(घोषित द्वारा श्रीमती अंजली देशमुख, अध्यक्ष ) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार खालीलप्रमाणे आहे. तक्रारदारानी गैरअर्जदार क्रमांक 2 यांच्या अर्थसहाय्याने गैरअर्जदार क्रमांक 1 यांच्याकडून अपे ट्रक दिनांक 27/10/2008 रोजी खरेदी केला. दिनांक 1/1/2009 रोजी तो त्यांच्या ताब्यात आला. सदरील ट्रक हा दिनांक 13/5/2009 रोजी तक्रारदार वाहतुकीचे भाडे घेऊन जात असताना अचानक बंद पडला. गाडीला टोचन करुन गैरअर्जदारांच्या वर्कशॉपमध्ये दुरुस्तीसाठी सदरील अपे ट्रक नेण्यात आला. गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी सर्व्हिसींग खर्च म्हणून रु 2,332/- तक्रारदाराकडून दुरुस्तीसाठी घेतले. दिनांक 11/6/2009 रोजी अपे ट्रक पुन्हा बंद पडला व यावेळेस सुध्दा गैरअर्जदारानी आवश्यक ते पार्ट्स टाकण्यासाठी म्हणून रु 336/- तक्रारदाराकडून घेतले. सदरील अपे ट्रक हा नेहमी बंद पडतो, त्याचे क्लच तुटते, मशिनमध्ये बिघाड होते, गिअर आडकतो, गिअर वेळेवर पडत नाही असे नेहमीच प्रकार होत आहेत त्यामुळे ट्रकच्या चालकाच्या जिवास धोका निर्माण होईल असे तक्रारदारास वाटते म्हणून त्यांच्याकडे ट्रक चालविण्यासाठी कोणीही चालक काम करीत नाही व या सर्वामुळे त्यांना आर्थिक नुकसान होत आहे. तक्रारदार हे वयोवृध्द असल्यामुळे मानसिक त्रासामुळे कुठलाही आजार होण्याची शक्यता आहे. सदरील वाहन हे जुने व खराब स्थितीत असल्यामुळे व नेहमी नेहमी बंद पडत असल्यामुळे त्यांना या गाडीपासून कुठहेच आर्थिक उत्पन्न मिळत नाही. ही गाडी त्यांनी गैरअर्जदार क्रमांक 2 यांच्या अर्थसहाय्याने घेतले होती व त्यांचे हप्ते भरण्यास ते असमर्थ आहेत. तक्रारदार पुढे असे म्हणतात की, जोपर्यंत गैरअर्जदार क्रमांक 1 दुसरी गाडी बदलून देत नाहीत तोपर्यंत ते हप्ते भरण्यास तयार नाही म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार गैरअर्जदारांकडून डाऊन पेमेंटची रक्कम रु 68,800/- परत मागतात, हप्त्यापोटी भरलेली रक्कम रु 71,950/ व्याजासह परत मागतात, मानसिक त्रास, आर्थिक त्रास, गाडी दुरुस्तीसाठी ने आण करण्याचा खर्च व इतर खर्च रु 30,000/- मागतात. तसेच गैरअर्जदारांनी खराब स्थितीतील गाडी दिल्यामुळे गैरअर्जदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी अशी मागणी करतात. तक्रारदाराने शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली आहेत. गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी त्यांचा लेखी जवाब दाखल केला. त्यांच्या म्हणण्यानुसार तक्रारदाराने अपे ट्रकच्या उत्पादकास पक्षकार केले नाही. मिस जॉंईंडर ऑफ नेसेसरी पार्टी म्हणून तक्रारदाराची तक्रार नामंजूर करावी अशी मागणी ते करतात. तक्रारदाराने ट्रक खरेदी करताना पूर्णपणे पाहून तसेच खात्री करुनच खरेदी केला होता. तक्रारदारानी त्यांच्याकडून दिनांक 27/10/2008 रोजी ट्रक घेऊन गेले . फायनान्स कंपनीने अर्जदाराची फाईल मंजूर करण्यास ऊशिर केल्यामुळे आरटीओ कार्यालयाकडून पासींग होण्यास ऊशिर झाला असावा. गैरअर्जदाराचे काम फक्त वाहनाची विक्री करणे, विक्री नंतर सेवा देणे एवढेच आहे. गैरअर्जदार हे कंपनीचे वितरक म्हणून काम पाहतात. वाहनात कांही दोष आढळल्यास त्याची दुरुस्ती करण्यापर्यत त्यांची जबाबदारी असते. तक्रारदारानी फायनान्स कंपनीकडून अर्थसहाय्य घेतले असून त्याच्याशी त्यांचा कांहीही संबंध नाही. गाडीच्या परिस्थितीला ते जबाबदार नाहीत. तक्रारदारानी त्यांच्या ताब्यातील वाहन कसे हाताळावे व त्याची काळजी घेणे हे तक्रारदारावर अवलंबून आहे. तक्रारदाराने वाहनाचा चालक हा प्रशिक्षीत व सर्व माहिती असलेला ठेवणे हे तक्रारदाराची काम आहे. गाडी बदलून देण्याची जबाबदार गैरअर्जदारावर नाही. वरील कारणामुळे तक्रारदाराची तक्रर खर्चासहीत नामंजूर करावी अशी मागणी ते करतात. गैरअर्जदारानी शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली आहेत. गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी त्यांचा लेखी जवाब मंचात दाखल केला. तक्रारदारानी त्यांना नुकसान झाल्याचा कुठलाही पुरावा मंचात दाखल केला नाही. तक्रारदारानी विनंती केल्यानुसार त्यास रु 2,15,000/- चे अपे ट्रक घेण्यासाठी अर्थसहाय्यक केले आहे. ट्रकची किंमत रु 2,42,999/- पैकी रु 2,15,000/- दिले होते तक्रारदारानी रु 27,999/- मार्जीन मनी म्हणून भरले. तक्रारदार व गैरअर्जदार यांच्यामध्ये लोन कम हायपोथीकेशन अग्रीमेंट करण्यात आले. 48 महिन्याच्या हप्त्यांपोटी ईएमआय रु 6550/- ठरला होता. दिनांक 12/2/2009 ते 10/12/2012 पर्यंत हप्ते भरण्याचा कालावधी ठरला होता. तक्रारदार हे अनियमीतपणे हप्ते भरत होते. अनेक वेळा नोटीस काढून, स्मरणपत्र देऊनही तक्रारदार हप्ते भरत नव्हते. त्यानंतर तक्रारदारानीच त्यांची गाडी स्वत:हून त्यांच्याकडे आणून ठेवली. दिनांक 12/3/2010 रोजी गैरअर्जदाराने पोस्ट रिपजेशन कम सेल नोटीस तक्रारदारास पाठविली आणि थकबाकीची रक्कम रु 1,78,174/- 7 दिवसात भरावेत अशी नोटीस पाठविली. ही रक्कम भरण्याऐवजी तक्रारदारानी गैरअर्जदारांच्या विरुध्द मंचात सदरील तक्रार दाखल केली आहे. वरील कारणावरुन तक्रारदाराची तक्रार नामंजूर करावी अशी मागणी ते करतात. गैरअर्जदारानी त्यांच्या लेखी जवाबात अनेक वरिष्ठ न्यायालयांचे निवाडे नमूद केले आहेत तसेच शपथपत्र दाखल केले आहे. दोन्हीही पक्षकारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार त्यांनी खरेदी केलेला अपे ट्रक खरेदीपासून चार महिन्यातच नादुरुस्त झाला. गैरअर्जदारांकडून पार्टस टाकून तो अनेकवेळा दुरुस्त करुन घेतला. गैरअर्जदारांनी पार्टसची रक्कमही घेतली. अपे ट्रक सारखा नादुरुस्त असल्यामुळे कर्जाचे हप्ते ते भरु शकत नाहीत असे तक्रारदाराने त्यांच्या तक्ररीतील परिच्छेद क्रमांक 16 मध्ये नमूद केले आहे. तसेच गैरअर्जदार क्रमांक 1 जोपर्यंत गाडी बदलून देत नाहीत तोपर्यंत ते कर्जाचे हप्ते भरणार नाहीत असेही नमूद केले आहे. तक्रारदाराच्या गाडीमध्ये उत्पादकीय दोष आहेत हे तक्रारदाराने तज्ञाच्या पुराव्यासहीत किंवा अधिकृत सर्व्हिसींग सेंटरच्या कागदपत्रावरुन सिध्द केलेले नाही. केवळ गाडी नादुरुस्त आहे व ती बदलून द्यावी अशी मागणी करणे योग्य ठरणार नाही. तक्रारदारानी त्यांची तक्रार पुराव्यासहीत सिध्द केलेली नाही म्हणून मंच तक्रारदाराची तक्रार नामंजूर करीत आहे. वरील विवेचनावरुन व कागदपत्रावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे. आदेश तक्रारदाराची तक्रार नामंजूर करण्यात येत आहे. (श्रीमती ज्योती पत्की) (श्रीमती रेखा कापडिया) (श्रीमती अंजली देशमुख) सदस्य सदस्य अध्यक्ष
| [ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Smt. Anjali L. Deshmukh] PRESIDENT[ Smt.Jyoti H.Patki] MEMBER | |