(पारीत व्दारा श्रीमती वृषाली गौरव जागीरदार, मा.सदस्या)
(पारीत दिनांक–25 /01/2021)
01. तक्रारकर्त्याने प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 खाली विरुध्दपक्षा विरुध्द नादुरुस्त थ्रेशर मशीनची किम्मत परत मिळावी तसेच अन्य अनुषंगीक मागण्यांसाठी प्रस्तुत तक्रार ग्राहक मंचा समोर दाखल केलेली आहे.
02. तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे-
तक्रारकर्ता हा मौजा सातोना येथील रहिवासी असून तो शेतीचा व्यवसाय करतो. त्याचे शेतीला पुरक म्हणून तो धानाचा चुरणा करण्यासाठी थ्रेशर मशीन सुध्दा अंदाजे दहा वर्षा पासून चालवित आहे. त्याने विरुध्दपक्षा कडून दिनांक-29 ऑक्टोंबर, 2018 रोजी मराठा जम्बो गोल्ड ही धान मल्टीक्राप थ्रेशर मशीन एकूण रुपये-1,75,000/- विकत घेण्याचा सौदा केला आणि त्याच दिवशी विरुध्दपक्षाला अग्रीम म्हणून रुपये-10,000/- नगदी दिले, पावती प्राप्त केली. थ्रेशर मशीनची डिलेव्हरी दिनांक-21.11.2018 पर्यंत देण्याचे विरुध्दपक्षाने कबुल केले होते. त्यानंतर विरुध्दपक्षाने मशीनची डिलेव्हरी तक्रारकर्त्यास दिनांक-14.11.2018 रोजी दिली, त्यावेळेस तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षास उर्वरीत रक्कमे पैकी रुपये-1,60,000/- दिलेत व पावती प्राप्त केली. उर्वरीत रुपये-5000/- नंतर देण्याचे ठरले होते. मशीनची डिलेव्हरी देताना विरुध्दपक्षाने सदर थ्रेशर मशीन उच्च दर्जाची असल्या बाबत आश्वस्त केले होते.
तक्रारकर्त्याने पुढे असे नमुद केले की, दिनांक-15.11.2018 रोजी त्याने अन्य शेतक-यांच्या शेतातील धानाचा चुरना सदर थ्रेशर मशीनव्दारे करण्यास सुरुवात केली. त्यानंतर काही दिवसांनी सदर मशीन एका ठिकाणाहून दुस-या शेतात नेत असताना मशीनच्या एका चाकामधील बेअरींग फुटून मशीन खराब झाली, त्या संबधीची तक्रार विरुध्दपक्षाकडे त्वरीत केली असता विरुध्दपक्षाने ते दुरुस्त करण्यास नकार दिल्याने त्याने स्वतःच्या खर्चाने सदर मशीन दुरुस्त करुन घेतली. परंतु त्यानंतरही त्याने विकत घेतलेल्या थ्रेशर मशीनमध्ये दोन ते तीन दिवसात नियमितपणे तांत्रीक बिघाड निर्माण होऊन सदर मशीन बंद पडू लागली त्यामुळे त्याचे आर्थिक नुकसान होऊ लागले. विरुध्दपक्षाने विक्री केलेली मशीन निकृष्ट दर्जाची असल्याने प्रत्येक दोन दिवसा नंतर सदर मशीन मधील बेल्ट, शाफ्ट व ईतर सामानाची तुटफूट होत होती, त्या बाबत त्याने तक्रारी करुनही विरुध्दपक्षाने त्याला कोणताही प्रतिसाद दिला नाही. तक्रारकर्त्याचे म्हणण्या प्रमाणे सर्वसाधारण एका दिवसात थ्रेशर मशीनव्दारे अंदाजे 200 ते 300 पोते धानाचा चुरना होतो परंतु विरुध्दपक्षाने विक्री केलेली मशीन ही संपूर्ण दिवसात फक्त 100 ते 150 पोते धानाचा चुरना करीत होती. तांत्रीक कारणामुळे मशीन बंद झाल्या नंतर ती सुरु करण्या करीता जवळपास एक तासाचा वेळ लागत होता. नादुरुस्त मशीनमुळे तक्रारकर्त्याचे प्रती दिवशी 1000/- ते रुपये-2000/- आर्थिक नुकसान होत होते आणि आज पर्यंत त्याचे अंदाजे रुपये-50,000/- चे आर्थिक नुकसान झालेले आहे. या बाबत वेळोवेळी विरुध्दपक्षाला दुरध्वनी वरुन थ्रेशर मशीन मधील तांत्रीक बिघाड दुर करुन त्याचे होणारे आर्थिक नुकसान थांबवावे अशी विनंती केली परंतु विरुध्दपक्षाने नादुरुस्त मशीन परत घेणार नाही अशी भूमीका घेतली आणि तक्रारकर्त्याला असे सांगितले की, तो पैसे देऊन आपल्या मर्जी प्रमाणे न्यायनिर्णय मिळवून घेईल या बद्दलचा कॉल रेकॉर्ड तक्रारकर्त्या जवळ उपलब्ध असून त्याची सी.डी. पुरावा म्हणून तो या तक्रारी सोबत जोडत असल्याचे नमुद केले. अशाप्रकारे विरुध्दपक्षाने त्याला नादुरुस्त मशीन विकून दोषपूर्ण सेवा दिली. तक्रारकर्त्याने थ्रेशर मशीन निर्माण करणा-या अन्य निर्मात्याला सदर मशीन दाखविली असता त्याने त्या मशीनमध्ये उत्पादकीय दोष असल्याचे सांगितले. थ्रेशर मधीन मध्ये धानाचा चुरना करताना मशीन तणसा पासून धान वेगळा करुन तणस बाहेर फेकल्या जातो परंतु त्याने विकत घेतलेली सदर थ्रेशर मशीन सुरु केली असता मशीन काही वेळ तणस बाहेर फेकते परंतु त्यानंतर तणस बाहेर फेकणे बंद झाल्याने सदर तणस मशीनमध्ये परत जमा होऊन मशीन बंद पडते. तक्रारकर्त्याने मेकॅनिकल इंजिनयर श्री प्रतीक बी. गिरडे यांचे कडून सदर थ्रेशर मशीन तपासून घेतली असता त्यांनी मशीनची प्रत्यक्ष पाहणी करुन त्यामध्ये तांत्रीक दोष असल्या बाबतचा विस्तृत अहवाल दिला. विरुध्दपक्षाने तांत्रीक उत्पादकीय दोष असलेली थ्रेशर मशीन त्याला विक्री केल्यामुळे त्याचे आज पर्यंत रुपये-50,000/- चे आर्थिक नुकसान झालेले आहे तसेच आज पर्यंत त्याला सदर मशीनचे दुरुस्तीवर अंदाजे रुपये-40,000/- खर्च झालेला आहे. सदर थ्रेशर मशीन दुरुस्त होण्या पलीकडील असल्याने त्याने विरुध्दपक्षास वकील श्री एस.एस.चव्हाण यांचे मार्फतीने दिनांक-24 डिसेंबर, 2018 रोजी रजिस्टर पोस्टाने कायदेशीर नोटीस पाठवून त्याव्दारे नादुरुस्त मशीन परत घेऊन मशीनची किम्मत परत करण्याची तसेच झालेले आर्थिक नुकसान भरुन देण्याची मागणी केली परंतु सदर नोटीस प्राप्त होऊन विरुध्दपक्षाने त्याला कोणताही प्रतिसाद दिला नाही म्हणून शेवटी तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षा विरुध्द प्रस्तुत तक्रार ग्राहक मंचा समोर दाखल करुन त्याव्दारे पुढील प्रमाणे मागण्या केल्यात-
1) विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्यास विक्री केलेली नादुरुस्त थ्रेशर मशीन परत घेऊन मशीनची किम्मत रुपये-1,70,000/- व आर्थिक नुकसानीपोटी रुपये-50,000/- असे एकूण रुपये-2,20,000/- व्याजासह त्याला परत करण्याचे विरुध्दपक्षाला आदेशित व्हावे.
2) विरुध्दपक्षाच्या सेवेतील त्रृटीमुळे व निष्काळजीपणामुळे तक्रारकर्त्याला झालेल्या मानसिक, शारीरीक व आर्थिक त्रासाकरीता 1,00,000/- तसेच प्रस्तुत तक्रारीचा खर्च रुपये 20,000/- विरुध्दपक्षाने त्याला देण्याचे आदेशित व्हावे.
3) या शिवाय योग्य ती दाद तक्रारकर्त्याचे बाजूने मंजूर करण्यात यावी.
03. विरुध्दपक्षाने आपले लेखी उत्तर ग्राहक मंचा समक्ष पान क्रं-34 ते 37 वर दाखल केले. त्यांनी प्राथमिक आक्षेपामध्ये तक्रारकर्त्याची तक्रार ग्राहक मंचा समक्ष चालू शकत नसल्याचे नमुद केले. तक्रारकर्त्याने स्वतःच तक्रारीमध्ये त्याने सदरची थ्रेशर मशीन व्यवसायिक कारणासाठी विकत घेतल्याची बाब नमुद केलेली असल्याने व्यवसायिक कारणासाठी मशीन विकत घेतलेली असल्याने तो विरुध्दपक्षाचा ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदी प्रमाणे ग्राहक होत नसल्याचे नमुद केले. तक्रारकर्त्याने सत्य वस्तुस्थिती ग्राहक मंचा पासून लपवून ठेवलेली असून तो स्वच्छ हाताने ग्राहक मंचा समोर आलेला नाही. तक्रारकर्त्याने तक्रारीत सदर थ्रेशर मशीन मध्ये उत्पादकीय दोष असल्याचे नमुद केले परंतु आपल्या मागणी मध्ये त्याने सदर मशीन बदलवून देण्या बाबत मागणी केलेली नाही. तसेच तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रारीमध्ये सदर थ्रेशर मशीनच्या निर्माता कंपनीला प्रतिपक्ष केलेले नाही, त्यामुळे योग्य त्या प्रतिपक्षाच्या अभावामुळे प्रस्तुत तक्रार खारीज होण्यास पात्र असल्याचे नमुद केले. तक्रारकर्त्याला योग्य प्रकारे ज्ञात आहे की, विरुध्दपक्ष हा सदर मशीनचा निर्माता नसून तो दुसरी कडून मशीन विकत आणून विक्री करत असतो. विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याला मशीन मध्ये तांत्रीक बिघाडा बद्दल मशीन निर्माता कंपनीकडे दाद मागण्यास सांगितले होते परंतु ब-याच दिर्घ कालावधी पर्यंत तक्रारकर्त्याने योग्य त्या सक्षम ठिकाणी दाद मागितलेली नाही. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाचे संभाषणा बाबत जी सी.डी. दाखल केलेली आहे, ती विरुध्दपक्षा कडून नाकारण्यात येते. तक्रारकर्त्याने मेकॅनिकल इंजिनियर कडून स्वतःहून प्राप्त केलेले प्रमाणपत्र हे खोटे व बनावट असल्याने ते विरुध्दपक्षा कडून नाकारण्यात येते. सदर थ्रेशर मशीन मध्ये उत्पादकीय दोष असल्याची बाब सुध्दा नाकारण्यात येते. तक्रारकर्त्याने तक्रारीतून केलेल्या मागण्या या नामंजूर करण्यात येतात. तक्रारकर्त्याने त्याचे कसे काय आर्थिक नुकसान झाले या बद्दलचे विस्तृत तपशिलवार विवरण नमुद केलेले नाही. तक्रारकर्त्याने पाठविलेल्या नोटीस मधील मजकूर विरुध्दपक्षा कडून नामंजूर करण्यात येतो. विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याला कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नाही. तक्रारकर्ता हा ग्राहक कायदयाचा दुरुपयोग करीत आहे. सबब तक्रारकर्त्याची तक्रार जास्तीत जास्त खर्च बसवून खारीज करण्यात यावी असे विरुध्दपक्षाने लेखी उत्तरात नमुद केले.
04. प्रस्तुत तक्रारी मध्ये तक्रारकर्त्याने पान क्रं 12 वरील दस्तऐवज यादी नुसार एकूण 01 ते 11 दस्तऐवजाच्या प्रती दाखल केलेल्या असून ज्यामध्ये प्रामुख्याने वि.प. श्री बालाजी मराठा एग्रो मोटर्स, मांगली, पोस्ट खापा, तहसिल तुमसर जिल्हा भंडारा याचा कॅश मेमो, आयुष फेब्रीकेशन इंजिनियरींग वर्क्स मोहगाव देवी याचे दोन बिलाच्या प्रती, एस.के.ट्रॅक्टर्स,भोजपूर, भंडारा यांनी दिलेल्या बिलाची प्रत, आशुतोष ट्रेडींग कंपनी भंडारा यांनी दिलेल्या बिलाची प्रत, वि.प. मराठा अॅग्रो मोटर्स, मांगली, तहसिल तुमसर जिल्हा भंडारा यांनी थ्रेशर मशीन विक्री केल्या बाबत तक्रारकर्त्या कडून अॅडव्हान्स मिळाल्या बाबत दिलेल्या बिलाची प्रत, तक्रारकर्त्याने सदर मशीन विकत घेतल्यापोटी उर्वरीत रक्कम रुपये-1,60,000/- दिल्या बाबत विरुध्दपक्षाने दिलेल्या बिलाची प्रत, तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाला दिनांक-24 डिसेंबर, 2018 रोजी रजिस्टर पोस्टाने पाठविलेली कायदेशीर नोटीसची प्रत, रजि.पोस्टाच्या पावत्या, रजि. पोस्टाची पोच, श्री प्रतीक ब. गिरडे यंत्र अभियंता, प्राध्यापक श्री शरचंद्र पावार पॉलिटेक्नीक भिलेवाडा विभाग प्रमुख यांनी तक्रारकर्त्याने विकत घेतलेल्या थ्रेशर मशीनची पाहणी करुन दिनांक-28 जानेवारी, 2019 रोजी दिलेला अहवाल अशा दस्तऐवजाचे प्रतींचा समावेश आहे. तक्रारकर्त्याने पान क्रं 42 ते 44 वर यंत्र अभियंता प्राध्यापक श्री प्रतीक ब. गिरडे यांचे शपथपत्र दाखल केले. तसेच पान क्रं-45 ते 50 वर तक्रारकर्त्याने स्वतःचे शपथपत्र दाखल केले तसेच पान क्रं 51 ते 55 वर तक्रारकर्त्याने लेखी युक्तीवाद दाखल केला.
05. वि.प. मराठा अॅग्रो मोटर्स, मांगली, तहसिल तुमसर जिल्हा भंडारा यांनी अभिलेखावर पान क्रं 34 ते 37 वर लेखी उत्तर दाखल केले. तसेच पान क्रं 38 वरील दस्तऐवज यादी प्रमाणे दोन दस्तऐवजाच्या प्रती ज्यामध्ये प्रामुख्याने युनायटेड इंडीया इन्शुरन्स कंपनीने जे.एस. अॅग्रो लिमिटेड, पंजाब यांचे नावे प्रिमियम स्विकारल्या बाबत दिनांक-01.11.2018 रोजीची दिलेली पावती, जे.एस. अॅग्रो इंडस्ट्रीज, जी.टी.रोड, गाव दानेवाला, पंजाब यांनी विरुध्दपक्ष श्री बालाजी मराठा अॅग्रो मोटर्स यांचे नावे दिनांक-01.11.2018 रोजी दिलेल्या कॅश इन्व्हाईसची प्रत अशा दस्तऐवजाचा समावेश आहे.
06. तक्रारकर्त्याची तक्रार, दाखल केलेले दस्तऐवज तसेच प्रकरणात दाखल केलेली शपथपत्रे व लेखी युक्तीवाद तसेच विरुध्दपक्षाचे लेखी उत्तर व दाखल केलेल्या दस्तऐवज इत्यादीचे ग्राहक मंचातर्फे अवलोकन करण्यात आले. तक्रारकर्त्याचे वकीलांचा तोंडी युक्तिवाद यावरून खालील मुद्दे ग्राहक मंचा समोर उपस्थित होतात.
अ.क्र. | मुद्दे | उत्तर |
01. | तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष विक्रेत्या कडून विकत घेतलेल्या थ्रेशर मशीन मध्ये उत्पादकीय दोष असल्याची बाब सिध्द होते काय? | होय |
02. | विरुध्दपक्ष मशीन विक्रेत्याने अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करुन व उत्पादकीय दोष असलेली मशीन तक्रारकर्त्याला विक्री करुन दोषपूर्ण सेवा दिल्याची बाब सिध्द होते काय? | होय |
03. | या तक्रारीचा अंतिम आदेश काय? | कारण मिमांसे प्रमाणे |
:: कारणे व मिमांसा ::
मुद्या क्रं. 1 व 2
07. सदर तक्रारीसोबत तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या दस्ताऐवजांचे अवलोकन करण्यात आले. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष बालाजी मराठा अॅग्रो मोटर्स, मांगली, पोस्ट खाता, तहसिल तुमसर यांचे कडून MARATHA JAMBO GOLD MULTICROP THRESAR MACHINE एकूण रुपये-1,75,000/- मध्ये विकत घेतल्या बाबत सौदा केला व अग्रीमपोटी दिनांक-29.10.2018 रोजी अग्रीम म्हणून रुपये-10,000/- दिल्या बाबत विरुध्दपक्ष विक्रेत्याने दिलेल्या बिलाची प्रत पान क्रं 18 वर दाखल केलेली आहे. तसेच तक्रारकर्त्याने सदर थ्रेशर मशीन संबधाने विरुध्दपक्ष श्री बालाजी मराठा अॅग्रो मोटर्स याला उर्वरीत रकमे पैकी रुपये-1,60,000/- असे मिळून एकूण रुपये-1,70,000/- दिल्या बाबतची पावती पान क्रं 19 वर दाखल केलेली आहे आणि उर्वरीत रक्कम रुपये-5000/- तक्रारकर्त्याला विरुध्दपक्षाला देणे बाकी आहेत याबाबत उभय पक्षात वाद नाही.
08. तक्रारकर्त्याचे तक्रारी प्रमाणे त्याने दिनांक-15.11.2018 रोजी नंतर काही दिवसांनी सदर मशीन वापरणे सुरु केले असता मशीनचे एका चाकामधील बेअरींग फुटून मशीन खराब झाली परंतु वि.प.कडून योग्य प्रतीसाद न मिळाल्याने त्याने स्वतःच्या खर्चाने सदर मशीन दुरुस्त करुन घेतली. परंतु त्यानंतरही सदर थ्रेशर मशीनमध्ये दोन ते तीन दिवसात नियमितपणे तांत्रीक बिघाड निर्माण होऊन मशीन बंद पडू लागल्याने त्याचे आर्थिक नुकसान झाले. मशीन निकृष्ट दर्जाची असल्याने प्रत्येक दोन दिवसा नंतर सदर मशीन मधील बेल्ट, शाफ्ट व ईतर सामानाची तुटफूट होत होती परंतु तक्रारी करुनही विरुध्दपक्षाने कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्याचे म्हणण्या प्रमाणे सर्वसाधारण एका दिवसात थ्रेशर मशीनव्दारे अंदाजे 200 ते 300 पोते धानाचा चुरना होतो परंतु सदर मशीन ही संपूर्ण दिवसात फक्त 100 ते 150 पोते धानाचा चुरना करीत होती. तांत्रीक कारणामुळे मशीन बंद झाल्या नंतर ती सुरु करण्या करीता जवळपास एक तासाचा वेळ लागत होता. आज पर्यंत त्याचे मशीन दुरुस्तीपोटी अंदाजे रुपये-50,000/- चे आर्थिक नुकसान झालेले आहे.
09. याउलट विरुध्दपक्षाचे असे म्हणणे आहे की, त्याने सदर मशीन ही जे.एस. अॅग्रो इंडस्ट्रीज, जी.टी.रोड, गाव दानेवाला, पंजाब या निर्माता कंपनी कडून विकत घेतलेली असून त्यांनी निर्मित मशीनचा विमा सुध्दा विमा कंपनीकडून काढलेला आहे, आपले या म्हणण्याचे पुष्टयर्थ विरुध्दपक्षापने युनायटेड इंडीया इन्शुरन्स कंपनीने सदर थ्रेशर मशीन निर्माता कंपनी जे.एस. अॅग्रो लिमिटेड, पंजाब यांचे नावे प्रिमियम स्विकारल्या बाबत दिनांक-01.11.2018 रोजीची दिलेली पावती पान क्रं 39 वर दाखल केली तसेच सदर मशीन निर्माता कंपनी जे.एस. अॅग्रो इंडस्ट्रीज, जी.टी.रोड, गाव दानेवाला, पंजाब यांनी विरुध्दपक्ष विक्रेता श्री बालाजी मराठा अॅग्रो मोटर्स यांचे नावे दिनांक-01.11.2018 रोजी दिलेल्या कॅश इन्व्हाईसची प्रत पान क्रं 40 वर दाखल केली. सदर दस्तऐवजी पुराव्या वरुन विरुध्दपक्षाचे असे म्हणणे आहे की, तो केवळ सदर थ्रशर मशीनचा विक्रेता असल्याने त्याची कोणतीही जबाबदारी हातातील प्रकरणात येत नाही तसेच तक्रारकर्त्याने सदर थ्रेशर मशीनची निर्माता कंपनी जे.एस. अॅग्रो इंडस्ट्रीज, जी.टी.रोड, गाव दानेवाला, पंजाब यांना प्रस्तुत प्रकरणात प्रतिपक्ष केलेले नसल्याने तक्रार खारीज करण्यात यावी. तसेच विरुध्दपक्ष मशीन विक्रेत्याने असाही आक्षेप घेतला की, तक्रारकर्त्याने मशीनमध्ये उत्पादकीय दोष असल्या बाबत श्री प्रतीक ब. गिरडे ,मेकॅनिकल इंजिनियर (यंत्र अभियंता) तथा प्राध्यापक व विभाग प्रमुख श्री शरदचंद्र पवार पॉलिटेक्नीक भिलेवाडा यांचा पान क्रं 27 व 28 वर दाखल मशीन तपासणी अहवाल हा बनावट स्वरुपाचा असून तो तक्रारकर्त्याने स्वतःचे बाजूने तयार केलेला आहे.
10. आम्ही तक्रारकर्त्याने विकत घेतलेल्या थ्रेशर मशीन दुरुस्ती करीता आलेल्या खर्चाचे बिलांचे अवलोकन केले, त्यामध्ये विक्रेता श्री बालाजी मराठा अॅग्रो मोटर्स याने दिनांक-25.12.2018 रोजी तक्रारकर्त्याला मशीनचा सुटे भाग विकत दिल्या बाबतचे रुपये-1500/- चे बिल पान क्रं 13 वर दाखल आहे तसेच पान क्रं 14 वर आयुष फेब्रीकेशन इंजिनियरींग वर्क्स मोहगाव देवी याचे दिनांक-25.12.2018 रोजीचे मशीन मधील शाफ्ट दुरुस्तीचे रुपये-200/- चे बिल आहे. तसेच एस.के.मोटर्स, सुटेभाग विक्रेता, भंडारा यांनी तक्रारकतर्याचे नावे दिनांक-29.11.2018 रोजीचे बेयरींगचे दिलेले रुपये-950/- चे बिल पान क्रं 15 वर दाखल आहे. तसेच पान क्रं 16 वर आयुष फेब्रीकेशन इंजिनियरींग वर्क्स मोहगाव देवी याचे दिनांक-19.12.2018 रोजीचे तक्रारकर्त्याचे नावे दिलेले सुटे भाग विकत घेतल्याचे रुपये-1200/- चे बिल दाखल आहे. पान क्रं 17 वर आशुतोष ट्रेडींग कंपनीने तक्रारकर्त्याचे नावे दिलेले बिल आहे. ही सर्व मशीन दुरुस्तीची व साहित्य विकत घेतल्याची बिले दिनांक-29.11.2018 ते 25.12.2018 या कालावधीतील असून तक्रारकर्त्याने सदर मशीन विरुध्दपक्ष विक्रेत्या कडून दिनांक-29.10.2018 रोजी विकत घेतलेली असून ताबा मिळालेला आहे. मशीन विकत घेतल्याचे दिनांका पासून केवळ दोन महिन्याचे आत सदर मशीनमध्ये अनेक वेळा तांत्रीक बिघाड आल्याने साहित्य खरेदी व दुरुस्तीची असल्याचे दिसून येते. थोडक्यात मशीन विकत घेतल्या पासून अत्यंत कमी कालावधीत त्यात तांत्रीक बिघाड सुरु झालेत आणि त्यामुळे मशीनमध्ये उत्पादकीय दोष असल्याची बाब सिध्द होते.
11. तक्रारकर्त्याने विकत घेतलेल्या थ्रेशर मशीनमध्ये उत्पादकीय दोष असल्या बाबत त्याने श्री प्रतीक ब. गिरडे, मेकॅनिकल इंजिनियर (यंत्र अभियंता) तथा प्राध्यापक श्री शरचंद्र पवार पॉलिटेक्नीक भिलेवाडा येथील विभाग प्रमुख असलेले यांचा मशीन तपासणी केल्या बाबतचा अहवाल अभिलेखावर पान क्रं 27 व 28 वर दाखल केला, त्यामध्ये त्यांनी खालील प्रमाणे नमुद केले-
प्रत्यक्ष मशीनची पाहणी केल्या नंतर असे दिसून आले की, सदर मशीनमध्ये वारलेले साहित्य अतिशय निकृष्ट दर्जाचे असून मशीन सुरु करताच मशीनमध्ये अतिशय जास्त कंपन होऊन काही वेळा नंतर मशीनमध्ये वेल्डींग तुटण्यास सुरुवात झाली व नंतर मशीन मध्ये धानाचा चुरना करीत असताना धान आणि तणस काढल्या नंतर काही मिनिटा नंतर तणस बाहेर न फेकता ते मशीनचे आतील थ्रेशरींग सिलेंडरमध्ये जमा होत होते, त्यामुळे मशीन जाम होऊन बंद पडते. परिणामी मशीन दिवसभरात 100 पोतेही धान चुरना करु शकत नाही. तसेच सदर तांत्रीक बिघाड दुर करण्याकरीता अथक प्रयत्न केल्यावरही सदर तांत्रीक बिघाड दुर होऊ शकत नाही आणि दुरुस्त केल्यास परत तोच त्रास उदभवेल कारण मशीन निकृष्ट दर्जाचे साहित्यापासून तयार केली असल्याचे अहवालात नमुद केले.
12. विरुध्दपक्ष मशीन विक्रेत्याचे असे म्हणणे आहे की, तक्रारकर्त्याने तांत्रीक अभियंता तथा प्राध्यापक विभाग प्रमुख श्री प्रतीक ब. गिरडे यांचे कडून तयार केलेला मशीन पाहणी अहवाल हा बनावट व खोटा असून स्वतःचे बाजूने तयार केलेला आहे. तक्रारकर्त्याने श्री प्रतीक ब.गिरडे, तंत्र अभियंता तथा प्राध्यापक विभाग प्रमुख श्री शरचंद्र पवार पॉलिटेक्नीक भिलेवाडा यांचे शपथपपत्र सुध्दा पान क्रं 42 व 43 वर दाखल केले. श्री प्रतिक ब. गिरडे हे पॉलिटेक्नीक कॉलेज मध्ये विभाग प्रमुख या पदावर कार्यरत असून त्यांनी खोटा व बनावटी अहवाल दिल्याचा विरुध्दपक्ष विक्रेत्याने घेतलेला आक्षेप जिल्हा ग्राहक आयोगा व्दारे नाकारण्यात येतो कारण त्यांनी खोटा व बनावटी अहवाल देण्याचे कोणतेही प्रयोजन दिसून येत नाही. श्री प्रतिक गिरडे यांनी आपल्या अहवालात असे नमुद केले की, सदर थ्रशर मशीन मधील वापरलेले साहित्य अत्यंत निकृष्ट दर्जाची असून सदर मशीन ही दुरुस्त होण्या पलीकडील आहे. याचाच अर्थ असा निघतो की, जेंव्हा विकत घेतलेल्या मशीन मध्ये अत्यंत अल्प प्रमाणात तांत्रीक दोष निर्माण होतात आणि वारंवार दुरुस्ती करुनही त्यामधील दोष दुर होत नाहीत आणि सदर तांत्रीक दोष दुरुस्त होण्या पलीकडील असतील तर त्यामध्ये उत्पादकीय दोष असल्याची बाब सिध्द होते. हातातील प्रकरणातील मशीन मध्ये वारंवार दुरुस्ती होऊनही त्यामधील दोष दुरुस्त पलीकडील असल्याने तक्रारकर्त्याने विकत घेतलेल्या थ्रेशर मधीन मध्ये उत्पादकीय दोष असल्याची बाब तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या दुरुस्ती बिलांच्या प्रतीवरुन तसेच मशीन तंत्रज्ञ श्री प्रतीक ब.गिरडे यांचे तपासणी अहवाल व शपथपत्रावरुन सिध्द होते, त्यामुळे आम्ही मुद्दा क्रं 1 चे उत्तर होकारार्थी नोंदवित आहोत.
13. विरुध्दपक्ष थ्रेशर मशीन विक्रेत्याचा संक्षीप्त बचाव असा आहे की, त्याने सदर मशीन ही जे.एस. अॅग्रो इंडस्ट्रीज, जी.टी.रोड, गाव दानेवाला, पंजाब या निर्माता कंपनी कडून विकत घेतलेली असल्याने तक्रारकर्त्याने निर्माता कंपनी कडे मशीन दुरुस्तीसाठी दाद मागावयास हवी होती तसेच त्याने मशीन निर्माता कंपनीला या प्रकरणात प्रतिपक्ष केलेले नसल्याने योग्य प्रतीपक्षाचे अभावी प्रस्तुत तक्रार खारीज व्हावी. विरुध्दपक्ष मशीन विक्रेत्याचे या आक्षेपा बाबत जिल्हा ग्राहक आयोगा तर्फे असे नमुद करण्यात येते की, तक्रारकर्ता हा एक ग्रामीण भागातील राहणारा आहे तसेच त्याने सदर मशीन ही विरुध्दपक्ष मशीन विक्रेत्याचे शब्दावर विश्वास ठेऊन विकत घेतलेली आहे तर मशीन निर्माता कंपनी ही पंजाब राज्या मधील आहे. ग्रामीण भागातील ग्राहकास काही तक्रार असल्यास तो जवळच्या संबधित विक्रेत्याकडेच करेल. विरुध्दपक्षाचे कथना नुसार तक्रारकर्त्याने पंजाब राज्यातील निर्माता कंपनीकडे जाऊन मशीन बाबत दाद मागावी या विरुध्दपक्षाचे कथनामध्ये जिल्हा ग्राहक आयोगाला कोणतेही तथ्य दिसून येत नाही. तसेच महत्वाची बाब अशी सुध्दा आहे की, पान क्रं 19 वर विरुध्दपक्ष श्री बालाजी मराठा अॅग्रो मोटर्स (मशीन विक्रेता) मु. मांगली, पोस्ट खापा, तहसिल तुमसर यांनी तक्रारकर्त्याचे नावे जे बिल दिलेले आहे त्या बिलातील विवरण मध्ये मराठा जम्बो गोल्ड धानमल्टीक्रॉप थ्रेशर मशीन असे नमुद केलेले आहे. याचाच अर्थ असा होतो की, विरुध्दपक्ष विक्रेता हा सदर थ्रेशर मशीन आपल्या नावाने म्हणजे मराठा जम्बो गोल्ड धानमल्टीक्रॉप थ्रेशर मशीन नावाने विक्री करीत होता आणि ही एक अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब (Unfair Trade Practice) पध्दती असून संबधित ग्राहकांचा केलेला विश्वासघात आहे त्याचे कारण असे आहे की, विरुध्दपक्ष विक्रेत्याने तक्रारकर्त्यास थ्रेशर मशीन विकताना स्वतःचे नावावर सदर मशीनची विक्री केलेली आहे, जर विरुध्दपक्ष विक्रेत्याने सदर थ्रेशर मशीन ही पंजाब राज्यातून निर्मित झाली असल्या बाबत तक्रारकर्त्यास स्पष्ट कल्पना दिली असती तर तक्रारकर्त्याने मशीन विकत घेताना योग्य तो विचार केला असता परंतु तशी स्पष्ट कल्पना विरुध्दपक्ष विक्रेत्याने तक्रारकर्त्याला दिलेली नसून बिलामध्ये मशीन स्वतःचे नाव टाकून विक्री केलेली आहे आणि त्यामुळे हातातील प्रकरणात जी काही जबाबदारी येते ती विरुध्दपक्ष थ्रेशर मशीन विक्रेत्यावर येते असे ग्राहक आयोगाचे स्पष्ट मत आहे, त्यामुळे आम्ही मुद्दा क्रं 2 चे उत्तर होकारार्थी नोंदवित आहोत. जर बिलामध्ये मशीन निर्माता कंपनीचे नाव टाकून बिल दिले असते तर मात्र जबाबदारी ही मशीन निर्माता कंपनीवर आली असती परंतु तसे काही हातातील प्रकरणात घडलेले दिसून येत नाही.
14. विरुध्दपक्ष मशीन विक्रेत्याचा असाही आक्षेप आहे की, तक्रारकर्ता हा सदर मशीनचा उपयोग व्यवसायिक कारणासाठी करीत असल्याने तो ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदी प्रमाणे ग्राहक या सज्ञेत मोडत नाही. जिल्हा ग्राहक आयोगा व्दारे या आक्षेपाचे संदर्भात स्पष्ट करण्यात येते की, ग्रामीण भागातील शेतकरी हे कुटीर उदयोग करुन आपले कुटूंबियांचा उदरनिर्वाह चालवितात. थ्रेशर मशीनव्दारे उत्पन्न कमाविणे हा खूप मोठया प्रमाणावरील व्यवसाय नसून तो एक कुटीर उदयोग आहे आणि त्यामुळे विरुध्दपक्ष मशीन विक्रेत्याचे या आक्षेपा मध्ये काहीही तथ्य ग्राहक मंचास दिसून येत नाही.
15. मुद्दा क्रं-3 बाबत-
मुद्दा क्रं 1 व क्रं 2 चे उत्तर होकारार्थी आल्याने मुद्दा क्रं 3 प्रमाणे तक्रारकर्त्याची विरुध्दपक्ष थ्रेशर मशीन विक्रेत्या विरुध्दची तक्रार अंशतः मंजूर होण्यास पात्र आहे. तक्रारकर्त्याने त्याचे तक्रारीतील मागणी मध्ये सदर थ्रेशर मशीनची त्याने विरुध्दपक्ष विक्रेत्याला किमतीपोटी दिलेली संपूर्ण रक्कम रुपये-1,70,000/- व्याजासह मागितलेली आहे परंतु तक्रारकर्त्याने त्याचे तक्रारीमध्ये व विरुध्दपक्षाला दिलेल्या नोटीसमध्ये प्रमाणे सर्वसाधारण एका दिवसात थ्रेशर मशीनव्दारे अंदाजे 200 ते 300 पोते धानाचा चुरना होतो परंतु सदर मशीन ही संपूर्ण दिवसात फक्त 100 ते 150 पोते धानाचा चुरना करीत होती याचाच अर्थ असा होतो की, तक्रारकर्त्याने सदर मशीनचा काही प्रमाणात वापर केलेला असून त्यापासून आर्थिक उत्पन्न सुध्दा कमाविलेले आहे ही बाब लक्षात घेता तसेच सदर थ्रेशर मशीन मध्ये उत्पादकीय दोष असल्याची बाब सिध्द झालेली असल्याने तक्रारकर्त्याला सदर थ्रेशरमशीन पोटी त्याने विरुध्दपक्ष मशीन विक्रेत्यास अदा केलेली संपूर्ण रक्कम रुपये-1,70,000/- पैकी 80 टक्के रक्कम म्हणजे रुपये-1,36,000/- आणि सदर रकमेवर रक्कम अदा केल्याचा दिनांक-29.10.2018 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-9 टक्के दराने व्याज मंजूर करणे योग्य व न्यायोचित होईल. तक्रारकर्त्याला मशीन संबधात आदेशित रक्कम व्याजासह प्राप्त झाल्या नंतर त्याने सदर नादुरुस्त मशीन विरुध्दपक्ष विक्रेत्याचे ताब्यात दयावी असे आदेशित करणे योग्य होईल. विरुध्दपक्ष मशीन विक्रेत्याने अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करुन अत्यंत निकृष्ट साहित्य असलेली थ्रेशर मशीन तक्रारकर्त्यास विक्री केल्याने त्याला वारंवार दुरुस्ती करावी लागली परंतु मशीन दुरुस्त झाली नाही या सर्व प्रकारात त्याला अतिशय मोठया प्रमाणावर शारिरीक व मानसिक त्रास झाल्याने विरुध्दपक्ष मशीन विक्रेत्याकडून नुकसान भरपाई दाखल रुपये-10,000/- तसेच प्रस्तुत तक्रारीचा खर्च रुपये-5000/- तक्रारकर्त्याला मंजूर करणे योग्य व न्यायेचित होईल असे जिल्हा ग्राहक आयोगाचे मत आहे.
16. उपरोक्त नमुद सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन जिल्हा ग्राहक आयोगा व्दारे प्रस्तुत तक्रारीमध्ये खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे.
:: अंतिम आदेश ::
(01) तक्रारकर्त्याची तक्रार विरुध्दपक्ष श्री बालाजी मराठा अॅग्रो मोटर्स, मांगली, पोस्ट खापा, तालुका तुमसर जिल्हा भंडारा फर्म आणि तिचा प्रोप्रायटर श्री राजेंद्र तुलाराम हातझाडे थ्रेशर मशीन विक्रेता याचे विरुध्द वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या खालील प्रमाणे अंशतः मंजूर करण्यात येते.
(02) विरुध्दपक्ष श्री बालाजी मराठा अॅग्रो मोटर्स फर्म आणि तिचा प्रोप्रायटर श्री राजेंद्र तुलाराम हातझाडे थ्रेशर मशीन विक्रेता याला आदेशित करण्यात येते की, त्याने उत्पादकीय दोष असलेल्या थ्रेशर मशीन पोटी तक्रारकर्त्या कडून स्विकारलेली एकूण रक्कम रुपये-1,70,000/- पैकी 80 टक्के रक्कम रुपये-1,36,000/- (अक्षरी रुपये एक लक्ष छत्तीस हजार फक्त) तक्रारकर्त्यास परत करावी आणि सदर रकमेवर रक्कम अदा केल्याचा दिनांक-29.10.2018 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-9टक्के दराने व्याज तक्रारकर्त्याला दयावे. तक्रारकर्त्यास मशीन संबधाने आदेशित रक्कम आणि त्यावरील व्याजाची रक्कम विरुध्दपक्ष विक्रेत्याकडून प्राप्त झाल्यानंतर त्याने विरुध्दपक्षाला सदर नादुरुस्त मराठा जम्बो गोल्ड धान मल्टीक्राप थ्रेशर मशीन विरुध्दपक्षाचे ताब्यात देऊन नादुरुस्त मशीन मिळाल्या बाबत विरुध्दपक्ष विक्रेता याचे कडून लेखी पावती घ्यावी. तक्रारकर्त्या कडून सदर नादुरुस्त मशीन परत नेण्याची जबाबदारी ही विरुध्दपक्ष विक्रेत्याची राहिल.
(03) विरुध्दपक्ष श्री बालाजी मराठा अॅग्रो मोटर्स फर्म आणि तिचा प्रोप्रायटर श्री राजेंद्र तुलाराम हातझाडे थ्रेशर मशीन विक्रेता याला असेही आदेशित करण्यात येते की, त्याने तक्रारकर्त्याला झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासाबद्दल नुकसान भरपाई रुपये-10,000/-(अक्षरी रुपये दहा हजार फक्त) आणि तक्रारीचा खर्च रुपये-5000/-(अक्षरी रुपये पाच हजार फक्त) अशा नुकसान भरपाईच्या रकमा तक्रारकर्त्याला दयाव्यात.
(04) सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष श्री बालाजी मराठा अॅग्रो मोटर्स फर्म आणि तिचा प्रोप्रायटर श्री राजेंद्र तुलाराम हातझाडे थ्रेशर मशीन विक्रेता यांनी वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या निकालपत्राची प्रथम प्रमाणित प्रत प्राप्त झाल्याचे दिनांकापासून 30 दिवसांचे आत करावे. विरुध्दपक्ष मशीन विक्रेत्याने विहित मुदतीत आदेशाचे अनुपालन न केल्यास अंतिम आदेशातील मुद्दा क्रं-02 मध्ये नमुद केलेली आदेशित रक्कम रुपये-1,36,000/- दिनांक-29.10.2018 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-12 टक्के दराने व्याजासह तक्रारकर्त्याला देण्यास विरुध्दपक्ष थ्रेशर मशीन विक्रेता जबाबदार राहिल.
(05) निकालपत्राच्या प्रथम प्रमाणित प्रती उभय पक्षकारानां निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.
(06) तक्रारकर्त्याला “ब” व “क” फाईल्स परत करण्यात याव्यात.