जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, गडचिरोली
ग्राहक तक्रार क्रमांक :- 4/2015 तक्रार दाखल दि. :-24/03/2015
तक्रार निकाली दि. :-25/03/2015
निकाल कालावधी :- 1 दिवस
अर्जदार/तक्रारकर्ता :- सुनिल नंदकिशोर रणदिवे,
वय – 32 वर्षे, धंदा – वर्कशॉप,
राह. आरमोरी रोड, सुप्रभात मंगल कार्यालयासमोर,
गडचिरोली, ता.जि. – गडचिरोली.
- विरुध्द –
गैरअर्जदार/विरुध्दपक्ष :- (1) अमोल पोटुडे,
व्यवस्थापक, जायका मोटर्स लिमिटेड, नागपूर रोड, चंद्रपूर, ता.जि.चंद्रपूर.
(2) अमित भगत, सेल्स मॅनेजर,
जायका मोटर्स लिमिटेड, नागपूर रोड, चंद्रपूर, ता.जि.चंद्रपूर.
अर्जदार तर्फे वकील :- अधि.श्री पी.एम.धाईत.
गणपूर्ती :- (1) श्री विजय चंद्रलाल प्रेमचंदानी, अध्यक्ष
(2) श्री सादीक मोहसीनभाई झवेरी, सदस्य
(3) श्रीमती रोझा फुलचंद्र खोब्रागडे, सदस्या
- आदेश –
(निशाणी क्र.1 वर )
(मंचाचे निर्णयान्वये, श्री विजय चंद्रलाल प्रेमचंदानी, अध्यक्ष)
(पारीत दिनांक : 25 मार्च 2015)
1. अर्जदाराने सदर तक्रार दाखल केली असून, तक्रारीचा आशय थोडक्यात याप्रमाणे.
2. अर्जदाराने, गैरअर्जदार क्र.1 कडून, टाटा इंडिगो ईसीएस एलएस या चारचाकी वाहनाची खरेदी केली.
3. सदर वाहन खरेदी करते वेळी गैरअर्जदार क्र.2 यांनी अर्जदाराला असे सांगितले होते की, गैरअर्जदाराची कंपनी अर्जदाराचे वाहनाकरीता अॅडॉन इन्शुरन्स पॉलीसी काढून देईल. यामध्ये, गाडीचे जर नुकसान झाले तर इन्शुरन्स कंपनी संपुर्ण रक्कम देवून नुकसानभरपाई करणार तसेच, सदर पॉलीसीमध्ये Own Damage, मालक व 3rd Party Insurance राहील.
4. अर्जदाराने पुढे असे कथन केले की, दिनांक 15.8.2014 रोजी सदर वाहनाचा अपघात झाल्याने अर्जदाराला सदर वाहनाचा दुरुस्ती खर्च 3,49,940/- झाला व इन्शुरन्स कंपनीने त्यांचे पॉलीसीमध्ये नमुद असलेल्या अटी व नियमाप्रमाणे विमा रक्कम रुपये 2,50,053/- मान्य केले व उर्वरीत रक्कम रुपये 99,887/- अर्जदाराला भरावे लागले.
5. गैरअर्जदाराने पॉलीसी काढतांना चुक झाली असे सांगून अर्जदाराला सदर वाहनाची दुरुस्ती करतेवेळी रक्कम भरावी लागली, त्यामुळे अर्जदाराला रुपये 99,887/- चे आर्थिक नुकसान झाले तसेच अर्जदाराला मानसिक त्रास सहन करावा लागला.
6. गैरअर्जदाराने इन्शुरन्स कंपनीकडून चुकीची पॉलीसी काढल्याने व अर्जदाराला त्याकरीता आर्थिक नुकसान सहन करावे लागले. म्हणून, गैरअर्जदाराने अर्जदाराला न्युनतम सेवा दिली असून अनुचित व्यवहार पध्दतीचा अवलंब केला सबब सदर तक्रार मंचासमोर दाखल करण्यात आली आहे.
7. अर्जदारातर्फे हजर अधिवक्त्याचे सदर तक्रार अर्जावर प्राथमिक युक्तीवाद ऐकण्यात आले व तक्रारीची पडताळणी करुन मंचाच्या समक्ष खालील मुद्दे विचारण्यात आले.
मुद्दे : निष्कर्ष
1) सदर तक्रार मंचाचे कार्यक्षेत्रात येत आहे काय ? : नाही.
2) अंतीम आदेश काय ? : अंतिम आदेशाप्रमाणे
- कारण मिमांसा –
मुद्दा क्रमांक 1 बाबत :-
8. अर्जदाराने सदर वाहन गैरअर्जदाराकडून, नागपूर रोड, चंद्रपूर, ता.जि.चंद्रपूर येथून खरेदी केले. त्याकरीता, अर्जदाराने गैरअर्जदाराला रुपये 1,87,000/- चे डाऊन पेमेंट केले, ते सुध्दा गैरअर्जदाराचे चंद्रपूर येथे स्थित कार्यालयात केले. अर्जदाराच्या तक्रारीमध्ये व त्यांचे अधिवक्त्याचे प्राथमिक युक्तीवादामध्ये असे सांगण्यात आले की, गैरअर्जदाराने, अर्जदाराचे वाहनाची इन्शुरन्स पॉलीसी काढण्याकरीता अर्जदाराकडून मोबदला चंद्रपूर येथील स्थित गैरअर्जदाराच्या कार्यालयात घेतला व गैरअर्जदाराने अर्जदाराला चंद्रपूर येथे स्थित कार्यालयात इन्शुरन्स बद्दल चुकीची माहिती दिली.
9. मंचाच्या मताप्रमाणे सदर तक्रार दाखल करण्यासाठी कारण चंद्रपूर येथे घडले व ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 11(2) (अ) व (ब) नुसार सदर तक्रार या मंचाचे कार्यक्षेत्रात येत नसल्याने मुद्दा क्र. 2 चे उत्तर नकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रमांक 2 बाबत :-
10. मुद्दा क्र. 1 चे विवेचनानुसार खालीलप्रमाणे नि.क्र. 1 वर अंतिम आदेश पारीत करण्यात येत आहे.
- अंतिम आदेश -
(1) अर्जदाराची तक्रार या मंचाचे कार्यक्षेत्रात येत नसल्याने, तक्रार अस्विकृत करुन खारीज करण्यात करण्यात येत आहे.
(2) अर्जदाराच्या तक्रारीची मुळ प्रत सोडून उरलेली प्रत व दस्ताऐवज अर्जदारांना परत करण्यात यावी.
(3) अर्जदाराने तक्रारीचा खर्च स्वतः सहन करावा.
(4) अर्जदाराला आदेशाची प्रत विनामुल्य देण्यात यावी.
गडचिरोली.
दिनांक :- 25.03.2015.
(रोझा फु. खोब्रागडे) (सादीक मो. झवेरी) (विजय चं. प्रेमचंदानी)
सदस्या सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, गडचिरोली.