::: नि का ल प ञ:::
(मंचाचे निर्णयान्वये, मा. सौ. कल्पना जांगडे (कुटे) मा.सदस्या)
(पारीत दिनांक :- 10/10/2019)
1. तक्रारकर्त्याने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अन्वये दाखल केली आहे. तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे.
2. तक्रारदारकर्त्याच्या भाचीचे दि.7/5/2019 रोजी नागपूर येथे लग्न असल्याने तक्रारकर्त्याने लग्नात भेटवस्तु म्हणून पलंग, सोफासेट, डायनिंग टेबल देण्याकरीता वि.प.यांना दि.29/1/2019 रोजी चिमुर येथे जाऊन सदर वस्तु चांगले लाकूड वापरून बनविण्याचा ऑर्डर दिला तसेच सदर वस्तु चिमुर ते नागपूर वाहतुक परवान्यासहीत बनविण्यांस सांगितले व वि.प. यांनी परवान्यासहीत वस्तु बनविण्याचे आश्वासनसुध्दा दिले. तक्रारकर्त्याने संपूर्ण फर्निचरचेरू.51,000/- व चिमुर ते नागपूर वाहतुक परवाना खर्च रू.1000/- असे एकूण रू.52,000/- वि.प.यांना देण्याचे निश्चित झाल्याने तक्रारकर्त्याने अॅडव्हान्स रक्कम रू.9,000/- म्हणून दिले. त्याबाबत वि.प. यांनी क्र.154 चे बिल दिले. तक्रारकर्त्याची नागभिड येथे नौकरी असल्याने त्याला वारंवार चिमुर येथे जाणे शक्य नसल्याने त्यांनी वारंवार दुरध्वनी करून वि.प.यांचेसोबत फर्निचर साहित्य तयार झाले काय याबाबत विचारणा केली तेंव्हा वि.प. हे चांगल्या प्रतीचे फर्निचर लग्न वेळेपर्यंत बनवून देण्याची खात्री देत होते.
3. वि.प. यांनीदि.25/4/2019 रोजी दुरध्वनीद्वारे फर्निचर साहित्य तयार असल्याचे सांगून उर्वरीत संपूर्ण रक्कम जमा करण्यांस सांगितले. त्यावेळी तक्रारकर्त्याने चिमुर येथे जाऊन फर्निचरची पाहणी केली असता सदर फर्निचर चांगल्या प्रतिच्या लाकडापासून बनविले होते परंतु त्याची पॉलिश व फिनिशिंग करणे बाकी होते. त्यामुळे तक्रारकर्त्याने सदर फर्निचरला पॉलिश व पलंगास पाटी लावून ते सर्व फर्निचर दि.6/5/2019 रोजी लग्नमंडपात पोहचवून देण्याचे आश्वासन दिल्याने व लग्न दि.7/5/2019 रोजी असल्याने तक्रारकर्त्याने वि.प.यांना वाहतुक परवानासहित उर्वरीत रक्कम दिली व संपूर्ण रक्कम रू.52,000/- मिळाल्याची वि.प.ने दि.7/5/2019 या लग्नाच्या तारखेची नवीन पावती क्र.224 दिली.
4. तक्रारकर्त्याने नागपूर वरून दि.6/5/2019 रोजी वि.प.यांना दुरध्वनी वरून संपर्क साधून फर्निचर नागपूरला किती वाजेपर्यंत पोहचणार याबाबत चौकशी केली तेंव्हा सदर फर्निचरला पॉलिश करणे बाकी आहे असे सांगून दि.7/5/2019 रोजी स्वतः लग्न वेळेपर्यंत फर्निचर आणून देण्याचे सांगितले. परंतु तक्रारकर्त्याने दि.7/5/2019 रोजी वि.प.यांना वारंवार दुरध्वनीवरून विचारणा केली असता निघत आहे असे सांगून संध्याकाळपर्यंत वेळ घालविला व सांय.5.30 वाजता वाहन क्र.एम.एम.34 ए.पी.3246चालक पुंडलीक भोयर व वि.प.यांचा मुलगा सदर फर्निचर घेऊन संताजी सांस्कृतीक सभागृह, बुधवारी बाजार, नागपूर येथे लग्नमंडपात पोहचले तेंव्हा सर्व फर्निचर वाहनातून खाली उतरविल्याने तक्रारकर्त्याने सदर फर्निचरची पाहणी केली असता पूर्वी तयार केलेले फर्निचर व साहित्य बदलवून डुप्लीकेट अत्यंत निःकृष्ट दर्जाचे लाकूड वापरून तसेच फर्निचरची घसाई व पॉलिश निःकृष्ट दर्जाचे केल्याने तसेच पलंगाला खाली पाटी लावून देण्याचे कबूल केल्यावरही त्यांनी हलक्या दर्जाचे प्लायवूड लावून दिले होते. हया बाबी वि.प.यांचे निदर्शनांस आणून दिल्या तसेच डायनिंग, टी टेबल काचसुध्दा फिटींग करून दिलेला नव्हता त्यामुळे तक्रारकर्त्याने सदर साहित्य वि.प.यांना परत घेऊन जाण्यांस सांगितले व पैशाची मागणी केली तेंव्हा वि.प.यांनी काच नागपूरवरून घेऊन लावून देतो असे सांगितले व रिक्षा करून डायनिंग काच पाठविला, त्याचे पैसे सुध्दा तक्रारकर्त्यासच द्यावे लागले.
5. वि.प.यांनी त्यांचेकडे पैसे नसल्याने नंतर पैसे देऊन फर्निचर नेईल असे सांगून फर्निचर सोडून निघून गेले. त्यानंतर वि.प.यांना दुरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते दुरध्वनी उचलत नव्हते. सदर फर्निचरची संपूर्ण पाहणी केली असता संपूर्ण फर्निचर हे कुजक्या लाकडाच माती पुटींग भरून असल्याने लग्न मंडपातील संपूर्ण नातेवाईक नाराज झाले सर्व नातेवाईकांसमोर तक्रारकर्त्यास अपमान सहन करावा लागला त्यामुळे तक्रारकर्त्याची मानहानी झाली तसेच नवरदेवाकडील नातेवाईकांनी सदर फर्निचर नेण्यास नकार दिल्याने तक्रारकर्त्यास तात्काळ रू.80,000/- चे नवीन फर्निचर विकत घेवून त्यांना द्यावे लागले.
6. तक्रारकर्त्याने सदर फर्निचर लग्न मंडपातून भाचीचे आईवडिलांकडे अयोध्यानगर, नागपूर येथे ठेवण्यात आलेले आहे. वि.प.यांनी दि.9/5/2019 रोजी दुरध्वनी उचलला असता त्यांनी संपूर्ण फर्निचर घेऊन पैसे परत देण्याचे आश्वासन दिले होते, परंतू आजपर्यंत सदर फर्निचर परत नेले नाही व दुरध्वनीवरून संपर्क साधला असता बोलत सुध्दा नाही. वि.प. यांनी तक्रारकर्त्यास अत्यंत निःकृष्ट दर्जाचे फर्निचर बनवून दिले व ते परत घेऊन रक्कम देण्याची मागणी केली असल्यावरही न देवून तक्रारकर्त्याप्रती न्युनतापूर्ण सेवा दिल्याने तक्रारकर्त्याने मंचासमक्ष गैरअर्जदाराविरूध्द तक्रार दाखल करुन त्यामध्ये अशी मागणी केली आहे की, गैरअर्जदाराने तक्रारकर्त्यांस न्युनतापूर्ण सेवा दिलेली आहे असे घोषित करावे, वि.प.यांनी सोफा सेट व टी टेबल परत घेवून तक्रारकर्त्याला किमतीची रक्कम रू.52,000/- परत करावी तसेच तक्रारकर्त्याला झालेल्या नुकसानासाठी नुकसान भरपाई रु. 10,000/- त्यावर 15 टक्के व्याज आणी तक्रार खर्च देण्याचा आदेश व्हावा, अशी विनंती केली.
7 . अर्जदाराची तक्रार स्विकृत करुन गैरअर्जदारा विरुध्द नोटीस काढण्यात आले. मात्र नोटीस प्राप्त होवूनदेखील विरूध्द पक्ष मंचात उपस्थीत न झाल्याने त्यांचेविरूध्द प्रकरण एकतर्फी चालविण्याचा आदेश दि.4/9/2019 रोजी नि.क्र.1 वर पारीत करण्यांत आला.
8. तक्रारदारांची तक्रार, दस्ताऐवज, शपथपत्र, तोंडी युक्तीवाद व तक्रारीतील कथन यावरुन खालील मुद्दे मंचाच्या विचारार्थ घेण्यात आले. त्याबाबतची कारणमिमांसा आणी निष्कर्ष पुढील प्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
1) तक्रारकर्ता विरूध्द पक्षांचा ग्राहक आहे काय ? : होय
2) विरूध्द पक्षाने तक्रारकर्त्याप्रती न्युनता पूर्ण सेवा दिली आहे
काय ? : होय
3) तक्रारकर्ता मागणीप्रमाणे दाद मिळण्यास पाञ आहे
काय ? : अंतिम आदेशाप्रमाणे.
कारण मिमांसा
मुद्दा क्रं. 1 बाबत ः-
9. तक्रारकर्त्याचे भाचीचे दि.7/5/2019 रोजी नागपूर येथे लग्न असल्याने सदर लग्नात भेटवस्तु म्हणून पलंग, सोफासेट, डायनिंग टेबल देण्याकरीता वि.प.यांना दि.29/1/2019 रोजी विरुध्द पक्ष यांचेकडे ऑर्डर देऊन पलंग, सोफा सेट व टी टेबल व डायनींग टेबल विकत घेतला, वि.प.ने सदर फर्निचरची डिलीव्हरी दिनांक 6/5/2019 रोजी द्यावयाची होती व त्याकरीता तक्रारकर्त्याने किंमतीची संपूर्ण रक्कम रू.52,000/- वि.प.ला दिली असून त्याबाबत तक्रारकर्त्याने विरूध्द पक्षाने दिलेल्या दोन्ही पावत्या प्रकरणात दाखल केलेल्या आहेत. यावरून तक्रारकर्ता हा वि.प. यांचा ग्राहक आहे ही बाब निर्विवाद आहे. त्यामुळे मुद्दा क्र.1 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्रं. 2 व 3 बाबतः-
10. तक्रारकर्त्याने प्रकरणात दाखल केलेल्या पावतीनुसार पलंग, सोफा सेट व डायनींग टेबल रू.52,000/- मध्ये बनवून नागपूर येथे लग्नस्थळी पोहचवून देण्याचे ठरलेले होते. मात्र सदर मुदतीत वि.प.ने सदर फर्निचर लग्नस्थळी आणून दिले नाही असे तक्रारकर्त्याचे म्हणणे आहे. आणी लग्नाच्या दिवशी सायंकाळी 5.30 वाजता सदोष व निःकृष्ट दर्जाच्या लाकडापासून बनविलेले तसेच फिनिशिंग व पॉलिश न केलेले फर्निचर लग्नस्थळी आणून दिले मात्र सदर निःकृष्ट फर्निचर नेण्यांस वरपक्षाकडील नातेवाईकांनी नकार दिल्याने तक्रारकर्त्याने सदर फर्निचर परत घेवून रक्कम परत करावी अशी वि.प.ला विनंती केली, मात्र रक्कम आणून फर्निचर परत नेण्याचे आश्वासन देऊन वि.प. फर्निचर सोडून निघून गेले. आपली पत वाचविण्यासाठी तक्रारकर्त्याला ऐनवेळी रू.80,000/- खर्च करून भाचीला फर्निचर विकत घेवून द्यावे लागले असे तक्रारकर्त्याने शपथेवर नमूद केलेले आहे. याशिवाय सदर फर्निचर निःकृष्ट दर्जाचे आहे याकरिता तक्रारकर्त्याने फर्निचरची रंगीत छायाचित्रे नि.क्र.3 दस्त क्र.4 वर दाखल केलेली आहेत. सदर छायाचित्रांचे अवलोकन केले असता फर्निचर हे सदोष व निःकृष्ट दर्जाचे असल्याचे निदर्शनांस येते. याशिवाय तक्रारकर्त्याचे याबाबतचे शपथेवरील कथन विरूध्द पक्षाने मंचासमक्ष कुठलाही बचाव दाखल करून खोडून काढलेले नाही. त्यामुळे वि.प.ने तक्रारकर्त्यास सदोष व निःकृष्ट दर्जाचे फर्निचर दिले व फर्निचर परत घेवून किंमतीची रक्कम परत करण्याचे आश्वासन दिले. मात्र आश्वासन देवूनही तसेच दाखल नोटीस व पोचपावत्यांवरून तक्रारकर्त्याने दोनदा यासंदर्भात दिलेली नोटीस प्राप्त होवूनदेखील रक्कम परत न करून तक्रारकर्त्याप्रती न्युनतापूर्ण सेवा दिल्याचे सिध्द होते.
तक्रारकर्त्याच्या भाचीचे दिनांक 7/5/2019 रोजी लग्न होते मात्र वि.प.ने तक्रारकर्त्यास मुदतीत फर्निचर तयार करून दिले नाही तसेच ऐनवेळी निःकृष्ट दर्जाचे फर्निचर दिल्यामुळे तक्रारकर्त्याची समाजात मानहानी होवून त्याला शारिरीक व मानसीक त्रास झाला तसेच त्याला वेळेवर नवीन फर्निचर विकत घावे लागल्यामुळे वि.पक्ष हे तक्रारकर्त्यास नुकसानभरपाई देण्यास जबाबदार आहेत असे मंचाचे मत आहे. सदर सोफा अद्यापही तक्रारकर्त्याचे नातेवाईकांकडे नागपूर येथे आहे ही बाब विचारात घेवून मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
अंतीम आदेश
1. ग्राहक तक्रार क्र. 82/2019 अंशतः मान्य करण्यात येते.
2. वि.प.ने तक्रारकर्त्यास संपूर्ण फर्निचरची एकुण किंमत रू.52,000/- परत करून नागपूर येथून सदोष फर्निचर स्वखर्चाने परत घेवून जावे.
3. वि.प.ने तक्रारकर्त्यास शारिरीक व मानसीक त्रास व तक्रारीच्या खर्चापोटी एकत्रीत रक्कम रू.5000/- द्यावे.
4. उभय पक्षांना आदेशाची प्रत तात्काळ पाठविण्यात यावी.
(श्रीमती.कल्पना जांगडे(कुटे)) (श्रीमती. किर्ती वैदय (गाडगीळ)) (श्री. श्री.अतुल डी. आळशी)
सदस्या सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, चंद्रपूर.