आदेश
(पारीत दिनांक :- 12/8/2021)
आयोगाचे निर्णयान्वये, श्रीमती कल्पना जांगडे (कुटे) मा.सदस्या
तक्रारकर्ता हे वरील पत्त्यावरील निवासी असून विरूध्द पक्ष बॅंकेने निवडप्रक्रियेअंती दिनांक 24/6/2015 चे आदेशान्वये तक्रारकर्त्याला अधिकारी पदावर 1 वर्षाचे परिविक्षाधीन कालावधीकरीता नियुक्त केले तसेच सदर कालावधीत समाधानकारक काम केल्यामुळे तक्रारकर्ता सेवेत नियमीत झाला. मात्र तक्रारकर्त्याने वैयक्तीक कारणास्तव सदर पदाचा दिनांक 4/6/2018 रोजी राजीनामा दिला व वि.प.ने तो स्विकृतदेखील केला. सदर रिक्त झालेल्या पदावर वि.प.ने श्री.दिनेश कावळे यांची नियुक्ती केली असून तक्रारकर्त्याने मध्यंतरीचे कालावधीत आपले प्रलंबीत काम पूर्ण करून सदर पदाचा कार्यभार रीतसर संबंधीतांस हस्तांतरीत देखील केला. तक्रारकर्त्याचे वि.प.बॅंकेत मुदतठेव रसीद क्र.031373 दिनांक 6/6/2016 अन्वये रू.50,000/-, मुदतठेव रसीद क्र.042318 दिनांक 1/2/2018 अन्वये रू.25,000/- व मुदतठेव रसीद क्र.042394 दिनांक 20/6/2018 अन्वये रू.25,000/- असे एकूण रू.1 लाख होते. तक्रारकर्त्याने राजीनामा दिल्यानंतर वरील मुदतीठेवींच्या रकमेची वि.प.कडे मागणी केली असता, बॅंकेचे नियमानुसार पूर्वसुचना न देता नोकरी सोडल्याचे कारण दर्शवून बेकायदेशीररीत्या 6 महिन्यांची वेतनकपात करून उर्वरीत रक्कम, तक्रारकर्त्याचे खात्यात जमा करण्यात आली. वि.प.ने मनमानी व नियमबाहय कपात करून तक्रारकर्त्याप्रती सेवेत न्यूनता तसेच अनुचीत व्यापार पध्दतीचा अवलंब केला आहे. सबब तक्रारकर्त्याने प्रस्तूत तक्रार वि.प. विरुद्ध दाखल केली असून मुदतीठेवींची संपूर्ण रक्कम सव्याज मिळावी तसेच शारिरीक व मानसीक त्रासापोटी नुकसान-भरपाई रू.30,000/- व तक्रारीचा खर्च रू.30,000/- मिळावा अशी तिने मंचास प्रार्थना केली आहे.
2. तक्रारकर्त्याची तक्रार स्वीकृत करून वि.प. यांना मंचातर्फे नोटीस काढण्यात आली. वि.प. यांनी मंचासमक्ष उपस्थित होऊन आपले लेखी कथन दाखल केले असून त्यामध्ये
वि.प.बॅंकेने दिनांक 24/6/2015 चे नियुक्ती आदेशान्वये तक्रारकर्ता यांना अधिकारी पदावर परिविक्षा कालावधीकरीता नियुक्त करण्यांत आल्याचे तसेच सदर पदावरून तक्रारकर्त्याने दिनांक 4/6/2018 रोजी राजीनामापत्र पाठविल्याचे मान्य केले आहे. मात्र तक्रारकर्त्याचे इतर कथन खोडून काढीत त्यांनी नमूद केले की तक्रारकर्त्याकडून बॅंकेतील त्यांचे पदाचे जबाबदारीबाबत नियमानुसार रू.1 लाखाची मुदतठेव सुरक्षा ठेव म्हणून जमा करण्यांत आली होती. बॅकेचे नियमानुसार अधिका-याने तीन वर्षाचे आंत पद सोडल्यांस सपूर्ण सुरक्षा ठेवीची रक्कम जप्त करण्याची तरतूद आहे. अन्यथादेखील 6 महिन्यांची पूर्वसुचना देवून वा 6 महिन्यांचा आगाऊ पगार भरूनच अधिका-यांस पद सोडता येते. मात्र तक्रारकर्त्याने तीन वर्षांचे आंतच पदावरून राजिनामा देवूनही वि.प.बॅंकेने सहानुभूतीपूर्ण भुमिका घेवून दिनांक 5/11/2015 चे बॅंकेचे परिपत्रकातील नियमानुसार केवळ 6 महिन्याच्या वेतनाची रक्कम सुरक्षा ठेवीतून कपात करून उर्वरीत रक्कम तक्रारकर्त्याचे खात्यात जमा केली व तसे तक्रारकर्त्यांस रीतसर कळविले आहे. इतकेच नव्हेतर बॅंकेतील पद सोडल्याचे 6 महिन्यांचे आंत अन्य वित्तीय संस्थेत नोकरी स्विकारणे हे नियमांचा भंग असूनही तक्रारकर्त्याने वि.प.बॅंकेतील अधिकारी पदावरून राजीनामा देताच दि निर्मल उज्वल बॅंकेत सेवेत रूजू झाले व या अनियमिततेकरीता ते कायदेशीर कार्यवाहीस पात्र आहेत. विरूध्द पक्ष यांनी नियमानुसार कार्यवाही केली असून तक्रारकर्त्याप्रती कोणतीही सेवेतील न्यूनता केलेली नाही. सबब प्रस्तूत तक्रार खर्च बसवून खारीज करण्यांत यावी, अशी त्यांनी मंचास विनंती केली आहे.
3. तक्रारकर्त्याची तक्रार, त्याने दाखल केलेले शपथपत्र, दस्तावेज, तसेच विरूध्द पक्ष यांचे लेखी उत्तर आणी त्यांनी दाखल केलेले शपथपत्र, दस्तावेज आणी उभय बाजूंकडून दाखल लेखी युक्तिवाद यांचे काळजीपूर्वक वाचन केले असता मंचाचे निर्णयास्तव उपस्थीत होणारे मुद्दे व त्यावरील मंचाचे निष्कर्ष खालीलप्रमाणे आहेत.
मुद्दे निष्कर्ष
1. वि.प.बॅंकेने तक्रारकत्याप्रती सेवेत न्युनता केली आहे काय ? नाही
2. आदेश काय ? अंतीम आदेशानुसार
मुद्दा क्रमांक 1बाबत
4. प्रकरणातील उपलब्ध दस्तावेज तसेच उभय पक्षांचे अभिकथनावरून वि.प.बॅंकेने दिनांक 24/6/2015 चे नियुक्ती आदेशान्वये तक्रारकर्ता यांना अधिकारी पदावर एक वर्षाचे परिविक्षा कालावधीकरीता नियुक्त करण्यांत आल्याचे तसेच सदर पदावरून तक्रारकर्त्याने दिनांक 17/5/2018रोजी राजीनामा दिल्याचे दिसून येते. सदर राजिनामा तक्रारकर्त्याने पूर्वसूचना न देता दिल्याबाबतही उभय पक्षात विवाद नाही। मात्र पूर्वसूचना न देता दिलेल्या राजिनाम्याकरीता वेतन कपातीकरीता किती कालावधीचे वेतन कापण्यात यावे हा वादाचा मुद्दा आहे। 6 महिन्यांची पूर्वसुचना देवून व पूर्वसुचना देणे शक्य नसल्यास सदर कालावधीचा किंवा उर्वरीत कालावधीचा पगार भरून देणे अनिवार्य आहे असे वि. प. बॅंकेचे म्हणणे आहे। याकरीता वि. प. ने दिनांक 5/11/2015 चे बॅंकेचे परिपत्रकाची प्रत प्रकरणात दाखल केली असून सदर परिपत्रकातील नियमावलीनुसार बॅंकेचे अधिकारी पदावर कार्यरत कर्मचा-यांस नोकरी सोडण्याबाबत 6 महिने आधी पूर्वसुचना द्यावी लागेल व अशी पूर्वसुचना देणे अनिवार्य राहील व अशी पूर्वसुचना देणे शक्य नसल्यास सदर कालावधीचा किंवा उर्वरीत कालावधीचा पगार भरून देणे अनिवार्य आहे अशी स्पष्ट तरतूद त्यात आहे। तक्रारकर्त्याने सदर परिपत्रक त्यांला माहित करून देण्यात आले नव्हते असे कोठेही नमूद केलेले नाही। अशा परिस्थितित साहजीकच सदर नियमावली त्याला मान्य असल्याचा अन्वयार्थ काढणे क्रमप्राप्त आहे। सदर परिपत्रकामध्ये अनामत रक्कम मुदतीठेवीच्या स्वरूपात घेण्यात येते असे नमूद आहे. अशा परिस्थितित सदर नियमावलीनुसार वि. प. बॅंकेने तक्रारकर्त्याच्या सुरक्षा ठेवीच्या रकमेतून 6 महिन्याचे वेतनाची कपात करून उर्वरीत रक्कम तक्रारकर्त्याचे खात्यात जमा केली व तसे तक्रारकर्त्यांस रीतसर कळविले यात वि. प. कडून सेवेतील न्यूनता झाल्याचे निदर्शनास येत नाही। सबब मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर नकारार्थी देण्यात येत आहे.
मुद्दा क्रमांक 2 बाबत
5. वरील मुद्दा क्र.1 वरील आयोागाचे अभिप्रायांचे अनुषंगाने मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
अंतीम आदेश
1. तक्रारकर्त्याची तक्रार 26/19 खारीज करण्यांत येते.
2. उभय पक्षांनी आप आपला तक्रारीचा खर्च सोसावा.
3. प्रस्तूत आदेशाची प्रत उभय पक्षांना तात्काळ व विनामुल्य देण्यांत यावी.