Maharashtra

Additional DCF, Nagpur

RBT/CC/13/829

Shri. Rajesh Katkamwar - Complainant(s)

Versus

Shri. Bhupendra Bhaskar Marliwar - Opp.Party(s)

Adv. A.P.Dande

23 Jan 2018

ORDER

ADDITIONAL DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM,
NAGPUR
New Administrative Building No.-1
3rd Floor, Civil Lines, Nagpur-440001
Ph.0712-2546884
 
Complaint Case No. RBT/CC/13/829
 
1. Shri. Rajesh Katkamwar
R/o. Flat No.100,Shiva Arcade, P.No.6,Narkesari Society,Jaiprakash Nagar, Somalwada,Nagpur
Nagpur
Maharashtra
2. Smt. Neeta W/O.Rajesh Katkamwar
R/o. Flat No.100,Shiva Arcade,P.No.6, Narkesari Society,Jaiprakash Nagar,Somalwada,Nagpur.
Nagpur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Shri. Bhupendra Bhaskar Marliwar
Plot No.54,Near Radhe Mangalam Hall,Friend's Layout No.4,Dindayal Nagar,Nagpur-440022
Nagpur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. Shekhar P.Muley PRESIDENT
 HON'BLE MRS. Chandrika K. Bais MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 23 Jan 2018
Final Order / Judgement

::निकालपत्र::

(पारीत व्‍दारा- सौ.चंद्रिका किशोरसिंह बैस, मा.सदस्‍या.)

                 (पारीत दिनांक– 23 जानेवारी, 2018)                 

01.     उपरोक्‍त नमुद तक्रारदारानीं ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्‍या कलम 12 खाली प्रस्‍तुत दोन्‍ही तक्रारी विरुध्‍दपक्षा कडून विकत घेतलेल्‍या निवासी सदनीका व ईमारती मध्‍ये आश्‍वासित केल्‍या प्रमाणे योग्‍य त्‍या सोयी सुविधा पुरविल्‍या नसल्‍याचे आरोपा वरुन दाखल केलेल्‍या आहेत. नमुद दोन्‍ही तक्रारीं मधील तक्रारदार हे जरी वेगवेगळे असले तरी तपशिलाचा थोडा फार भाग वगळता यातील विरुध्‍दपक्ष हे एकच आहे आणि ज्‍या कायदेशीर तरतुदींच्‍या आधारे या तक्रारी निकाली निघणार आहेत, त्‍या कायदेशीर तरतुदी सुध्‍दा एक सारख्‍याच आहेत म्‍हणून या दोन्‍ही तक्रारीं मध्‍ये आम्‍ही एकत्रितरित्‍या निकाल पारीत करीत आहोत-

 

02.       दोन्‍ही तक्रारी मधील तक्रारदारांचे संक्षीप्‍त कथन   खालील प्रमाणे-  

       उपरोक्‍त नमुद तक्रारदार हे निवासी सदनीकेच्‍या शोधात होते, त्‍या नुसार त्‍यांनी विरुध्‍दपक्ष बिल्‍डर्स सोबत संपर्क केला, विरुध्‍दपक्षाने नरकेसरी सोसायटी, जयप्रकाश नगर सोमलवाडा येथील खसरा नं. 6/118/1 सी.टी. सर्व्‍हे नं.107/2 यावर बांधल्‍या जात असलेल्‍या ‘शिव आर्केड’ या बहुमजली इमारतीची माहिती दिली. त्‍यावेळी तक्रारदारांना त्‍यांनी माहितीपत्रक दिले व दि.08.04.2012 रोजी दैनिक लोकमत मध्‍ये प्रसिध्‍द केलेल्‍या जाहीरातीची प्रत दिली.

     विरुध्‍दपक्षाचे माहिती पत्रकाप्रमाणे  ते  ईमारती मध्‍ये  खालील प्रमाणे सर्व सोयी सुविधा उपलब्‍ध  उपलब्‍ध करुन देतील-

 

(ए) मॉडयुलर किचन चिमणीसह

(बी) प्रत्‍येक फ्लॅट मध्‍ये स्‍वतंत्र पाण्‍याची व्‍यवस्‍था

(सी) आर.ओ. वॉटर प्‍युरिफीकेशन सिस्‍टीम.

(डी) प्‍लम्‍बींग तथा सॅनिटेशन जग्‍वार फीटींग.

(इ) आयएसआय ग्रेड ईलेक्ट्रिक फीटींग.

(एफ)  लिफ्ट सुविधा पॉवर बॅकअप सहीत.

(जी)  स्‍टेट ऑफ आर्ट प्‍लम्‍बींग आणि इलेक्ट्रिफीकेशन

(एच)       नॅचरल वॉटर हार्वेस्‍टींग.

(आय)  ड्राईंग रुम मध्‍ये वुडन टाईल्‍स

      ग्राहक तक्रार क्रं- RBT/CC/13/829 मधील तक्रारदार हे नात्‍याने पती व पत्‍नी असून त्‍यांनी दोघांनी मिळून विरुध्‍दपक्षाचे उपरोक्‍त नमुद बहुमजली ईमारती मधील पहिल्‍या मजल्‍या वरील फ्लॅट क्रं-100 बिल्‍टअप एरिया 1400 चौरसफूट एकूण-52,00,000/- एवढया किमतीत दिनांक-25 जुलै, 2012 रोजीच्‍या विक्रीपत्रान्‍वये खरेदी केला आणि उभय  तक्रारदारांनी फ्लॅटचा प्रत्‍यक्ष्‍य  ताबा दिनांक-07/09/2012  रोजी घेतला.

    तर ग्राहक तक्रार क्रं- RBT/CC/13/830 मधील तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्षाचे उपरोक्‍त नमुद बहुमजली ईमारती मधील चौथ्‍या मजल्‍या वरील फ्लॅट क्रं-400 बिल्‍टअप एरिया 1400 चौरसफूट एकूण-36,00,000/- एवढया किमतीत दिनांक-21 जुलै, 2012 रोजीच्‍या विक्रीपत्रान्‍वये खरेदी केला आणि तक्रारकर्त्‍याने फ्लॅटचा प्रत्‍यक्ष्‍य  ताबा दिनांक-21/07/2012  रोजी घेतला.     तक्रारदारानीं ज्‍यावेळी त्‍यांच्‍या-त्‍यांच्‍या फ्लॅटचे प्रत्‍यक्ष्‍य ताबे घेतलेत, त्‍या वेळी  विरुध्‍दपक्षाचे माहितीपत्रकातील उपरोक्‍त नमुद केल्‍या प्रमाणे क्रं-(ए) ते (आय) मधील सुविधा दिल्‍या नसल्‍याचे त्‍यांचे लक्षात आले.

 

   ग्राहक तक्रार क्रं- RBT/CC/13/829 मधील तक्रारदारांनी चिमणी करीता रुपये-25,000/- एवढी रक्‍कम खर्च करुन सदर सुविधा उपलब्‍ध करुन घेतली.

    तक्रारदारांनी पुढे असे नमुद केले की, विरुध्‍दपक्षाला या बाबीचे ज्ञान असल्‍याने विरुध्‍दपक्ष कार्यालयातील गौरव तेंडूलकर याने फ्लॅटला भेटी दिल्‍यात त्‍यावेळी त्‍याला सुध्‍दा सदर सुविधा उपलब्‍ध केल्‍या नसल्‍याचे दिसून आले. विरुध्‍दपक्षाने पंधरा दिवसांचे आत सोयी सुविधा उपलब्‍ध करुन देण्‍याचे आश्‍वासन दिले परंतु त्‍या आज पर्यंत पुरविलेल्‍या नाहीत. विरुध्‍दपक्षाने दिनांक-15/02/2013 रोजी प्रत्‍यक्ष्‍य मोक्‍यावर भेट दिली, त्‍यावेळी तक्रारकर्ता    श्री मनोज बोकरे यांनी ईमारती मधील  समस्‍यां बद्दल सांगितले असता विरुध्‍दपक्षाने त्‍या समस्‍या दुर करण्‍याचे आश्‍वासन दिले.

    तक्रारदारांनी प्रत्‍यक्ष्‍य फ्लॅटचा ताबा घेतल्‍या नंतर ते राहण्‍यास गेल्‍या नंतर तेथे बांधकामात खालील दोष आढळून आले-

 

(1) प्रत्‍येक खोलीतील भिंती मधून पाणी झिरपत होते.

(2) समोरील खोलीतील रंग बरोबर मारलेला नव्‍हता.

(3) पुट्टीचे काम करण्‍यात आलेले नव्‍हते.

(4) टायलेट सिट लिकेज असून बाथरुम मध्‍ये क्रॅक आहे.

(5) लिफ्टला पॉवर बॅक अप नव्‍हते.

(6) ईलेक्ट्रिक बोर्ड योग्‍य दर्जाचे नसल्‍यामुळे स्‍पॉर्कींग होत होते.

(7) योग्‍य दर्जाचे दरवाजे बसविलेले नव्‍हते, त्‍यावर हवेचे फुगे होते.

(8) खोल्‍यां मधील टाईल्‍स व्‍यवस्थित बसविलेल्‍या नव्‍हत्‍या.

(9) सुरक्षे करीता किचन रेलींग रॉड पुरविलेला नव्‍हता.

(10) छताचे वरील टँक आणि टाके यांना झाकण नव्‍हते.

(11) शॉर्ट सर्कीट प्रतिबंधीत करण्‍यासाठी योग्‍य कारवाई नव्‍हती.

(12) ड्रेनेज पाईपसला योग्‍य क्‍लॅम्‍पस नसल्‍याने पाणी गळत होते.

(13) पार्कींग मधील फ्लोअरींग व्‍यवस्थित नव्‍हते.

(14) पी.ओ.पी.वर्क व्‍यवस्‍थीत नव्‍हते.

(15) टेलीफोनसाठी पॉईन्‍ट दिलेले नव्‍हते.

     तक्रारदारांनी पुढे असे नमुद केले की, विरुध्‍दपक्षाने सदनीकाधारकांची सोसायटी सुध्‍दा नोंदणी करुन दिली नाही. तक्रारदार व ईतर सदनीकाधारकांनी प्रांजल बोकडे आर्किटेक्‍ट यांची नेमणूक केली त्‍यांनी पाहणी करुन अहवाला मध्‍ये विरुध्‍दपक्ष बिल्‍डरने आश्‍वासित केल्‍या प्रमाणे सोयी व सुविधा उपलब्‍ध करुन दिल्‍या नाहीत व त्‍या पूर्ण करण्‍यासाठी उपरोक्‍त नमुद दोन्‍ही तक्रारदारांना प्रत्‍येक सदनीकेपोटी रुपये-8,96,765/- एवढा खर्च येणार असल्‍याचे नमुद केले. अशाप्रकारे विरुध्‍दपक्षाने आश्‍वासित केल्‍या प्रमाणे सोयी सुविधा पुरविल्‍या नाहीत तसेच दर्जेदार साहित्‍य न वापरुन दोषपूर्ण सेवा दिली आणि अनुचित व्‍यापारी पध्‍दतीचा अवलंब केला. तक्रारदार व इतर सदनीकाधारकांनी विरुध्‍दपक्षाला दिनांक-13/06/2013 रोजीचे पत्र देऊन  सदर त्रृटी दुर करण्‍याची विनंती केली तसेच शेवटी दिनांक-20/09/2013 रोजी कायदेशीर नोटीस सुध्‍दा पाठविली परंतु योग्‍य प्रतिसाद न‍ मिळाल्‍याने नमुद दोन्‍ही तक्रारी ग्राहक मंचात दाखल करुन खालील मागण्‍या विरुध्‍दपक्षा विरुध्‍द केल्‍यात-

(1)   ग्राहक तक्रार क्रं-RBT/CC/13/829 मधील तक्रारदारांना चिमणीसाठी आलेला खर्च रुपये-25,000/- परत करण्‍याचे विरुध्‍दपक्षाला आदेशित व्‍हावे.

(2)   आर्कीटेक्‍ट यांनी दिलेल्‍या अहवाला नुसार विरुध्‍दपक्षाने सोयी सुविधा न दिल्‍याने त्‍या उपलब्‍ध करण्‍यासाठी दिलेल्‍या अंदाजपत्रका प्रमाणे  दोन्‍ही तक्रारीं मधील तक्रारदारांना येणारा खर्च तक्रारनिहाय प्रत्‍येकी रुपये-8,96,765/- विरुध्‍दपक्षाने देण्‍याचे आदेशित व्‍हावे.

(3)  तक्रारखर्च म्‍हणून तक्रारनिहाय प्रत्‍येकी  रुपये-50,000/- तसेच मानसिक त्रासा बद्दल तक्रारनिहाय प्रत्‍येकी रुपये-3,00,000/- एवढी रक्‍कम विरुध्‍दपक्षाने देण्‍याचे आदेशित व्‍हावे.

(4)   या सर्व रकमांवर वार्षिक 18 टक्‍के दराने व्‍याज मिळावे तसेच आवश्‍यक दस्‍तऐवज पुरविण्‍याचे विरुध्‍दपक्षाला आदेशित व्‍हावे.

 

03.  विरुध्‍दपक्षाने तक्रारनिहाय लेखी उत्‍तर ग्राहक मंचा समक्ष सादर करुन तक्रारदार यांनी फ्लॅट विकत घेतल्‍याची बाब मान्‍य केली मात्र त्‍यांनी यु‍रोपीयन स्‍टाईलचे कंस्‍ट्रक्‍शन देणार असल्‍याची बाब नाकबुल केली. त्‍यांनी शिव आर्केड ईमारतीचे जे माहितीपत्रक छापले तो एक ईमारत सादरीकरणा संबधीचा दस्‍तऐवज असून तो कायदेशीर दस्‍तऐवज नसल्‍याचे नमुद केले होते. तक्रारदार आणि विरुध्‍दपक्ष यांच्‍या मध्‍ये कधीही वॉटर प्‍युरिफीकेशन सिस्‍टीम, पॉवर बॅक अप लिफ्ट, वुडन टाईल्‍स, माडयुलर किचन चिमणीसह, जग्‍वार फीटींग आणि नॅचरल वॉटर हॉर्वेस्‍टींग इत्‍यादी सुविधा पुरविण्‍या बाबत करार झालेला नाही. मात्र  ग्राहक तक्रार क्रं-RBT/CC/13/829 मध्‍ये विक्री करार दिनांक-05/05/2012 सोबत निशाणी क्रं-ए प्रमाणे तसेच ग्राहक तक्रार क्रं-RBT/CC/13/830 मध्‍ये विक्री करार दिनांक-19/09/2011 सोबत निशाणी क्रं-ए प्रमाणे  ते सोयी सुविधा पुरविणार असल्‍याचे मान्‍य केले परंतु सदरचा दस्‍तऐवज तक्रारदार लपवून ठेवीत आहे. विक्रीपत्राचे दिनांकालाच तक्रारदारांना फ्लॅटचा ताबा दिला होता. विक्रीपत्राचे वेळी तक्रारदार हे पुरविलेल्‍या सोयी सुविधा बाबत समाधानी होते. विरुध्‍दपक्षाने लिफ्ट पॉवरबॅकअप सह, तसेच मॉडयुलर किचन चिमणसह, थ्री फेज ईलेक्ट्रिक मीटर, वॉटर मिटर, अलॉटेड पार्कींग या सुविधा जर तक्रारदार व ईतर सदनीकाधारकांनी पैसे दिल्‍यास पुरविण्‍यात येतील असे मान्‍य केले होते परंतु तक्रारदारांनी त्‍याचे शुल्‍क दिले नाही. विरुध्‍दपक्षाने विक्री करारातील निशाणी क्रं-ए मध्‍ये नमुद केल्‍या प्रमाणे सर्व सोयी सुविधा पुरविलेल्‍या आहेत. अन्‍य सदनीकाधारकांनी चिमणी पुरविण्‍यासाठी विरुध्‍दपक्षाला पैसे दिले असल्‍याने त्‍यांनी ती सुविधा उपलब्‍ध करुन दिली, परंतु तक्रारदारांनी चिमणीसाठी पैसे दिले नाहीत. तक्रारदारांनी बांधकामात ज्‍या त्रृटी असल्‍याचे नमुद केले ते संपूर्णपणे चुकीचे आहे, ग्राहक मंचाने त्‍यासाठी कमीश्‍नर नियुक्‍ती करुन बांधकामाचे निरिक्षण करुन अहवाल मागवावा. विक्रीपत्रात विरुध्‍दपक्ष हे सोसायटीची नोंदणी करुन देतील असे कुठेही नमुद केलेले नाही. तक्रारदार यांनी आर्कीटेक्‍टची नियुक्‍ती करुन अहवाल तयार केल्‍याची बाब नाकबुल केली. विरुध्‍दपक्षाने तक्रारदारांना आवश्‍यक दस्‍तऐवज पुरविले नसल्‍याची बाब सुध्‍दा नाकबुल केली. तक्रारदारांच्‍या         दिनांक-21/10/2013 रोजीच्‍या नोटीसला विरुध्‍दपक्षाने दिनांक-07/10/2013 रोजी उत्‍तर दिले आहे परंतु तक्रारदारानीं ते उत्‍तर दाखल केले नाही. तक्रारदारांनी त्रृटी दुर करण्‍यासाठी रुपये-8,96,765/- एवढा खर्च येणार असल्‍याचे जे नमुद केलेले आहे ते पूर्णपणे खोटे व चुकीचे आहे. तक्रारदारांची तक्रार ही खोटी व चुकीची असून ती खारीज करण्‍यात यावी अशी विनंती विरुध्‍दपक्षा तर्फे करण्‍यात आली.

 

04.   मौखीक युक्‍तीवादाचे वेळी दोन्‍ही पक्षकार व त्‍यांचे अधिवक्‍ता हे पुकारा होऊनही गैरहजर राहिलेत त्‍यामुळे तक्रारदारांची दाखल तक्रार, विरुध्‍दपक्षाचे लेखी उत्‍तर, उभयपक्षां तर्फे दाखल दस्‍तऐवजाच्‍या प्रती यावरुन अतिरिक्‍त ग्राहक मंचाचा निष्‍कर्ष खालील प्रमाणे देण्‍यात येतो-

 

                                        :: निष्‍कर्ष   ::

05.  दोन्‍ही तक्रारी मधील तक्रारदार आणि विरुध्‍दपक्ष यांचे मध्‍ये  फ्लॅट खरेदी संबधी जे विक्रीपत्र नोंदविल्‍या गेले त्‍याची प्रत दाखल करण्‍यात आली, ग्राहक तक्रार क्रं- RBT/CC/13/829 मधील तक्रारदार हे नात्‍याने पती व पत्‍नी असून त्‍यांनी दोघांनी मिळून विरुध्‍दपक्षाचे उपरोक्‍त नमुद बहुमजली ईमारती मधील पहिल्‍या मजल्‍या वरील फ्लॅट क्रं-100 बिल्‍टअप एरिया 1400 चौरसफूट एकूण-52,00,000/- एवढया किमतीत दिनांक-25 जुलै, 2012 रोजीच्‍या विक्रीपत्रान्‍वये खरेदी केला तर ग्राहक तक्रार क्रं- RBT/CC/13/830 मधील तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्षाचे उपरोक्‍त नमुद बहुमजली ईमारती मधील चौथ्‍या मजल्‍या वरील फ्लॅट क्रं-400 बिल्‍टअप एरिया 1400 चौरसफूट एकूण-36,00,000/- एवढया किमतीत दिनांक-21 जुलै, 2012 रोजीच्‍या विक्रीपत्रान्‍वये खरेदी केला. सदर विक्रीपत्र हे मे.तारा इन्‍फ्राटेक या भागीदारी फर्म तर्फे त्‍यातील अधिकृत भागीदार भूपेंद्र भास्‍कर मार्लीवार यांनी नोंदवून दिल्‍याचे दिसून येते.

06.    विक्रीपत्रात असेही नमुद आहे की, लिकेज, सिपेज ऑफ वॉटर इत्‍यादी समस्‍या उदभवल्‍यास त्‍यासाठी येणारा खर्च हा खरेदीदार याला करावा लागेल. तसेच कॉमन सुविधा इलेक्ट्रिक मीटर बोर्ड, ड्रेनेज, रेन वॉटर पाईप इत्‍यादी खर्च खरेदीदार याला करावा लागेल. विक्रीपत्रात पुढे असेही नमुद अहे की, विरुध्‍दपक्षाने पॉवर बॅकअप लिफ्ट, मॉडयुलर किचन चिमणीसह, थ्री फेज इलेक्ट्रिक मीटर, वॉटर मीटर, अलॉटेड पार्कींग इत्‍यादी सुविधा पुरविल्‍याने सदनीका खरेदी करण्‍यात येत आहे.

07. सदर विक्रीपत्रा वरुन असा निष्‍कर्ष निघतो की, विरुध्‍दपक्षाने पॉवर बॅकअप लिफ्ट, मॉडयुलर किचन चिमणीसह, थ्री फेज इलेक्ट्रिक मीटर, वॉटर मीटर, अलॉटेड पार्कींग अशा सुविधा पुरविण्‍याचे मान्‍य केले होते. मात्र लिकेज, सिपेज ऑफ वॉटर इत्‍यादी समस्‍या उदभवल्‍यास त्‍यासाठी येणारा खर्च हा खरेदीदार याला करावा लागेल. तसेच कॉमन सुविधा इलेक्ट्रिक मीटर बोर्ड, ड्रेनेज, रेन वॉटर पाईप इत्‍यादी खर्च खरेदीदार याला करावा लागेल असे नमुद केलेले आहे.

08.   विरुध्‍दपक्षाचे माहितीपत्रकात खालील सुविधा देण्‍याचे नमुद केले आहे.

* वुडन फ्लोअरींग.

     * मॉडयुलर किचन विथ चिमणी.

      * नॅचरल वॉटर हॉर्वेस्‍टींग.

      * लिफ्ट विथ पॉवर बॅक अप.

      * अलोटेड कव्‍हर पार्कींग.

      * सेप्रेट  वॉटर सप्‍लॉय प्रत्‍येक फ्लॅट मध्‍ये

      *  स्‍टेट ऑफ आर्ट प्‍लम्‍बींग एवं इलेक्ट्रिफीकेशन.

 

09.   विरुध्‍दपक्षाचे उत्‍तरात सदर माहितीपत्रक हे कायदेशीर दस्‍तऐवज असल्‍याची बाब नाकारण्‍यात आली परंतु विरुध्‍दपक्षाच्‍या या नाकारण्‍याला काहीही अर्थ उरत नाही कारण विरुध्‍दपक्षाने लेखी आश्‍वासन देऊन ग्राहकांना फ्लॅट विक्रीचे आमीष दाखविले असल्‍याने विरुध्‍दपक्षाने माहितीपत्रकात दिलेल्‍या सुविधा सदनीकाधारकाला देणे त्‍याचेवर बंधनकारक असून सदर माहितीपत्रक हा एक वैध दस्‍तऐवज आहे. विरुध्‍दपक्षाने उत्‍तरात असेही नमुद केले की, चिमणीसह मॉडयुलर किचन ज्‍या सदनीकाधारकाने अतिरिक्‍त शुल्‍क दिले त्‍यांना चिमणी पुरविण्‍यात आली परंतु याही मुद्दावर विरुध्‍दपक्षाचे उत्‍तरात फारसे तथ्‍य दिसून येत नाही, आश्‍वासित केल्‍या प्रमाणे सुविधा पुरविणे विरुध्‍दपक्षाला बंधनकारक (Mandatory) आहे. विरुध्‍दपक्षाने त्‍याचे उत्‍तरात असेही नमुद केले आहे की, विक्रीपत्रा सोबत निशानी क्रं- ए मध्‍ये नमुद केल्‍या प्रमाणे सोयी सुविधा पुरविण्‍याचे त्‍याने मान्‍य केले होते परंतु सदर निशाणी क्रं-ए सुध्‍दा विरुध्‍दपक्षाने दाखल केलेला नाही.

10.    तक्रारदार व अन्‍य सदनीकाधारकांनी नोंदणीकृत सिव्‍हील अभियंता प्राजंली बोकडे यांचे कडून ईमारत व सदनीका यामधील बांधकाम त्रृटी बाबत पाहणी करुन घेतली व त्‍यांनी दिनांक-15 जुलै, 2013 रोजीचा आपला अहवाल सादर करुन त्‍यामध्‍ये खालील त्रृटी दुर करण्‍यासाठी खर्चाचे अंदाजपत्रक दिले, त्‍या नुसार योग्‍य त्‍या टाईल्‍स बसविलेल्‍या नाहीत, भिंतीनां वॉटर प्रुफींग ट्रीटमेंट, मेन एन्‍टरन्‍स डोअर डॅमेज झाल्‍याने त्‍यासाठी येणारा खर्च, बाल्‍कनी फलश डोअर डॅमेज झाल्‍याने त्‍यासाठी येणारा खर्च, टॉयलेट मध्‍ये बसविलेली सिट डॅमेज झाल्‍याने येणारा खर्च, प्‍लम्‍बींग फीक्‍चर दुर करुन   त्‍याठिकाणी जग्‍वार फीक्‍चर बसविणे, एस.डब्‍लु.आर. पाईपलाईन बसविणे,इलेक्ट्रिक स्विचेस योग्‍य दर्जाचे बसविणे, किचन मध्‍ये रेलींग राऊन्‍ड बार बसविणे, बेडरुम मध्‍ये आरसीसी लॉफ्ट बसविणे, ओव्‍हरहेड आणि अंडरग्राऊंड टॅंकला फेब्रीकेटेड कव्‍हर बसविणे,  पार्कींग एरीया मध्‍ये सिमेंट कॉन्‍क्रीट फलोअरींग करणे, इलेक्ट्रिक चिमणी, लिफट मध्‍ये पॉवर बॅक अप बसविणे, आर.ओ. वॉटर प्‍युरिफीकेशन सिस्‍टीम आणि वॉटर हार्वेस्‍टींग सिस्‍टीम इत्‍यादीसाठी एकूण रुपये-8,96,765/- एवढा खर्च येणार असल्‍याचे नमुद केले.

 

11.   सदर सिव्‍हील अभियंता प्राजंली बोकडे यांनी जो अहवाल दिलेला आहे तो फक्‍त सदनीकाधारकांच्‍या उपस्थितीत पाहणी करुन दिलेला आहे तसेच तो विरुध्‍दपक्षाचे अनुपस्थितीत दिलेला आहे, त्‍यामध्‍ये काही बाबींचा जास्‍तीचा खर्च नमुद केलेला आहे, त्‍यामुळे तो जसाच्‍या तसा मान्‍य करता येणार नाही.

      सिव्‍हील अभियंता प्राजंली बोकडे यांचे अहवाला प्रमाणे मेन एन्‍टरन्‍स डोअर डॅमेजसाठी येणारा खर्च रुपये-10,000/- बाल्‍कनी फलश डोअर डॅमेज खर्च रुपये-12,000/- टॉयलेट मध्‍ये बसविलेली सिट डॅमेजसाठी येणारा खर्च रुपये-10,000/- एस.डब्‍लु.आर. पाईपलाईन बसविणे यासाठी येणारा खर्च रुपये-10,000/- इलेक्ट्रिक स्विचेस योग्‍य दर्जाचे बसविण्‍यासाठी येणारा खर्च रुपये-40,000/- किचनमधील बॉल्‍कनी मध्‍ये सेफ्टी रेलींग बार बसविण्‍यासाठी येणारा खर्च रुपये-5000/- चिमणीसाठी येणारा खर्च रुपये-12,000/- असे मिळून प्रत्‍येक प्रकरणात एकूण रुपये-99,00,000/- खर्च तक्रारदारांच्‍या सदनीके संबधी सुचविलेला आहे.

     सिव्‍हील अभियंता प्राजंली बोकडे यांचे अहवाला प्रमाणे ज्‍या कॉमन सुविधा पुरविण्‍यासाठी खर्च दिलेला आहे त्‍यामधील कॉमन सुविधा जसे ओव्‍हरहेड आणि अंडरग्राऊंड टॅंकला फेब्रीकेटेड कव्‍हर बसविण्‍यासाठी येणारा खर्च रुपये-2000/-,  पार्कींग एरीया मध्‍ये सिमेंट कॉन्‍क्रीट फलोअरींग करण्‍यासाठी येणारा खर्च रुपये-65,030/- इलेक्ट्रिक लिफट मध्‍ये पॉवर बॅक अप बसविण्‍यासाठी येणारा खर्च रुपये-2,50,000/- वॉटर हार्वेस्‍टींग सिस्‍टीमसाठी येणारा खर्च रुपये-20,000/- असे मिळून कॉमन सुविधेसाठी रुपये-3,47,030/- एवढा खर्च सुचविलेला आहे.

12.     सिव्‍हील अभियंता प्रांजली बोकडे यांनी सुचविलेला खर्च हा जास्‍त रकमेचा दिसून येतो, त्‍यामुळे तो जसाच्‍या तसा मान्‍य करता येणार नाही. तक्रारदारांनी या सोयी सुविधा पुरविण्‍यासाठी पैशाचे स्‍वरुपात मागणी केलेली आहे. तक्रारदारांनी संपूर्ण टाईल्‍स बदलवून मिळण्‍याची मागणी केलेली आहे परंतु ज्‍यावेळी त्‍यांनी फ्लॅटचे विक्रीपत्र नोंदवून घेतले त्‍याच वेळी त्‍यांनी या बाबी पाहावयास हव्‍या होत्‍या, आता बसविलेल्‍या टाईल्‍स उखडून नव्‍याने विरुध्‍दपक्षाने त्‍याच बाबीवर खर्च करणे अपेक्षीत नाही, त्‍यामुळे टाईल्‍सची मागणी मान्‍य करता येत नाही. मात्र काही दोष सदनीके मध्‍ये  राहण्‍यास गेल्‍या नंतर लक्षात येतात, जसे ईलेक्ट्रिक फीटींग मध्‍ये स्‍पॉर्कींग होणे, दरवाजे नादुरुस्‍त होणे, टॉयलेट सिट डॅमेज होणे, प्‍लॅम्‍बींगचे पाईप्‍स मध्‍ये योग्‍य क्‍लॅम्‍प न वापरल्‍यास त्‍यामधून पाणी गळती होणे, लाईन गेल्‍या नंतर बॅक अप नसल्‍यास लिफ्ट बंद पडणे इत्‍यादी बाबी दुरुस्‍त करुन मिळण्‍यास तक्रारदार हे पात्र आहेत.

 

13.   विरुध्‍दपक्षाने सिव्‍हील अभियंता प्राजंली बोकडे यांचे अहवालाला आव्‍हान दिलेले नाही किंवा त्‍यांचे साक्षीची मागणी केलेली नाही. अशाप्रकारे विरुध्‍दपक्षाने माहितीपत्रकात नमुद केल्‍या प्रमाणे आवश्‍यक सोयी सुविधा न पुरवून तसेच बांधकामात त्रृटी ठेऊन दोषपूर्ण सेवा दिल्‍याची बाब सिध्‍द होते त्‍यामुळे आम्‍ही सिव्‍हील अभियंता प्राजंली बोकडे यांनी दिलेल्‍या अहवालातील उपरोक्‍त नमुद केल्‍या प्रमाणे काही कॉमन सुविधा तसेच अंतर्गत सुविधा पुरवून देण्‍यासाठी विरुध्‍दपक्षाला आदेशित करीत आहोत-

 

14.   सदनीके मधील सुविधां बाबत- ग्राहक मंचाचे निष्‍कर्षा प्रमाणे दोन्‍ही तक्रारदार यांचे सदनीके मध्‍ये सिव्‍हील अभियंता प्रांजली बोकडे यांचे दिनांक-15 जुलै, 2013 रोजीचे अहवाला प्रमाणे  मेन एन्‍टरन्‍स डॅमेज डोअर दुरुस्‍ती, बाल्‍कनी फलश डॅमेज डोअर दुरुस्‍ती, टॉयलेट मध्‍ये बसविलेली डॅमेज सिट बसवून देणे,  योग्‍य दर्जाचे आयएसआय दर्जाचे इलेक्ट्रिक स्विचेस, सदनीकेमध्‍ये पाण्‍याचे नळ कनेक्‍शन, आर.ओ.पाणी शुध्‍दीकरण यंत्रणा, प्‍लम्‍बींगचे पाईप मध्‍ये योग्‍य क्‍लॅम्‍प बसवून देणे जेणे करुन पाण्‍याची गळती थांबेल अशा योग्‍य सुविधा तक्रारदारांना पुरवाव्‍यात किंवा असे करणे विरुध्‍दपक्षास शक्‍य नसल्‍यास या सोयी सुविधेसाठी तक्रारदारांना जो खर्च येईल तो संपूर्ण खर्च विरुध्‍दपक्षाने द्दावा. या शिवाय ग्राहक तक्रार क्रं-RBT/CC/13/829 मधील तक्रारदार  श्री व सौ.कटकमवार यांनी चिमणी बसवून घेतल्‍याने त्‍यासाठी आलेला खर्च रुपये-15,000/- तक्रारदारांना द्दावेत.

 

15.   कॉमन सुविधां बाबतीत- त्‍याच प्रमाणे ग्राहक मंचाचे निष्‍कर्षा  प्रमाणे विरुध्‍दपक्षाने त्‍याचे माहितीपत्रकात आश्‍वासित केल्‍या प्रमाणे  कॉमन सुविधां मध्‍ये तक्रारदार व इतर सदनीकाधारकांना लिफ्ट विथ पॉवर बॅक अप, अलोटेड कव्‍हर पार्कींग प्‍लम्‍बींग मध्‍ये योग्‍य क्‍लॅम्‍प जेणे करुन पाणी गळती होणार नाही इत्‍यादी सुविधा पुरविणे आवश्‍यक आहे. तसेच पार्कींग मधील फ्लोअरींग उखडून गेले असल्‍यास ते योग्‍यरित्‍या दुरुस्‍त करुन देणे आवश्‍यक आहे..

     त्‍याच बरोबर तक्रारदार हे झालेल्‍या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल प्रत्‍येक प्रकरणात रुपये-10,000/- व तक्रारखर्च म्‍हणून प्रत्‍येक प्रकरणात रुपये-5000/- विरुध्‍दपक्षा कडून मिळण्‍यास पात्र आहेत.

        वरील सर्व वस्‍तुस्थितीचा विचार करुन, आम्‍ही उपरोक्‍त नमुद दोन्‍ही तक्रारीं मध्‍ये खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत-

                         ::आदेश::

 

(01)  ग्राहक तक्रार क्रं-RBT/CC/13/829 मधील तक्रारदार श्री राजेश कटकमवार आणि सौ.निता राजेश कटकमवार आणि ग्राहक तक्रार क्रं- RBT/CC/13/830 मधील तक्रारकर्ता श्री मनोज कमलाकर बोकरे यांच्‍या तक्रारी, विरुध्‍दपक्ष मे. तारा इन्‍फ्राटेक कार्यालय प्‍लॉट क्रं-68, दिनदयाल नगर, नागपूर या फर्म तर्फे भागीदार श्री भूपेंद्र भास्‍कर मार्लीवार याचे विरुध्‍द अंशतः मंजूर करण्‍यात येतात.

(02)  विरुध्‍दपक्ष फर्म तर्फे तिचा भागीदार भूपेंद्र भास्‍कर मार्लीवार याला आदेशित करण्‍यात येते की, त्‍याने दोन्‍ही तक्रारदारांनी बहुमजली ईमारत शिव आर्केड मधील खरेदी केलेल्‍या सदनीका अनुक्रमे फ्लॅट क्रं-100 व फ्लॅट क्रं-400 मध्‍ये खालील नमुद सुविधा पुरवाव्‍यात-

      मेन एन्‍टरन्‍स डॅमेज डोअर दुरुस्‍त करुन देणे, बाल्‍कनी फलश डॅमेज डोअर दुरुस्‍त करुन देणे, टॉयलेट मध्‍ये बसविलेली डॅमेज सिट दुरुस्‍त करुन बसवून देणे, योग्‍य दर्जाचे आयएसआय दर्जाचे इलेक्ट्रिक स्विचेस लावले नसल्‍यास ते बसवून देणे, प्रत्‍येक सदनीके मध्‍ये पाण्‍याचे नळ कनेक्‍शन पुरविणे, आर.ओ.पाणी शुध्‍दीकरण यंत्रणा, प्‍लम्‍बींगचे पाईप मध्‍ये योग्‍य क्‍लॅम्‍प बसवून देणे जेणे करुन पाण्‍याची गळती थांबेल अशा योग्‍य सुविधा तक्रारदारांना पुरवाव्‍यात किंवा असे करणे विरुध्‍दपक्षास शक्‍य नसल्‍यास या सोयी सुविधेसाठी तक्रारदारांना जो खर्च येईल तो संपूर्ण खर्च विरुध्‍दपक्षाने द्दावा. या शिवाय ग्राहक तक्रार क्रं- RBT/CC/13/830 मधील तक्रारकर्ता श्री मनोज कमलाकर बोकरे यांचे सदनीके मध्‍ये चिमणी बसवून द्दावी.

(03)  या शिवाय ग्राहक तक्रार क्रं-RBT/CC/13/829 मधील तक्रारदार  श्री व सौ.कटकमवार यांनी चिमणी बसवून घेतल्‍याने त्‍यासाठी आलेला खर्च रुपये-15,000/- (अक्षरी रुपये पंधरा हजार फक्‍त) तक्रारदारांना द्दावेत.

(04)  विरुध्‍दपक्ष फर्म तर्फे तिचा भागीदार भूपेंद्र भास्‍कर मार्लीवार याला  असेही आदेशित करण्‍यात येते की, त्‍याने माहितीपत्रकात आश्‍वासित केल्‍या प्रमाणे कॉमन सुविधां मध्‍ये तक्रारदार व इतर सदनीकाधारकांना लिफ्ट विथ पॉवर बॅक अप, अलोटेड कव्‍हर पार्कींग, प्‍लम्‍बींग मध्‍ये योग्‍य क्‍लॅम्‍प बसवून देणे जेणे करुन पाणी गळती होणार नाही इत्‍यादी सुविधा पुरवाव्‍यात. तसेच पार्कींग मधील फ्लोअरींग उखडून गेले असल्‍यास ते योग्‍यरित्‍या दुरुस्‍त करुन द्दावे.

(05)   दोन्‍ही तक्रारीं मधील तक्रारदारांना झालेल्‍या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल प्रत्‍येक प्रकरणात रुपये-10,000/-(अक्षरी प्रत्‍येक प्रकरणात रुपये दहा हजार फक्‍त)  व तक्रारखर्च म्‍हणून प्रत्‍येक प्रकरणात रुपये-5000/-(अक्षरी प्रत्‍येक प्रकरणात रुपये पाच हजार फक्‍त) विरुध्‍दपक्ष फर्म तर्फे तिचा भागीदार भूपेंद्र भास्‍कर मार्लीवार याने द्दावेत.

(06)  सदर आदेशाचे अनुपालन विरुध्‍दपक्ष फर्म तर्फे तिचा भागीदार भूपेंद्र भास्‍कर मार्लीवार याने निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्‍त झाल्‍याचे दिनांका पासून 45 दिवसांचे आत करावे. या संबधात विरुध्‍दपक्ष फर्म तर्फे तिचा भागीदार भूपेंद्र भास्‍कर मार्लीवार याने निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्‍त झाल्‍या बरोबर तक्रारदारांना त्‍वरीत लेखी कळवावे की, तो स्‍वतः काम करेल की, ते काम तक्रारदार यांनी करावे, तक्रारदारांनी कामे केल्‍यास येणारा खर्च देण्‍याची जबाबदारी विरुध्‍दपक्षाची राहिल.  

(07)    प्रस्‍तुत निकालपत्राच्‍या प्रमाणित प्रती  सर्व पक्षकारांना निःशुल्‍क उपलब्‍ध  करुन  देण्‍यात याव्‍यात. निकालपत्राची मूळ प्रत ग्राहक तक्रार क्रं-RBT/CC/13/829 मध्‍ये लावण्‍यात यावी आणि अन्‍य ग्राहक तक्रार क्रं-RBT/CC/13/830 मध्‍ये निकालपत्राची प्रमाणित प्रत लावण्‍यात यावी.       

 
 
[HON'BLE MR. Shekhar P.Muley]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. Chandrika K. Bais]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.