सातारा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच यांचेसमोर
उपस्थिती - मा.सौ.सविता भोसले,अध्यक्षा
मा.श्री.श्रीकांत कुंभार,सदस्य.
मा.सौ.सुरेखा हजारे, सदस्या.
तक्रार अर्ज क्र. 143/2014
तक्रार दाखल दि.01-10-2014.
तक्रार निकाली दि.27-08-2015.
1. श्री. अशोक रामचंद्र गोळे
2. सौ. जिजाबाई अशोक गोळे,
दोघे रा. वालुथ, (बामणेवाडी),
ता.जावळी,जि.सातारा. .... तक्रारदार.
विरुध्द
1. श्री. तुषार नामदेव तरडे
रा.सोमर्डी, ता. जावळी,जि.सातारा .... जाबदार.
तक्रारदारातर्फे –अँड.के.आर. वागडोळे.
जाबदार तर्फे – अँड.व्ही.आय.शेट्टी.
न्यायनिर्णय
(सदर न्यायनिर्णय मा.सौ.सविता भोसले, अध्यक्षा यानी पारित केला)
1. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 नुसार दाखल केला आहे. तक्रारअर्जातील थोडक्यात मजकूर पुढीलप्रमाणे-
तक्रारदार हे वालुथ (बामणेवाडी),ता.जावळी, जि.सातारा येथील रहिवासी आहेत. तर जाबदार हे बांधकाम व्यावसायिक आहेत. तक्रारदाराने त्यांचे मालकीची मिळकत नं. 472 या जागेत आर.सी.सी. घर बांधण्याचे ठरविले. त्याप्रमाणे तक्रारदाराने जाबदारांबरोबर चर्चा करुन त्याप्रमाणे प्रस्तुत तक्रारदाराचे बांधकाम जाबदार यांचेकडून लेबर कॉन्ट्रॅक्ट्रप्रमाणे प्रति चौ.फूट रक्कम रु.220/- याप्रमाणे ठरला व कामकाज करणेचे उभयतांमध्ये ठरले. त्याबाबत दि. 2/12/2010 रोजी बांधकाम करणेबाबतचा करार झाला. करारासोबत कामाचे स्पसिफिकेशन (तपशील) दिला आहे. प्रस्तुत कराराप्रमाणे जाबदाराने बांधकाम करण्याचे मान्य व कबूल केले होते. प्रस्तुत करारनाम्याप्रमाणे बांधकामाला लागणारे स्टील,सिमेंट,बाळू,खडी,टाईल्स तसेच इतर आवश्यक साहित्य अर्जार क्र. 1 ने जाबदाराला जागेवर पुरवणेचे ठरले होते. त्याप्रमाणे तक्रारदाराने वेळोवेळी साहित्याचा पुरवठा केला. संपूर्ण बांधकामाचे कॉन्ट्रॅक्ट लेबर रेट प्रमाणे रक्कम रु.2,28,142/- (रुपये दोन लाख अठ्ठावीस हजार एकशेबेचाळीस मात्र) करारपत्रातील पेमेंटचे तारखेप्रमाणे वेळोवेळी जाबदाराला अदा केले आहेत. तक्रारदार हे मेढा येथे नोकरीस असलेने त्यांना बांधकामाकडे वैयक्तिक लक्ष देता येत नव्हते तरीदेखील तक्रारदार जाबदार यांना कामातील त्रुटी/दोष दाखवत होते. त्यावेळी जाबदार हे, मी इंजिनियर आहे, मला कामाचे काही सांगू नका वगैरे उडवाउडवीची उत्तरे देत व काही दोष राहीलेस दुरुस्त करुन देऊ असे तक्रारदारास सांगितले. तक्रारदाराने जाबदाराकडे लेबर कॉन्ट्रॅक्ट पध्दतीने काम दिले होते तसे करारपत्र झाले असलेने तक्रारदार हे जाबदाराचे ग्राहक आहेत. परंतू जाबदाराने प्रस्तुत बांधकामात वेगवेगळया खालील त्रुटी व दोष ठेवलेले होते व आहेत.
अ. बांधकामाचे फौंडेशनपासून वरती आलेले कॉलम्स, स्लॅब व टेरेसपर्यंत संपूर्ण तिरके झाले आहेत. त्यामुळे भिंत काटकोनात जुळून येत नाही. त्याचे बांधकाम, प्लॉस्टर योग्य होणार नाही. हॉलच्या बाजूसही बेडरुममध्ये आडवा बिम कमीजास्त दिसत आहे.
ब. चौकटीच्या बाजूनी फिनीशींग नाही, चौकटी भिंतींच्या आत बाहेर आहेत, दरवाजे बंद होत नाहीत, खिडक्यांच्या चारही बाजूला ग्रेनाईटच्या बाजूला फटी आहेत, तसेच दर्शनी भागातील प्लास्टरमधील नक्षी बांधकाम गळून पडलेले आहे. टेरेसवरील रेलींग बांधकाम लेवल मध्ये नाही.
क. आतील सर्व भिंतींना चिरा पडल्या आहेत, आतील सर्व भिंतीना फिनीशिंग नाही, जिन्याच्या समोरील भिंत तिरकी दिसत आहे. जिन्याच्या भिंतीला चिर पडली आहे.
ड. संडासचे टाकीला बाहेरुन प्लॅस्टर केलेले नाही.
इ. किचनमध्ये एका बाजूस टाईल्स बसवल्या नाहीत. बाथरुममध्ये बाहेर वॉश-बेसीनच्या बाजूने टाईल्स बसवल्या नाहीत, कट लादीच्या वरच्या बाजूस फिनीशींग नाही. स्कर्टिंगमध्ये दोष राहीला नाही. जिन्याच्या शेवटी व अनेक लाद्या पोकळ बसविलेल्या आहेत.
फ. टेरेसवरील स्लॅबला कुठल्या प्रकारचा उतारलोप दिला नसल्या कारणाने व फिनिशींग न केल्याने स्लॅबवर पाणी साठून राहते आहे, त्या पाण्याचा योग्य निचरा होत नाही.
ग. बाथरुमचे बांधकाम काटकोनात नाही, बाथरुमचे कोप-यात पाणी साठते आऊटलेट जाळीत पाणी जात नाही. तसेच संडासचे बांधकामही काटकोनात नाही.
ह. किचनचे कोप-यात पाणी साठते, सिंकमधून पाणी जाऊन भिंत ओली होते,
य. जिन्यामधून पाणी हॉलमध्ये येते.
ल. बेडरुम व किचनचा स्लॅब गळतो, घरामध्ये ओल राहते.
वरील सर्व त्रुटी जाबदाराने बांधकामात ठेवलेल्या असल्याने तक्रारदार व त्यांचे कुटूंबीय यांना प्रस्तुत घरामध्ये राहताना त्रास होत आहे. पावसाळ्यात घरात सतत ओल राहीलेने तक्रारदार यांना बुरशी, किटाणू इ. मुळे शारीरिक त्रास होतो. बाथरुम व संडासचे पाणी भिंतीमध्ये मुरते, त्यामुळे दुर्गंधी येते, अशा अवस्थेत तक्रारदार सदर घरात रहात आहेत. तसेच बांधकाम 926 चौ.फूट करुन 1011 चौ.फूट केलेचे दाखवून तक्रारदारकडून जास्त रक्कम घेतली आहे. अशाप्रकारे जाबदाराने तक्रारदाराला सदोष सेवा दिली आहे. तक्रारदाराने प्रस्तुत त्रुटी काढून देणेबाबत जाबदाराला सांगीतले असता जाबदार टाळाटाळ करत आहेत ही सेवेतील कमतरता आहे. त्यामुळे तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज दाखल केला आहे.
2. तक्रारदाराने प्रस्तुत कामी नि. 2 व 3 कडे अँफीडेव्हीट, नि. 6 चे कागदयादीसोबत नि.6/1 ते 6/8 कडे अनुक्रमे तक्रारदार व जाबदार यांचे दरम्यान झालेले करारपत्र, जाबदाराने तक्रारदाराला दिलेली कच्ची पावती, तक्रारदाराने जाबदाराला वकिलामार्फत पाठवलेली नोटीस, जाबदाराने तक्रारदाराचे नोटीसीला वकीलामार्फत दिलेले उत्तर, सुहास कान्हेरे यांचा इमारत पाहणी अहवाल, तक्रारदाराचे मिळकतीचा 8 अ चा उतारा, ग्रामपंचायत वालुथ, ता. जावली यांनी दिले घरबाबंधणी दुरुस्ती परवाना याची मुळप्रत, बांधकामासंदर्भात आर.सी.सी. स्लॅब व बीमचा आर्कीटेक्टचा नकाशा, नि. 13 कडे पुराव्याचे शपथपत्र, नि. 14 कडे व्हॅल्यूएटर कन्सलटंट यांचे पुराव्याचे शपथपत्र, नि. 15 कडे फोटोग्राफरचे अँफीडेव्हीट, नि. 16 चे कागदयादीसोबत तक्रारदाराचे घराचे फोटो, व घराची वास्तुशांतीची पत्रीका, नि. 17 कडे तक्रारदारचा पुरावा संपलेची पुरसीस, नि. 24 कडे लेखी युक्तीवाद वेगैरे कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच Dilbagh Rai V/s. Housing Board Hariyana Laws (NCD)-1994-770-880 हा केस-लॉ दाखल केला आहे.
3. तक्रारदाराने प्रस्तुत कामी जाबदार यांचेकडून इमारतीचे बांधकामात त्रुटी राहीलेने तक्रारदार यांना मानसीक , आर्थिक व शारिरीक त्रासाला सामोरे जावे लागले, त्याची नुकसानभरपाई म्हणून जाबदार यांचेकडून तक्रारदाराला रक्कम रु.5,00,000/- (रुपये पाच लाख मात्र) वसूल होवून मिळावी, प्रस्तुत रक्कम प्रत्यक्ष हाती पडेपर्यंत त्यावर द.सा.द.शे. 12 टक्के व्याजदराने व्याज आकारावे, जाबदाराने रक्कम देणेस टाळाटाळ केलेस जाबदाराची मालमत्ता विक्री करुन सदरची रक्कम जाबदाराकडून तक्रारदाराला व्याजासह वसूल होवून मिळावी. नोटीस खर्च, अर्ज खर्च, स्टँम्प खर्च तसेच इन्साफी खर्च जाबदाराकडून वसूल होवून मिळावा अशी विनंती याकामी तक्रारदाराने केली आहे.
4. प्रस्तुत कामी जाबदार यांनी नि.11 कडे म्हणणे, नि.12 कडे म्हणण्याचे अँफीडेव्हीट, नि. 19 व 20 कडे साक्षीदारांचे पुराव्याची शपथपत्रे, नि.21 कडे पुरावा संपलेची पुरसीस, वगैरे कागदपत्र मे. मंचात दाखल केली आहेत. तसेच जाबदाराने 1. S.C. NC Vol. 4 National Consumer Disputes Redressal Commission New Delhi, यांचेकडील First Appeal No.63/1990 Decided on 08/01/1991
2. III (2010) CPJ 353 (NC) – V. Narayanan V/s. Canara Bank,
3. I (2013) CPJ 27 (SC) – Ramesh Chandra Agrawal V/s. Regency Hospital वगैरे केस लॉज जाबदाराने मे. मंचात दाखल केलेले आहेत. जाबदारानी त्यांचे म्हणण्यामध्ये तक्रारदाराचे तक्रार अर्जातील सर्व कथने फेटाळलेली आहेत. जाबदाराने प्रस्तुत तक्रार अर्जावर पुढीलप्रमाणे आक्षेप नोंदवलेले आहेत.
जाबदाराचे कथनानुसार, तक्रारदाराचा अर्ज व त्यातील कथने मान्य व कबूल नाहीत. परंतू, तक्रारदाराचे अर्जातील तक्रारदार व जाबदार यांचेत दि. 2/12/2010 रोजी लेबर कॉन्ट्रॅक्टपोटी, लेबर रेटप्रमाणे रक्कम रु.2,28,142/- इतकी रक्कम अदा केली आहे हा मजकूर बरोबर आहे. इतर सर्व मजकूर मान्य नाही. तो खोटा व चूकीचा आहे. खरी हकिकत अशी आहे की, तक्रारदाराने जाबदारावर एक निष्णात इंजिनियर या नात्याने घराचे बांधकामाचे काम सोपविले नव्हते, तक्रारदाराने जाबदारावर केवळ उपलब्ध करुन दिल्या जाणा-या मालाचा वापर करुन बांधकाम करुन देणेची जबाबदारी दि.2/12/2010 रोजी लेबर कॉन्ट्रॅक्ट या करारा तहत सोपविली होती. या कराराप्रमाणे जाबदारांवर लेबर कॉन्ट्रॅक्टप्रमाणेची सिमीत अशी जबाबदारी होती. म्हणूनच तक्रारदाराने केवळ रक्कम रु.220/- प्रती चो. फूट या लेबर रेटने (घराच्या स्लॅबचे क्षेत्रफळानुसार रक्कम देणेचे ठरले होते. तसेच बांधकामासाठी लागणारे सर्व साहित्य पुरविण्याची जबाबदारी तक्रारदार यांचेवर होती. तसेच करारातील अट क्र. 6 नुसार तक्रारदार यांचेवर त्यांचे घराचे बांधकाम, प्लॅन प्रमाणे व योग्यप्रकारे होते का याची खात्री करुन घेणेसाठी स्वतंत्र इसमाची नेमणूक करणेची जबाबदारी तक्रारदारावर होती. तक्रारदाराने त्यांचे घराचे बांधकाम हे त्याचेकडील उपलब्ध रकमेनुसार व प्रसंगी कमी दर्जाचे मालाचा वापर करुन पूर्ण करुन घेतले आहे. तक्रारदाराचे घराचे बांधकाम दि. 9/7/2011 रोजी पूर्ण झाले होते. तक्रारदाराने दाखल केले आराखडयानुसार घराचे बिल्ट अप क्षेत्र 887 चौ. फू. झाले होते. त्यानंतर प्रत्यक्ष बांधकामावेळी तक्रारदाराने वाढीव स्लॅबचे क्षेत्र करावयास लावले होते. दोन बाजूला जादाच्या बाल्कनीचे काम करुन घेतले आहे. सबब या घराचे स्लॅबचे क्षेत्रफळ हे 1011 चौ.फूट इतके झाले होते. तक्रारदारास ही बाब माहीती होती व आहे. याच क्षेत्रफळाचे मोजमापानुसार प्रति.चौ.फू.220 प्रमाणे रक्कम तक्रारदार अदा करीत आले होते. ही बाब तक्रारदारास मान्य व कबूल असलेनेच दि. 9/7/2011 रोजी तक्रारदाराने शेवटच्या हप्त्याची रक्कम रु.8,140/- जाबदाराला अदा केली आहे. तसेच तक्रारदाराने दि. 24/11/2016 रोजी जाबदाराला दिले नोटीसमधेही तक्रारदाराला हा हिशोब मान्य व कबूल आहे. तक्रारदाराने जाबदाराला दिले रकमेबाबतचा हिशोबा बाबत दि. 9/7/2011 पर्यंत व तदनंतरही पुढे सतत व ता. 24/11/2013 पर्यंत कधीही कसलीही तक्रार, हरकत आक्षेप नव्हता व नाही. तक्रार अर्जास मुदतीच्या कायद्याची बाधा लागू आहे. तक्रार अर्ज विहीत मुदतीत नाही तसेच continuous cause of action आहे अशी स्थिती नाही अगर तसा तक्रारदाराचा अर्ज व प्लीडींग नाही. तक्रारदाराने नोटीसमध्ये सर्व हिशोब मान्य केला होता. परंतू, तक्रारदार तक्रार अर्ज कलम 12 मध्ये खोटी व करारबाहय तक्रार करत आहेत. जाबदाराने तक्रारदाराचे घराचे कमी क्षेत्रफळाचे बांधकाम करुन जास्त क्षेत्रफळाचे दाखवून रक्कम तक्रारदाराकडून वसूल केली आहे हा खोटा आरोप तक्रारदार जाबदारांवर करत आहेत. सबब प्रस्तुत तक्रार अर्जास allegation contra factum non est admittenda i.e. allegation contrary to a deed is not admissible ची बाधा लागू होते. तसेच तक्रार अर्जास इस्टॉपल व वेव्हर याही तत्वाची बाधा लागू होते. जाबदार यांनी कराराप्रमाणे फक्त तक्रारदाराने उपलब्ध करुन दिले मालाचा वापर करुनच केवळ लेबर/मजूरी पुरते काम करुन देणेचे होते ही बाब करारावरुन स्पष्ट होते. सबब करार संपुष्टात आलेनंतर जाबदारांवर अशी करारबाहय विना मोबदल्याची सेवा, जबाबादारी एकतर्फा लादता येणार नाही. प्रस्तुत तक्रार अर्जास Ex nuds Pacto non oriture octio i.e. No action arises from a contract without consideration याची बाधा लागू झाली आहे. कराराप्रमाणे सिमीत सेवा जाबदाराने तक्रारदाराला वेळीच पुरवली होती व आहे. परंतु, तक्रारदाराने 3 वर्ष पूर्ण झालेनंतर प्रस्तुत करारबाहय व बिनबुडाच्या तक्रारी घेऊन तक्रारदाराने अर्ज दाखल केला आहे. तो कायद्याने चालणेस पात्र नाही. तसेच प्रस्तुत कामी तक्रारदाराने सुहास कान्हेरे या व्हॅल्युएटर चा अहवाल पुरावा म्हणून मे. मंचात दाखल केला आहे. तो जाबदारांना मान्य नाही. कारण प्रस्तुत अहवाल हा एकतर्फा आहे. प्रस्तुत अहवालामध्ये कान्हेरे यांनी तक्रारदाराचे घराचा आराखडा, प्रत्यक्ष मोजमापे नमूद केलेली नाहीत. संपूर्ण अहवाल व त्यातील सर्व टिपणे मोघम स्वरुपाची आहेत. कोणत्याही टिपणीला शास्त्रीय आधार नाही. निश्चीत आकडेमोड, पारदर्शी व विश्वसनीय नाही. प्रस्तुत अहवाल हा मोघम स्वरुपाचा आहे. अशा आधारहिन, परिक्षणाविना, पारदर्शी घटकांविना मोघम शब्दांमध्ये दिलेला अहवालास कायद्याने कोणतेही महत्व प्राप्त होत नाही. त्यामुळे प्रस्तुत अहवाल ग्राहय धरु नये. तो जर-तर पध्दतीचा आहे. लाकडी दरवाजे हे पावसाळी भाग असलेने आर्दतेने फुगतात त्यामुळे लागत नसतील तर त्यात जाबदाराची कोणतीही चूक नाही. परंतु सर्वसामान्य हवेत दरवाजे पूर्ववत होतात, भिंतीना एअर क्रॅकमुळे भेगा पडणे यामध्ये जाबदाराचा बांधकामाचा दोष नसतो. तसेच नक्षीकाम गळून पडणे यालाही पुरेसे पाणी न मारल्याने व क्युअरिंग झाले नाही हेच कारण लागू पडते. टेरेसला ढाळ दिलेने वॉटरप्रुफींग केले व त्यापूर्वी रेलींग केले होते. टेरेसला ढाळ दिल्याने रेलींगची लेव्हल त्या तुलनेत राहणार ही बाब कान्हेरे यांच्या लक्षात आलेली दिसत नाही. श्री. कान्हेरे यांना बांधकामाचा पुरेसा अनुभव नसलेचे स्पष्ट होते. संडासचे टाकीचे बांधकाम हे जमीनीखाली असते व जमीनीतून केवळ एकफूट इतका भाग वरती घेतलेला असतो. या भागाचा प्लॅस्टर करताना तक्रारदाराने माल विनाकारण वाया घालवू नका, मी मुरुम टाकून घेतो असे सांगीतले होते व प्लॅस्टरचे काम थांबवले होते. तसेच किचनकट्टयाला लावण्यासाठी तक्रारदाराने मोजक्याच टाईल्स दिलेल्या होत्या. तेवढयाच वापरणेस सांगितलेने वॉश-बेसीन भोवती टाईल्स बसविणेसाठी टाईल्स तक्रारदाराने उपलब्ध केल्या नव्हत्या, त्यामुळे बसविल्या नाहीत. तसेच जिन्याच्या शेवटी बसविले लाद्या या बांधकामातील राहीलेला माल टाकून लाद्या बसवण्यास सांगीतले होते. त्याप्रमाणे जाबदाराने बसविल्या होत्या व चांगला माल वापरणेस तक्रारदाराने जाबदाराला मज्जाव केला होता. तसेच स्लॅबचे फिनीशींगचे वेळी योग्य ढाळ दिलेला होता, अशा कामावेळी तक्रारदाराने चांगल्या दर्जाची बारीक वाळू व अधिक प्रमाणात सिमेंटची गरज असते तथापी तक्रारदाराने मातकट वाळू पुरविली व उपलब्ध सिमेंटमध्येच काम पूर्ण करावे असे तक्रारदाराने जाबदाराला सांगितले होते. त्यामुळे तक्रारदार याबाबतीत कोणतीही तक्रार करु शकत नाही. त्यामुळे तक्रारदाराने केलेल्या तक्रारीस जाबदार यांना करार संपुष्टात आलेनंतर तीन वर्षांनी अशा तक्रारी कायद्याने चालू शकत नाही. त्यामुळे तक्रारदाराचा तक्रार अर्ज खर्चासह फेटाळणेत यावा असे म्हणणे जाबदाराने दाखल केले आहे.
5. प्रस्तुत कामी वर नमूद तक्रारदार व जाबदार यांनी दाखल केले सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन मे. मंचाने प्रस्तुत तक्रार अर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दयांचा विचार केला.
अ.नं. मुद्दा निष्कर्ष
1. तक्रारदार हे जाबदाराचे ग्राहक आहेत काय ? नाही
2. जाबदाराने तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली आहे काय ? नाही
3. अंतिम आदेश काय ? खालील नमूद
आदेशाप्रमाणे
विवेचन-
6. वर नमूद मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत. कारण- तक्रारदार व जाबदार यांचेदरम्यान लेबर कॉन्ट्रॅक्ट पध्दतीने काम जाबदाराने तक्रारदाराचे घराचे बांधकाम करुन देणेबाबत झालेले होते. या बांधकामासाठी लागणारे स्टील, सीमेंट, वीट, वाळू, खडी, टाईल्स असे सर्व साहित्य तक्रारदार स्वतः जाबदार यांना पुरविणार होते व त्या साहित्यातूनच जाबदार हे तक्रारदाराचे घराचे बांधकाम पूर्ण करणार होते व त्याप्रमाणे लेबर रेटप्रमाणे झाले बांधकाम 1011 चौ. फूट रक्कम रुपये 220/- प्रमाणे होणारी एकूण रक्कम रु.2,28,142/- जाबदाराला तक्रारदाराने टप्याटप्प्याने वेळोवेळी अदा केली आहे. जाबदाराची जबाबदारी लेबर कॉन्ट्रॅक्टरप्रमाणे सिमीत होती व त्याप्रमाणे लेबर चार्जेस तक्रारदाराने जाबदाराला दिलेले आहेत. त्यामुळे तक्रारदार हा जाबदार यांचा ग्राहक होऊ शकत नाही किंवा ग्राहक संरक्षण कायदा कलम 2 (1)(d) प्रमाणे ग्राहक या संज्ञेत येत नाही. प्रस्तुत बाबतीत आम्ही जाबदाराने दाखल केले पुढील मा. राष्ट्रीय आयोगाचे न्यायनिवाडयाचा व त्यातील दंडकाचा आधार घेतला आहे.
National Consumer Disputes Redressal Commission, New Delhi First Appeal No. 63 of 1990 Mrs. Vinodini Baj pai Vs. Rajya Krishi Utpadan Mandi Parishad
Head Note- Consumer Protection Act 1986- Sec.2(1)(d) Construction contract-Consumer-The acceptance of tender undoubtedly creates a contractual relationship- But the contractor who has undertaken to perform a work of construction can not] by any streth of reasoning, be regarded as a person who has entered- into an agreement of hiring of service with the other party merely on the ground that under the contract there is an obligation on the part of the said party to supply. certain materials such as cement etc. and also to ultimately pay a charges found due for the execution of the work in full agreement with the view expressed by the state commission that the appellant who was the complainant does not fall agreement with in any part of the definition of consumer contained in clause 2 (1) (d)(i) of the Act.
The Complaint Preferred by her was therefore rightly dismissed on the ground that it was not maintainable under the Act. We accordingly confirm the order passed by the state commission and dismiss this appeal.
7. वर नमूद मुद्दा क्र. 2 चे उत्तर आम्ही नकारार्थी देत आहोत. कारण- तक्रारदाराचे घराचे दोषपूर्ण बांधकाम झालेबाबतचा व्हॅल्यूएटर श्री. कान्हेरे यांनी दिलेला अहवाल प्रस्तुत कामी नि. 6/7 कडे दाखल आहे. प्रस्तुत अहवाल हा एकतर्फा आहे. प्रस्तुत अहवालात घराचा मंजूर आराखडा, प्रत्यक्ष मोजमापे नमूद केलेली नाहीत. सर्व टिपणे मोघम स्वरुपाची आहेत. त्यामुळे पूर्णतः एकांगी व अविश्वसनीय आहे. कोणत्याही आधाराविना, परिक्षणाविना मोघम शब्दांमध्ये दिलेला हा इमारत पाहणी अहवाल असलेचे स्पष्ट होते. तसेच प्रस्तुत कामी जाबदार यांनी नि. 19 व नि. 20 कडे अनुक्रमे सत्यराम रामदेव चौरसिया व गुलाब भरत कुशवाह यांचे पुराव्याची शपथपत्रे दाखल केली आहेत. त्यामध्ये चौरसिया यांनी म्हटले आहे की, तक्रारदाराचे घरामध्ये फरशी व टाईल्स बसवण्याचे काम त्याने केले असून तक्रारदारने पुरविले मालाचाच वापर केला आहे. तक्रारदाराने किचन कट्टयाला लागतील एवढयाच मोजक्याच टाईल्स दिल्या होत्या. त्याप्रमाणे बसवून दिल्या आहेत. मात्र वॉश बेसीनजवळ बसवण्यासाठी टाईल्स तक्रारदाराने पुरविल्या नाहीत. सबब त्या बसविल्या नाहीत. तसेच जिन्याच्या शेवटी बसविलेल्या लाद्या बसवताना बांधकामातील राहीलेला माल गोळा करुन खाली टाकायला तक्रारदाराने सांगितले होते व त्यावर लाद्या बसवणेस सांगीतलेने तशा लाद्या बसविल्या, त्यामुळे लाद्यांच्या खाली पोकळी निर्माण होवू शकते वगैरे तसेच नि. 20 कडील गुलाब कुशवाह यांचे अँफीडेव्हीटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, त्यांनी तक्रारदाराचे घराचे वीट बांधकाम व प्लॅस्टर केलेले आहे. सेफ्टीटँकला प्लॅस्टर करणेस तक्रारदारानेच नकार दिला होता त्यामुळे केलेले नाही. वगैरे वगैरे. परंतू प्रस्तुत दोन्ही अँफीडेव्हीटला तक्रारदाराने प्रतिअँफीडेव्हीट दाखल केले नाही किंवा त्याबाबत काहीही उल्लेख तक्रारदाराने केलेला नाही याचा अर्थ जाबदाराने कोणतीही सेवात्रुटी तक्रारदाराला दिली नाही. प्रस्तुत कामी कान्हेरे यांनी दिलेला इमारत अहवाल अंदाजे व मोघम दिला आहे. त्याबाबतीत मे. सुप्रीम कोर्टच्या खालील नमूद न्यायनिवाडयाचा आधार घेतला आहे.
IV (2009) CPJ 27(SC) Ramesh Chandra Agrawal V/s. Regency Hospital Ltd.,
Head note – Consumer Protection Act 1986-Sec.23-Indial Evidence Act 1872 Sec. 45 – Evidence- Expert Opinion-Admissibility of –Expert evidence advisory in nature- Experts duly to furnish necessary scientific criteria for testing accuracy of conclusions to enable judge to from indeperdent Judgment – importance of opinion to be decided on basis of creditability of expert – Relevant facts supporting opinion can be cross checked – mere assertion without data basis is not evidence even if it comes from expert. Treatment record filed before commission- lack of care shown by Assistant Registrar – records not forwarded to export- request to send record, for reconsideration rejected by commission- Commission failed to appreciate that in absence of document expert not in position to form true opinion- fair opportunity to be given to complainant to prove his case-impugned order set-aside
सबब जाबदाराने तक्रारदाराला कोणतीही सेवात्रुटी दिलेली नाही तसेच तक्रारदार हे मुळात जाबदाराचे ग्राहक होत नाहीत व तक्रारदार ग्राहक संरक्षण कायद्याप्रमाणे ‘ग्राहक’ या संज्ञेत येत नाहीत. त्यामळे तक्रारदारचा सदरचा तक्रार अर्ज खर्चासह फेटाळण्यास पात्र आहे असे या मे. मंचाचे स्पष्ट मत आहे.
8. सबब आम्ही खालीलप्रमाणे अंतीम आदेश पारीत करत आहोत.
आदेश
1. तक्रारदाराचा तक्रारअर्ज खर्चासह फेटाळण्यात येतो.
2. सदर न्यायनिर्णयाच्या सत्यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्य पाठवणेत याव्यात.
3. सदर न्यायनिर्णय खुल्या मंचात जाहीर करणेत आला.
ठिकाण- सातारा.
दि. 27-08-2015.
(सौ.सुरेखा हजारे) (श्री.श्रीकांत कुंभार) (सौ.सविता भोसले)
सदस्या सदस्य अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा.