(मंचाचे निर्णयान्वये, श्री विजय चं. प्रेमचंदानी, अध्यक्ष)
(पारीत दिनांक : 23 एप्रिल 2015)
तक्रारकर्त्याने सदर तक्रार, 1986 चे कलम 12 अन्वये दाखल केली असून, तक्रारीचा आशय थोडक्यात येणे प्रमाणे.
1. अर्जदार हीने गैरअर्जदार क्र.1 व 2 चे संयुक्त मालकी, कब्जा व वहीवाटीत मौजा रामपुर तुकूम येथे नगरपरीषद गडचिरोलीच्या हद्दीत भु.क्र.122/2, 123/2 आराजी 2050.80 चौ.मी. अकृषक जमीन आहे. गैरअर्जदार क्र.3 हा गैरअर्जदार क्र.1 व 2 चा मुखत्यार म्हणून मौजा रामपुर तुकूम येथील भु.क्र.122/2, 123/2 पैकी भुखंड क्र.1 वर निवासी प्रयोजनाकरीता सदनिका बांधण्याचे प्रस्तावित केले. गैरअर्जदार क्र.3 व अर्जदारामध्ये झालेल्या चर्चेदरम्यान सदनिका क्र.002 ची किमंत रुपये 10,50,000/- ठरविण्यात आली. मौखीक करारानुसार अर्जदार हीने गैरअर्जदार क्र.3 ला इसारा दाखल वेळोवेळी धनादेशाव्दारे एकूण रुपये 2,00,000/- दिले. गैरअर्जदार क्र.1 व 2 चे आममुखत्यार म्हणून गैरअर्जदार क्र.3 ने दि.20.4.2013 रोजी अर्जदारास सदनिका क्र.002 विक्री करण्याचा करारनामा साक्षदारासमक्ष लिहून दिला. करारनाम्यानुसार सदनिका क्र.002 चे संपूर्ण बांधकाम दि.1.10.2013 पर्यंत गैरअर्जदारांनी अर्जदाराचे नावे पंजीबध्द विक्रीपञ करुन देण्याचे ठरले होते. परंतु, गैरअर्जदार क्र.3 याने सदनिकेचे बांधकाम पुर्णत्वाकडे नेण्याकरीता कोणतीही कारवाई केली नाही. अर्जदार हिने दि.1.2.2014 ला वकीलामार्फत नोटीस पाठविला. परंतु, गैरअर्जदारांना नोटीस प्राप्त होऊनही सदनिकेचे बांधकाम पुर्ण केले नाही किंवा अर्जदारास कोणतेही उत्तर दिले नाही. त्यामुळे, अर्जदार हीने दुसरे बांधकाम व्यावसायीक यांचेसोबत रुपये 14,00,000/- एक सदनिका विकत घेण्याचा दि.1.7.2014 रोजी पंजीबध्द करारनामा केला. गैरअर्जदारांनी अवलंबलेल्या व्यापार प्रथेमुळे अर्जदारास रुपये 3,50,000/- अतिरिक्त आर्थिक भुर्दंड सोसावा लागला. अर्जदारास दि.2.10.2013 पासून डिसेंबर 2014 पर्यंतचा प्रतीमहा रुपये 3500/- या दराने आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला, तसेच अर्जदारास झालेल्या शारिरीक, आर्थिक व मानसिक ञासापोटी रुपये 2,00,000/-, तसेच इसाराची रक्कम रुपये 2,00,000/- द.सा.द.शे.10 टक्के व्याजासह, नवीन सदनिकेच्या विक्रीपञाचा पंजीयनाचा खर्च रुपये 40,000/-, नोटीस खर्च रुपये 4000/-, तक्रार खर्च 25,000/- देण्याबाबत गैरअर्जदारांना निर्देश जारी करावे, अशी प्रार्थना केली.
2. अर्जदाराने नि.क्र.2 नुसार 10 दस्ताऐवज दाखल केले. अर्जदाराची तक्रार नोंदणी करुन गैरअर्जदारांविरुध्द नोटीस काढण्यात आले. गैरअर्जदारांनी नि.क्र.13 नुसार लेखी उत्तर दाखल केले.
3. गैरअर्जदाराने नि.क्र.13 नुसार दाखल केलेल्या लेखी उत्तरातील विशेष कथनात नमूद केले की, अर्जदार हा गैरअर्जदार क्र.3 यांच्या अत्यंत जवळचा व परिचयाचा व्यक्ती आहे. गैरअर्जदार क्र.3 हा बांधकाम साहित्य विक्रीचा व्यवसाय करतो. अर्जदाराने गैरअर्जदार क्र.3 ला सन 2011 ते 2012 या कालावधीत व्यवसायाकरीता आर्थिक मदत म्हणून रुपये 1,90,000/- वेळोवेळी दिले आहेत. अर्जदाराने गैरअर्जदार क्र.3 ला दि.20.4.2013 ला स्वतः खरेदी करुन आणलेल्या स्टॅम्प पेपरवर आर्थिक मदत म्हणून घेतलेली रक्कम परत मिळावी याकरीता सुरक्षा म्हणून गैरअर्जदार क्र.3 ची स्टॅम्प पेपरवर स्वाक्षरी घेतली. अर्जदाराने गैरअर्जदार क्र.3 ने स्वाक्षरी करुन दिलेल्या स्टॅम्प पेपरचा गैरवापर करुन तथाकथीत नियोजीत सदनिकेचा विक्री करारनामा तयार करुन घेतला. गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी गैरअर्जदार क्र.3 च्या हक्कात मुखत्यारनामा करुन दिला हे सत्य असले तरी अर्जदाराने गैरअर्जदार क्र.3 ला वेळोवेळी दिलेल्या रकमांच्या कालावधीत सदर मुखत्यारनामा अस्तित्वात नव्हता. करीता अर्जदाराची तक्रार खारीज होणे गरजेचे आहे.
4. अर्जदाराने नि.क्र.14 नुसार शपथपञ, नि.क्र.18 नुसार लेखी युक्तीवाद, नि.क्र.20 नुसार 1 दस्ताऐवज दाखल केले. गैरअर्जदाराने दाखल केलेली तक्रार शपथपञ समजण्यात यावे अशी नि.क्र.16 वर पुरसीस, तसेच लेखी बयानाला लेखी युक्तीवादाचा भाग समजण्यात यावा अशी पुरसीस नि.क्र.21 वर दाखल केली. अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेले लेखी बयान, दस्ताऐवज, लेखी युक्तीवादावरुन खालील मुद्दे निघतात.
मुद्दे : निष्कर्ष
1) अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? : होय
2) गैरअर्जदारांनी सेवेत न्युनता केली आहे काय ? : होय
3) आदेश काय ? : अंतिम आदेशाप्रमाणे
- कारण मिमांसा –
मुद्दा क्रमांक 1 बाबत :-
5. गैरअर्जदार क्र.1 व 2 चे संयुक्त मालकी, कब्जा व वहीवाटीत मौजा रामपुर तुकूम येथे नगरपरीषद गडचिरोलीच्या हद्दीत भु.क्र.122/2, 123/2 आराजी 2050.80 चौ.मी. अकृषक जमीन आहे. गैरअर्जदार क्र.3 हा गैरअर्जदार क्र.1 व 2 चा मुखत्यार म्हणून मौजा रामपुर तुकूम येथील भु.क्र.122/2, 123/2 पैकी भुखंड क्र.1 वर निवासी प्रयोजनाकरीता सदनिका बांधण्याचे प्रस्तावित केले. गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी गैरअर्जदार क्र.3 ला मुखत्यारनामा करुन दिला ही बाब दोन्ही पक्षांना मान्य आहे. गैरअर्जदार क्र.3 यांनी त्यांचे लेखी बयाणात परिच्छेद क्र.9 मध्ये असे कबुल केले आहे की, गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी गैरअर्जदार क्र.3 च्या हक्कात मुखत्यारनामा करुन दिलेला आहे. अर्जदाराने दाखल नि.क्र.2 वर दस्त क्र.अ-1 मध्ये गैरअर्जदार क्र.3 यांची हस्ताक्षर आहे हे सुध्दा गैरअर्जदार क्र.3 यांनी त्यांच्या लेखी बयाणात परिच्छेद क्र.8 मध्ये स्विकार केलेले आहे. गैरअर्जदार क्र.3 यांनी वादातील सदनिका खरेदीबाबतचे कारारनामामध्ये नमूद असलेले मजकुराबाबत फक्त आक्षेप घेतला आहे. सदर करारनाम्याचे कालावधीत गैरअर्जदार क्र.3 ला दिलेल्या मुखत्यारनामा अस्तित्वात नव्हता ही बाब सिध्द करण्याची जबाबदारी गैरअर्जदाराची होती. परंतु, गैरअर्जदाराने सदर प्रकरणात गैरअर्जदार क्र.3 ला दिलेल्या मुखत्यारनाम्याची कोणतीही प्रत प्रकरणात दाखल केलेली नाही. सबब, गैरअर्जदार क्र.3 ने अर्जदारासोबत वादातील सदनिकाचे संबंधीत करारनामा केलेला होता हे सिध्द झालेले आहे. त्याअनुषंगाने अर्जदार हे गैरअर्जदाराचे ग्राहक आहेत असे सिध्द होते. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रमांक 2 बाबत :-
6. मुद्दा क्र.1 चे विवेचनावरुन आणि हे सिध्द झाल्यावर की, गैरअर्जदार क्र.3 ने गैरअर्जदार क्र.1 व 2 चे वतीने अर्जदारासोबत दि.20.4.2013 रोजी वादातील सदनिकेच्या संबंधीत करार केला होता व त्याअनुषंगाने गैरअर्जदाराने अर्जदाराला वादातील सनदिकेची उर्वरीत रक्कम घेवून विक्रीपञ करुन दिले नाही. तसेच, अर्जदार हीने गैरअर्जदाराला दि.1.2.2014 आणि 1.9.2014 ला पाठविलेला नोटीस, गैरअर्जदाराला मिळून सुध्दा त्याचे उत्तर अर्जदाराला दिले नाही, यावरुन असे सिध्द होते की, गैरअर्जदाराने अर्जदाराप्रती न्युनतम सेवा दर्शविलेली आहे. सबब, मुद्दा क्र.2 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रमांक 3 बाबत :-
7. मुद्दा क्र.1 व 2 चे विवेचनावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
- अंतिम आदेश -
(1) अर्जदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
(2) गैरअर्जदाराने अर्जदाराकडून प्राप्त केलेली रक्कम रुपये 2,00,000/- अर्जदाराला आदेशाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसाचे आंत देण्यात यावे.
(3) अर्जदाराला झालेल्या शारिरीक, मानसिक, व आर्थिक ञासापोटी रुपये 25,000/- गैरअर्जदाराने अर्जदाराला आदेशाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसाचे आंत देण्यात यावे.
(4) उभय पक्षानी आप-आपला तक्रारीचा खर्च सहन करावे.
(5) उभय पक्षांना आदेशाची प्रत विनामुल्य देण्यात यावी.
गडचिरोली.
दिनांक :- 23/4/2015
(रोझा फु. खोब्रागडे) (सादीक मो. झवेरी) (विजय चं. प्रेमचंदानी)
सदस्या सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, गडचिरोली.