( आदेश पारित द्वारा : श्री. विजयसिंह ना. राणे, अध्यक्ष ) आदेश ( पारित दिनांक : 04आक्टोबर, 2010 ) 1. यातील तक्रारदार श्री दामोदर लक्ष्मण गोन्नाडे यांची थोडक्यात तक्रार गैरअर्जदार, सर्वोदय को-ऑपरेटिव हाऊसिंग सोसायटी, जमीन विकसक व बिल्डर विरुध्द अशी आहे की, तक्रारदाराने त्यांचे सोबत दिनांक 19.11.2005 रोजी रुपये 2,10,000/- रुपये देऊन एक सदनिका विकत घेण्याचा सौदा केला. ही सदनिका मौजा–नरसाळा, तहसिल व जिल्हा-नागपूर सर्वे नं.204/2, पटवारी हलका नं.37, राधारमण नगर क्रमांक 1 या नावाने टाकलेल्या ले-आऊट मधील प्लॉट क्रं.27 व 28 वर बांधण्यात आलेल्या इमारत क्रं.15 यातील पहील्या माळयावरील सदनिका क्रं.27-28/7 अशी असुन तीचे क्षेत्रफळ 34.91 चौरस मीटर आहे. - तक्रारकर्त्याने गैरअर्जदाराला आतापर्यत रुपये 41,000/-, व रुपये 1,70,000/- असे बॅकेमार्फत त्याच्याकडुन घेतलेल्या कर्जामधुन मे 2006 पर्यत दिलेले आहे. गैरअर्जदाराने जाहीरातपत्रकाप्रमाणे काम पुर्ण करुन सदनिकेचा ताबा व विक्रीपत्र करुन देणे गरजेचे होते. मात्र गैरअर्जदाराने बांधकाम अपुर्ण ठेवले आहे. बांधकाम पुर्ण झाल्याबाबतचे प्रमाणपत्र संबंधीत अथॉरिटीकडुन घेतलेले नाही. म्हणुन तक्रारदाराने शेवटी दिनांक 22.10.2010 व दिनांक 04.01.2010 रोजी गैरअर्जदारास नोटीस दिली. परंतु गैरअर्जदाराने नोटीस मिळुनही उत्तर दिले नाही. तत्पुर्वी तक्रारदाराने गैरअर्जदारास भेट देऊन वारंवार बांधकाम पुर्ण करुन ताबा देण्याची मागणी केली व शेवटी ही तक्रार दाखल करुन, ती द्वारे करारनाम्याच्या अटी प्रमाणे व जाहीरात पत्रकाप्रमाणे बांधकाम पुर्ण करुन वादातीत सदनिकेचा ताबा व विक्रीपत्र करुन द्यावे. शारिरिक व मानसिक त्रासापोटी रुपये 1,00,000/- मिळावे आणि तक्रारीचा खर्च रुपये 10,000/- नोटीस खर्च रुपये 2,000/- मिळावा. तसेच जोपर्यत गैरअर्जदार विक्रीपत्र व ताबा देत नाही तो पर्यत दरमहा रुपये 3,000/- नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली.
- यात गैरअर्जदार यांना नोंदणीकृत डाकेद्वारे नोटीस पाठविण्यात आली. नोटीस प्राप्त होऊन गैरअर्जदार हजर झाले व आपला लेखी जवाब दाखल केला.
- गैरअर्जदाराने तक्रारदाराची सर्व विपरित विधाने नाकबुल केली. गैरअर्जदाराचे असे म्हणणे आहे की, 3 वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेला असल्यामुळे तक्रार मुदतीत नाही. तक्रारकर्त्याने त्यांना पुर्ण रक्कम दिली नाही. त्याला वारंवार बांधकाम पाहावयास बोलाविले मात्र ते आले नाही. सदनिकेचे बांधकाम पुर्ण झालेले आहे. सदनिकेचे दार सागवानाचे राहिल असे कधीही ठरलेले नव्हते. तक्रारदाराला ऑक्यूपंसी प्रमाणपत्र नेण्यास बोलाविले असता उर्वरित रक्कम मागील या भितीने तक्रारदार प्रमाणपत्र स्विकारण्यास आले नाही. थोडक्यात तक्रारदाराची तक्रार बेकायदेशिर व चुकीची आहे त्यामुळे खारीज करण्यात यावी असा उजर घेतला.
- तक्रारदाराने आपली तक्रार प्रतिज्ञालेखावर दाखल केली असून, दस्तऐवजयादीनुसार करारनामा, रक्कम भरल्याबाबतचे पावत्या, आयसीआयसीआय बँक खात्याची नकल, नोटीस जाहीरात पत्रक, स्पीड पोस्ट लिफाफा, रजिस्टर ए.डी. पावती शिक्षक सहकारी बॅक खाते उता-याची नकल आयसीआयसीआय बँक कर्ज खात्याची नकल इत्यादी कागदपत्रे दाखल केलीत. तर गैरअर्जदार यांनी आपला लेखी जवाब शपथपत्रावर दाखल केला सोबत कोणतेही दस्तऐवज दाखल केले नाही. तक्रारदाराचे प्रतिउत्तर दाखल केले.
- तक्रारकर्त्या तर्फे वकील श्री.बी.डी.दवे, गैरअर्जदारातर्फे वकील श्री लुबेश मेश्राम यांनी युक्तिवाद केला.
#####- का र ण मि मां सा -##### - सदर प्रकरणात गैरअर्जदार यांनी सदनिकेचे बांधकाम पुर्ण केले यासंबंधी पूरावा म्हणून संबंधीत अधिका-यांना(Authority) कळवुन त्यांचे कडुन ऑक्यूपंसी पत्र प्राप्त करणे गरजेचे होते आणि ते प्रकरणात दाखले करणे गरजेचे होते. गैरअर्जदारांनी बांधकाम पुर्ण झाल्याबद्दल असे कोणतेही प्रमाणपत्र प्राप्त केले नाही, असे दिसते. व असेल तर ते दाखल केले नाही आणि त्यामुळे जोपर्यत बांधकाम पुर्ण होत नाही तोपर्यत तक्रारीत घडणारे कारण हे सतत घडणारे असते त्यामुळे सदर तक्रार ही मुदतीत नाही असा गैरअर्जदारांचा आरोप निरर्थक आहे.
8. गैरअर्जदार क्रं.2 नी असा उजर घेतला आहे की, तक्रारदाराने त्यांना पुर्ण मोबदला रक्कम दिली नाही. तक्रारदाराने यासंबंधी गैरअर्जदार यांचेकडुन प्राप्त केलेल्या पावत्या दाखल केल्या आहेत. त्या पावत्याप्रमाणे पावती क्रं.078 दिनांक 7.8.2002 रोजी रुपये 5,000/-, पावती क्रं.213 दिनांक 18.9.2004 रोजी रुपये 10,000/- , पावती क्रं.218 दिनांक 18.9.2004 रोजी रुपये 6,000/-, पावती क्रं.546 दिनांक 27.12.2004 रोजी रुपये 3,000/-पावती क्रं.755 दिनांक 19.2.2005 रोजी रुपये 3,000/-, पावती क्रं. 806 दिनांक 12.3.2005 रोजी रुपये 3,000/-, पावती क्रं.810 दिनांक 25.3.2005 रोजी रुपये 11,000/-, देण्यात आलेले आहे हे स्पष्ट होते. या रक्कमांची बेरीज एकुण रुपये 41,000/- होते. या पावत्या गैरअर्जदाराने अमान्य केल्या नाही व तसेही रुपये 41,000/- मिळाल्याबाबतची बाब परिच्छेद क्रं.3 मधे आपल्या लेखी जवाबात गैरअर्जदार यांनी मान्य केली आहे. पुढे तक्रारदाराने आयसीआयसीआय बॅकेचे कर्ज खात्याचा उतारा दाखल केलेला आहे आणि त्या खात्यात दिनांक 24.11.2005, रोजी रुपये 1,48,000/- आणि दिनांक 23.5.2006 ला रुपये 22,000/- अशी नोंद त्या खाते उता-यावरुन दिसुन येते आणि त्याबद्दल तक्रारदार यांनी गैरअर्जदार क्रं.2 यांचे खाते उता-याच्या नकला दाखल केलेल्या आहे. ज्याप्रमाणे गैरअर्जदार क्रं. 2 ला दिनांक 25.11.2005 ला रुपये 1,48,000/- एवढी रक्कम ही आयसीआयसी बँकेतील खात्यातुन प्राप्त झाल्याची नोंद असुन पूढे दिनांक 24.5.2006 रोजी 20,917/- एवढी रक्कम तक्रारदार यांचे बँकेकडुन प्राप्त झाल्याची नोंद आहे. ही नोंद बॅकेने दिलेल्या प्रमाणीत खाते उता-यावरुन तक्रारदाराने सिध्द केलेली आहे आणि ती गैरअर्जदाराने नाकारलेली नाही. त्यासंबंधी शपथपत्र दाखल केले नाही. थोडक्यात तक्रारदाराने एकुण रक्कम रुपये 2,09,917/- एवढी दिली असुन तक्रारदार गैरअर्जदारास केवळ रुपये 83/- देणे लागतात. त्यामुळे गैरअर्जदाराचा मोबदल्या संबंधीचा उजर उघडउघड चुकीचा आहे हे स्पष्ट होते. - थोडक्यात तक्रारदाराने गैरअर्जदारास एकुण मोबदल्यापैकी बहुतांश रक्कम
दिलेली आहे. - तक्रारदाराने जाहीरातपत्रक या प्रकणात दाखल केले असुन त्यामध्ये
बांधकामाबाबतची माहीती व विवरण देण्यात आलेले आहे. त्यामध्ये समोरचा दरवाजा सागवानाचा लावणार असल्याचे नमुद केलेले आहे. तसेच इतर बाबी संबंधी सुध्दा तपशील दिलेला आहे आणि त्याप्रमाणे बांधकाम करुन देण्याची जबाबदारी गैरअर्जदाराची आहे आणि गैरअर्जदाराने अद्यापही तसे केले नाही. तक्रारदाराच्या नोटीसला उत्तर ही दिले नाही आणि तक्रारदाराला सदनिकेचा ताबा व विक्रीपत्र करुन दिले नाही या सर्व गैरअर्जदाराच्या सेवेतील त्रुटी आहे हे स्पष्ट होते. वरील सर्व परिस्थितीचा विचार करुन आम्ही खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहोत. // अं ति म आ दे श //- 1. तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. 2. गैरअर्जदार यांनी वादातीत सदनिका मौजा – नरसाळा, तहसिल व जिल्हा- नागपर सर्वे नं.203/2, पटवारी हलका नं.37, राधारमण नगर क्रमांक 1 या नावाने टाकलेल्या ले-आऊट मधील प्लॉट क्रं.27 व 28 वर बाधण्यात आलेल्या इमारत क्रं.15 यातील पहील्या माळयावरील सदनिका क्रं.27-28/7 चे जाहिरातीपत्रकाप्रमाणे व कराराप्रमाणे पुर्ण बांधकाम सागवानी मुख्य दारासह करुन त्यासंबंधी ऑक्युपंसी प्रमाणप्रत्र घेऊन सदनिकेचा ताबाव विक्रीपत्र हे निकालपत्र प्राप्त झाल्यापासुन दोन महिन्याचे आत तक्रारदारास करुन द्यावे. 3. तक्रारदाराने राहीलेला मोबदला रक्कम रुपये 83/- विक्रीपत्राचे वेळी गैरअर्जदाराने स्विकारावी. ती देण्याची जबाबदारी तक्रारदाराची राहील. 4. वरील विक्रीपत्राचे नोंदीबाबत व ताबा देण्याची तारीख व वेळेबाबतची सुचना तक्रारदारास गैरअर्जदाराने नोंदणीकृत डाकेद्वारे कळवावी. 5. गैरअर्जदार यांनी तक्रारदारास झालेल्या मानसिक त्रासापोटी व आर्थिक नुकसान भरपाईपोटी रुपये 10,000/-(रुपये दहा हजार फक्त) व दाव्याच्या खर्चापोटी रुपये 1,000/-(रुपये एक हजारफक्त )असे एकुण 11,000/-(रुपये अकरा हजार फक्त) तक्रारदारास द्यावे. 6. गैरअर्जदार यांनी या आदेशाचे पालन वरील प्रमाणे दोन महिन्याचे आत न केल्यास ते तक्रारदारास पुढील नुकसान भरपाईबाबत दरमहा रुपये 2,000/- देणे लागतील.
| [HONABLE MRS. Mrs.Jayshree Yangal] Member[HONORABLE Shri V. N. Rane] PRESIDENT[HONABLE MRS. Mrs. Jayshree Yende] MEMBER | |