(आदेश पारीत व्दारा - श्रीमती चंद्रिका कि. बैस, मा.सदस्या)
(पारीत दिनांक : 22 नोव्हेंबर 2016)
तक्रारकर्त्याने सदरची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अंतर्गत दाखल केली असून तक्रारकर्त्याच्या तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालील प्रमाणे आहे.
1. तक्रारकर्त्याचे म्हणण्यानुसार त्याचा मुलगा नामे शञुघ्नसिंग डी.कुशवाह याचा विवाह दिनांक 24.4.2012 रोजी संपन्न झाला असून त्या विवाहाचे अनुषंगाने दिनांक 25.4.2012 रोजी विरुध्दपक्ष श्री विजय पाल, प्रोप्रायटर दुलारीया लॉनवर स्वागत समारंभ आयोजीत करण्याचे तक्रारकर्त्याने ठरविले. त्यानुसार विरुध्दपक्ष यांचेशी तोंडी करार करुन स्वागत समारंभाकरीता आमंञित 350 पाहुण्यांकरीता प्रती प्लेट रुपये 205/- प्रमाणे जेवण दिलेल्या यादीतील पदार्थ निश्चित करुन एकूण रुपये 73,250/- (यामध्ये 1500/- रुपये 5 टेबलांकरीता समाविष्ठ केले आहे.) मध्ये पुरविण्याचे विरुध्दपक्ष यांनी कबूल केले. तसेच, त्यावेळी विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्त्यास रुपये 250/- सुट देवून एकूण रुपये 73,000/- ला वरील नमूद लॉन व जेवण ठरल्याप्रमाणे दिनांक 25.4.2012 रोजी देण्याचे कबूल केले.
2. तक्रारकर्त्याचे म्हणण्याप्रमाणे त्यांनी विरुध्दपक्षाशी केलेल्या कराराप्रमाणे दिनांक 7.12.2011 रोजी रुपये 5,000/- रोख व दिनांक 18.3.2012 रोजी रुपये 29,000/- व दिनांक 21.4.2012 रोजी रुपये 39,000/- युनियन बँक, शाखा मानेवाडा, नागपूर चा धनादेशा व्दारे विरुध्दपक्ष यांना दिलेले आहे. त्याबाबत विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्त्यास आपल्या सहीनिशी रितसर पावत्या सुध्दा दिलेल्या आहेत. विरुध्दपक्ष यांना तक्रारकर्त्याकडून कराराप्रमाणे पूर्ण मोबदला प्राप्त झाला आहे, त्यामुळे तक्रारकर्ता हा विरुध्दपक्ष यांचा ग्राहक आहे. तक्रारकर्त्याच्या म्हणण्याप्रमाणे विरुध्दपक्षाने ठरलप्रमाणे पूर्ण मोबदला प्राप्त झाल्याने लॉन, तसेच जेवणाची व्यवस्था करुन देणे विरुध्दपक्षाकरीता बंधनकारक होते. परंतु, विरुध्दपक्षाने त्याबाबत हेतुपुरस्परपणे दुर्लक्ष केल्याने तक्रारकर्त्याने निवडलेल्या खालील पदार्थांपैकी विरुध्दपक्ष कबूल करुन सुध्दा दहीपापडी, स्प्राऊटेड, बिन, सुप, सलाद, सुपारी आणि मुख्य म्हणजे उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे अत्यंत आवश्यक म्हणजे थंड पाणी आमंञित पाहुण्यांना दिले नाही. त्याचप्रमाणे विरुध्दपक्षाने कबूल केल्याप्रमाणे समारंभात उपस्थित पाहुण्यांपैकी सुमारे 50 टक्के पाहुण्यांना आईस्क्रीम व चमचम पुरेश्याप्रमाणात विरुध्दपक्षाने पुरविली नसल्यामुळे समारंभात तक्रारकर्त्याची मोठ्या प्रमाणावर गैरसोय झाली. परिणामतः तक्रारकर्त्यास मोठ्या प्रमाणात रक्कम खर्च करुन सुध्दा बोलाविलेल्या पाहुण्यांसमोर अपमाणीत व्हावे लागले व त्यामुळे तक्रारकर्त्यास व त्याचे कुंटूंबियाना मानसिक ञास सहन करावा लागला. यावरुन विरुध्दपक्षाने त्याचे सेवेत केलेली ञुटी दिसून येते व तक्रारकर्ता हे विरुध्दपक्षाकडून नुकसान भरपाई मिळण्यास पाञ आहे.
3. तक्रारकर्ता पुढे नमूद करतो की, त्याने दिनांक 19.7.2012 कायदेशिर नोटीस पाठविली असून ती विरुध्दपक्षास प्राप्त होऊन सुध्दा त्यावर विरुध्दपक्षाने कोणत्याही प्रकारचे सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही.
4. तक्रारकर्त्याचे प्रार्थनेनुसार विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्त्याशी केलेला तोंडी करारातील अटी व शर्तीप्रमाणे पूर्ण मोबदला रक्कम स्विकारुन सुध्दा ठरल्याप्रमाणे जेवणाची व्यवस्था निर्धारीत व पुरेशा पदार्थाप्रमाणे उपलब्ध करुन न दिल्याने त्यांनी सेवेत ञुटी केलेली आहे, असे घोषीत करावे. तसेच अशापरिस्थितीत तक्रारकर्त्यास झालेल्या आर्थिक, मानसिक व शारिरीक ञासापोटी नुकसान भरपाई म्हणून त्यांचेकडून स्विकारलेली रक्कम रुपये 73,000/- वार्षीक 9 टक्के व्याजाने परत करावे. त्याचप्रमाणे आमंञित पाहुण्यासमक्ष विरुध्दपक्ष यांच्या सेवेतील ञुटीमुळे तक्रारकर्त्यास अपमाणित व्हावे लागले त्याकरीता विरुध्दपक्षास रुपये 50,000/- द्यावे असे आदेशीत करावे. त्याचप्रमाणे तक्रारीचा खर्च रुपये 10,000/- देण्याचे आदेशीत करावे.
5. तक्रारकर्त्याच्या तक्रारीचे अनुषंगाने विरुध्दपक्षाला नोटीस पाठविण्यात आली. विरुध्दपक्ष वकीला मार्फत उपस्थित होऊन निशाणी क्रमांक 8 वर लेखीउत्तर दाखल करुन त्यात नमूद केले की, विरुध्दपक्ष यांचे दुलारीया नावाचा लॉन मानेवाडा रिंगरोड, साऊथ पॉईंट स्कुलजवळ, नागपूर येथे आहे. विरुध्दपक्षाच्या म्हणण्यानुसार तक्रारकर्त्याने फक्त दुलारीया या लॉनचे विवाह स्वागत समारंभा प्रित्यर्थ बुकींग केले होते. दिनांक 7.12.2011 रोजी कुठल्याही प्रकारचे जेवण व्यवस्था पुरविण्याचा करार विरुध्दपक्ष व तक्रारकर्ता यांचेमध्ये झाला नव्हता. याअनुषंगाने तक्रारकर्त्याने एकूण रुपये 25,000/- रकमेपैकी रुपये 5000/- अॅडव्हॉन्स (अनामत रक्कम) म्हणून दिली होती व उर्वरीत रक्कम रुपये 20,000/- लग्न समारंभाच्या दिवशी देण्याचे ठरले होते. त्यानंतर, विरुध्दपक्ष पुढे असे नमूद करतो की, आमंञित 350 पाहुण्यांकरीता प्रती प्लेट रुपे 305/- प्रमाणे जेवण देण्याचे ठरले होते हे म्हणणे संपूर्ण चुकीचे आहे. कारण, सदर तक्रारीसोबत स्वतः तक्रारकर्त्याने जे दस्ताऐवज दाखल केले आहे त्या दस्ताऐवजामध्ये असे स्पष्टपणे नमूद आहे की, आमंञित 350 पाहुण्यांकरीता प्रती प्लेट 195/- प्रमाणे जेवण देण्याचे ठरले होते. वरील बाबीवरुन स्पष्ट होते की, तक्रारकर्ता हा मा.मंचासमोर खोटे बोलत आहे. विरुध्दपक्षाच्या म्हणण्याप्रमाणे तक्रारकर्त्याकडून आजपावेतो विरुध्दपक्षास पूर्ण मोबदला मिळालेला नाही. दिनांक 25.4.2012 रोजी नमूद लॉन जो विवाह स्वागत समारंभ आयोजीत केला होता, ज्यामध्ये 350 पाहुण्याकरीता प्रती प्लेट 195/- प्रमाणे ठरले होते. त्याचप्रमाणे 350 पाहुण्यां व्यतिरिक्त जर जास्त पाहुणे आले तर प्रती प्लेट रुपये 200/- ठरविण्यात आले होते. सदर समारंभामध्ये 143 पाहुणे जास्त वाढल्यामुळे विरुध्दपक्षास 143 प्लेट अतिरिक्त लावावी लागली. त्यामुळे, तक्रारकर्त्याने एकूण रुपये 28,600/- विरुध्दपक्षास जास्तीचे देणे भाग होते. तक्रारकर्त्याने सदर व्यवहाराबाबत रुपये 10,000/- अनामत रक्कम म्हणून विरुध्दपक्षास दिली होती. त्यामुळे, एकूण रक्कम रुपये 28,600/- मधून अनामत रक्कम रुपये 10,000/- वजा केल्यास तक्रारकर्त्याकडून उर्वरीत रक्कम रुपये 18,600/- विरुध्दपक्षास घेणे बाकी आहे. परंतु, आजपावेतो तक्रारकर्त्याने वरील उर्वरीत संपूर्ण रक्कम विरुध्दपक्षास दिलेली नाही त्याकरीता विरुध्दपक्षाने वारंवार दुरध्वनीव्दारे तसेच व्यक्तीगरित्या तक्रारकर्त्याचे घरी जावून विनंती केली, परंतु तक्रारकर्त्याने उलटपक्षी विरुध्दपक्षास धमकाविले की, जर पुन्हा तुम्ही माझेकडे पैसे मागण्याकरीता आले तर तुमच्याविरुध्द पोलीसांकडे किंवा जिल्हा ग्राहक मंचात तक्रार करण्यात येईल. वरील बाबीवरुन हे सिध्द होते की, तक्रारकर्त्याने फक्त विरुध्दपक्षाकडून पैसे उकडण्याकरीता विरुध्दपक्षास मानसिक छळ करीत आहे व तक्रारकर्त्याने मा. मंचासमक्ष बिनबुडाची खोटी तक्रार दाखल केली आहे, करीता त्याचेवर जबर नुकसान भरपाई लादावी व त्याची तक्रार खारीज करावी. त्याचप्रमाणे तक्रारकर्त्याने जाणून-बुजून 16 महिन्यानंतर मा. मंचासमक्ष ही तक्रार दाखल केली आहे. जर तक्रारकर्त्यास आमच्या तर्फे खरोखर ञास झाला असता तर तक्रारकर्त्याने लगेचच विरुध्दपक्षास कायदेशिर नोटीस पाठवून आमच्याविरुध्द तक्रार दाखल केली असती, यावरुन असे दिसून येते की विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्यास झालेल्या करारनाम्याप्रमाणे कुठल्याही प्रकारची गैरसोय केलेली नाही व तो कुठल्याही प्रकारच्या ञुटीस बाध्य नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार जास्तीत-जास्त खर्चासह खारीज करावी.
6. सदर प्रकरणात दोन्ही पक्षानी लेखी युक्तीवाद दाखल केला. तसेच दोन्ही पक्षाचे वकीलांचा मौखीक युक्तीवाद केला ऐकण्यात आला. दोन्ही पक्षानी अभिलेखावर दाखल केलेल्या दस्ताऐवजाचे अवलोकन करण्यात आले, त्याप्रमाणे खालील प्रमाणे मुद्दे व निष्कर्ष देण्यात येते.
मुद्दे : निष्कर्ष
1) तक्रारकर्त्याची तक्रार मंजूर होण्यास पाञ आहे काय ? : होय.
2) अंतिम आदेश काय ? : खालील प्रमाणे
// निष्कर्ष //
7. तक्रारकर्ता यांचा मुलगा नामे शञुघ्नसिंग डी.कुशवाह यांचा दिनांक 24.4.2012 ला विरुध्दपक्षाचे लॉनमध्ये विवाह स्वागत समारंभ झाला होता. विरुध्दपक्ष व तक्रारकर्ता यांचेमध्ये तोंडी करार होऊन 350 पाहण्यांकरीता रुपये 195/- प्रती प्लेट प्रमाणे ठरविले होते. तसेच, त्याचे दुलारीया लॉन यांचे डिनर मेनुवर हातानी लिहिल्याचे दिसून येते. तक्रारकर्ता तर्फे दाखल केलेल्या निशाणी क्र.3 वरील दस्त क्र.1 वर सदर कागदपञ जोडले आहे त्यावर विरुध्दपक्षाची सही सुध्दा आहे. तक्रारकर्त्याचे म्हणण्यानुसार निशाणी क्र.3 वरील दस्त क्र.2 वर रुपये 5000/- अग्रिम रक्कम रोख दिल्याचे दिसून येते, तसेच दस्त क्र.3 वर रुपये 29,000/- दिनांक 17.3.2012 चेक क्र.031101 युनियन बँकेचा व दस्त क्र.4 नुसार रुपये 39,000/- दिल्याचे दुलारीया लॉनच्या पावत्या आहेत. त्याचप्रमाणे सदर कागदपञावर रुपये 350/- लोकांपेक्षा जास्त लोक आल्यास प्रती प्लेट 200/- प्रमाणे चार्ज केले जाईल असे सदर कागदपञावर नमूद आहे. निशाणी क्र.3 वरील दस्त क्र.5 वर तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षास पाठविलेली नोटीस जोडलेली आहे, तसेच दस्त क्र.6 वर पोष्टाची पावती जोडली आहे. निशाणी क्र.8 वर विरुध्दपक्षाचा लेखी जबाब दाखल केला आहे, निशाणी क्र. 9 वर जोडलेल्या शपथपञाप्रमाणे विरुध्दपक्ष यांनी आयोजीत समारंभात जेवण व्यवस्थित पुरविण्याबाबत करार केल्याचे प्रथमतः नाकारली आहे, परंतु त्यांनी आपल्या उत्तरातील परिच्छेद क्रमांक 4 मध्ये ‘‘ त्याचे म्हणण्यानुसार गैरअर्जदाराने आपल्या कामामध्ये कुठल्याही प्रकारचे हेतुपुरस्परपणे दुर्लक्ष केलेले नाही. सदर स्वागत समारंभामध्ये तक्रारकर्त्याने जे काही पदार्थ निवडले होते ते संपुर्ण पदार्थ दिनांक 25.4.2012 रोजी जो स्वागत समारंभ झाला त्या समारंभामध्ये पुरविले होते, असे म्हटले आहे.’’ यावरुन तक्रारकर्ता व विरुध्दपक्ष यांचेमध्ये दिनांक 25.4.2012 रोजीच्या विवाह प्रित्यर्थ स्वागत समांरभ हेतु जेवण व्यवस्था पुरविण्याचा करार झाला होता, ही बाब आपोआप विरुध्दपक्षाचे उपरोक्त कथनावरुन सिध्द होते. त्यामुळे विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्त्यास आयोजीत स्वागत समारंभामध्ये जेवण पुरविण्याचा करार केला होता व त्याचप्रमाणे देवज पुरविण्याची जबाबदारी विरुध्दपक्ष यांची होती. परिणामतः तक्रारकर्त्याचे समारंभामध्ये झालेल्या व्यवस्थेला, गैरसोयीस विरुध्दपक्ष जबाबदार आहे. त्यामुळे तक्रारकर्त्यास आमंञित पाहण्या समोर अपमाणित व्हावे लागले, त्यामुळे नुकसान भरपाई देण्यास विरुध्दपक्ष जबाबदार आहे.
8. सदर प्रकरणात विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्त्याने आपल्या तक्रार अर्जासोबत जोडलेला दस्त क्र.1 व त्यावर नमूद असलेला मजकूर नाकारला नसल्याने ते विरुध्दपक्ष यांनीच तक्रारकर्त्याला आपल्या स्वाक्षरीने लिहून दिलेले आहे, ही बाब सुध्दा सिध्द होते. परिणामतः विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्त्यास आयोजीत समारंभामध्ये जेवण पुरविण्यास करार केला होता, जेवण देण्याची जबाबदारी स्विकारली व तसेच त्याबाबत रकमा सुध्दा स्विकारल्या या बाबी सुध्दा सिध्द होतात. सदर प्रकरणात विरुध्दपक्ष यांनी आपल्या उत्तरात आयोजीत समारंभामध्ये 143 पाहुणे जास्त वाढल्याचे नमूद केले असून त्याबाबत तक्रारकर्त्याकडून रुपये 28,600/- घेणे निघतात, तसेच त्यापैकी अग्रीम रक्कम रुपये 10,000/- वजा करता उरलेली रक्कम रुपये 18,600/- घेणे बाकी आहे असे नमूद केले आहे. परंतु, यासंबंधी विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्यास कोणत्याही प्रकारे लेखी स्वरुपात पञ किंवा कायदेशिर नोटीस दिल्याचे दिसून येत नाही. त्याचप्रमाणे तक्रारकर्त्याची दिनांक 19.7.2012 ची कायदेशिर नोटीस प्राप्त झाल्यानंतर देखील विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्यास त्याचेकडून कोणत्याही प्रकारची रक्कम घेणे बाकी असल्याचे नमूद केले नाही, यावरुन विरुध्दपक्षाने ही बाब उत्तरामध्ये खोटी नमूद केली असल्याचे सिध्द होते. तक्रारकर्त्याने सदर प्रकरणात आमंञित पाहुण्यापैकी काही पाहण्यांचे शपथपञ सोबत जोडले आहे. त्यापैकी, 1) चैनसिंग करनसिंग बैस, 2) अनिल दिनेशचंद्र गुप्ता, 3) नारायण बाबुराव खोब्रागडे, राह. बहादुरा फाटा, उमरेड रोड नागपूर, 4) प्रमोद उमशचंद्र दास, राह. कोयला खदान, ता.उमरेड, जि. नागपूर यांचे शपथपञ सोबत जोडले आहे. त्याचप्रमाणे, सदर प्रकरणात विरुध्दपक्ष यांनी आपल्या बचावाचे समर्थनार्थ समारंभात उपस्थित असेलेले काही लोकांचे शपथपञ दाखल केले असून त्यात सुनिल दिनेश गुप्ता व विजयकुमार राजाराम पाल यांचे शपथपञ दाखल केले आहे. यावरुन असे दिसून येते की, विवाह स्वागत समारंभाच्या व्यवस्थेमुळे काही लोक समाधानी तरी काही लोक असमाधानी असल्याचे दिसून येते.
9. तक्रारकर्त्याकडून विवाह स्वागत समारंभाचे अनुषंगाने रुपये 73,000/- रोख व धनादेशाव्दारे विरुध्दपक्षाकडे जमा केले होते. परंतु, विरुध्दपक्षाने स्वागत समारंभात दहीपापडी, स्प्राऊटेड, बिन, सुप, सलाद, सुपारी व मुख्य म्हणजे थंड पाणी पाहुण्यांना दिले नाही. त्याचप्रमाणे अर्ध्या पाहुण्यांना आईस्क्रीम व चमचम पुरविली नाही, त्यामुळे तक्रारकर्त्याचे कुटूंबियांचा आमंञित निमंञित पाहूण्यांची फार मोठ्या प्रमाणे गैरसोय झाली, यावरुन विरुध्दपक्षाने आपल्या सेवेत ञुटी केली आहे असे मंचाचे मत आहे.
सबब, खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येते.
// अंतिम आदेश //
(1) तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजुर करण्यात येते.
(2) विरुध्दपक्ष यांना आदेशीत करण्यात येते की, विरुध्दपक्ष यांच्या सेवेतील ञुटीमुळे तक्रारकर्त्यास नमूद परिस्थितीमध्ये झालेल्या आर्थिक, मानसिक, शारिरीक ञासापोटी रुपये 10,000/- तक्रारकर्त्यास द्यावे.
(3) तसेच विरुध्दपक्ष यांनी तक्रारीचा खर्च म्हणून रुपये 5000/- तक्रारकर्त्यास द्यावे.
(4) विरुध्दपक्ष यांनी आदेशाचे पालन आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून एक महिण्याचे आत करावे.
(5) उभय पक्षकारांना आदेशाची प्रत निःशुल्क पाठविण्यात यावी.
नागपूर.
दिनांक :- 22/11/2016