तक्रार अर्ज क्र. 77/2014.
तक्रार दाखल दि.03-06-2014.
तक्रार निकाली दि.20-11-2015.
1. सौ. रजनी कृष्णराव साळुंखे
2. श्री. अजितकुमार कृष्णराव साळुंखे
दोघे रा.465/ब, प्लॉट नं.52, कुपर कॉलनी,
तारा बंगला, सदरबझार, सातारा - 415 001. ... तक्रारदार.
विरुध्द
1. श्री. सुर्या इन्व्हेस्टमेंटस्
प्रोप्रा. श्री. समीर जोशी, मॅनेजिंग डायरेक्टर,
2. श्री. सुर्या इन्व्हेस्टमेंटस्
व सौ. पल्लवी जोशी, डायरेक्टर
नं. 1 व 2 दोघे रा. प्लॉट नं.90,
विद्याविहार कॉलनी, प्रतापनगर,
नागपूर – 440 022.
रा. जोशी वाडी, घाट रोड,
भाजी मंडईमध्ये, सीताबर्डी,
नागपूर -440 012.
3. श्री. गंगाधर बाजीराव धमाले,
बिझनेस असोसिएटस्, श्री. सुर्या इन्व्हेस्टमेंटस्,
रा. ए-4, कापरे गार्डन, सनसिटी रोड,
आनंदनगर, सिंहगड रोड, पुणे – 411 051
4. श्री. पुरुषोत्तम पेंडसे
श्री. सुर्या इन्व्हेस्टमेंटस्
कंपनीचे पदाधिकारी,
रा. पांडे लेआऊट, निमर वॉटर टँकजवळ,
नागपूर – 440 015. .... जाबदार.
तक्रारदारातर्फे –अँड.व्ही.जे.उथळे.
जाबदार क्र. 1 ते 4 – एकतर्फा.
न्यायनिर्णय
(सदर न्यायनिर्णय मा.सौ.सविता भोसले, अध्यक्षा यानी पारित केला)
1. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 नुसार दाखल केला आहे. तक्रारअर्जातील थोडक्यात मजकूर पुढीलप्रमाणे-
तक्रारदार हे सातारा येथील कायमस्वरुपी रहिवाशी आहेत. तक्रारदार क्र.1 या तक्रारदार क्र. 2 यांच्या आई आहेत. तक्रारदार क्र.1 या कला व वाणिज्य कॉलेज, सातारा येथे प्राध्यापिका म्हणून कार्यरत होत्या. सध्या त्या निवृत्त झाल्या आहेत. जाबदार क्र. 1 ही इन्व्हेस्टमेंट कंपनी असून तिचे मॅनेजिंग डायरेक्टर समीर जोशी व त्यांची पत्नी पल्लवी जोशी हे असून ते नमूद पत्त्यावरील कायमचे रहिवाशी आहेत. जाबदार यांचे इन्व्हेस्टमेंट कंपनीची माहिती ऐकून, स्कीममध्ये जास्त व्याज मिळत असलेने तक्रारदाराने प्रस्तुत जाबदार कंपनीत रक्कम गुंतविणेचे उद्देशाने तक्रारदार क्र. 1 यांचे पती व तक्रारदार क्र. 2 वडील यांच्या बँक खात्यामधून रजिस्ट्रेशनकरीता रक्कम रु.20,000/- कंपनीमध्ये तक्रारदार क्र. 1 व 2 तसेच तक्रारदार क्र. 1 यांचे पति व मुलगा अभयकुमार यांचे नावे रजिस्ट्रेशन करण्यासाठी भरली. तसेच तक्रारदार क्र. 1 यांनी तिमाही व्याज परती स्कीममध्ये 2 वर्षे कालावधीकरीता गुंतवणूकीसाठी रक्कम रु.2,00,000/- (रुपये दोन लाख मात्र) अशी रक्कम दिली. प्रस्तुत रक्कम तक्रारदार क्र. 1 ने त्यांचे एच.डी.एफ.सी. बँकेतील खाते क्र. 2373 मधून R.T.G.S. करुन श्री. सुर्या इन्व्हेस्टमेंट कंपनीस दि. 28/7/2011 रोजी दिले. सदर गुंतवणूक केलेनंतर कंपनीने तक्रारदार क्र.1 यांना तिमाही व्याज परतीपोटी प्रत्येकी रक्कम रु.25,000/- चे एकूण 8 चेक तसेच रक्कम रु.2,00,000/- (रुपये दोन लाख मात्र) या मुद्दल रकमेचा चेक दिला. सोबत जाबदार कंपनीने तक्रारदाराला प्रॉमीसरी नोटीस लिहून दिली. सदर प्रॉमीसरी नोटवर जाबदार कंपनीचे मॅनेजींग डायरेक्टर समीर जोशी यांची सही आहे.
वर नमूद रक्कम रु.25,000/- चे व्याज स्वरुपात जाबदाराने तक्रारदाराला दिले एकूण 8 चेक पैकी 7 चे वटले. अशाप्रकारे तक्रारदार यांना दि. 28/4/2013 पर्यंतचे व्याज मिळाले. परंतू आठ चेक पैकी 1 चेकची रक्कम रु.25,000/- तसेच मुद्दल रक्कम रु.2,00,000/- (रुपये दोन लाख मात्र) तक्रारदाराला जाबदार यांचेकडून येणे आहे.
वर नमूद व्याजाची रक्कम तक्रारदाराला वेळोवेळी मिळत असलेने तक्रारदाराचा जाबदारावरील विश्वास दृढ झालेने तक्रारदार क्र. 1 यांनी त्यांचा मुलगा म्हणजेच तक्रारदार क्र. 2 चे नावे रकम रु.2,00,000/- (रुपये दोन लाख मात्र) आणखी गुंतवणूक केली. सदरची रक्कम तक्रारदाराचे पती कृष्णराव पुंडलीक साळुंखे यांचे एच.डी.एफ.सी. बँकेतील खाते क्र.13030 या खात्यामधून रक्कम रु.1,24,000/- व रयत सेवक बँकेतील खात्यामधून रक्कम रु.59,000/- तसेच एच.डी.एफ.सी. बँकेतील खात्यामधून रक्कम रु.44,000/- इतकी रक्कम काढून त्यापैकी रक्कम रु.2,00,000/- (रुपये दोन लाख मात्र) जाबदार इन्व्हेस्टमेंट कंपनीचे खात्यामध्ये दि. 2/9/2011 रोजी तिमाही व्याज परतीच्या स्किममध्ये 2 वर्षांकरीता गुंतविले. त्यावेळी कंपनीने तक्रारदार यांना तिमाही व्याज परतीचे रक्कम रु.25,000/- चे 8 चेक व मुद्दल रकमेचा रक्क्म रु.2,00,000/- चा एक चेक दिला व सोबत तक्रारदार क्र. 2 चे नावे प्रॉमिसरी नोट देखील लिहून दिली. प्रस्तुत प्रॉमिसरी नोटवर जाबदार क्र. 1 समीर जोशी यांची सही आहे. प्रस्तुत 8 चेकपैकी एकूण 6 चेक वटले. त्यामुळे तक्रारदाराला दि. 28/3/2012 पर्यंतचे व्याज मिळाले. उर्वरीत रक्कम रु.25,000/- चे दोन चेकची रक्कम रु.50,000/- तसेच मुद्दल रक्कम रु.2,00,000/- अद्याप जाबदार यांचेकडून तक्रारदाराला मिळालेले नाहीत. अशाप्रकारे जाबदार यांचेकडून तक्रारदार यांना एकूण रक्कम रु.2,50,000/- येणेबाकी आहे
दि. 2/9/2011 रोजी केलेल्या दुस-या गुंतवणूकीनंतर दि. 19/11/2011 रोजी पुणे येथील अरोरा टॉवरचे येथे एक सभा आयोजीत केली होती. तिथे जाबदार कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर समीर जोशी व पल्लवी जोशी तसेच कंपनीचे पदाधिकारी उपस्थित होते. तसेच जाबदार कंपनीत गुंतवणूक केलेले जवळजवळ 150 गुंतवणूकदार हजर होते. त्यावेळी जाबदार कंपनीचे मॅनेजींग डायरेक्टर यांनी प्रस्तुत जाबदार कंपनीचे काम यापुढे कंपनीमार्फत पुणे शहर परिसरात श्री. गंगाधर धमाले हे बिझनेस असोसिएटस् म्हणून काम पाहणार असलेचे कथन केले व यापुढे गुंतवणूक करणेची असल्यास सदर गुंतवणूकीची रक्कम श्री. गंगाधर धमाले यांचेमार्फत द्यावयाची सूचना सर्व ग्राहकांना दिली.
श्री. गंगाधर धमाले यांनी तक्रारदार क्र. 1 यांना वारंवार फोन करुन कंपनीच्या 25 महिन्यांमध्ये गुंतवणूक केलेली रक्कम अडीच पटीने वाढून मिळण्याबाबतच्या स्कीमची माहिती दिली व सदर स्कीममध्ये रक्कम गुंतविण्याचा आग्रह धरला. वर नमूद केलेप्रमाणे गुंतवणूक केलेल्या रकमेवरील तिमाही परतीचे व्याज तक्रारदार यांना वेळोवेळी दि. 28/4/2013 रोजी पर्यंत मिळत होते. त्यामुळे तक्रारदाराने जाबदारवर विश्वास ठेऊन तक्रारदार क्र. 1 ने स्वतःच्या नावे रक्कम रु.5,00,000/- RTGS करुन दि. 24/7/2012 रोजी कंपनीच्या बँक खातेवर जमा केली. सदर रक्कम ही 25 महिन्यांत अडीचपट या स्कीममध्ये गुंतविली होती. सदर वेळी जाबदार कंपनीने तक्रारदारने, टी.डी.एस. वगळता एन.जी.व्हॉस बँकेचा चेक नं. 7701551 हा चेक दिला. प्रस्तुत जाबदार कंपनीचे स्कीममध्ये गुंतविले रकमेची मॅच्युरिटी तारीख दि.24/8/2014 रोजी असून जाबदार कंपनी तक्रारदाराला रक्कम रु.11,75,000/- देणे लागत आहे. वर नमूद केलेप्रमाणे तक्रारदाराने जाबदार कंपनीत गुंतवणूक केली असताना, मार्च,2013 पासून अचानकपणे कंपनीने मुदतठेवीच्या रकमेवर व्याज देणे बंद केले. त्यामुळे गुंतवणूक केलेल्या सर्व ठेवीदारांनी गंगाधर धमाले यांचेकडे वेळोवेळी मुदत ठेव (मुद्दल रक्कम) व व्याज यांची रक्कम परतफेड करणेबाबत वारंवार चौकशी केली असता व मुदत ठेव (मुद्दल रक्कम) व व्याज यांची रक्कम परतफेड करण्याबाबत वारंवार चौकशी केली असता श्री. गंगाधर धमाले यांनी तक्रारदार यांना दि. 29/6/2013 रोजी सुर्या इन्व्हेस्टमेंट कंपनी तर्फे पुणे येथील सिध्दार्थ हॉल, सिंहगड रोड, पुणे येथे कंपनीच्या सर्व गुंतवणूकदारांची सभा आयोजीत केली असल्याचे कळविले. सदर सभेस जाबदार क्र.1 ते 4 हजर होते. त्यावेळी सर्व गुंतवणूकदारांनी गुंतवणूक रक्कम व व्याज परत मागणी केली असता, जाबदारांनी आमच्यावर विश्वास ठेवा, आम्ही तुमची सर्व रक्कम व्याजासह परत करणार आहोत. तसेच कंपनीमार्फत सर्व गुंतवणूकदारांची माफी मागून 22 जुलै,2013 नंतर 6 महिन्यामधेच सर्व गुंतवणूकदारांची रक्कम परत करणेत येईल असे आश्वासन दिले. तसेच जाबदार क्र. 1 व 2 यांनी स्वतःचे फोन नंबर सर्व गुंतवणूकदारांना दिले. परंतू प्रस्तुत फोन नंबरवर गुंतवणूकदारांनी फोन केला असता जाबदारांना फोन लागला नाही. त्यामुळे फोननंबर खोटे असल्याचे लक्षात आले. त्यानंतर काही महिन्यांनंतर दि.7/10/2013 रोजी इंडियन एक्स्प्रेस या वर्तमानपत्रात प्रसिध्द झालेल्या बातमीवरुन तक्रारदाराला समजलेली जाबदार क्र. 1 व 2 यांना नागपूर येथे अटक केली आहे. कारण प्रस्तुत जाबदार यांनी सुर्या इन्व्हेस्टमेंटमध्ये गुंतविले सर्व रकमेची अफरातफर करुन सर्व गुंतवणूकदारांचे आर्थिक फसवणूक केल्याबाबत तक्रारदाराला समजले. त्यामुळे तक्रारदाराला मानसिक धक्का बसला. तदनंतर तक्रारदाराने पुणे येथे दत्तवाडी पोलीस स्टेशन येथे जाबदार यांचेविरुध्द आर्थिक फसवणूक केलेबाबत फौजदारी गुन्हा केला. तक्रारदाराने नोकरीतून मिळविलेली आयुष्यभराची पुंजी जाबदारांकडे गुंतविली होती. परंतु प्रस्तुत रक्कम परत न मिळाल्याने तक्रारदारावर उपासमारीची वेळ आली व तक्रारदार यांना अत्यंत मानसिकत्रास झाला आहे. त्यामुळे जाबदार यांनी अनुचित व्यापारी व्यवस्थेचा अवलंब करुन तक्रारदार यांची फसवणूक करुन तक्रारदार यांना सदोष सेवा पुरविली आहे. त्यामुळे तक्रारदाराने प्रस्तुत जाबदार यांचेकडून गुंतवणूकीची सर्व रक्कम व नुकसानभरपाई मिळावी म्हणून सदर तक्रार अर्ज या मे. मंचात दाखल केला आहे.
2. तक्रारदाराने प्रस्तुत कामी जाबदार यांचेकडून गुंतवणूक रक्कम रुपये (मुदलीची रक्कम) रु.9,00,000/- (रुपये नऊ लाख मात्र) व त्यावरील व्याजाची रक्कम रु.7,50,000/- अशी एकूण रक्कम रु.16,50,000/- (रुपये सोळा लाख पन्नास हजार मात्र) जाबदार क्र.1 ते 4 यांनी तक्रारदार यांस वैयक्तिक व संयुक्तिकरित्या अदा करावी. तसे प्रस्तुत रकमेवर अर्ज दाखल तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष हाती पडेपर्यंत जाबदार यांचेकडून व्याज देण्यात यावे, तक्रारदाराला झाले मानसीक त्रासासाठी व नुकसानभरपाई म्हणून रक्कम रु.2,00,000/-, अर्जाचा खर्च म्हणून रक्कम रु.10,000/- जाबदार यांनी तक्रारदार यांना देणेबाबत योग्य ते हुकूम व्हावेत अशी विनंती तक्रारदाराने याकामी केली आहे.
3. तक्रारदाराने प्रस्तुत कामी नि. 2 कडे प्रतिज्ञापत्र, नि. 5 चे कागदयादीसोबत नि. 5/1 ते नि. 5/12 कडे अनुक्रमे जाबदार क्र. 1 ने तक्रारदाराला दिलेली प्रॉमीसरी नोट, जाबदाराने तक्रारदाराला व्याजाचे रकमेपोटी दिलेला धनादेश, रक्कम रु.2,00,000/- चा चेक, जाबदाराने तक्रारदाराला दिलेला चेक क्र. 0600819, जाबदाराने तक्रारदार क्र.2 यांस व्याजपरतीसाठी दिला रक्कम रु.25,000/- चा चेक क्र. 060880, जाबदार यांनी तक्रारदार क्र. 2 यास मुद्दल परतफेडीपोटी दिलेला रक्कम रु.2,00,000/- या युनियन बँक,शाखा नागपूर येथील चेक क्र. 060881, जाबदाराने तक्रारदार यास दिलेली प्रॉमीसरी नोट, रक्कम रु.12,50,000/- ची तक्रारदार यास जाबदाराने रक्कम रु.11,75,000/- चा युनियन बँकेचा दिलेला चेक, तक्रारदाराने जाबदारकडे आर.टी.जी.एस. ने रक्कम पाठवलेचा फॉर्म, जाबदार कंपनीच्या स्किमचे माहीतीपत्रक, तक्रारदाराने जाबदार विरुध्द पोलीस स्टेशनला दिलेली तक्रार नि.8,9,10,11 कडे जाबदार क्र. 1 ते 4 चे ‘NOT CLAIMED’ शे-याने परत आलेला नोटीसचा लखोटा, नि. 12 चे तक्रारदाराचे पुराव्याचे शपथपत्र, नि. 13 कडे पुरावा संपलेची पुरसीस, नि. 14 कडे लेखी युक्तीवाद वगैरे कागदपत्रे तक्रारदाराने याकामी दाखल केली आहेत.
4. प्रस्तुत कामी जाबदार क्र. 1 ते 4 यांना मे. मंचाने पाठविलेल्या नोटीस ‘NOT CLAIMED’ या शे-याने परत आलेल्या आहेत. प्रस्तुत नोटीसीचे लखोटे नि. 8 ते 11 कडे दाखल आहेत. सदर कामी जाबदार क्र. 1 ते 4 हे नोटीस लागू होवूनही जाबदार याकामी मे मंचात हजर राहीले नाहीत व त्यांनी तक्रारदाराचे तक्रार अर्जास म्हणणे/कैफीयत देवून तक्रार अर्जातील तक्रारदाराचे कथन खोडून काढलेले नाही किंवा याकामी कोणतेही आक्षेप जाबदाराने नोंदविलेले नाहीत. सबब जाबदार क्र. 1 ते 4 यांचेविरुध्द नि. 1 वर एकतर्फा आदेश पारीत झालेला आहे. सबब प्रस्तुत तक्रार अर्ज जाबदारांचे म्हणण्याविना एकतर्फा चालविणेत आला.
5. वर नमूद तक्रारदाराने दाखल केले सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन मे. मंचाने प्रस्तुत तक्रार अर्जाच्या निराकरणार्थ पुढील मुद्दयांचा विचार केला.
अ.क्र. मुद्दा उत्तर
1. तक्रारदार हे जाबदारांचे ग्राहक आहेत काय? होय.
2. जाबदार यांनी तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली आहे काय? होय.
3. तक्रारदार हे गुंतवणूकीची रक्कम व्याजासह
मिळणेस पात्र आहेत काय ? होय.
4. अंतिम आदेश? खालील आदेशात
नमूद केलेप्रमाणे
विवेचन-
6. वर नमूद मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत. कारण- तक्रारदाराने जाबदार इन्व्हेस्टमेंट कंपनीमध्ये गुंतवणूक स्कीममध्ये वेळोवेळी एकूण रक्कम रु.9,00,000/- (रुपये नऊ लाख मात्र) गुंतवणूक केली होती व आहे. तसेच या गुंतवणूक रकमेवर जाबदार यांनी आकर्षक व्याजदर देणेचे जाबदाराने मान्य व कबूल केलेले होते. तक्रारदाराने प्रस्तुत रकमेची गुंतवणूक जाबदार यांचेकडे केलेची बाब तक्रारदाराने नि. 5 चे कागदयादीसोबत दाखल केले नि. 5/1 ते 5/13 कडील सर्व कागदपत्रांवरुन सिध्द होते. तसेच याकामी जाबदार क्र. 1 ते 4 यांचेविरुध्द एकतर्फा आदेश नि.1 वर पारीत झालेला आहे. जाबदाराने तक्रारदाराचे तक्रार अर्जातील कोणतेही कथन खोडून काढलेले नाही. सबब तक्रारदाराने तक्रार अर्जात कथन केलेप्रमाणे जाबदार इन्व्हेस्टमेंट कंपनीकडे तक्रार अर्जात नमूद केलेप्रमाणे वेळोवेळी गुंतवणूक केलेचे स्पष्ट होते. त्यामुळे तक्रारदार हे जाबदार यांचे ग्राहक असून जाबदार क्र. 1 ते 4 हे तक्रारदाराचे सेवापुरवठादार आहेत हे निर्विवादपणे सिध्द होत आहे. सबब आम्ही मुद्दा क्र. 1 चे उत्तर होकारार्थी दिले आहे.
7. वर नमूद मुद्दा क्र. 2 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत. कारण- तक्रारदाराचे तक्रार अर्जातील कथनाप्रमाणे तक्रारदाराने जाबदार इन्व्हेस्टमेंट कंपनी वेळोवेळी रक्कम गुंतविली होती व आहे. प्रस्तुत गुंतवणूक रकमेवर जाबदार यांनी तक्रारदार यांना गुंतवणूक केले रकमेवरील व्याजाचे चेक अदा केले होते. प्रस्तुत चेकपैकी काही चेक वटले तर काही चेक वटले नाहीत. तसेच गुंतवणूकीची मुदत संपलेनंतर गुंतवणूक रक्कमही जाबदाराने तक्रारदाराला अदा केली नाही. तक्रारदाराने वारंवार रकमेची जाबदारांकडे मागणी केली असता जाबदाराने रक्कम अदा करणेस टाळाटाळ केली व रक्कम तक्रारदारला अदा केलेली नाही. ही बाब तक्रारदाराने नि. 5 चे कागदयादीसोबत दाखल केले सर्व कागदपत्रांवरुन स्पष्ट होते. तसेच प्रस्तुत कामी जाबदार क्र. 1 ते 4 यांना नोटीस लागू होवूनही ते मे. मंचात याकामी हजर झाले नाहीत. त्यामुळे जाबदार क्र. 1 ते 4 यांचेविरुध्द एकतर्फा आदेश पारीत झाला आहे. जाबदाराने तक्रारदाराने तक्रार अर्जात केलेले कोणतेही कथन खोडून काढलेले नाही. सबब तक्रारदाराने केलेल्या कथनावर विश्वास ठेवणे न्यायाचे होणार आहे. सबब प्रस्तुत जाबदाराने तक्रारदाराची गुंतवणूक केलेली रक्कम तक्रारदाराला परत अदा न केलेने तसेच व्याजापोटीचे न वटलेले चेकची रक्कम तक्रारदाराला अदा केले नसल्याने तक्रारदार यांना जाबदार यांनी सदोष सेवा पुरविलेचे स्पष्ट होत आहे. सबब मुद्दा क्र. 2 चे उत्तर होकारार्थी दिले आहे.
8. वरील मुद्दा क्र. 1 व 2 चे विवेचनानुसार व तक्रारदाराने नि. 5 चे कागदयादीसोबत दाखल सर्व कागदपत्रे यांचा उहापोह केला असता, तक्रारदार हे जाबदार क्र. 1 ते 4 यांचेकडून वैयक्तिक व संयुक्तिकपणे इन्व्हेस्टमेंट केलेली सर्व रक्कम रु.9,00,000/- (रुपये नऊ लाख मात्र) व प्रस्तुत रकमेवर जाबदार यांचेकडून येणे असलेले व्याजाची रक्कम रु.7,50,000/- अशी एकूण रक्कम रु.16,50,000/- व्याजासह मिळणेस पात्र आहेत. कारण जाबदार क्र. 1 ते 4 हे मे. मंचात नोटीस लागू होऊनही हजर राहीलेले नाहीत त्यांनी तक्रार अर्जास कोणतेही म्हणणे दिले नाही व तक्रार अर्जातील कोणतेही कथन खोडून काढलेले नाही. त्यामुळे तक्रारदार हे वर नमूद रक्कम जाबदार यांचेकडून व्याजासह मिळणेस पात्र आहेत असे या मे. मंचाचे स्पष्ट मत आहे. सबब आम्ही मुद्दा क्र.3 चे उत्तर होकारार्थी दिले आहे.
वर नमूद विवेचन, दाखल कागदपत्रे, पुराव्याची शपथपत्रे, लेखी व तोंडी युक्तीवाद यांचा विचार करता जाबदारांने तक्रार अर्जातील कोणतेही कथन खोडून काढलेले नाही. त्यामुळे प्रस्तुत तक्रार अर्जाचा निकाल एकतर्फा देणे न्यायोचीत वाटते. त्यामुळे तक्रार अर्जात तक्रारदाराने केले मागणीप्रमाणे जाबदार क्र. 1 ते 4 यांचेकडून वैयक्तिक व संयुक्तिकपणे वरील मुद्दा क्र.3 मध्ये नमूद केलेप्रमाणे रक्कम तक्रारदाराला मिळणे न्यायोचीत होणार आहे असे या मे. मंचाचे स्पष्ट मत आहे.
9. सबब प्रस्तुत कामी आम्ही खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करत आहोत.
आदेश
1. तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.
2. तक्रारदाराने जाबदाराकडे गुंवणूक केलेली मुद्दलाची रक्कम रु.9,00,000/- (रुपये
नऊ लाख मात्र) व प्रस्तुत रकमेवर जाबदारांकडून येणे असलेल्या व्याजाची
रक्कम रु.7,50,000/- (रुपये सात लाख पन्नास हजार मात्र) अशी एकूण
रक्कम रु. 16,50,000/- (रुपये सोळा लाख पन्नास हजार मात्र) जाबदार क्र.
1 ते 4 यांनी वैयक्तिक व संयुक्तीकपणे तक्रारदार यांना अदा करावी.
3. प्रस्तुत सर्व रकमेवर अर्ज दाखल तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष तक्रारदाराचे हाती
पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के प्रमाणे होणारे व्याज तक्रारदार यांना जाबदार क्र.
1 ते 4 यांनी वैयक्तिक व संयुक्तिरित्या अदा करावे.
4. तक्रारदाराला झाले मानसिक त्रासासाठी रक्कम रु.20,000/- (रुपये वीस हजार
मात्र) जाबदार क्र. 1 ते 4 यांनी वैयक्तिक प संयुक्तीकपणे तक्रारदाराला अदा
करावी.
5. तक्रार अर्जाचा खर्च म्हणून रक्कम रु.5,000/- (रुपये पाच हजार मात्र)
जाबदार क्र. 1 ते 4 यांनी तक्रारदाराला वैयक्तिक व संयुक्तिक अदा करावे.
6. वरील सर्व आदेशांची पूर्तता जाबदाराने आदेश पारीत झाले तारखेपासून 45
दिवसात करावी.
7. विहीत मुदतीत आदेशाचे पालन जाबदार यांनी न केलेस तक्रारदार
यांना जाबदारांविरुध्द ग्राहक संरक्षण कायदा कलम 25 व 27 प्रमाणे कारवाई
करणेची मुभा राहील.
8. सदर न्यायनिर्णयाच्या सत्यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्य पाठवणेत याव्यात.
9. सदर न्यायनिर्णय खुल्या मंचात जाहीर करणेत आला.
ठिकाण- सातारा.
दि. 20-11-2015.
(सौ.सुरेखा हजारे) (श्री.श्रीकांत कुंभार) (सौ.सविता भोसले)
सदस्या सदस्य अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा.