Final Order / Judgement | ::: नि का ल प ञ ::: (आयोगाचे निर्णयान्वये, सौ किर्ती वैद्य (गाडगीळ), मा. सदस्या,) (पारीत दिनांक १२/१०/२०२२) - प्रस्तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा, १९८६ चे कलम १४ सह १२ अन्वये दाखल केली असून तक्रारीचा थोडक्यात आशय खालिलप्रमाणे.
- विरुध्द पक्ष क्रमांक १, २ आणि स्वर्गीय डॉ. देवराव पांडुरंग जोगी यांनी विरुध्द पक्ष क्रमांक ४ श्री गुरुदेव इन्व्हेस्टमेंट सर्व्हीसेस या नावाने व्यवसाय सुरु केला. विरुध्द पक्ष क्रमांक ३ हे स्वर्गीय डॉ. जोगी यांचे वारसदार आहेत. तक्रारकर्त्याने दिनांक ५/१०/२०१२ रोजी रक्कम रुपये १,००,०००/-, ४८ महिण्यांकरिता विरुध्द पक्ष/श्री गुरुदेव इन्व्हेस्टमेंट सर्व्हीसेस मध्ये नगदी गुंतवणूक केली तसेच दिनांक ५/११/२०१२ रोजी रक्कम रुपये ५०,०००/-, ४८ महिण्यांकरिता, दिनांक २५/०४/२०१३ रोजी रक्कम रुपये ५०,०००/-, ४८ महिण्यांकरिता, दिनांक २५/०५/२०१३ रोजी रक्कम रुपये ७५,०००/-, ५४ महिण्यांकरिता, दिनांक ०८/०७/२०१३ रोजी रक्कम रुपये १,१०,०००/-, ६० महिण्यांकरिता, दिनांक ०१/१०/२०१३ रोजी रक्कम रुपये ७५,०००/-, ६६ महिण्यांकरिता असे एकूण रुपये ४,६०,०००/- (तक्रार मध्ये ४७००००/- दिले आहे.) वेळोवेळी विरुध्द पक्षाकडे भरणा केले असून त्याकरिता वेळोवेळी विरुध्द पक्ष क्रमांक २ ने तक्रारकर्त्याचे लाभात करार करुन दिलेला आहे.कराराप्रमाणे उपरोक्त दिलेल्या मुदतीत रक्कम दुप्पट करण्याची हमी दिली होती. परंतु तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्षांकडे मुदतीनंतर वेळोवेळी रकमेची मागणी केली असता त्यांनी टाळाटाळ केली. त्यामुळे तक्रारकर्त्याने अधिवक्ता मार्फत विरुध्द पक्ष क्रमांक १ ते ४ यांना रजिस्टर्ड पोस्टाव्दारे नोटीस पाठविले. नोटीस प्राप्त होऊनसुध्दा विरुध्द पक्षांनी नोटीसची पुर्तता केली नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याने आयोगासमक्ष तक्रार दाखल करुन त्यामध्ये अशी मागणी केली आहे की, विरुध्द पक्ष क्रमांक १ ते ४ यांनी करारनाम्यानुसार एकूण रक्कम रुपये ४,६०,०००/- तक्रारकर्त्यास परत देण्यात यावे तसेच त्या रकमेवर दिनांक ०५/१०/२०१२ पासून २५% द.सा.द.शे. व्याज आणि शारीरिक व मानसिक ञासाकरिता नुकसानभरपाई रक्कम व तक्रार खर्च देण्याचे आदेशित व्हावे अशी प्रार्थना केली आहे.
- तक्रार दाखल करुन विरुध्द पक्ष क्रमांक १ ते ४ यांना आयोगामार्फत नोटीस काढण्यात आले. नोटीस प्राप्त झाल्यावर विरुध्द पक्ष क्रमांक १ व २ हे आयोगासमोर हजर होऊन त्यांनी आपले लेखी उत्तर दाखल करुन त्यामध्ये असे नमूद केले की, विरुध्द पक्ष क्रमांक ३ हे स्वर्गीय डॉ. जोगी यांचे वारसदार आहे. व स्वर्गीय डॉ. जोगी यांनी विरुध्द पक्ष क्रमांक ४ चे नावाने व्यवसाय सुरु केला व त्यांचा खुन होऊन मृत्यु झाला. तसेच विरुध्द पक्ष क्रमांक १ हे अल्ट्राटेक सिमेंट, आवारपूर येथे कार्यरत आहे. हृया बाबी मान्य केल्या असून आपले विशेष कथनामध्ये नमूद केले आहे की, तक्रारकर्त्याची तक्रार मुदतबाहृ आहे. तक्रारकर्ता हा विरुध्द पक्ष क्रमांक १ व २ यांची ग्राहक नाही. तक्रारकर्त्याने यापूर्वीही स्वर्गीय डॉ. जोगी व विरुध्द पक्ष क्रमांक १ व २ यांना विनाकारण ञास दिलेला आहे परंतु कोणीही तक्रार करु नये म्हणून ही खोटी तक्रार दाखल केल्याचे दिसून येते. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष क्रमांक १ व २ यांना कधीही कोणतीही रक्कम स्वतः वा कोणामार्फत दिलेली नाही व विरुध्द पक्षांनी कोणतीही रक्कम गुंतवणूकीच्या दृष्टीने तक्रारकर्त्यास मागितलेली नव्हती. विरुध्द पक्ष क्रमांक १ व २ हे स्वर्गीय डॉ. जोगी यांचेकडे इतर नोकरांप्रमाणे पार्टटाईम नोकरी करायचे. स्वर्गीय डॉ. जोगी यांच्या व्यवसायाशी भागीदार म्हणून कोणताही संबंध नाही. तक्रारकर्ता व स्वर्गीय डॉ. जोगी यांचे प्रत्यक्ष व्यवहाराशी कोणतीही कल्पना विरुध्द पक्ष क्रमांक १ व २ यांना नाही. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष क्रमांक १ व २ विरुध्द तक्रार दाखल करण्यास कोणतेही कारण घडलेले नाही. तक्रारकर्त्याने खोट्या कथनाच्या आधारे तथ्यहीन व कपोलकल्पीत तक्रार विरुध्द पक्ष क्रमांक १ व २ यांचेविरुध्द त्यांना ञास देण्याकरिता विनाकारण दाखल केलेली असल्याने खर्चासह खारीज करण्यात यावी व विरुध्द पक्ष क्रमांक १ व २ यांना झालेल्या शारीरिक व मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई द्यावी ही विनंती करण्यात येत आहे.
- विरुध्द पक्ष क्रमांक ३ यांनी आपले लेखी उत्तरात नमूद केले आहे की, ती स्वर्गीय डॉ. जोगी यांची वारसदार आहे ही बाब मान्य करुन तक्रारकर्त्याचे तक्रारीतील उर्वरित कथन नाकबूल करुन पुढे नमूद केले की, तक्रारकर्ता हा विरुध्द पक्षांचा ग्राहक नाही तसेच विरुध्द पक्ष क्रमांक ३ चे वडील स्वर्गीय डॉ. जोगी यांचा तक्रारकर्त्यासोबत कोणताही व्यवहार झालेला नाही त्यामुळे स्वर्गीय डॉ. जोगी यांचे वारसदारावर कोणत्याही प्रकारची जबाबदारी नाही. तक्रारकर्त्याने स्वर्गीय डॉ. जोगी यांचे अन्य वारस सौ. वैशाली ढोके व सौ. धनश्री घाटे यांना प्रकरणात आवश्यक पक्ष म्हणून जोडलेले नाही. प्रस्तुत तक्रारीत बरेच वादग्रस्त मुद्दे आहेत व हा दिवाणी स्वरुपाचा वाद आहे. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष क्रमांक ३ यांना विनाकारण तक्रारीत पक्ष बनविले आहे. विरुध्द पक्ष क्रमांक ३ चे मयत वडील स्वर्गीय डॉ. जोगी यांचा कोणताही संबंध नाही. सबब वरील कारणास्तव तक्रारकर्त्याची तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी.
- तक्रारकर्ता व विरुध्द पक्षांचे परस्पर विरोधी कथनावरुन तक्रार निकाली काढण्याकरिता खालील कारणमीमांसा व त्यावरील निष्कर्ष कायम करण्यात आले.
कारणमीमांसा - तक्रारकर्ता व विरुध्द पक्ष क्रमांक ४ यांचेमध्ये एकूण रुपये ४,६०,०००/- गुंतविल्याबाबत एकूण ६ करार झाले. सदर सहा करार/मेमोरंडम ऑफ अंडरस्टॅण्डींग तक्रारकर्त्याने प्रकरणात दाखल केलेले आहेत. त्याचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की करारनाम्याप्रमाणे पार्टी क्रमांक २ म्हणजे तक्रारकर्ता व पार्टी क्रमांक १ म्हणजे विरुध्द पक्ष क्रमांक ४ आहे. तक्रारकर्त्याने पार्टी क्रमांक १ म्हणजे विरुध्द पक्ष क्रमांक ४ यांना कर्ज दिले व त्यांचेमध्ये झालेला व्यवहार हा कर्जासंबंधीचा आहे. यावरुन तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षांकडून कर्जाची रक्कम वसूल करण्याकरिता प्रस्तुत प्रकरण आयोगासमक्ष दाखल केलेली आहे हे स्पष्ट होते. तक्रारकर्ता व विरुध्द पक्षांचेमधील वाद ग्राहक संबंधीचा वाद नाही व तो वाद दिवाणी स्वरुपाचा असल्याने आयोगाला अशा वादावर निवाडा करण्याचे अधिकारक्षेञ नाही या निष्कर्षाप्रत आयोग आलेले आहे त्यामुळे तक्रारकर्त्याला योग्य त्या न्यायासनासमक्ष तक्रार दाखल करतांना त्याने दाखल केलेल्या तक्रारीच्या दिनांकापासून ते तक्रार निकाली काढेपर्यंतचा कालावधी वगळता तक्रारकर्त्यास योग्य त्या न्यायाधिकरणाकडे नवीन तक्रार दाखल करुन दाद मागण्याची मुभा देऊन प्रस्तुत तक्रार अधिकारक्षेञाअभावी निकाली काढण्यात येते. सबब आयोग खालिलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
अंतिम आदेश - आयोगासमक्ष तक्रार दाखल केलेला कालावधी वगळता योग्य न्यायाधिकरणाकडे दाद मागण्याची मुभा देण्यात येऊन तक्रारकर्त्याची तक्रार क्रमांक ९३/२०१६ खारीज करण्यात येते.
- उभयपक्षांनी तक्रारीचा खर्च स्वतः सहन करावा.
- उभयपक्षांना आदेशाच्या प्रती विनामुल्य देण्यात यावे.
| |