जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, गडचिरोली
ग्राहक तक्रार क्र. :- CC/25/2022 तक्रार नोंदणी दि. :- 09/06/2022
अंतिम आदेश दि. :- 16/04/2024
निर्णय कालावधी :- 01 व., 10 म., 07 दि.
अर्जदार / तक्रारकर्ता :- सचिन सुरेश कारपेनवार,
रा. घोट, ता. चामोर्शी,
जि. गडचिरोली.
विरुध्द
गैरअर्जदार / विरुध्दपक्ष :- 1) मधुकर मानकर (प्रो. प्रा. अंजनी ट्रॅव्हल्स),
पत्ता – शॉप नं. 4, ग्रामीण कोंग्रेस भवन,
डालडा फॅक्टरी रोड, एस. टी. स्टँड जवळ,
गणेशपेठ, नागपूर – 24.
2) उमेश आत्राम (ट्रॅव्हल्स चालक)
3) राजकुमार दलांजे (ट्रॅव्हल्स चालक)
4) धनराज आंबेकर (ट्रॅव्हल्स चालक)
अर्जदार / तक्रारकर्ता तर्फे :- स्वतः
गैरअर्जदार / विरुध्दपक्ष 1 ते 4 तर्फे :- एकतर्फी
गणपूर्ती :- श्री. नितीनकुमार चं. स्वामी, मा. अध्यक्ष,
श्रीमती. रोझा फु. खोब्रागडे, मा. सदस्या,
श्रीमती. माधुरी के. आटमांडे, मा. सदस्या.
:: निकालपत्र ::
(आयोगाचे निर्णयान्वये, श्रीमती रोझा फु. खोब्रागडे, सदस्या)
(आदेश पारीत दि. 16/04/2024)
तक्रारकर्ता प्रस्तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 2019 चे कलम 35(1) अंतर्गत दाखल केलेली आहे. तक्रारीचा थोडक्यात आशय खालीलप्रमाणे :-
- तक्रारकर्ता घोट येथे 8 वर्षापासून “एस के मोबाईल” शॉप चालवत आहे व ते मोबाईलचे साहित्य व मोबाईल नागपूर येथून बोलवितात. तक्रारकर्त्याने दि. 31/05/2022 ला श्री शुभलक्ष्मी कलेक्शन शॉप नंबर LS. 15 अमृता बाजार कॉम्प्लेक्स सिताबर्डी, नागपूर येथून (1) Realme C35 4/128 IMEI No – 863802068074272 PRICE Rs. 13000/- आणि (2) Itel A48 2/32 PRICE RS. 5900/- PARCEL CHARGES Rs. 100/- असे रु. 19,000/- चे दोन मोबाईल अंजनी ट्रॅव्हल्स क्र. MH-40 AT 652 मालाचा बिल्टी क्र. 5701 या ट्रॅव्हल्स ने नागपूर वरुन घोटला आणत होते. रोजच्या वेळेनुसार रात्री 10 वाजताच्या सुमारास तक्रारकर्ता ट्रॅव्हल्सवाल्याकडून आपले पार्सल आणावयास गेले असता ट्रॅव्हल्सवाल्यांना पार्सल दिसले नाही. दुसऱ्या दिवशी माहिती काढून आणून देण्यात येईल, असे ट्रॅव्हल्स ट्रॅव्हल्सवाल्यांनी सांगितले. दुसऱ्या दिवशी तक्रारकर्ता ट्रॅव्हल्सवाल्याकडे गेले असता पार्सल चोरीला गेले असेल, ती माझी जबाबदारी नाही. मी काही तुम्हाला पार्सल टाकावयास सांगितले नाही, जे करायचे आहे ते करा अश्या शब्दात ट्रॅव्हल्स मालक बोलले. वारंवार फोन केला असता धमकी देऊन मी तुमचं बरवाईट करेन, तुम्ही मला काहीही करू शकत नाही आणि पुनः फोन करू नका, अश्या भाषेत शिवीगाळ केले.
- तक्रारकर्त्याने ज्याच्याकडून मोबाईल विकत घेतले त्यांनी अंजनी ट्रॅव्हल्स नागपूरच्या ऑफिसमध्ये जावून पार्सल घोटला पाठविण्यासाठी दिले व दिलेल्या पार्सलची 100 रुपये चार्जेस देवून रसीद घेतली. ऑफिसमध्ये कॉल करून विचारणा केले असता ट्रॅव्हल्स वाहकाणे ऑफिसमधून पार्सल सोबत घेऊन गेले असे सांगितले व हे पर्सलचे चार्जेस ट्रॅव्हल्स मालकाला जातात आणि या पार्सलची जिम्मेदारी ही मालकाची असते अस त्या ऑफिस वाल्याचे म्हणणे होते. ट्रॅव्हल्स वाल्यांच्या निष्काळजीपणामुळे तक्रारकर्त्याचे नुकसान झालेले आहे. त्यामुळे विरुद्ध पक्षाने तक्रारकर्त्यास मोबाईल पार्सलची एकूण रक्कम रु. 19,000/- व त्यावर 9% व्याज देण्याची तसेच शारीरिक व मानसिक त्रासापोटी रु. 10,000/- व तक्रारीचा खर्च रु. 5,000/- तक्रारकर्त्यास देण्याची विनंती या आयोगाला केलेली आहे.
- तक्रारकर्त्याने निशाणी क्र. 2 नुसार 4 झेरॉक्स दस्तऐवज दाखल केले. तक्रारकर्त्याची तक्रार नोंदणी करून विरुध्द पक्षांना नोटीस काढण्यात आली. विरुद्ध पक्ष क्र. 1 ते 4 यांना नोटीस मिळून सुद्धा ते आयोगात हजर न झाल्यामुळे दि. 29/08/2022 रोजी निशाणी क्र. 1 वर गैरअर्जदार क्र. 1 ते 4 विरुद्ध प्रकरण एकतर्फी चालविण्याचे आदेश पारित करण्यात आले.
- तक्रारकर्त्याने दाखल केलेली तक्रार, दस्तऐवज, शपथपत्र लेखी व तोंडी युक्तिवादावरुन सदर तक्रारीच्या निवारणार्थ खालील मुद्द्यांवर निर्णय देणे आवश्यक आहे.
अनु क्र. | मुद्दे | निष्कर्ष |
1. | तक्रारकर्ता हा विरुध्द पक्षाचा ग्राहक आहे काय ? | नाही. |
2. | विरुध्द पक्षांनी तक्रारकर्त्याप्रती दिलेल्या सेवेत त्रुटी आहे काय ? | नाही. |
3 . | अंतिम आदेश काय ? | अंतिम आदेशाप्रमाणे |
:: कारण मिमांसा ::
मुददा क्र. 1 व 2 बाबत :- तक्रारकर्त्याने तक्रारीमध्ये नमूद केले आहे की, त्याचे 8 वर्षापासून घोट येथे “एस के मोबाईल” शॉप आहे व ते मोबाईल व मोबाईलचे साहित्य नागपूर वरुन बोलवितात. तक्रारकर्त्याने श्री शुभलक्ष्मी कलेक्शन शॉप नंबर LS. 15 अमृता बाजार कॉम्प्लेक्स सिताबर्डी, नागपूर येथून (1) Realme C35 4/128 IMEI No – 863802068074272 PRICE Rs. 13000/- आणि (2) Itel A48 2/32 PRICE RS. 5900/- PARCEL CHARGES Rs. 100/- असे रु. 19,000/- चे दोन मोबाईल अंजनी ट्रॅव्हल्स क्र. MH-40 AT 652 मालाचा बिल्टी क्र. 5701 या ट्रॅव्हल्स ने नागपूर वरुन घोटला बोलविले होते. यावरून तक्रारकर्ते हे मोबाईल खरेदी विक्री चा व्यवसाय करतात हे सिद्ध होते.
2019 च्या ग्राहक संरक्षण कायद्यानुसार कलम 7(2) नुसार वस्तूचा किंवा सेवेचा वापर व्यावसायिक कारणासाठी किंवा पुनविक्री करण्यासाठी खरेदी करणारी किंवा उपभोग घेणारी व्यक्ती कायद्याप्रमाणे ग्राहक या संज्ञेत बसत नसल्यामुळे तसेच तक्रारकर्ता ह विरुद्ध पक्षाचा ग्राहक आहे, ही बाब तक्रारकर्ता सिद्ध करण्यास असमर्थ राहिल्यामुळे सदर मुद्दा क्र. 1 नकारार्थी दर्शविण्यात येत आहे. तसेच तक्रारकर्ता हा ग्राहक नसल्यामुळे तक्रारकर्त्याला दिलेल्या सेवेबाबत विरुद्ध पक्ष यांचे ग्राहक संरक्षण कायदा 2019 अंतर्गत कोणतेही दायित्व नाही असे या आयोगाचे मत झाल्याने मुद्दा क्र. 2 सुद्धा नकारार्थी दर्शविण्यात येत आहे.
मुददा क्र. 4 बाबत :- मुददा क्र. 1 व 2 चे विवेचनावरून हे आयोग खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करीत आहे.
:: अंतिम आदेश ::
- तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यात येत आहे.
- तक्रारीच्या खर्चाबद्दल कोणतेही आदेश नाही.
- उभय पक्षांना आदेशाची प्रत विनामुल्य देण्यात यावी.
- प्रकरणाच्या “ब” व “क” फाईल्स तक्रारदाराला परत करण्यांत याव्यात.
(श्रीमती रोझा फु. खोब्रागडे) (श्रीमती माधुरी कृ. आटमांडे) (श्री.नितीनकुमार चं. स्वामी)
सदस्या सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, गडचिरोली