नि. 18 मे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा यांचेसमोर तक्रार क्र. 228/2010 नोंदणी तारीख – 29/9/2010 निकाल तारीख – 29/11/2010 निकाल कालावधी – 60 दिवस श्री विजयसिंह दि. देशमुख, अध्यक्ष श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्या श्री सुनिल कापसे, सदस्य (श्री सुनिल कापसे, सदस्य यांनी न्यायनिर्णय पारीत केला) ------------------------------------------------------------------------------------ गोविंद वासुदेव गाडगीळ 1149, शनिवार पेठ, सातारा ----- अर्जदार (अभियोक्ता श्री डी.डी.कुलकर्णी) विरुध्द 1. व्यवस्थापक, सौ पल्लवी अभय देवरे श्री ट्रॅव्हल्स सर्व्हिसेस, पवार टॉवर्स, कमानी हौदासमोर, राजपथ, सातारा 2. श्री कुमार बेलसरे (शंकर) श्री ट्रॅव्हल्स सर्व्हिसेस, 399, नारायण पेठ, मुंजाबा लेन, राष्ट्रभाषा भवन जवळ, पुणे-411030 ----- जाबदार (अभियोक्ता श्री सुनिल द्रविड) न्यायनिर्णय अर्जदार यांनी प्रस्तुतचा अर्ज ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 नुसार केलेला आहे. अर्जदार यांचे अर्जातील कथन थोडक्यात खालीलप्रमाणे - 1. अर्जदार हे सातारा येथील कायमचे रहिवासी आहेत. जाबदार ही प्रवासी सेवा देणारी कंपनी आहे. जाबदार यांनी काशी, गया, प्रयाग या धार्मिक स्थळांसाठी सहलीचे आयोजन केले होते त्यासाठी अर्जदार यांनी जाबदार यांचेकडे बुकींग केले होते. सदरचे सहलीसाठी अर्जदार यांनी जाबदार यांचेकडे एकूण रु.9,929/- इतकी रक्कम भरली होती. जाबदार यांनी अर्जदार यांचेकडून रु.1,420/- कोणतीही कल्पना न देता वसूल केलेले आहेत. तदनंतर जाबदार यांनी अर्जदार यांना दि.21/8/10 रोजी पूणे रेल्वे स्टेशनवरुन दु.4.05 वा. ज्ञानगंगा एक्सप्रेसने जावयाचे असल्याबाबत कळविले होते. अर्जदार यांनी जाबदार यांचेकडून सदरच्या वेळेबाबत खात्री करुन घेतली होती. त्यानुसार अर्जदार हे दि.21/8/2010 रोजी दु.2.00 वा.पुणे स्टेशनवर हजर होते. परंतु जाबदार यांचे कोणीही कर्मचारी त्यावेळी हजर नव्हते म्हणून अर्जदार यांनी जाबदार यांचेशी संपर्क साधला असता कार्यक्रम पत्रिकेत वेळ चुकीची नमूद केली होती. प्रत्यक्षात ट्रेनची वेळ रात्री 9.00 आहे असे सांगण्यात आले. अर्जदार यांचे वय 83 असून ते एकटेच या प्रवासाला जाणार होते. तसेच वयाचा विचार करता त्यांना थांबणेही शक्य नव्हते. म्हणून अर्जदार यांनी जाबदार यांचेकडे बुकींग रद्द करुन रक्कम परत करावी अशी मागणी केली. त्यावर रक्कम उद्या चेकने पाठवून देतो असे जाबदार यांनी सांगितले. परंतु त्यानंतर जाबदार यांनी अर्जदार यांना पत्र पाठवून पैसे परत देता येत नाहीत असे कळविले. म्हणून अर्जदार यांनी जाबदार यांना वकीलांचेमार्फत नोटीस पाठविली असता जाबदार यांनी त्यास काहीच प्रतिसाद दिला नाही. सबब, सहलीची रक्कम रु.9,929/- व्याजासह मिळावी, तसेच मानसिक त्रासापोटी व अर्जाचे खर्चापोटी रक्कम मिळावी यासाठी अर्जदार यांनी प्रस्तुतचा अर्ज दाखल केला आहे. 2. जाबदार क्र. 1 व 2 यांनी प्रस्तुतचे कामी त्यांचे लेखी म्हणणे/कैफियत नि. 11 ला दाखल केली आहे. त्यामध्ये त्यांनी अर्जदारचे तक्रारअर्जातील बहुतांश मजकूर नाकारलेला आहे. अर्जदार व जाबदार यांचेमधील व्यवहार हा पुणे येथे झाल्याने या मंचास तक्रार चालविण्याचा अधिकार नाही. जाबदार यांनी सातारा येथील प्रतिनिधी हे केवळ माहिती देणे व रक्कम गोळा करणे यासाठी सोय म्हणून नेमेलेले आहेत. वेळेचा घोटाळा जाबदार यांचे लक्षात आलेनंतर जाबदार यांनी दोन कर्मचारी पुणे स्टेशनवर पाठविले व अर्जदार व त्यांची कन्या यांना ऑफिसवर आणले व त्यांना जेवण करुन विश्रांती घेण्यास सांगितले. परंतु अर्जदार यांच्या संतप्त स्वभावामुळे त्यांनी कोणतीही गोष्ट मान्य केली नाही व धमक्या देवून निघून गेले. एकदा केलेले बुकींग रद्द करता येत नाही याची अर्जदार यांना माहिती होती. त्याप्रमाणे संमतीपत्र भरुन दिल्यानंतर पुढील व्यवस्था केली जाते. सदरची सहल ही अर्जदार यांनी स्वतः रद्द केली आहे. त्यात त्यांच्या मनातील भीतीही कारणीभूत असू शकते. कारण जाबदार यांनी अर्जदार यांची त्यांचे ऑफिसवरील फलॅटवर सर्व सोय केली होती. जाबदार यांनी सेवा देण्यामध्ये कोणतीही त्रुटी केलेली नाही. सबब तक्रारअर्ज फेटाळणेत यावा असे जाबदार यांनी त्यांचे कैफियतीमध्ये कथन केले आहे. 3. अर्जदारतर्फे दाखल लेखी युक्तिवाद नि. 16 ला पाहिला. तसेच अर्जदार व जाबदारतर्फे दाखल कागदपत्रे पाहिली. 4. प्रस्तुतचे कामी प्रामुख्याने खालीलप्रमाणे मुद्दे उपस्थित होत आहेत. हे मुद्दे व त्यांना दिलेली उत्तरे खालीलप्रमाणे आहेत. मुद्दे उत्तरे अ) अर्जदार व जाबदार यांचे दरम्यान ग्राहक व सेवा देणारे असे नाते आहे काय ? होय ब) जाबदार यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केली आहे काय ? होय क) अंतिम आदेश - खाली दिलेल्या कारणास्तव अर्जदार यांचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येत आहे. कारणे 6. जाबदार यांनी त्यांचे कैफियतीमध्ये असे कथन केले आहे की, अर्जदार व जाबदार यांचेमधील व्यवहार हा पूणे येथे झाल्यामुळे प्रस्तुतचे मंचास सदरची तक्रार चालविण्याचे अधिकारक्षेत्र नाही. परंतु जाबदार यांनी पुढे असेही कथन केले आहे की, जाबदार यांनी त्यांचे प्रतिनिधींना सहलीची माहिती देण्यासाठी तसेच रक्कम गोळा करण्यासाठी नेमेलेले आहे. अर्जदार यांनीही त्यांचे प्रत्युत्तरामध्ये असे नमूद केले आहे की, त्यांनी जाबदार यांचे प्रतिनिधीला सातारा येथे सहलीची रक्कम दिली आहे. सदरची बाब विचारात घेता जरी जाबदार यांचे कार्यालय पुणे येथे असले तरी जाबदार यांचे प्रतिनिधींनी सातारा येथे अर्जदार यांचेबरोबर जाबदार यांचेवतीने व्यवहार केलेला आहे. त्यामुळे प्रस्तुतचे मंचास सदरचा तक्रारअर्ज चालविण्याचे अधिकार क्षेत्र आहे असे या मंचाचे मत आहे. 7. अर्जदार यांनी त्यांचे तक्रारअर्जात असे कथन केले आहे की, त्यांना जाबदार यांनी जी सहलीची कार्यक्रम पत्रिका दिली होती त्यामध्ये चुकीची वेळ नमूद केलेली होती. त्यामुळे अर्जदार यांनी सहल रद्द केली. अर्जदार यांनी त्यांचे कथनाचे पृष्ठयर्थ नि.5/8 ला कार्यक्रम पत्रिका दाखल केली आहे. त्यामध्ये पुण्याहून सुटणा-या ट्रेनची वेळ दु.4.05 अशी आहे. परंतु सदरची वेळ चुकीची असल्याने अर्जदार यांना विनाकारण त्रास झाला. अर्जदार हे वयोवृध्द आहेत. त्यांना योग्य ती वेळ देवून त्यांना त्रास होणार नाही याची काळजी घेणे ही जाबदार यांची जबाबदारी होती. परंतु जाबदार यांनी चुकीची वेळ दिल्याने अर्जदार यांना मानसिक त्रास झाल्याचे व त्यामुळे त्यांना सहल रद्द करावी लागल्याचे दिसून येत आहे. सदरची वस्तुस्थिती विचारात घेता जाबदार यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये त्रुटी केली आहे असे या मंचाचे मत आहे. सबब अर्जदार यांनी जाबदार यांचेकडे सहलीसाठी भरलेली रक्कम परत मिळण्यास अर्जदार हे पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे. 10. या सर्व कारणास्तव व वर नमूद मुद्दयांच्या दिलेल्या उत्तरास अनुसरुन अर्जदार यांचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येत आहे. आदेश 1. अर्जदार यांचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येत आहे. 2. आजपासून 30 दिवसांचे आत जाबदार क्र.1 व 2 यांनी वैयक्तिकरित्या व संयुक्तरित्या अर्जदार यांना खालीलप्रमाणे रकमा द्याव्यात. अ. सहलीची रक्कम रु.9,929/- द्यावेत. ब. मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 500/- द्यावेत. क. अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु. 500/- द्यावेत. 3. सदरचा न्यायनिर्णय खुल्या न्यायमंचात जाहीर करणेत आला. सातारा दि. 29/11/2010 (सुनिल कापसे) (सुचेता मलवाडे) (विजयसिंह दि. देशमुख) सदस्य सदस्या अध्यक्ष
| Smt. S. A. Malwade, MEMBER | HONABLE MR. Vijaysinh D. Deshmukh, PRESIDENT | Mr. Sunil K Kapse, MEMBER | |