(आदेश पारीत व्दारा - श्री नितीन मा. घरडे, मा. प्र. अध्यक्ष)
(पारीत दिनांक : 31 मे, 2017)
1. तक्रारकर्त्याने सदरची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अंतर्गत दाखल केली असून तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालील प्रमाणे.
2. विरुध्दपक्ष क्र.1 व 2 म्हणजे थॉमस कुक इंडिया लिमिटेड या नावाने नागपुरात एजंट असून, नागपूर येथील लोकांना विदेशात जाण्या-येण्यासाठी टूर पॅकेज सांभाळतात, ही माहिती तक्रारकर्त्याला मिळाल्यानंतर विरुध्दपक्ष क्र.2 यांचेशी संपर्क साधून तक्रारकर्त्याची फॅमिली व इतर मित्रांच्या फमिली मिळून एकूण 10 व्यक्तींना अमेरिकेला जाण्याकरीता टूर पॅकेजची व्यवस्था करुन देतो, अशी विरुध्दपक्ष क्र.2 यांनी तक्रारकर्त्याला आश्वासीत केले. त्याअनुषंगाने, दिनांक 9.2.2011 रोजी विरुध्दपक्ष यांना रुपये 50,000/- नगदी दिले व तक्रारकर्ता यांना ‘थॉमस कुक हॉलिडे बुकींग फॉर्म’ दिला व तो तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष यांना भरुन दिला. फॉर्म भरुन दिल्यानंतर काही व्यक्तीगत कारणास्तव तक्रारकर्ता टूरला जाण्याची निश्चित तारीख ठरवू शकला नाही, परंतु दुरध्वनीवरुन विरुध्दपक्ष क्र.1 व 2 यांना टूरला जाण्याची तारीख दोन महिण्यानंतर कळविल्या जाईल असे सांगितले. तक्रारकर्ता यांना अमेरिकेला जाण्यासाठी विरुध्दपक्षाकडे टूरला जाण्याची रक्कम रुपये 2,50,000/- भरावी लागेल असे सांगितले. त्याअनुषंगाने, तक्रारकर्ता यांनी दि.19.3.2011 रोजी धनादेश क्र.218566, तिरुपती अर्बन को-ऑप. बॅकेचा रुपये 2,50,000/- चा धनादेश विरुध्दपक्ष यांना दिला व त्यांचेकडून रसीद प्राप्त करुन घेतली. सदरची रक्कम जमा करुनही विरुध्दपक्ष क्र.1 यांनी तक्रारकर्ता व त्यांचे कुटूंबियांना अमेरिकेला जाण्याकरीता बुकींग केलेल्या टूर पॅकेजची कुठल्याही प्रकारची व्यवस्था केली नाही व तसे लेखी कळविलेले नाही, सदरची बाब ही विरुध्दपक्षांची सेवेतील त्रुटी असल्याचे दिसून येते. त्यानंतर विरुध्दपक्ष क्र.2 सोबत दि.28.8.2011 रोजी विरुध्दपक्ष क्र.1 च्या कार्यालयात गेले असता, तक्रारकर्त्याने त्यांना त्यांचे कुटूंबाकरीता टूर पॅकेजची व्यवस्था करण्याची विनंती केली, तसेच टूर पॅकेजची व्यवस्था होत नसल्यास त्याबाबत जमा केलेली रक्कम परत करावी. त्यावर विरुध्दपक्ष क्र.1 यांनी कार्यालयामधील एक श्री रंगनाथन व्यक्तीला सांगून तक्रारकर्त्याच्या टूर पॅकेजची व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले. परंतु, दिनांक 28.8.2011 पासून आजपर्यंत तक्रारकर्ता व त्याचे कुटूंबियांना अमेरिकेच्या टूर पॅकेजची सेवा विरुध्दपक्ष यांनी पुरविलेली नाही. त्यामुळे, सरतेशवटी तक्रारकर्त्याने आपल्या वकीला मार्फत दिनांक 23.10.11 रोजी कायदेशिर नोटीस पाठविला, सदरच्या नोटीसला सुध्दा विरुध्दपक्ष यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. करीता, तक्रारकर्त्याने सदरची तक्रार मंचात दाखल करुन खालील प्रमाणे मागणी केलेली आहे.
1) विरुध्दपक्ष यांना आदेशीत करावे की, त्यांनी तक्रारकर्त्याना टूर पॅकेजींगच्या नावाने स्विकारलेली रक्कम 2,50,000/- रुपये यावर 15 % टक्के व्याजासह तक्रारकर्त्याला परत देण्याचे आदेशीत व्हावे.
2) तक्रारकर्ता व त्याचे कुटूंबियाला विरुध्दपक्ष क्र.2 यांचे कार्यालय मुंबई येथे जाण्या-येण्याचा खर्च रुपये 80,000/- , तसेच तक्रारकर्त्यास झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासापोटी रुपये 25,000/- देण्याचे आदेशीत व्हावे व तसेच तक्रारीचा खर्च म्हणून 10,000/- देण्याचे आदेशीत व्हावे.
3. तक्रारकर्त्याच्या तक्रारीला अनुसरुन विरुध्दपक्ष यांना मंचा मार्फत नोटीस बजावण्यात आली. विरुध्दपक्ष क्र.1 यांना संधी देवूनही तक्रारीला उत्तर सादर केले नाही, करीता दिनांक 14.9.2012 रोजी विरुध्दपक्ष क्र. 1 विरुध्द एकतर्फा आदेश पारीत केला.
4. विरुध्दपक्ष क्र.2 यांनी आपल्या उत्तरात असे नमूद केले की, ते विदेशातील टूरचा स्वतंत्र व्यवसाय करीत नसून विरुध्दपक्ष क्र.1 च्या व्यवसायात फक्त एजंसी स्वरुपात सहकार्य करतात. त्यांनी तक्रारकर्त्याला कोणतेच आश्वासन दिले नाही. तसेच, दि.9.2.2011 रोजी तक्रारकर्त्याने त्यांना रुपये 50,000/- रुपये नगदी दिली ही बाब अमान्य केली. त्यांनी फक्त तक्रारकर्त्याकडून टूरचे आवेदनपत्र स्विकारले व त्यामध्ये टूरला जाण्याची निश्चित तारीख लिहिली नव्हती व तसेच, तक्रारकर्त्याने टूर ला जाण्याची तारीख कळविली नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याचे आवेदन पत्र संदिग्ध होते करीता विरुध्दपक्ष क्र.2 यांना कोणतेही कायेदशिर बंधन येत नाही. तसेच, तक्रारकर्ता यांनी धनादेशाव्दरे रुपये 2,50,000/- विरुध्दपक्ष क्र.1 ला दिल्याची बाब नाकारली. तसेच, तक्रारकर्ता हा टूरला जाण्याकरीता मुंबई येथे गेला याबाबतचा कोणताही पुरावा तक्रारकर्त्याने जोडला नाही त्यामुळे तक्रारकर्ता हा खर्च मागण्यास पात्र नाही. तसेच, तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाकडे रुपये 2,50,000/- चा धनादेश दिला याबाबतचा पुरावा सुध्दा तक्रारकर्त्याने अभिलेखावर दाखल केला नाही. एकंदरीत तक्रारकर्त्याची तक्रार खो़ट्या स्वरुपाची असून विरुध्दपक्ष यांना बदनाम करण्याकरीता सदरची तक्रार दाखल केलेली आहे. करीता, तक्रारकर्त्याची तक्रार व तक्रारीतील मजकूर बेकायदेशिर असल्या कारणास्तव खारीज होण्यास पात्र आहे.
5. तक्रारकर्ता यांनी प्रकरण मंचात प्रलंबीत असतांना अर्ज दाखल करुन विरुध्दपक्ष क्र.3 व 4 यांना प्रकरणात सामील करुन घेण्याचा अर्ज दाखल केला व तो मंचाने मंजूर केला. त्याअनुषंगाने विरुध्दपक्ष क्र.3 व 4 यांनी तक्रारीला उत्तर सादर करुन त्यात असे नमूद केले की, तक्रारकर्त्याची सदारची तक्रार ही खोट्या स्वरुपाची असून ती फक्त कंपनीच्या नावाला बदनाम करण्याकरीता दाखल केलेली आहे. तसेच, संपूर्ण तक्रारीत तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्र.3 व 4 यांचेकडून कोणतीही मागणी किंवा कोणतेही आरोप सदर तक्रारीमध्ये नमूद केले नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याने विनाकारणच सदर प्रकरणात गोवलेले आहे, करीता तक्रारकर्त्याची तक्रार खारीज होण्यास पात्र आहे.
6. तक्रारकर्त्याने सदरच्या तक्रारीबरोबर 1 ते 4 दस्ताऐवज दाखल करुन त्यात प्रामुख्याने थॉमस कुक हॉलिडे बुकींग फार्म विरुध्दपक्ष क्र.2 कडून नागपूर येथे जमा केल्याची प्रत, तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाच्या खात्यामध्ये रुपये 2,50,000/- धनादेशाव्दारे जमा केल्याची प्रत, तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष यांना पाठविलेली नोटीस व त्याची पोहचपावती इत्यादी दस्ताऐवज दाखल केले. विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी दस्ताऐवज दाखल करुन त्यात प्रामुख्याने Copies of the Email correspondence, पोहचपावती, Invoice for cancellation from supplier इत्यादी दस्ताऐवज दाखल केले.
7. सदर प्रकरणात मंचासमक्ष तक्रारकर्त्याचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला. विरुध्दपक्षास संधी मिळूनही मौखीक युक्तीवाद केला नाही. उभय पक्षांनी अभिलेखावर दाखल केलेल्या दस्ताऐवजाचे अवलोकन करण्यात आले, त्याप्रमाणे खालील प्रमाणे मुद्दे व निष्कर्ष देण्यात येते.
मुद्दे : निष्कर्ष
1) तक्रारकर्ता हा विरुध्दपक्ष यांचा ग्राहक होतो काय ? : होय
2) विरुध्दपक्ष यांचेकडून तक्रारकर्त्यास सेवेत ञुटी किंवा अनुचित : होय
व्यापारी प्रथेचा अवलंब केल्याचे दिसून येते काय ?
3) आदेश काय ? : खालील प्रमाणे
// निष्कर्ष //
8. तक्रारकर्त्याची सदरची तक्रार थोडक्यात अशी आहे की, तक्रारकर्ता यांनी विरुध्दपक्ष यांचेकडे कुंटूंबासह एकूण 10 व्यक्तींचा अमेरिकेला जाण्याचा टूर पॅकेज बुक केला व त्याअनुषंगाने विरुध्दपक्षाला प्रथम रुपये 50,000/- थॉमस कुक हॉलिडे बुकींग फॉर्म भरतांना दिले. त्यानंतर, विरुध्दपक्ष यांनी मागणी केल्यावर रुपये 2,50,000/- धनादेशाव्दारे दिनांक 19.3.2011 रोजी दिले. तसेच, टूरला जाण्याची तारीख विरुध्दपक्ष कळविणार होते, परंतु विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्त्यांना आजपर्यंत टूरला जाण्याची तारीख कळविली नाही व तक्रारकर्त्याच्या कुंटूंबियांचा अमेरिकेचा टूर पूर्ण केला नाही. विरुध्दपक्ष क्र.2 यांनी आपल्या उत्तरामध्ये तक्रारकर्त्याच्या सर्व बाबी नाकारल्या व तक्रारकर्त्याची तक्रार खोटी आहे असे नमूद केले. त्याचप्रमाणे, तक्रारकर्त्याने अमेरिकेला जाण्याकरीता दिलेली रकमेची बाब विरुध्दपक्षाने नाकारली. विरुध्दपक्ष क्र.3 व 4 यांनी आपल्या लेखी युक्तीवादात ही बाब नमूद केली की, विरुध्दपक्ष क्र.3 व 4 हे यांनी तक्रारकर्त्याच्या कुंटूंबियांना अमेरिकेत जाण्याकरीता टूरच्या टिकीटा काढल्या होत्या व 15 एप्रिल 2011 पर्यंत त्यांनी सतत विरुध्दपक्ष क्र.2 व तक्रारकर्ता यांना टूरला जाण्याकरीता आवश्यक कागदपत्रे उदा. पासपोर्ट, वीजा याबाबत माहीती पुरविण्यासाठी सांगितली. परंतु, विरुध्दपक्ष क्र.2 यांनी विरुध्दपक्ष क्र.3 व 4 कडे माहीती पुरविली नाही, तसेच तक्रारकर्त्याच्या एकूण 10 कुंटूंबसदस्यांपैकी सात लोकांचे पासपोर्ट व वीजा तयार होता, परंतु उर्वरीत तीन लोकांचे पार्सपोर्ट नव्हते, त्याकरीता त्यांना वारंवार कळविण्यात आले होते. तसेच, विरुध्दपक्ष क्र.2 याची संपूर्ण जबाबदारी होती की, त्यांनी यासर्व बाबींची पुर्तता करुन ते विरुध्दपक्ष क्र.3 व 4 यांचेकडे पुरवायचे होते. टूरला जाण्याची तारीख सुध्दा दिनांक 23.6.2011 तय झाली होती, परंतु दस्ताऐवज व पैशाच्या अभावामुळे 4 जुलै 2011 रोजी बुकींग व टिकीटा रद्द कराव्या लागल्या.
9. सदरहू तक्रारीचे स्वरुप पाहता असे दिसून येते की, विरुध्दपक्ष क्र.2 हे एजंट म्हणून काम करणारे होते व त्यांची प्राथमिक जबाबदारी होती की, त्यांनी तक्रारकर्त्याच्या कुंटूंबियांचा अमेरिकेला जाण्याचा टूर पॅकेज पारपाडून, त्यापूर्वी त्यांना टूरला जाण्यास लागणारे संपूर्ण दस्ताऐवज उदा. पासपोर्ट व वीजा याची माहिती करुन घेणे व तसेच त्यांची पुर्तता करण्याकरीता आटोकाठ प्रयत्न करुन पासपोर्ट व वीजा पूर्ण करुन विरुध्दपक्ष क्र.3 व 4 यांचेकडे पाठविण्याची जबाबदारी होती, परंतु त्यांनी ती पूर्ण पारपाडली नाही. तसेच, तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या दस्ताऐवजाचे अवलोकन केले असता ही बाब स्पष्ट होते की, तक्रारकर्त्याचे 10 कुंटूंबीय सदस्य अमेरिकेला जाण्यास तयार होते व रुपये 2,50,000/- विरुध्दपक्ष यांचेकडे जमा केल्याबाबतची पावती सुध्दा अभिलेखावर दाखल केली आहे. त्यामुळे ही बाब स्पष्ट होते की, त्यांनी विरुध्दपक्ष क्र.1 व 2 यांचेकडे रकमेचा भरणा केला त्या रकमेची परतफेड करण्याची जबाबदारी विरुध्दपक्ष क्र.1 व 2 ची आहे, असे मंचाला वाटते. सबब, खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येते.
// अंतिम आदेश //
(1) तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
(2) विरुध्दपक्ष क्रमांक 1 व 2 यांना वैयक्तीकरित्या व संयुक्तीकरित्या आदेशीत करण्यात येते की, त्यांचेकडे तक्रारकर्त्याने अमेरिका टूरला जाण्याकरीता जमा केलेली रक्कम रुपये 2,50,000/- (रुपये दोन लाख पन्नास हजार फक्त) परत करावे.
(3) विरुध्दपक्ष क्रमांक 3 व 4 यांना सदरच्या प्रकरणातून मुक्त करण्यात येते.
(4) तसेच, विरुध्दपक्ष क्रमांक 1 व 2 यांनी, तक्रारकर्त्यास झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासापोटी रुपये 10,000/- (रुपये दहा हजर फक्त) व तक्रारीचा खर्च म्हणून रुपये 5,000/- (रुपये पाच हजार फक्त) द्यावे.
(5) विरुध्दपक्ष क्र.1 व 2 यांनी आदेशाची पुर्तता निकालप्रत प्राप्त झाल्यापासून 30 दिवसांचे आत करावे. अन्यथा, विरुध्दपक्ष क्र.1 व 2 यांनी आदेशाची पुर्तता मुदतीत न केल्यास आदेशीत रकमेवर द.सा.द.शे. 6% टक्के दराने आदेशाचे दिनांकापासून तक्रारकर्त्याचे हातात मिळेपर्यंत द्यावे.
(6) उभय पक्षकारांना आदेशाची प्रत निःशुल्क पाठविण्यात यावी.
नागपूर.
दिनांक :- 31/05/2017