(आदेश पारित द्वारा मा. अध्यक्ष, श्री. अतुल दि. आळशी)
(पारित दि. 30 जुलै, 2014)
तक्रारकर्त्यांचे प्लॉट क्रमांक 4 व 5 हे विद्यमान न्याय मंचाच्या अधिकारक्षेत्रात असून त्यावर कराराप्रमाणे विरूध्द पक्ष यांनी बांधकाम न केल्यामुळे तक्रारकर्त्यांनी नुकसानभरपाई मिळण्यासाठी सदरहू तक्रार दाखल केलेली आहे. तक्रारकर्त्यांच्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालीलप्रमाणेः-
2. तक्रारकर्ते हे गोंदीया येथील रहिवासी असून विद्यमान न्याय मंचाच्या अधिकारक्षेत्रात कटंगीकला, तालुका जिल्हा गोंदीया येथे त्यांचा 3600 चौरस फुटाचा प्लॉट क्रमांक 4 व 5 आहे. विरूध्द पक्ष हे आर्किटेक्ट तसेच डेव्हलपर आहेत. तक्रारकर्त्यांनी विरूध्द पक्ष यांचेसोबत त्यांच्या घराचे तळमजला व पहिल्या मजल्याचे बांधकाम नकाशाप्रमाणे एकूण 3451.17 चौरस फुट करण्याचा दिनांक 07/12/2010 रोजी करार केला. सदरहू बांधकाम हे रू. 600/- प्रति चौरस फुट दराप्रमाणे करण्याचे करारामध्ये ठरविण्यात आले होते, ज्यामध्ये आवारभिंतीचा सुध्दा समावेश असून त्याकरिता येणारा एकूण बांधकाम खर्च रू. 22,59,700/- इतका निश्चित करण्यात आला होता. तसेच विरूध्द पक्ष यांनी रू. 71,000/- इतकी रक्कम आवारभिंत बांधण्यापोटी व त्यावर लोखंडी रेलिंग बसविण्याकरिता अधिकचे घेतले.
3. विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्यांच्या घराचे बांधकाम चालू केले व तक्रारकर्त्यांकडून रू.20,25,000/- बांधकामापोटी घेतले. तसेच रू. 3,05,000/- हे तक्रारकर्त्यांकडे उर्वरित थकित बाकी उर्वरित कामाबद्दल राहिले होते.
4. ऑगस्ट 2012 मध्ये विरूध्द पक्ष यांनी अचानकपणे तक्रारकर्त्यांच्या घराचे बांधकाम अर्ध्यातूनच बंद केले. तक्रारकर्त्यांनी गोंदीया येथील प्लॅनर, व्हॅल्युअर व इंजिनिअर इम्रान कुरेशी यांना विरूध्द पक्ष यांनी कराराप्रमाणे बांधकाम न केलेल्या कामाच्या अहवालाकरिता बोलाविले. इम्रान कुरेशी यांनी त्यांचा दिनांक 15/01/2013 रोजीचा अहवाल तक्रारकर्त्यांना दिला. सदरहू अहवाल तक्रारकर्त्यांनी मंचासमोर दाखल केलेला आहे.
5. विरूध्द पक्ष यांनी बांधकाम पुन्हा सुरू करावे म्हणून तक्रारकर्त्यांनी
विरूध्द पक्ष यांना वेळोवेळी विनंती केली व तक्रारकर्त्यांकडे बाकी असलेले रू. 3,05,000/- विरूध्द पक्ष यांना नेहमीच देण्याची तयारी दर्शविली. तरी देखील विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्यांना कुठलीही दाद दिली नाही. त्यामुळे तक्रारकर्त्यांनी दिनांक 21/01/2013 रोजी व दिनांक 04/12/2013 रोजी विरूध्द पक्ष यांना नोटीस पाठविली. विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्यांच्या मागणीला दाद न दिल्यामुळे तक्रारकर्त्यांनी रू. 4,81,374/- इतकी नुकसानभरपाई मिळण्यासाठी सदरहू तक्रार न्याय मंचात दाखल केली आहे.
6. तक्रारकर्त्यांची तक्रार विद्यमान न्याय मंचाने दिनांक 23/04/2013 रोजी दाखल करून घेतल्यानंतर विरूध्द पक्ष यांना मंचामार्फत नोटीस बजावण्यात आली. विरूध्द पक्ष यांना नोटीस मिळून सुध्दा ते सदरहू प्रकरणात हजर न झाल्यामुळे त्यांच्याविरूध्द प्रकरण एकतर्फी चालविण्याचा आदेश दिनांक 18/03/2014 रोजी पारित करण्यात आला.
7. तक्रारकर्त्यांनी तक्रारीसोबत विरूध्द पक्ष यांनी न केलेल्या कामांची यादी पृष्ठ क्र. 16 वर दाखल केली असून बांधकामाचा करारनामा पृष्ठ क्र. 18 वर दाखल केला आहे. तसेच विरूध्द पक्ष यांनी तयार केलेला बांधकामाचा नकाशा पृष्ठ क्र. 23 व 24 वर, इम्रान कुरेशी Planer & Valuer यांचा अहवाल पृष्ठ क्र. 25 वर, वकिलामार्फत पाठविलेली नोटीस पृष्ठ क्र. 29 व 31 वर, नोटीसची पोस्टल रिसीप्ट पृष्ठ क्र. 33 वर, नोटीसच्या पोचपावत्या पृष्ठ क्र. 35 वर दाखल केलेल्या आहेत. .
8. तक्रारकर्त्याचे वकील ऍड. आय. के. होतचंदानी यांनी असा युक्तिवाद केला की, तक्रारकर्ता क्र. 1 व विरूध्द पक्ष यांच्यामध्ये बांधकामाचा करारनामा दिनांक 07/12/2010 रोजी झाला. सदरहू करारनाम्याप्रमाणे तक्रारकर्त्यांनी विरूध्द पक्ष यांना वेळोवेळी पैसे दिले व त्यांना पैसे मिळाल्याची सही देखील विरूध्द पक्ष यांनी करारनाम्यावर केली आहे. तक्रारकर्त्यांनी विरूध्द पक्ष यांना वेळोवेळी एकूण रू. 20,25,000/- आतापर्यंत दिले असून अधिकचे रू. 71,000/- आवारभिंतीकरिता दिले. तक्रारकर्त्यांनी कराराप्रमाणे वेळोवेळी मुदतीत पैसे देऊन सुध्दा विरूध्द पक्ष यांनी ऑगस्ट 2012 मध्ये कुठलेही संयुक्तिक कारण नसतांना तक्रारकर्त्यांच्या घराचे बांधकाम थांबविले. विरूध्द पक्ष यांनी करारनाम्याप्रमाणे व सदरहू प्रकरणात पृष्ठ क्र. 23 व 24 वर दाखल केलेल्या बांधकामाच्या नकाशाप्रमाणे पूर्ण बांधकाम न केल्यामुळे तसेच ते अर्धवट राहिल्यामुळे तक्रारकर्त्यांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागला. तक्रारकर्त्यांनी बांधकामाचे उर्वरित पैसे म्हणजेच रू. 3,05,700/- देण्याबद्दल संमती दर्शविली असतांनाही विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्यांचे बांधकाम नकाशाप्रमाणे व कराराप्रमाणे कुठलेही संयुक्तिक कारण न देता बंद पाडले. त्यामुळे तक्रारकर्त्यांना नुकसान सोसावे लागले. विरूध्द पक्ष यांनी अर्धवट सोडलेल्या बांधकामाबाबत तक्रारकर्त्यांनी गोंदीया येथील बांधकामाचे तज्ञ इम्रान कुरेशी यांच्याकडून अहवाल प्राप्त केला. त्यानुसार विरूध्द पक्ष यांनी रू. 6,86,374/- चे काम न केल्याचे अहवालात नमूद केलेले आहे. सदरहू अहवाल तक्रारकर्त्यांनी प्रस्तुत प्रकरणात दाखल केलेला आहे. तक्रारकर्त्यांनी विरूध्द पक्ष यांना बांधकाम पूर्ण करण्याची वारंवार तोंडी तसेच लेखी विनंती करून सुध्दा विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्यांच्या विनंतीला कुठलाही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे विरूध्द पक्ष यांनी कराराचा भंग केलेला असल्यामुळे विरूध्द पक्ष हे तक्रारकर्त्यांना रू. 4,81,374/- देण्यास बाध्य आहेत. करिता तक्रारकर्त्यांची तक्रार मंजूर करण्यात यावी.
9. तक्रारकर्त्यांचा तक्रारअर्ज, तक्रारीसोबत दाखल केलेली कागदपत्रे तसेच तक्रारकर्त्यांच्या वकिलांचा तोंडी युक्तिवाद यावरून खालील मुद्दे उपस्थित होतात.
अ.क्र. | मुद्दे | निर्णय |
1. | तक्रारकर्त्यांची तक्रार मान्य होण्यास पात्र आहे काय? | होय |
2. | विरूध्द पक्ष यांच्या सेवेत त्रुटी असल्याचे निदर्शनास येते काय? | होय |
3. | या तक्रारीचा अंतिम आदेश काय? | कारणमिमांसेप्रमाणे |
- कारणमिमांसा –
10. तक्रारकर्त्यांनी दाखल केलेला दिनांक 07/12/2010 रोजी करारनामा ज्यावर दोन्ही पक्षाची सही आहे तो सदरहू प्रकरणात पृष्ठ क्रमांक 18 वर आहे. सदरहू करारनाम्यानुसार तक्रारकर्त्यांच्या 3600 चौरस फुट प्लॉटवर तळमजला व पहिल्या मजल्याचे बांधकाम रू. 21,39,700/- तसेच आवारभिंतीचे बांधकाम रू. 1,20,000/- असे एकूण रू. 22,59,700/- मध्ये करण्याचे सदरहू करारनाम्यामधील clause no. 1 ते 32 वरील अटींसह ठरले होते. तक्रारकर्त्यांनी विरूध्द पक्ष यांना Plinth Level पर्यंत रू. 3,50,000/- दिले असून Plinth level ते Lintel level पर्यंत रू. 2,85,000/-, Lintel level ते Slab level पर्यंत रू. 3,00,000/-, Ground Floor Slab ते Lintel level पर्यंत रू. 2,84,000/-, Lintel level ते First floor Slab पर्यंत रू. 2,75,000/- आणि Ground Floor finishing करिता रू. 3,40,000/- याप्रमाणे तक्रारकर्त्यांनी संपूर्ण रकमा ठरल्याप्रमाणे विरूध्द पक्ष यांना दिल्या. विरूध्द पक्ष यांनी सुध्दा वरील रकमा मिळाल्याचे मान्य करून रक्कम मिळाल्याचा आकडा लिहून त्याखाली सही केलेली आहे. तक्रारकर्त्यांनी आवारभिंतीपोटी दिनांक 09/08/2011 रोजी रू. 71,000/- विरूध्द पक्ष यांना दिले असून त्याची नोंद सदरहू करारनाम्यात आहे. आवारभिंतीपोटी विरूध्द पक्ष यांना रू. 71,000/- मिळाल्याबाबतची स्वाक्षरी विरूध्द पक्ष यांनी करारनाम्यात केलेली आहे. त्यामुळे तक्रारकर्ता व विरूध्द पक्ष यांच्यामध्ये बांधकामाचा करार करण्यात आला होता व करारनाम्याप्रमाणे विरूध्द पक्ष हे बांधकाम करणार असल्याचे सिध्द होते. सदरहू करारनाम्याप्रमाणे तक्रारकर्त्यांनी विरूध्द पक्ष यांना रू. 20,25,000/- दिले व उर्वरित रू. 3,05,700/- देणे बाकी आहेत असे करारनाम्यावरून सिध्द होते.
11. तक्रारकर्त्यांनी पृष्ठ क्र. 23 व 24 वर बांधकामाचा नकाशा दाखल केलेला आहे. जो विरूध्द पक्ष यांनी स्वतः तयार केलेला असून त्यावर त्यांची स्वाक्षरी सुध्दा आहे. त्यावरून असे सिध्द होते की, पृष्ठ क्र. 23 व 24 वर दाखविलेल्या नकाशाप्रमाणे तक्रारकर्त्यांचे तळमजला व पहिल्या मजल्याचे बांधकाम विरूध्द पक्ष यांनी करून द्यायचे होते.
12. विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्यांच्या घराचे बांधकाम ऑगस्ट 2012 ला बंद केल्याचे त्यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रावरून सिध्द होते. तक्रारकर्त्यांनी विरूध्द पक्ष यांना वेळोवेळी विनंती करून सुध्दा विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्यांच्या बांधकामाची दखल न घेतल्यामुळे तक्रारकर्त्यांनी गोंदीया येथील Planer & Valuer इम्रान कुरेशी यांच्याकडून बांधकामाची तपासणी करून अहवाल प्राप्त केला. सदरहू अहवाल पृष्ठ क्र. 25 दाखल केला असून कराराप्रमाणे तक्रारकर्त्यांच्या घराचे संपूर्ण काम केले गेल्या नसून clause no. 2 ते 18 नुसार रू. 6,86,374/- इतक्या रकमेचे काम न केल्याचे सदरहू अहवालामध्ये नमूद केलेले आहे. तक्रारकर्त्यांनी दाखल केलेला अहवाल हा एका तज्ञ व्यक्तीचा असून त्यांच्याकडे Planer & Valuer चा कायदेशीर परवाना आहे. त्यांचा लायसेन्स नंबर 134/2001-02 असा असून ते बांधकाम व्यवसायातील एक तज्ञ व्यक्ती म्हणून समजल्या जातात. तक्रारकर्त्यांनी दाखल केलेला इम्रान कुरेशी यांचा अहवाल एक तज्ञ अहवाल म्हणजेच Expert Report म्हणून मान्यताप्राप्त आहे. त्यामुळे तक्रारकर्त्यांनी दाखल केलेला Planer & Valuer यांचा रिपोर्ट हा तज्ञ दाखला म्हणून स्विकारण्यात येतो व त्यानुसार विरूध्द पक्ष यांनी करारनाम्याप्रमाणे पैसे घेऊन सुध्दा तक्रारकर्त्यांचे बांधकाम पूर्ण न केल्याचे सिध्द होते.
13. तक्रारकर्त्यांनी दिनांक 21/01/2013 रोजी ऍड. होतचंदानी यांच्यामार्फत पाठविलेली नोटीस ही विरूध्द पक्ष यांना मिळाल्याचे पोस्टल रिसीप्ट व acknowledgement यावरून सिध्द होते. तसेच विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्यांच्या नोटीसला कुठलेही उत्तर न देता तक्रारकर्त्यांच्या तक्रारीची कुठल्याही प्रकारे दखल न घेणे व कराराप्रमाणे पैसे घेऊनही बांधकाम पूर्ण न करणे ही सेवेतील त्रुटी आहे हे सिध्द होते. “Every suit is charge” आणि तक्रारकर्त्यांनी बांधकाम करारनामा, विरूध्द पक्षाने बांधकामाकरिता घेतलेले पैसे व बांधकामाचा नकाशा तसेच Expert Report या पुराव्याद्वारे तक्रारकर्त्यांच्या तक्रारीमध्ये केलेला Charge सिध्द होतो.
14. तक्रारकर्त्यांनी कराराप्रमाणे विरूध्द पक्ष यांना वेळोवेळी बाकी असलेली रक्कम देण्याची नेहमी तयारी दर्शविणे म्हणजे तक्रारकर्त्यांनी कराराचे पूर्णपणे पालन केल्याचे आढळते. परंतु विरूध्द पक्ष यांनी कुठलेही संयुक्तिक कारण न देता तक्रारकर्त्यांकडून जवळपास पूर्ण घेऊनही काम अर्धवट ठेवणे तसेच तक्रारकर्त्यांच्या तक्रारीला दाद न देणे म्हणजे सेवेतील त्रुटी होय. त्यामुळे तक्रारकर्त्यांना होणा-या आर्थिक व मानसिक त्रासापोटी उद्भवणा-या नुकसानीकरिता नुकसानभरपाई देण्यास विरूध्द पक्ष जबाबदार आहेत असे मंचाचे मत आहे.
करिता खालील आदेश.
-// अंतिम आदेश //-
1. तक्रारकर्त्यांची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. विरूध्द पक्ष यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी कराराप्रमाणे तक्रारकर्त्यांचे बांधकाम पूर्ण करून न दिल्यामुळे त्यांनी तक्रारकर्त्यांना रू. 3,81,000/- तक्रार दाखल केल्याच्या दिनांकापासून म्हणजेच दिनांक 23/04/2013 पासून ते संपूर्ण पैसे अदा होईपर्यंत द. सा. द. शे. 9% व्याजासह द्यावे.
3. विरूध्द पक्ष यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्त्यांना झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई म्हणून रू.25,000/- द्यावे.
4. विरूध्द पक्ष यांना आदेश देण्यात येतो की, या तक्रारीचा खर्च म्हणून त्यांनी तक्रारकर्त्यांना रू. 10,000/- द्यावे.
5. विरूध्द पक्ष यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी या आदेशाचे पालन आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसांचे आंत करावे.