निकाल (घोषित द्वारा – श्री डी.एस.देशमुख, अध्यक्ष) गैरअर्जदार केसरी टुर्स यांच्या सेवेत त्रुटी असल्याच्या आरोपावरुन ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. थोडक्यात तक्रारदारांची तक्रार अशी आहे की, त्यांनी 2010 च्या उन्हाळी सुट्टीमध्ये गैरअर्जदार केसरी टुर्स यांच्यामार्फत 7 दिवस व 6 रात्रीसाठी स्विर्त्झलंडची सहल करण्याचे ठरविले. त्यासाठी त्यांनी गेरअर्जदार क्र 1 यांच्याकडे संपर्क साधला असता त्यांनी प्रवासासाठीचा व्हिसा काढण्याची जबाबदारी त्यांचेवरच (म्हणजे टूर्स कंपनीची) राहील असे सांगितले. त्यानंतर गैरअर्जदारांनी तक्रारदारांना प्रवासासाठीची रक्कम रु 3,26,794/- भरण्यास सांगितले. त्यानुसार त्यांनी गैरअर्जदारांकडे रक्कम जमा केली. त्यानंतर गैरअर्जदारांनी तक्रारदारांना त्यांचे विमान दिनांक 23/5/2010 रोजी पहाटे 5.30 वाजता असल्यामुळे दिनांक 22/5/2010 रोजीच मुंबईला पोहचावे असे सांगितले. त्यानुसार दिनांक 22/5/2010 रोजी ते मुंबईला पोहचले. त्यावेळी गैरअर्जदार क्र 1 च्या वतीने तक्रारदार क्र 1 व 2 यांचा व्हिसा स्विर्त्झलंड वकीलातीने नाकारल्याचा निरोप दिला. वास्तवकि व्हिसा काढण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याची जबाबदारी गैरअर्जदारांचेच होती. व्हिसा काढण्यासाठीचे सर्व कागदपत्र गैरअर्जदारांनी संबंधित वकीलातीकडे जमा करणे आवश्यक होते. परंतु गैरअर्जदारांनी तक्रारदार क्र 1व 2 चा व्हिसा काढून घेण्याबाबत निष्काळजीपणा केला. तक्रारदारांचा स्विर्त्झलंडची सहल दिनांक 23/5/2010 रोजी सुरु होणार होती परंतु गैरअर्जदारांनी स्विर्त्झलंड वकिलातीने तक्रारदार क 1 व 2 चा व्हिसा नाकारल्याची बाब दिनांक 22/5/2010 रोजी तक्रारदार मुंबईला गेल्यावर सांगितली. वास्तविक व्हिसा नाकारल्याची बाब गैरअर्जदारांना दिनांक 20/5/2010 रोजीच कळाली होती. तक्रारदार क 1 व 2 यांचाव्हिसा नाकारण्यात आल्यामुळे सर्व तक्रारदारांनी त्यांची सहल रद्द केली. गैरअर्जदारांच्या निष्काळजीपणामुळेच सहल रद्द करावी लागल्यामुळे तक्रारदारांनी गैरअर्जदारांकडे प्रवासाची रक्कम परत मागितली असता गैरअर्जदारांनी तक्रारदार क्र 1 च्या नावाने रु 1,04,491/- चा व तक्रारदारक्र 4 च्या नावाने रु 1,01,491/- चा धनादेश दिला परंतु उर्वरित रक्कम रु 1,23,812/- वारंवार मागणी करुनही परत दिली नाही. म्हणून तक्रारदारांनी अशी मागणी केली आहे की, तयांना गेरअर्जदारांकडून रक्कम रु 1,23,812/- तसेच प्रवास खर्चाची रक्कम रु 19,600/- आणि हॉटेलचा खर्च रु 6,000/- देण्यात यावेत. गैरअर्जदार क 1 व 2 यांचा मंचातर्फे पाठविलेली नोटीस मिळूनही ते गैरहजर असल्यामुळे त्यांच्या विरुध्द ही तक्रार एकतर्फी चालविण्यात आली. तक्रारदाराच्या कैफियतीवरुन खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे उत्तर 1. गैरअर्जदारांच्या सेवेत त्रुटी आहे काय होय. 2. आदेश काय अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मुद्दा क्र 1 :- तक्रारदारांच्या वतीने अड ए.एम.मामीडवार यांनी युक्तिवाद केला. गैरअर्जदार हजर नाहीत. तक्रारदारांनी गैरअर्जदार क्र 2 केसरी टूर्स यांच्या मार्फत स्विर्त्झलँडच्या सहलीसाठी गैरअर्जदार क्र 1 श्री व्यंकटेश टुर्स व ट्रॅव्हल्स यांच्याकडे नोंदणी केली होती व त्यासाठी तक्रारदारांनी गैरअर्जदारांकडे एकूण रु 2,63,794/- भरल्याचे पावती नि. 4 ते 11 वरुन दिसून येते. अशा प्रकारे तक्रारदारांनी सहलीसाठी आवश्यक असलेली रक्कम भरल्यानंतर गैरअर्जदार केसरी टुर्स यांनी तक्रारदारांना त्यांचा प्रवास मुंबईवरुन दि 23/5/2010 रोजी सुरु होणार असल्याबाबत ई-मेल नि.16 द्वारे कळविले होते. तसेच दि 15/5/2010 रोजी केसरी टुर्स यांनी तक्रारदारांना नि.17 ते 20 द्वारे संपूर्ण प्रवासाचा तपशिल कळविला होता. गैरअर्जदार केसरी टुर्स यांनी तक्रारदारांना नि 20 द्वारे जी माहिती दिलेली होती त्यामध्ये केसरी टुर्स यांनी तक्रारदारांना असे कळविले होते की, सहलीची नोंदणी केल्यानंतर व्हिसा काढण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबीची पूर्तता त्यांच्या वतीने करण्यात येईल. यावरुन तक्रारदारांचा व्हिसा काढण्याची जबाबदारी गैरअर्जदार केसरी टुर्स यांनी स्विकारल्याचे दिसुन येते. तक्रारदारांचा प्रवास दि 23/5/2010 रोजी मुंबईवरुन सुरु होणार असल्यामुळे गैरअर्जदार केसरी टुर्स यांनी तक्रारदारांना विमानतळावर तीन तास आगोदरच पोचण्याबाबत सुचना दिलेली होती. त्यानुसार तक्रारदार दि 22/5/2010 रोजी म्हणजे प्रवासाच्या एक दिवस आगोदरच मुंबईला पोचले. परंतु मुंबईला पोचल्यानंतर तक्रारदारांना गैरअर्जदार केसरी टुर्स यांचे प्रतिनिधी गैरअर्जदार क्र 1 व्यंकटेश टुर्स अन्ड ट्रॅव्हल्स यांच्याकडून तक्रारदार क्र 1 व 2 यांचा व्हिसा स्विर्त्झलँड वकीलातीने नाकारल्याचा निरोप देण्यात आला. त्याबाबत स्विर्त्झलँड वकीलातीने कळविलेल्या निर्णयाची प्रत गैरअर्जदार केसरी टुर्स प्रा.लि., यांनी तक्रारदारांना दि 22/5/2010 रोजी सायंकाळी 6 वाजता दिले. सदर बाब नि. 12 वरुन दिसुन येते. स्विर्त्झलँड वकीलातीने तक्रारदार क्र 1 व 2 यांचा व्हिसा नाकारल्याबाबत जो निर्णय कळविला त्याची प्रत नि. 13 वर आहे. त्यांनी तक्रारदाराचा व्हिसा नाकारल्याबाबत असे कारण दिले की, तक्रारदारानी प्रवासादरम्यान निर्वाहासाठी त्यांच्याकडे पुरेशी रक्कम असल्याबाबत पुरावा दिलेला नाही. तक्रारदाराचा व्हिसा संबंधित वकीलातीकडून तयार करुन घेण्याची जबाबदारी गैरअर्जदार क्र 2 केसरी टुर्स यांनी स्विकारलेली होती त्यामुळे तक्रारदारांकडे प्रवासादरम्यान निर्वाहासाठी पुरेशी रक्कम आहे किंवा नाही याबाबत संबंधित वकीलातीचे समाधान करण्याची जबाबदारी केसरी टुर्स यांचीच होती. निदान केसरी टुर्स यांनी व्हिसा काढून घेण्यासाठी आवश्यक असलेल्या बाबी तक्रारदाराला कळविणे आवश्यक होते व त्यामुळे तक्रारदाराना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करता आली असती परंतु गैरअर्जदार केसरी टुर्स यांनी प्रवासाच्या आदल्या दिवशीपर्यंत तक्रारदारांचा व्हिसा मिळालेला आहे किंवा नाही याबाबत तक्रारदरांना कोणतीही कल्पना दिली नाही आणि ऐनवेळी तक्रारदारांना त्यांचा व्हिसा नाकारण्यात आल्याची बाब कळविली व त्यामुळे तक्रारदार क्र 1 व 2 यांना त्यांची सहल रद्द करावी लागली . तक्रारदार क्र 1 ते 4 हया सर्वांनी सहलीची एकत्रच नोंदणी केलेली होती आणि त्यांना एकत्र प्रवास करायचा होता त्यामुळे तक्रारदार क्र 1 व 2 यांची सहल व्हिसा नसल्यामुळे रद्द झाल्यानंतर तक्रारदार क्र 3 व 4 यांना देखील त्यांची सहल रद्द करावी लागली. तक्रारदारांची सहल गैरअर्जदार केसरी टुर्स यांनी तक्रारदार क्र 1 व 2यांच्या व्हिसा मिळणे बाबत योग्य काळजी न घेतल्यामुळेच रद्द झालेली आहे. तक्रारदारांची सहल रद्द झाल्यानंतर गैरअर्जदारांनी तक्रारदारांना एकूण रु 2,02,982/- परत दिले. परंतु तक्रारदारांनी भरलेली संपूर्ण रक्कम गैरअर्जदारांनी परत केली नाही त्याबाबत गैरअर्जदारांनी कोणताही खुलासा केला नाही. तक्रारदारांचा व्हिसा संबंधित वकीलातीकडून तयार करुन घेण्याची जबाबदारी गैरअर्जदार केसरी टुर्स यांचीचे होती परंतु केसरी टुर्स यांच्या निष्काळजीपणामुळे तक्रारदारांचा व्हिसा प्रवासाच्या आदल्या दिवशी नाकारण्यात आला व त्यामुळे तक्रारदारांना त्यांची सहल रद्द करावी लागली ही बाब गैरअर्जदार क्र 1 व 2 यांच्या सेवेतील त्रुटीच आहे. म्हणुन मुद्दा क्र 1 चे उत्तर वरीलप्रमाणे देण्यात आले. तक्रारदारांनी गैरअर्जदारांकडे रु 3,26,794/- भरले होते आणि त्यापैकी गैरअर्जदारांनी तक्रारदार क्र 1 व 2 यांना रु 1,01,491/- आणि तेवढीच रक्कम तक्रारदार क्र 3 व 4 यांना परत केली असे तक्रारदाराचे म्हणणे आहे. तक्रारदारांनी गैरअर्जदारांकडे रक्कम भरल्याबाबत दाखल केलेल्या पावत्या पाहता तक्रारदारांनी गैरअर्जदारांकडे प्रवासाची पूर्ण रक्कम भरल्याचे दिसून येते आणि तक्रारदारांना गैरअर्जदारांच्या निष्काळजीपणामुळे सहल रद्द करावी लागलेली असल्यामुळे गैरअर्जदारांनी तक्रारदारांन संपूर्ण प्रवास भाडे परत करणे आवश्यक ठरते. परंतु गैरअर्जदारांनी तक्रारदारांना केवळ रु 2,02,982/- परत केलेले आहेत. तक्रारदार गैरअर्जदारांकडून उर्वरीत रक्कम मिळण्यास पात्र आहेत. म्हणून खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो. आदेश 1. तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते. 2. गैरअर्जदार क्र 1 व 2 यांनी संयुक्तपणे आणि स्वतंत्रपणे तक्रारदारांना रक्कम रु 1,23,812/- दि.23/5/2010 पासून पुर्ण रक्कम देईपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के व्याजदराने निकाल कळाल्यापासुन एक महिन्याच्या आत द्यावेत. 3. गैरअर्जदार क्र 1 व 2 यांनी संयुक्तपणे आणि स्वतंत्रपणे तक्रारदारांना त्रुटीच्या सेवेबद्दल रु 5,000/- आणि मानसिक व शारीरिक त्रासापोटी रु 3,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु 1,000/- निकाल कळाल्यापासून एक महिन्याच्या आत द्यावेत. 4. संबंधितांना आदेश कळविण्यात यावा. (श्रीमती ज्योती पत्की) (श्रीमती रेखा कापडिया) (श्री डी.एस. देशमुख) सदस्य सदस्य अध्यक्ष UNK
| [ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Shri.D.S.Deshmukh] PRESIDENT[ Smt.Jyoti H.Patki] MEMBER | |