेतलेल्या घर बांधकामाचे सेवेमध्ये निष्काळजीपणा व सेवेतील त्रुटी झालेमुळे विरुध्द पक्षाविरुध्द ग्राहक तक्रार दाखल करणेत आलेली आहे.
2) तक्रारीची थोडक्यात हकीगत अशी की, तक्रारदार व विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांचेत दि.10/03/2014 रोजी घरबांधकामाच्या अटीशर्तीबाबत करारपत्र झाले. सदर बांधकामाचा एकूण मोबदला रक्कम रु.5,15,000/- (रुपये पाच लाख पंधरा हजार मात्र) इतका ठरला. सदर बांधकाम दि.5/6/2014 पर्यंत पूर्ण करावयाचे असतांना विरुध्द पक्ष यांनी कामास सुरुवातही केली नाही. तक्रारदार यांनी घराचे काम लवकरात लवकर पूर्ण होईल व घरात राहावयास मिळेल या अपेक्षेने विरुध्द पक्ष यांना कराराचे तारखेपूर्वी तसेच त्यानंतर अशी एकूण रक्कम रु.4,80,000/- विरुध्द पक्ष 1 ते 4 यांना पोहोच केली. ऑक्टोबर 2014 पर्यंत विरुध्द पक्ष 1 ते 4 यांनी तक्रारदार यांच्या घराच्या केवळ भिंती उभ्या केल्या व काम थांबविले. तक्रारदार यांनी विचारणा केल्यावर विरुध्द पक्ष क्र.1 ते 4 यांनी दि.10/10/2014 रोजी नोटरी, कणकवली यांचेसमोर दि.10/11/2014 पर्यंत घराचे बांधकाम पूर्ण करुन घराची चावी तक्रारदार यांचे हातात देतो असे हमीपत्र लिहून दिले, परंतु त्यानंतर कोणतेही बांधकाम केले नाही.
3) विरुध्द पक्ष 1 ते 4 हे कराराप्रमाणे बांधकाम करण्याचे टाळू लागल्याने तक्रारदार यांनी दि.14/11/2014 रोजी वकीलामार्फत नोटीस पाठवून अपूर्ण बांधकाम पूर्ण करणेस कळविले. दरम्यानच्या काळात विरुध्द पक्ष क्र.4 यांनी तक्रारदार यांचे घराचे बांधकाम पूर्ण करण्याचे शक्य होत नसल्याचे सांगून रक्कम रु.2,00,000/- चा धनादेश दिला, परंतू तो वटला नाही. तसेच विरुध्द पक्ष यांनी रक्कम स्वीकारुनही कराराप्रमाणे बांधकाम पूर्ण करुन दिले नाही म्हणून करारापोटी स्वीकारलेली रक्कम रु.4,80,000/-, भाडयाच्या घरात राहात असल्याने प्रतिमहिना रु.1200/- प्रमाणे घरभाडे, विरुध्द पक्ष यांच्या सेवेतील त्रुटीमुळे झालेल्या शारीरिक, मानसिक व आर्थिक नुकसान भरपाईची रक्कम रु.1,00,000/- आणि तक्रार खर्च रु.10,000/- मिळणेसाठी तक्रार दाखल केली आहे.
4) सदर तक्रारीची नोटीस विरुध्द पक्ष 1,2,4 यांना प्राप्त झाली, परंतू त्यांनी लेखी म्हणणे म्हणणे दाखल केले नाही. विरुध्द पक्ष क्र.3 यांनी नोटीस स्वीकारली नसल्याने नोटीसचा लखोटा परत आला. त्यामुळे त्यांचेविरुध्द एकतर्फा चौकशीचे आदेश पारीत करणेत आले.
5) तक्रारदार यांनी तक्रार अर्जासोबत विरुध्द पक्ष व तक्रारदार यांचेत झालेले दि.10/3/2014 रोजीचे करारपत्र, दि.10/10/2014 रोजी तक्रारदार व विरुध्द पक्ष यांचेत झालेले हमीपत्र, तक्रारदार यांनी वकीलामार्फत विरुध्द पक्ष यांना पाठविलेली दि.14/11/2014 ची नोटीस प्रत, पोष्टाच्या पोहोचपावत्या व लखोटा असे कागदपत्र नि.4 सोबत दाखल केले आहेत. तसेच नि.18 वर पुराव्याचे शपथपत्र आणि नि.19 सोबत जितेंद्र शिवराम कांबळे, कॉन्ट्रॅक्टर यांनी दि.1/7/2015 रोजी दिलेल्या बांधकामाचा पाहाणी अहवाल तक्रारदार यांनी दाखल केला आहे. तक्रारदार यांनी त्यांचा लेखी युक्तीवाद नि.23 वर दाखल केला आहे. विरुध्द पक्ष 1 ते 4 प्रकरणात गैरहजर असल्याने त्यांचेकडून कोणताही पुरावा दाखल नाही.
6) तक्रारदार यांची तक्रार, पुराव्याची कागदपत्रे, लेखी युक्तीवाद विचारात घेता खालीलप्रमाणे मुद्दे निष्कर्षासाठी निघतात. त्याची कारणमिमांसा पुढीलप्रमाणे देत आहोत.
अ.क्र. | मुद्दे | निष्कर्ष |
1 | तक्रारदार हे विरुध्द पक्ष यांचे ग्राहक आहेत काय ? | होय. |
2 | विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार या ग्राहकाला सेवा देण्यात त्रुटी केली आहे काय ? | होय. |
3 | तक्रारदार कोणता अनुतोष मिळणेस पात्र आहेत ? | खालीलप्रमाणे. |
7) मुद्दा क्रमांक 1 व 2 - तक्रारदार क्र.1 व 2 मध्ये घरबांधकामासंबंधाने झालेला करार नि.4/1 वर असून वाढीव बांधकामासंबंधाने तक्रारदार व विरुध्द पक्ष 1 ते 4 यामध्ये झालेला करार नि.4/2 वर आहे. कराराप्रमाणे रक्कम रु.4,80,000/- स्वीकारल्याचे विरुध्द पक्ष 1 ते 4 यांनी नि.4/2 मध्ये मान्य केले आहे. तक्रारदार आणि विरुध्द पक्ष यांचेकडून घर बांधकामासंबंधाने सेवा घेतली असल्याने तक्रारदार हे विरुध्द पक्ष यांचे ग्राहक आहेत. तसेच कराराप्रमाणे विरुध्द पक्ष यांनी रक्कम स्वीकारुनही मुदतीत बांधकाम पूर्ण करुन दिले नाही. ही बाब विरुध्द पक्ष यांची बांधकाम सेवेतील त्रुटी स्पष्ट करते असे मंचाचे मत आहे.
8) मुद्दा क्रमांक 3 – i) तक्रारदार यांनी करारपत्राप्रमाणे बांधकामाचा ठेका विरुध्द पक्ष यांना दिला होता. त्यापोटी तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष यांना रु.4,80,000/- दिल्याचे विरुध्द पक्ष यांनी मान्य केले आहे. तसेच लेंटल लेव्हल पर्यंतच काम पूर्ण करुन उर्वरीत बांधकाम बंद ठेवल्याचेही नि.4/2 मध्ये कबूल करुन दि.10/11/2014 पर्यंत संपूर्ण बांधकाम वाढीव बांधकामासहीत पूर्ण करण्याचे लेखी अभिवचन देऊनही घराचे बांधकाम मुदतीत पूर्ण करुन दिले नाही. तक्रारदार हे सेवानिवृत्त असून विरुध्द पक्ष यांच्या या कृतीमुळे व सेवेतील त्रुटीमुळे तक्रारदार यांस शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रासास सामोरे जावे लागले. तसेच तक्रारदार यांना घर बांधकाम पूर्ण करुन मिळाले नसल्याने भाडयाच्या घरात दरमहा रु.1200/- देऊन रहावे लागले त्यामुळे त्यांस अतिशय त्रास झाला व त्यांच्या घराचे स्वप्न अपूरे राहिले असे तक्रारदार यांचे म्हणणे आहे.
ii) विरुध्द पक्ष यांनी कोणतेही म्हणणे न दिल्याने तक्रारदाराची तक्रार मान्य असल्याचे हे मंच गृहीत धरते. तथापि तक्रारदार यांनी दाखल केलेला कागदोपत्री पुरावा तपासणे गरजेचे आहे. तक्रारदार यांनी तक्रार प्रकरणात विरुध्द पक्ष यांनी घराच्या केलेल्या कामाचा मुल्यांकन अहवाल दाखल केला आहे. तो नि.19/1 वर आहे. सदर मुल्यांकन अहवालाच्या तपशीलाची खात्री करता विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांच्या घरासाठी केलेला खर्च रु.2,22,490/- असल्याचे दिसून येते. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांचेकडून करारापोटी रक्कम रु.4,80,000/- स्वीकारले असून घर बांधकामासाठी रक्कम रु.2,22,490/- खर्च केले असल्याने उर्वरीत रक्कम रु.2,57,510/- विरुध्द पक्ष यांचेकडून मिळणेस तक्रारदार हे पात्र आहेत असे मंचाचे मत आहे.
iii) विरुध्द पक्ष 1 ते 4 यांच्या बांधकाम सेवेतील त्रुटीमुळे झालेल्या मानसिक, शारीरिक व आर्थिक नुकसानीपोटी रक्कम रु.25,000/- आणि तक्रार अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.10,000/- मिळणेस तक्रारदार पात्र आहेत असे मंचाचे मत आहे.
iv) तक्रारदार भाडयाच्या घरात राहात असलेसंबंधाने कोणताही पुरावा मंचासमोर दाखल नसल्याने सदर मागणी फेटाळण्यात येते.
v) उपरोक्त विवेचनानुसार तक्रारदार यांची तक्रार अंशतः मंजूर करुन खालीलप्रमाणे आदेश पारीत करणेत येतो
आदेश
- तक्रारदार यांची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
- विरुध्द पक्ष 1 ते 4 यांनी तक्रारदार यांचेकडून बांधकामापोटी स्वीकारलेल्या रक्कमपैकी शिल्लक रक्कम रु.2,57,510/-(रुपये दोन लाख सत्तावन्न हजार पाचशे दहा मात्र) व त्यावर दि.20/03/2015 पासून रक्कम फिटेपर्यंत द.सा.द.शे. 9% व्याजदराने रक्कम तक्रारदारास परत करण्याचे आदेश पारीत करणेत येतात.
- तसेच तक्रारदार या ग्राहकांस सेवा देण्यात त्रुटी केल्याने झालेल्या शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून रक्कम रु.25,000/- (रुपये पंचवीस हजार मात्र) आणि तक्रार अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.10,000/-(रुपये दहा हजार मात्र) विरुध्द पक्ष 1 ते 4 यांनी तक्रारदार यांस दयावेत.
- विरुध्द पक्ष 1 ते 4 यांनी वरील आदेशाची अंमलबजावणी 45 दिवसांचे आत न केलेस तक्रारदार ग्राहक संरक्षण कायदा कलम 25 व 27 अन्वये विरुध्द पक्ष यांचेविरुध्द दंडात्मक कारवाई करु शकतील.
- मा.राज्य आयोग, मुंबई यांचे परिपत्रक्र क्र.राआ/महा/आस्था/-3/जि.मं.कामकाज/ परिपत्रक/2014/3752 दि.05 जुलै 2014 नुसार उभय पक्षकारांनी 45 दिवसानंतर म्हणजेच दि.18/12/2015 रोजी आदेशाची पुर्तता झाली किंवा नाही हे कळवणेसाठी या मंचासमोर हजर रहावे असे आदेश देण्यात येतात.
ठिकाणः सिंधुदुर्गनगरी
दिनांकः 04/11/2015
सही/- सही/-
(वफा ज. खान) (कमलाकांत ध.कुबल)
सदस्या, प्रभारी अध्यक्ष,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
प्रत तक्रारदार यांना हातपोहोच/रजि पोस्टाने रवाना दि.
प्रत विरुद्ध पक्ष यांना हातपोहोच/रजि. पोस्टाने रवाना दि.