(पारित व्दारा- श्री नितीन माणिकराव घरडे, मा.सदस्य.)
(पारित दिनांक- 06 फेब्रुवारी, 2017)
01. तक्रारदारांनी प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अन्वये विरुध्दपक्षां विरुध्द निवासी सदनीकांचे बांधकामातील त्रृटी संबधाने मंचासमक्ष दाखल केली.
02. तक्रारदारांची थोडक्यात तक्रार खालील प्रमाणे-
विरुध्दपक्ष क्रं-1) श्री तिरुपती बिल्डर्स ही एक भागीदारी फर्म असून तिचे विरुध्दपक्ष क्रं-2) ते 4) भागीदार आहेत. विरुध्दपक्ष फर्मने त्यांचे मालकीचे मौजा दिघोरी खसरा क्रं-61/1, शिट क्रं-365/30 एकूण क्षेत्रफळ-4050 चौरसफूट या भूखंडावर बहुमजली ईमारत बांधली. सर्व तक्रारदारांनी विरुध्दपक्षाचे ईमारती मधील निवासी गाळे विकत घेतलेत, त्याचा तपशिल खालील प्रमाणे-
तक्रारदाराचे नाव | गाळा क्रमांक | एकूण किम्मत | विक्रीपत्र नोंदणीचा दिनांक |
संजय देवरावजी पोटदुखे | 102 | 14,00,000/- | 31/07/2009 |
सुनिल लक्ष्मणदास लष्करे | 302 | 11,00,000/- | 17/11/2008 |
श्रीमती विनीता राजेश शेलोकर | 201 | 8,50,000/- | 30/09/2009 |
श्रीमती पुष्पा सुरेंद्र मेनकुदळे | 101 | 8,00,000/- | 11/08/2009 |
अभय महादेवराव गंगलवार | जी-001 | 5,00,000/- | 05/10/2009 |
तक्रारदारांनी सदर निवासी गाळे विरुध्दपक्षानां संपूर्ण किम्मत अदा करुन विकत घेतल्या नंतर व ताबे मिळाल्या नंतर स्वतःच्या साईनुसार स्वखर्चाने अतिरिक्त सोयी सुविधा जसे पी.ओ.पी., इलेक्ट्रीकची कामे, टाईल्स, एअर कुलींग सिस्टीम, रंग व इतर सजावटीचे कामे केलीत.
तक्रारदारांची मुख्य तक्रार अशी आहे की, त्यांनी करारा प्रमाणे निवासी गाळयांची संपूर्ण किम्मत विरुध्दपक्षानां अदा केल्या नंतरही ईमारती मध्ये खालील कामे अपूर्ण असून त्रृटया आहेत-
(1) गच्चीवर कोंबा व फ्लोअरींग न केल्याने ठिकठिकाणी पाणी साचून राहत असल्याने भिंतीनां ओलावा आलेला आहे व त्याचा त्रास पावसाळयात होते.
(2) पाण्याचे टाकीवर चढण्यासाठी दिलेली सिडी तकलादु आहे.
(3) कम्पाऊंड वॉल तकलादू असून 40 ते 50 फुटाची वॉल तयार करताना कुठेही पिल्लरचा उपयोग केलेला नाही.
(4) विहिरीला पाणी अत्यंत कमी असून ते फक्त 04 ते 05 लोकांना पुरेल एवढेच आहे त्यामुळे सर्व सदनीकाधारक तक्रारदारांनी स्वखर्चाने रुपये-85,000/- लाऊन बोअरवेल तयार केली.
(5) नळ व इलेक्ट्रिक फीटींग तसेच विद्दुत मीटर भोवती कव्हर नाही. सांडपाणी साचून राहते.
(6) पार्कींग मध्ये ब्राऊचर मध्ये दर्शविल्या प्रमाणे व्यवस्था नाही, चार चाकी वाहन निट वळवित येत नाही. गाळयात फेब्रीकेशनचा व्यवसाय असल्याने आवाजामुळे प्रदुषण निर्माण झालेले आहे
(7) पाय-यांना तकलादु टाईल्स बसविलेल्या आहेत.
पुढे तक्रारदारांनी असे नमुद केले की, विरुध्दपक्षानीं ईमारतीचे संपूर्ण बांधकाम केलेले नसून बांधकामात त्रृटी ठेवलेल्या आहेत. तक्रारदारांनी त्यांच्या-त्यांच्या गाळयातील बांधकामातील त्रृटी संबधाने विस्तृत विवरण दिलेले आहे. विरुध्दपक्षानां बांधकामातील त्रृटी संबधाने वेळोवेळी विनंती करुनही त्यांनी ते दुर करण्या संबधाने कोणतीही पुर्तत केलेली नाही आणि विरुध्दपक्षाची ही कृती दोषपूर्ण सेवा आणि अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब या प्रकारात माडते. विरुध्दपक्षांनी फक्त वेळोवेळी आश्वासने दिलेली आहेत परंतु कोणतीही कार्यवाही केलेली नाही म्हणून त्यांनी प्रस्तुत तक्रार मंचा समक्ष दाखल करुन पुढील प्रमाणे मागण्या केल्यात-
(1) विरुध्दपक्षानीं ईमारत व गाळयाची संपूर्ण कामे करुन योग्य ऑथोरिटी कडून कम्प्लीशन प्रमाणपत्र प्राप्त करुन ते तक्रारदारांना द्दावेत.
(2) तक्रारदारांनी बोअरवेलसाठी खर्च केलेली रक्कम रुपये-85,000/- वार्षिक 12 टक्के दराने व्याजासह परत करण्याचे विरुध्दपक्षांना आदेशित व्हावे.
(3) तक्रारदारांना झालेल्या मानसिक त्रास व गैरसोयी बाबत प्रत्येकी रुपये-50,000/- देण्याचे विरुध्दपक्षानां आदेशित व्हावे तसेच या तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-25,000/- देण्याचे आदेशित व्हावे.
03. विरुध्दपक्षांनी संयुक्तिक लेखी उत्तर नि.क्रं 12 प्रमाणे मंचा समक्ष अभिलेखावर दाखल केले. त्यांनी लेखी उत्तरात नमुद केले की, तक्रारदारांनी विक्रीपत्र होण्यापूर्वी व विक्रीपत्र नोंदविल्या नंतर स्वतःच्या सोई नुसार अतिरिक्त सजावटी केलेल्या आहेत. विक्रीपत्रातील परिच्छेद क्रं-5) मध्ये तक्रारदारांनी कबुल केलेले आहे की, संपूर्ण गाळयाचे बांधकाम, पुरविलेल्या सुविधा, बांधकामाचा दर्जा पाहणी करुन ताबे घेतलेले आहेत व ते बांधकामा बद्दल समाधानी आहेत. सर्व तक्रारदार जवळ पास एक ते दोन वर्ष कालावधीत गाळयात राहावयास गेलेले आहेत व त्यांनी एक ते दोन वर्षात कधीही कुठलीही तक्रार केलेली नाही. विक्रीपत्रात नमुद केल्या प्रमाणे ताबा घेतल्या नंतर तक्रारदारांनी सोसायटीची स्थापना करावयास हवी होती. परंतु त्यांनी तसे केलेले नाही. तक्रारदारांनी निवासी गाळयांचे ताबे पूर्ण समाधान झाल्या नंतर घेतलेले आहेत,त्यामुळे आता तक्रारी करण्याचे कोणतेही प्रयोजन नाही. तक्रारदारांनी विरुध्दपक्षांना विश्वासात न घेता परस्पर स्वतःच्या सोई नुसार निवासी गाळयात सोयी सुविध बाहेरुन मजूर व मिस्त्री आणून केलेल्या आहेत, त्यासाठी विरुध्दपक्ष बिल्डर जबाबदार नाही. सबब तक्रारदारांची प्रस्तुत तक्रार खोटी असून ती खर्चासह खारीज करण्याची विनंती विरुध्दपक्षा तर्फे करण्यात आली.
04. तक्रारदारांनी तक्रारी सोबत नि.क्रं 28 वरील दस्तऐवज यादी नुसार विक्रीचे करारपत्र, मंजूर नकाशा व ईमारतीचे काही फोटोग्राफ्स दाखल केलेले आहेत.
05. तक्रारदारांची तक्रार, विरुध्दपक्षाचे लेखी उत्तर, प्रकरणातील दाखल दस्तऐवजांच्या प्रती आणि उभय पक्षाचे वकीलांचा मौखीक युक्तीवाद यावरुन मंचाचा निष्कर्ष खालील प्रमाणे देण्यात येतो-
:: निष्कर्ष ::
06. मंचाचे मार्फतीने श्री राजेश एम. खरे, चॉर्टड इंजिनिअर यांची कमीश्नर अभियंता म्हणून नियुक्ती करण्यात आली होती व त्यांनी दुस-यांदा केलेल्या मोका निरिक्षणाचा दिनांक-10 मे, 2012 रोजी अहवाल दाखल केला. अहवाला नुसार त्यांनी दिनांक-30/04/2012 रोजी प्रत्यक्ष्य ईमारतीची पाहणी केली व त्यांचे अहवाला नुसार गच्चीवर प्लोरींग न केल्याने ठिकठिकाणी पाणी साचून राहत असल्याने भिंतींना ओलावा असते. टाकीवर चढण्यासाठी सिडीला काहीही सपोर्ट नसल्याने सिडी हालते. विहिर खोलवर आहे परंतु पाणी फक्त 09 इंच आहे. इलेक्ट्रिक मीटरला बरोबर कव्हर केलेले नाही. सांडपाणी साचून राहते. मोजेक टाईल्सचा उल्लेख ब्राऊचर मध्ये आहे परंतु चेकरस्ड टाईल्स लावलेल्या आहेत. तसेच गाळया मध्ये टाईल्स प्लोरींग काही ठिकाणी दबतात, गॅलरीत पाण्याचा स्कोप नाही, दरवाज्यांचा साईझ कमी जास्त असल्याने ते बरोबर लागत नाही. किचन ओटया खालील भागात सिमेंट रेतीची डागडूजी व्यवस्थित केलेली नाही. किचन मध्ये दोन खिडक्या नाहीत. भिंतीमध्ये भेगा पडलेल्या आहेत असे नमुद केलेले आहे.
07. विरुध्दपक्षा तर्फे कमीश्नर अहवालावर दिनांक-24/01/2013 रोजीचे अर्जा नुसार आक्षेप घेण्यात आलेला आहे, विरुध्दपक्षाचे असे म्हणणे आहे की, दुपारी 12 वाजे पर्यंत कमीश्नर यांची वाट पाहूनही ते आले नाहीत आणि त्यांचे अनुपस्थितीत हा अहवाल तयार केलेला असल्याने तो त्यांना मान्य नाही. ज्या काही त्रृटया आलेल्या आहेत त्या तक्रारदारांनी त्यांच्या त्यांच्या गाळयामध्ये केलेल्या अतिरिक्त सोयी सुविधामुळे निर्माण झालेल्या आहेत.
08. परंतु विरुध्दपक्षाचे उपरोक्त विधानामध्ये काहीही तथ्य दिसून येत नाही, याचे कारण असे आहे की, कमीश्नरांची नियुक्ती ही ग्राहक मंचा मार्फतीने उभय पक्षांचे उपस्थितीत झालेली असताना उभय पक्षकारांनी कमीश्नरांचे संपर्कात राहून त्यांचे भेटीमध्ये उपस्थित राहणे अनिर्वाय आहे, त्यामुळे विरुध्दपक्षाचे वरील आक्षेपात की त्यांचे अनुपस्थिती मध्ये कमीश्नरांनी पाहणी केली या मध्ये मंचास फारसे तथ्य दिसून येत नाही.
09. तक्रारदारांचे तक्रारी प्रमाणे तक्रारदार सर्वश्री संजय पोटदुखे यांनी दिनांक-30/07/2009, सुनिल लष्करे यांनी दिनांक-17/11/2008 रोजी, श्रीमती विनिता राजेश शेलोकार हयांनी दिनांक-30/09/2009 तसेच श्रीमती पुष्पा मेनकुदळे हयांनी दिनांक-11/08/2009 तसेच श्री अभय गंगलवार यांनी दिनांक-05/10/2009 रोजी विक्रीपत्रे नोंदविलीत व ताबे सुध्दा घेतलेत. तसेच तक्रारदारांचेच तक्रारी प्रमाणे त्यांनी आप-आपल्या सोई नुसार सदर्हू निवासी गाळयांमध्ये अतिरिक्त सोयी सुविधा सुध्दा करुन घेतल्यात.
10. कमीश्नर अहवाला प्रमाणे मोजेक टाईल्सचा उल्लेख ब्राऊचर मध्ये आहे परंतु चेकरस्ड टाईल्स लावलेल्या आहेत. तसेच गाळया मध्ये टाईल्स प्लोरींग काही ठिकाणी दबतात, गॅलरीत पाण्याचा स्कोप नाही, दरवाज्यांचा साईझ कमी जास्त असल्याने ते बरोबर लागत नाही. किचन ओटया खालील भागात सिमेंट रेतीची डागडूजी व्यवस्थित केलेली नाही. किचन मध्ये दोन खिडक्या नाहीत. भिंतीमध्ये भेगा पडलेल्या आहेत असे नमुद केलेले आहे. तसेच गच्चीवर प्लोरींग न केल्याने ठिकठिकाणी पाणी साचून राहत असल्याने भिंतींना ओलावा असते. टाकीवर चढण्यासाठी सिडीला काहीही सपोर्ट नसल्याने सिडी हालते.
11. विरुध्दपक्ष बिल्डरचे निवेदना नुसार भिंतीवर एअर कुलींग सिस्टीम असल्याने भितींना 2 बाय 3 चे छिद्र पडलेले आहे आणि हेच छिद्र पाडताना अशा प्रकारच्या भेगा पडलेल्या आहेत. फक्त कुलींग सिस्टीम ज्या भिंतीवर आहे अशाच भिंतींना भेगा पडलेल्या आहेत.
12. मंचाचे मते कमीश्नर अहवाला नुसार असलेले दोष हे मुख्यत्वे करुन बाहय स्वरुपाचे असून निवासी गाळयांचा ताबा घेते वेळी पाहता क्षणी दिसून येणारे आहेत, जसे लावलेल्या टाईल्स, दरवाज्यांचा साईझ, किचन ओटया खालील डागडूजी, किचन मध्ये दोन खिडक्या नसणे, टाकीवर चढण्यासाठी सिडीला सपोर्ट नसणे, विहिरीला पुरेसे पाणी नसणे इत्यादी. या बाबी जेंव्हा तक्रारदारांनी निवासी गाळयांचे ताबे घेतलेत त्याच्या पूर्वीच लक्षात येण्याजोग्य आहेत परंतु त्यावेळी तक्रारदारांनी कोणतेही आक्षेप घेतले नाहीत व सदनीकांचे ताबे घेतलेले आहेत. इतकेच नव्हे तर ताबा घेण्यापूर्वी आप-आपल्या सोयी सुविधा नुसार निवासी गाळयांमध्ये बदल केलेले आहेत आणि ताबा घेतल्या नंतर जवळपास एक वर्षा नंतर ग्राहक मंचात ही तक्रार दाखल केलेली आहे, त्यामुळे आता तक्रारदारांच्या या तक्रारीला काहीही महत्व उरत नाही.
13. या शिवाय तक्रारदारांचे असे म्हणणे आहे की, विहिर खोलवर आहे परंतु पाणी फक्त 09 इंच आहे परंतु या गोष्टींची तक्रारदारांनी गाळयाची खरेदी करताना व निवासी गाळयाचा ताबा घेण्यापूर्वीच शहानिशा करुन निवासी गाळे खरेदी करणे अभिप्रेत आहे परंतु त्यांनी तसे केलेले नाही. पाण्याचे अपुरी व्यवस्थे संबधाने आता उजर घेण्यात काहीही अर्थ उरत नाही, जेंव्हा की, निवासी गाळयाची खरेदी होऊन ताबे घेतलेले आहेत व सदनीकाधारक तेथे राहत आहेत.
14. उपरोक्त नमुद वस्तुस्थितीचा विचार करता, तक्रारदारांची विरुध्दपक्षा विरुध्दची ही तक्रार खारीज होण्यास पात्र आहे, त्यावरुन मंच खालील प्रमाणे तक्रारीत आदेश पारीत करीत आहे-
::आदेश::
(1) तक्रारदार श्री संजय देवरावजी पोटदुखे आणि इतर-04 यांची तक्रार, विरुध्दपक्ष क्रं-(1) श्री तिरुपती बिल्डर्स भागीदारी फर्म, नागपूर तर्फे विरुध्दपक्ष क्रं-(2) ते क्रं-(4) विरुध्दची खारीज करण्यात येते.
(02) खर्चा बद्दल कोणतेही आदेश नाहीत.
(03) निकालपत्राच्या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारानां निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.