जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच बीड यांचे
तक्रार क्रमांक – 149/2010 तक्रार दाखल तारीख –06/10/2010
गोरखनाथ पि. रामचंद्र चौधरी
वय 49 वर्षे धंदा नौकरी .तक्रारदार
रा.आपेगांव ता.अंबड जि.जालना.
विरुध्द
1. श्री.वैद्य चालक व मालक
लव्हली मोबाईल शॉपी, जगताप प्लाझा समोर,
सुभाष रोड,बीड ता.जि.बीड
(ओम मोबाईल गॅलरी सारडा संकूल दुकान नं.युजी-5)
डीपी रोड, बीड)
2. सर्व्हीस सेंटर,नोकिया केअर सेंटर
द्वारकादास मंत्री बँकेजवळ, जालना रोड, बीड .सामनेवाला 3. दि केअर मॅनेजर/प्रॉडक्टींग मार्केटींग मॅनेजर
नोकीया इंडीया प्रा.लि.
5,एफ टावर ए/बी सायबर ग्राम, डी.एल.एफ.
सायबर सीटी, सेक्टर 25 ए, गुरगांव
गुरगांव (हरियाना राज्य) 122 002
को र म - पी.बी.भट, अध्यक्ष
अजय भोसरेकर, सदस्य.
तक्रारदारातर्फे :- स्वतः
सामनेवाला 1 ते 3 तर्फे :- कोणीही हजर नाही.
निकालपत्र
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदारांनी संपर्कासाठी सामनेवाला क्र.1 ओम गॅलरी येथून पावती नंबर 591 दि.25.10.2009 रोजी रक्कम रु.2100/-रोख देऊन नोकिया भ्रमणध्वनी संच नंबर 5030 खरेदी केले. ज्यांचा निर्मीती सांकेताक क्र.358008070215944 विजेरी क्रमांक 0670400363563 क्यू, 346123808198 आणि ऊर्जा वाहक क्र.4810719386030806994-0675605 आहे. त्यासोबत सामनेवाला क्र.1 माहीती पुस्तक देखील दिली.
सदर पावतीवर भ्रमणध्वनी बदलून दूरुस्त करुन देण्याची एक वर्षाची हमी व खात्री सामनेवाला क्र.1 यांनी दिलेली आहे.
ओम मोबाईल गॅलरी व लव्हली मोबाईल शॉपी हया दोन्ही दूकानाचे मालक चालक सामनेवाला क्र.1 असून त्यांनी अंदाजे चार महिन्यापूर्वी ओम मोबाईल गॅलरी दूकान बंद करुन लव्हली मोबाईल शॉपी नांवाने नवीन दूकान सूरु केले.
सामनेवाला क्र.3 हे नोकिया संचाचे उत्पादक आहे. सामनेवाला क्र.2 हे सामनेवाला क्र.3 चे अधिकृत सेवा देणारे व दूरुस्ती करणारे आहेत. सामनेवाला क्र.1 हे सामनेवाला क्र.3 चे अधिकृत विक्रेते आहेत.
नोकिया संच दि.01.07.2010 पर्यत व्यवस्थित चालू होते. भ्रमणध्वनी संच कंपन अवस्थेत गेला होता. दि.2.7.2010 रोजी तक्रारदार सामनेवाला क्र.1 कडे जाऊन भ्रमणध्वनी चालू करुन, दूरुस्त करुन देण्याची विनंती केली असता सामनेवाला क्र.1 यांनी सामनेवाला क्र.2 नोकिया कंपनीचे अधिकृत दूरुस्त केंद्रावर पाठविले. सामनेवाला क्र.2 यांनी भ्रमणध्वनी संच तपासून रक्कम रु.850/- दूरुस्तीचा खर्च मागितला. भ्रमणध्वनी संचाचे हमी व खात्रीचे कालावधीत विनामुल्य दूरुस्तीची विनंती सामनेवाला क्र.2 यांनी फेटाळली.
त्यानंतर तक्रारदार स्वतः सामनेवाला क्र.1 व 2 यांचेकडे दि.6.7.2010 रोजी, दि.9.7.2010, 27.7.2010, 30.07,2010 रोजी प्रत्यक्ष भेटून दूरुस्तीसाठी आग्रह करीत होते परंतु सामनेवाला क्र.2 यांनी दूरुस्तीचा खर्च रक्कम रु.950/- ची मागणी केली आणि संच येथे दूरुस्त होत नाही कंपनीकडे पाठवावा लागेल असे सांगून दूरुस्ती करुन देण्यास टाळाटाळ केली. अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब करुन तक्रारदाराना दयावयाचे सेवेत कसूर केला.
तक्रारदाराने सामनेवाला क्र.1 व 2 यांना दि.2.8.2010 रोजी नोंदणीकृत डाकेने नोटीस पाठवून भ्रमणध्वनी दूरुस्त करुन अथवा नवीन भ्रमणध्वनी संच देण्याविषयी पाठविले. नोटीस सामनेवाला क्र.1 व 2 यांना दि.04.08.2010 रोजी मिळाली. त्यांनी अद्यापपर्यत दूरुस्त करुन दिले नाही. संच बदलून दिले नाही. संच बंद झाल्याने तक्रारदारांना अप्तेइष्ट नातेवाईक अधिकारी/कर्मचारी यांचेशी संपर्क करणे कठीण झाले. भ्रमणध्वनी संचातील असलेल्या सुविधेपासून उदा.बीड आकाशवाणी, बॅटरी विजेरी वंचित रहावे लागले. सदर कालावधीपासून गैरसोय झाली.
ओम मोबाईल गॅलरी व पावतीवर फक्त मोबाईल गॅलरी तसेच पूर्वीचे दूकान बंद करुन तेथे कोणतीही सुचना न लिहीता दूस-या जागेत लव्हली मोबाईल शॉपी हे दूकान उघडून मक्तेदारी व निबंधक व्यापारी प्रथा अधिनियम 1969 च्या कलम 36 (क) प्रमाणे अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केला आहे. त्यामुळे तक्रारदारांना शारीरिक, आर्थिक मानसिक त्रास झाला. सामनेवाला क्र. 1 ते 3 कडून भ्रमणध्वनी संच विनामुल्य चांगल्या प्रकारे दूरुस्त करुन अथवा बदलून नवीन संच किंवा भ्रमणध्वनीची किंमत रु.2100/-, संचात बिघाड झाल्यापासून द.सा.द.शे. 18 टक्के व्याजासळ रक्कम वसुल होऊन मिळावी. दिलेल्या मानसिक शारीरिक त्रासापोटी रक्कम रु.5,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु.2000/- वसूल करुन देण्यात यावेत.
विनंती की, सामनेवाला क्र.1 ते 3 यांचेकडे संयुक्तपणे अथवा विभक्तपणे नवीन भ्रमणध्वनी संच चांगल्या प्रकारे विनामुल्य दूरुस्त करुन अथवा भ्रमणध्वनी किंमत रु.2100/- द.सा.द.शे.18 टक्के व्याजासह वसूल होऊन मिळावेत, मानसिक त्रासापोटी रु.5,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु.2,000/- वसूल होऊन मिळावेत.
सामनेवाला क्र.1 यांनी दि.3.11.2010 रोजी नोटीस स्विकारली, सामनेवाला क्र.2 यांनी नोटीस घेण्यास इन्कार दिला, सामनेवाला क्र.3 यांनी नोटीस घेऊन ते जिल्हा मंचात हजर झाले नाही.
सामनेवाला क्र.1 ते 3 यांनी ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदीनुसार मूदतीत सदर तक्रारीला आव्हान दिले नाही व हजरही झाले नाही म्हणून त्यांचे विरुध्द सामनेवाला क्र.1 विरुध्द दि.18.10.2010 रोजी सामनेवाला क्र.2 विरुध्द दि.12.11.2010 रोजी व सामनेवाला क्र.3 विरुध्द दि.0.5.12.2011 रोजी एकतर्फा तक्रार चालविण्याचा निणर्य जिल्हा मंचाने घेतला.
तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, तक्रारदाराचे शपथपत्र यांचे सखोल वाचन केले.
तक्रारीतील सर्व कागदपत्रे पाहता तक्रारदारांनी ओम मोबाईल गॅलरी यांचे दूकानातून पावती नंबर 591 दि.25.10.2009 रोजी रक्कम रु.2100/- देऊन नोकिया भ्रमनध्वनी संच नंबर 5030 सामनेवाला क्र.3 यांनी उत्पादित केलेला खरेदी केला. त्या बाबत मोबाईल गॅलरीचे बिल दाखल केलेले आहे. यावरुन तक्रारदारांनी सदरचा भ्रमनध्वनी विकत घेतल्याची बाब स्पष्ट होते. दि.1.7.2010 रोजी पर्यत भ्रमनध्वनी व्यवस्थीत चालला. सदर दिनांकाला भ्रमनध्वनीच्या संचाच्या घटीचा आवाज बंद झाला. विजेरी चालू होती. भ्रमनध्वनी संच कंपन अवस्थेत गेला म्हणून तक्रारदारांनी सामनेवाला क्र.1 कडे दि.2.7.2010 रोजी जाऊन संच दूरुस्त करुन देण्याची विनंती केली. सामनेवाला क्र.1 यांनी सामनेवाला क्र.2 कडे अधिकृत दूरुस्ती केंद्रावर पाठविले. सदर दूरुस्ती केंद्रावर संच तपासून रक्कम रु.850/- दूरुस्तीचा खर्च सांगितला. संच हमी व खात्रीचे कालावधीत विनामुल्य दूरुस्तीची मागणी तक्रारदारांनी केली. तीसामनेवाला क्र.2 ने फेटाळली. त्यानंतर ब-याच दिनांकांना तक्रारदार सामनेवाला क्र.1 व 2 कडे गेलेले आहेत परंतु त्यांनी संच दूरुस्त करुन दिलेला नाही.
सामनेवाला क्र.1 यांनी मोबाईल गॅलरी या नांवाचे बिल दिले त्यावेळी त्यांचे दूकानाचे नांव ओम मोबाईल गॅलरी असे होते व सदरचे दूकान बंद करुन त्यांनी दूस-या जागेत सध्या लव्हली मोबाईल शॉपी हे दूकान चालू केलेले आहे.
तक्रारदाराच्या या वरील विधानाला सामनेवाला क्र. 1 ते 3 यांनी कूठलाही आक्षेप घेतला नाही, आवाहन दिलेले नाही. त्यामुळे तक्रारदाराची विधाने ग्राहय धरण्यापलिकडे दूसरा पर्याय नाही. सामनेवाला क्र.3 यांनी उत्पादित केलेला भ्रमनध्वनी संच तक्रारदारांनी विकत घेतला आहे व सामनेवाला क्र.3 याचे अधिकृत दूरुस्ती सेंटर सामनेवाला क्र.2 आहे.त्यामुळे सामनेवाला क्र. 2 व 3 यांनी तक्रारदाराचा भ्रमनध्वनी संच नंबर 5030 चे तक्रारीत नमुद दोष करुन देण्याची जबाबदारी होती. परंतु ती त्यांनी योग्यरित्या पार पाडल्याचे दिसत नाही.त्यामुळे सामनेवाला क्र. 2 व 3 यांनी तक्रारदारांना दयावयाचे सेवेत कसूर केल्याची बाब स्पष्ट होते. म्हणून सामनेवाला क्र. 2 व 3 यांनी तक्रारदारांचा भ्रमनध्वनी संचातील तक्रारीत नमुद दोष विनामोबदला दूर करणे उचित होईल असे न्यायमंचाचे मत आहे.
सेवेत कसूरीचा बाब स्पष्ट झाल्याने निश्तितच आधूनिक काळात भ्रमनध्वनी पासून तक्रारदार राहू शकत नाही. संपर्कासाठी ते अत्यंत उपयोगी साधन आहे. सदर साधनापासून तक्रारदारांना वंचित व्हावे लागले. तक्रारदाराने ज्या उददेशाने सदरचा संच विकत घेतला तो तक्रारदारांचा उददेश सफल झाला नाही. म्हणून निश्चितच तक्रारदारांना मानसिक त्रास झालेला आहे त्यामुळे सामनेवाला क्र.3 यांनी तक्रारदारांना मानसिक त्रासाची रक्कम रु.,5,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु.2,000/- देणे योग्य जिल्हा मंचाचे मत आहे.
सबब, न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. सामनेवाला क्र. 2 व 3 यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदारांचा नोकिया भ्रमनध्वनी संच नंबर 5030 मधील तक्रारीत नमूद दोष कोणताही मोबदला न घेता आदेश प्राप्तीपासून 30 दिवसांचे आंत दूर करावेत.
3. सामनेवाला क्र.3 यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदारांना मानसिक त्रासाची रक्कम रु.5000/-(अक्षरी रु.पाच हजार फक्त) व तक्रारीचा खर्च रु.2,000/-(अक्षरी रु.दोन हजार फक्त) आदेश प्राप्ती पासून 30 दिवसांचे आंत अदा करावेत.
4. वरील रक्कम विहीत मूदतीत अदा न केल्यास त्यावर द.सा.द.शे. 9 टक्के व्याज देण्यास सामनेवाला क्र.3 जबाबदार राहतील.
5. सामनेवाला क्र.1 विरुध्दची तक्रार रदद करण्यात येते.
6. ग्राहक संरक्षण कायदा- 1986, अधिनियम 2005 मधील कलम-20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
(अजय भोसरेकर) (पी.बी.भट)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड