::: आ दे श :::
( पारीत दिनांक : 06.12.2016 )
आदरणीय अध्यक्षा श्रीमती एस.एम.उंटवाले, यांचे अनुसार
1. सदर फिर्याद ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम : 12 अन्वये, दाखल करण्यात आली. सदर तक्रारीचा सारांश खालील प्रमाणे आहे.
तक्रारकर्त्याने ऑनलाईनद्वारे दि.09/11/2015 रोजी Sony Xperia T3, Item code BD821872, IMEI 354127061585504, हा मोबाईल रु. 11,990/- ला विकत घेतला. मोबाईल विकत घेतांना विरुध्दपक्ष यांनी एक वर्षाची हमी दिली होती. सदरच्या मोबाईलचे सिम स्लॉट काम करीत नसल्यामुळे, तक्रारकर्त्याने दुरुस्त करण्याकरिता विरुध्दपक्ष क्र. 1 कडे 18 जुलै 2016 रोजी दिला. त्यावेळी तक्रारकर्त्याला, 2-3 दिवसानंतर येवून मोबाईल घेवून जाण्यास सांगीतले. तक्रारकर्ता मोबाईल घेण्याकरिता गेला असता, अजुन मोबाईल दुरुस्त झाला नाही, असे कारण सांगून तक्रारकर्त्याला परत दोन दिवसांनी बोलाविले. त्यानंतरही तक्रारकर्त्याला उडवाउडवीचे उत्तरे देऊन परत पाठविण्यात आले. शेवटी सदर मोबाईल परत करण्याची मागणी केली असता, विरुध्दपक्षाच्या कर्मचा-याने रु. 7000/- खर्च लागेल, अन्यथा मोबाईल सुधारुन देता येत नाही, असे सांगुन तक्रारकर्त्यास परत पाठविले. वास्तविक पाहता सदर मोबाईल मध्ये कोणत्याही प्रकारे पाणी गेले नव्हते, विरुध्दपक्ष क्र. 1 च्या दुर्लक्षीतपणामुळे व निष्काळजीपणामुळे तक्रारकर्त्याचा मोबाईल खराब झाला होता. विरुध्दपक्ष हे काहीही ऐकून घेण्यास तयार नसल्यामुळे तक्रारकर्त्याने दि. 16/8/2016 रोजी विरुध्दपक्ष क्र. 1 ला नोटीस पाठविली व मोबाईल दुरुस्त करुन देण्याची विनंती केली, परंतु विरुध्दपक्षाने सदर नोटीसची पुर्तता केली नाही. अशा प्रकारे विरुध्दपक्षांनी सेवा देण्यास त्रुटी दर्शविली तक्रारकर्त्याने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल करुन विनंती केली आहे की, तक्रारकर्त्याची तक्रार मंजुर करण्यात यावी व विरुध्दपक्ष क्र. 2 यांना मोबाईल बदलून देण्याचे अथवा मोबाईलची मुळ किंमत परत करण्याचे निर्देश देण्यात यावे, शारीरिक व मानसिक त्रासापोटी रु. 7000/- व न्यायालयीन खर्च रु. 3000/- देण्याचा आदेश पारीत व्हावा.
तक्रारकर्त्याने सदर तक्रारीसोबत एकूण 05 दस्तऐवज दाखल केलेले आहेत.
विरुध्दपक्ष क्र.1 चा लेखी जबाब :-
2. विरुध्दपक्ष क्र. 1 यांना वारंवार संधी देऊनही त्यांनी लेखी जबाब दाखल केला नाही, त्यामुळे सदर प्रकरण विरुध्दपक्ष क्र. 1 च्या लेखी जबाबाशिवाय पुढे चालविण्याचा आदेश पारीत करण्यात आला.
विरुध्दपक्ष क्र.2 चा लेखी जबाब :-
विरुध्दपक्ष क्र. 2 यांना सदर प्रकरणाच्या नोटीसची बजावणी होऊन सुध्दा ते प्रकरणात हजर झाले नाही, त्यामुळे सदर प्रकरण विरुध्दपक्ष क्र. 2 विरुध्द एकतर्फी चालविण्याचा आदेश पारीत करण्यात आला.
3. त्यानंतर तक्रारकर्त्यातर्फे तोंडी युक्तीवाद करण्यात आला
::: का र णे व नि ष्क र्ष :::
4. तक्रारकर्ते यांची तक्रार, दाखल केलेले सर्व दस्तऐवज व तक्रारकर्त्याचा तोंडी युक्तीवाद यांचे काळजीपुर्वक अवलोकन करुन खालील प्रमाणे निष्कर्ष कारणे देवून नमुद केला, कारण या प्रकरणात विरुध्दपक्ष क्र. 1 ला वारंवार संधी देवूनही त्यांनी लेखी जबाब दाखल केला नाही, त्यामुळे प्रकरण विरुध्दपक्ष क्र. 1 विरुध्द विनाजबाब चालवावे, असे आदेश मंचाने दि. 24/11/2016 रोजी पारीत केले व विरुध्दपक्ष क्र. 2 यांना नोटीस बजावून देखील ते मंचात गैरहजर राहीले, त्यामुळे विरुध्दपक्ष क्र. 2 विरुध्द प्रकरण एकतर्फी चालविण्यात येईल, असे आदेश मंचाने पारीत केले, सबब तक्रारकर्ते यांनी दाखल केलेले दस्त ‘ रिटेल इनव्हाईस’ यावरुन असे दिसते की, तक्रारकर्ते यांनी दि. 9/11/2015 रोजी विरुध्दपक्ष क्र. 2 निर्मित मोबाईल Sony Xperia T3( 8GB Colour White ), Item code BD821872, IMEI 354127061585504 या वर्णनाचा रक्कम रु. 11,990/- या किंमतीत खरेदी केला होता. सदर मोबाईल ऑनलाईन खरेदी प्रकारातील आहे. तक्रारकर्त्याने दाखल केलेले दस्त ‘सर्व्हीस जॉबशिट’ यावरुन असा बोध होतो की, सदर मोबाईल दि. 18/7/2016 रोजी विरुध्दपक्ष क्र. 1, जे विरुध्दपक्ष क्र. 2 चे अधिकृत सेवा केंद्र आहे, यांचेकडे दुरुस्ती करण्याकरिता दिला होता. अशा परिस्थितीत तक्रारकर्ते हे विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 चे ग्राहक होतात, या निष्कर्षाप्रत मंच आले आहे.
5. तक्रारकर्ते यांची तक्रार, सर्व्हीस जॉबशिट, यावरुन असे दिसते की, सदर मोबाईल मध्ये सिमस्लॉट काम करीत नव्हता, म्हणून तक्रारकर्त्याने दि. 18/7/2016 रोजी विरुध्दपक्ष क्र. 1 कडे दुरुस्तीकरीता दिला होता. तक्रारकर्त्याचे असे कथन आहे की, विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी सदर मोबाईल घेवून जाण्यास 2 ते 3 दिवसानंतर तक्रारकर्त्यास बोलाविले होते. परंतु त्या प्रमाणे मोबाईल दुरुस्त करुन दिला नाही व अजुन परत दोन दिवसांनी बोलाविले, मात्र त्यानंतरही तो दुरुस्त न करता, सदर मोबाईल मध्ये वॉटर डॅमेज असल्याचे सांगुन, दुरुस्तीकरिता रु. 7000/- खर्च रक्कम मागीतली. तक्रारकर्त्याचे पुढे कथन असे आहे की, त्याच्या मोबाईल मध्ये पाणी गेलेले नव्हते, त्यामुळे विरुध्दपक्ष क्र. 1 ने सांगितलेले कारण खोटे व सेवा न्युनता दिसणारे आहे.
दाखल दस्त ‘कायदेशिर नोटीस प्रत, पोस्टाची पावती व पोच पावती ’ यावरुन असे दिसते की, प्रकरण दाखल करण्यापुर्वी तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांना कायदेशिर नोटीस पाठविली होती व ती त्यांना प्राप्त झालेली आहे.
यावर, मंचाचे असे मत आहे की, तक्रारकर्त्याचे कथन व दस्त विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांनी मंचात हजर राहून खोडले नाही, त्यामुळे नकारार्थी कथन उपलब्ध नसल्यामुळे, तक्रारकर्त्याचे कथन मंचाने स्विकारले आहे. सदर मोबाईल हा वॉरंटी कालावधीत होता, त्यामुळे तो दुरुस्त करणे, हे विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 चे कर्तव्य होते व तो का दुरुस्त होत नाही, या बद्दल सबळ कारण मंचात येवून दाखल करणे क्रमप्राप्त होते. विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याची नोटीस प्राप्त होवूनही कोणते उत्तर दिले नाही, त्यामुळे हे प्रकरण तक्रारकर्त्याला मंचात दाखल करावे लागले. सबब विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांनी सेवेत न्युनता केली, असे मंचाचे मत आहे. तक्रारकर्ते यांनी प्रार्थनेत फक्त विरुध्दपक्ष क्र. 2 विरुध्द मदत मागीतली आहे. त्यामुळे विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी तक्रारकर्ते यांचा वादातील मोबाईल परत घेऊन, त्याची खरेदी किंमत तक्रारकर्त्याला परत करावी, तसेच शारीरिक, मानसिक व आर्थिक नुकसान भरपाईपोटी याप्रकरणाच्या न्यायीक खर्चासह रु. 3000/- तक्रारकर्त्यास द्यावे, असे आदेश पारीत करण्यात येतात. म्हणून खालील प्रमाणे अंतीम आदेश पारीत केला.
::: अं ति म आ दे श :::
- तक्रारकर्त्याची तक्रार विरुध्दपक्ष क्र. 2 विरुध्द अंशतः मंजुर करण्यात येते
- विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी तक्रारकर्ते यांचा वादातील मोबाईल परत घेऊन, त्याची खरेदी किंमत रु. 11,990/- (रुपये अकरा हजार नऊशे नव्वद फक्त ) तक्रारकर्त्यास द्यावी. तसेच दोषपुर्ण सेवेमुळे झालेल्या शारीरिक, मानसिक व आर्थिक नुकसान भरपाईपोटी, प्रकरण खर्चासह रु. 3000/- (रुपये तिन हजार फक्त ) रक्कम तक्रारकर्त्यास अदा करावी.
- सदर आदेशाचे पालन, निकालाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसाचे आत करावे.
सदर आदेशाच्या प्रती उभयपक्षांना नि:शुल्क देण्यात याव्या.