नि का ल प त्र : (व्दाराः- सौ. रुपाली धै. घाटगे, सदस्या) (दिनांक: 17-06-2016)
1. तक्रारदार यांनी वि.प. श्री सोन्या मारुती नागरी सहकारी पतसंस्था मर्या,. कोल्हापूर या पतसंस्थेत ‘शिवशक्ती मुदतबंद ठेव’ स्वरुपात गुंतविलेल्या रक्कमेची मागणी करुनही परत दिली नाही म्हणून तक्रारदारांनी प्रस्तुतचा तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा, कलम 12 अन्वये या मंचात दाखल केला आहे.
2. तक्रारदार यांची थोडक्यात तक्रार अशी आहे की, तक्रारदार यांनी वि.प. श्री सोन्या मारुती नागरी सहकारी पतसंस्था मर्या,. कोल्हापूर (यापुढे संक्षिप्तेसाठी “पतसंस्था” असे संबोधण्यात येईल) या पतसंस्थेत “शिवशक्ती मुदत बंद ठेव ” स्वरुपात गुंतविलेली होती त्याचा तपशील खालीलप्रमाणेः-
अ.क्र. | ठेव पावती क्र. | ठेव रक्कम रु. | ठेव ठेवलेची तारीख | मुदत संपलेची तारीख/मुदत | मुदतीनंतर मिळणारी रक्कम |
1 | 13470 | 5,000/- | 11-11-1999 | 11-11-2014 | रु. 50,000/- |
3. तक्रारदारांनी कु. दिक्षा हिचे भविष्यकालीन शिक्षणाची तरतुद म्हणून श्री शिवशक्ती अर्बन को. ऑप. क्रेडीट सोसायटी लि कोल्हापूर या संस्थेमध्ये “शिवशक्ती मुदत बंद ठेव” ठेवली होती. दरम्यानचे काळात सदर संस्था वि.प. नं. 1 संस्थेत विलीनीकरण झाले आहे. सदर संस्थेची कर्ज वसुली व ठेवीदारांच्या ठेवी परत करणेची जबाबदारी वि. प. नं. 1 यांची आहे.
4. तक्रारदार यांनी वि.प. पतसंस्थेकडे “शिवशक्ती मुदत बंद ठेव ” स्वरुपात गुंतविलेली ठेवीच्या रक्कमेची मुदत संपलेनंतर रक्कमेची मागणी व्याजासह केली असता पतसंस्थेने रक्कमा दिली नाही. तक्रारदारांना ठेवींच्या रक्कमांची अत्यंत निकड होती. तेव्हा तक्रारदारांनी वि.प. यांचेकडे मुदत संपलेनंतर रक्कमेची मागणी केली असता, वि.प. पतसंस्था यांनी तक्रारदार यांना ठेवीची रक्कम देणेस टाळाटाळ केली.
5. तक्रारदारांनी मे. उपनिबंधक व विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर यांचेकडे दि. 2-01-2015 रोजी अर्ज केला त्यांनी दि. 17-03-2015 रोजी वि.प. पतसंस्था यांना तक्रारदार यांना ठेव रक्कम देणेबाबत आदेश केले तरी सुध्दा तक्रारदारांची ठेव रक्कम परत दिली नाही. सबब, ठेवीची व्याजासह रक्कम, मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम रु. 15,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रु. 5,000/- ची मागणी तक्रार अर्जात विनंती केली आहे.
6. तक्रारदारांनी त्यांचे तक्रारीसोबत शिवशक्ती ठेव पावतीची छायांकित प्रत, तक्रारदारांनी वि.प. कडे दिलेला रक्कम मागणीचा अर्ज, उपनिबंधक सहकारी संस्था, कोल्हापूर यांनी वि.प.यांना दिलेला आदेश, तक्रारदारांनी विभागीय निबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर यांना दिलेला अर्ज व तक्रारीसोबत शपथपत्र दाखल केले आहे.
7. वि. प. नं. 1 व 2 यांनी तक्रारदारांचे तक्रारीस म्हणणे दाखल केले असून तक्रारीतील मजकूर चुकीचा व खोटा असलेचे कथन केले आहे. वि.प. यांनी त्यांचे म्हणण्यात तक्रारदाराची तक्रार चालणेस पात्र नाही. प्राथमिक मुद्दे काढून त्यावर निर्णय होणे आवश्यक आहे. तक्रारदार व वि.प. यांचेमध्ये ग्राहक व विक्रेता हे नाते निर्माण होत नाही. तक्रारदारांनी वि.प. कडे ठेव ठेवलेली नाही. वि.प. संस्थेने तक्रारदारांकडून कोणतीही रक्कम स्विकारलेली नाही. तक्रारदार दिक्षा ही अज्ञान असलेचे नमूद केले आहे. तिचे वयाबाबत कोणताही दाखला दाखल केला नाही. दिक्षा हिचेकडून अपाक म्हणून दिलीप निंबाळकर यांना तक्रार दाखल करणेचा कोणताही अधिकार नाही. तक्रारदारांनी वि.प. कडे कोणतीही ठेव ठेवली नाही व वि.प. यांनी कोणतीही रक्कम स्विकारलेली नाही.
वि.प. पुढे म्हणणेत नमूद करतात तक्रारदारास तक्रार दाखल करणेस कोणतेही कारण घडलेले नाही. तक्रारदार यांनी शिवशक्ती अर्बन को.क्रेडीट सोसायटी लि, या संस्थेमध्ये ठेव ठेवली असून तक्रारदार सदर संस्थेचे सभासद होते व त्यामुळे संस्थेच्या अटी व शर्ती तक्रारदारावर बंधनकारक आहेत. सदर संस्थेने दि. 14-08-2009 रोजी वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये ठराव करुन व्याज दर कमी केले आहे. संस्थेच्या सभासदांवर सभेमध्ये केलेले ठराव बंधनकारक आहेत. त्यास तक्रारदार यांनी ठरावास हरकत घेतलेली नव्हती. शिवशक्ती ठेवीचा व्याज दर हा 9 % केलेला आहे. त्यामुळे वि.प. तक्रारदार मागणी करतात ती रक्कम देणेस जबाबदार नाहीत.
तक्रारदारांनी ठेव रक्कमेवर 9 % व्याजाप्रमाणे कोणतीही देय रक्कम वि.प. देणे लागत नाहीत. शिवशक्ती अर्बन को.ऑप. क्रेडीट सोसायटी ही संस्था दि. 1-09-2012 रोजी वि.प. संस्थेमध्ये सहकार खात्याने विलीनीकरण केली आहे. वि.प. संस्थेच्या आलेल्या दप्तरावरुन ठेवीचे द.सा.द.शे. 9 % व्याज जमा केलेचे दिसून येते. वि.प. संस्थेकडे विलीनीकरणाच्यावेळी आलेल्या खाते उता-याप्रमाणे वि.प. यांची जबाबदारी येते. त्यामुळे वि. प. हे रक्कम फ. 5,000/- द.सा.द.शे. 9 % दराने देणेस जबाबदार आहेत. तक्रार अर्जास कोणतेही कारण घडलेले नाही. तक्रारदारांचा अर्ज खर्चासह नामंजूर करणेत यावा.
8. वि.प. यांनी म्हणणेसोबत तक्रारदार यांचा खाते उतारा क्र. 2197 व वि.प. यांनी श्री. राजेंद्र खं.पाटील यांचे नावे केलेला कारणापुरता उतारा तसेच शपथपत्र दाखल केले आहे. तसेच मा. उपनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर यांचेकडील विलिनीकरणाचा आदेश, श्री. शिवशक्ती अर्बन को. ऑप. क्रेडीट सोसायटी यांनी ‘दैनिक समाज’ मध्ये दिलेली नोटीस इत्यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
9) तक्रारदाराचा तक्रार अर्ज, लेखी म्हणणे व उभय दोन्ही बाजूंचे वकिलांचा युक्तीवाद यांचे अवलोकन करता, खालील मुद्दे विचारता घेता येतात.
अ. क्र. | मु द्दा | उत्तरे |
1 | तक्रारदार व वि.प. यांचे ग्राहक आहेत काय ? | होय |
2 | वि.प. यांनी तक्रारदार यांना देण्यात येणा-या सेवेत त्रुटी केली आहे काय ? | होय |
3 | तक्रारदार हे वि.प. यांचेकडून मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहेत का ? | होय |
4 | अंतिम आदेश काय ? | अंशत: मंजूर. |
का र ण मि मां सा –
मुद्दा क्र. 1 –
प्रस्तुत कामी तक्रारदार यांचे श्री. शिवशक्ती अर्बन को. ऑप. क्रेडीट सोसायटी लि कोल्हापूर यांचेकडे ठेव पावती क्र. 13470, ही ठेव रक्कम रु. 5,000/- दि. 11-11-1999 रोजी 15 वर्षे मुदतीसाठी ठेवलेली होती. तथापि, वि.प. यांनी त्यांचे म्हणणेमध्ये तक्रारदारांनी सदरची ठेव वि.प. यांचेकडे ठेवलेली नसलेने वि.प. यांचेकडून कोणताही मोबदला अथवा रक्कम स्विकारली नसलेने तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक होत नाहीत असे कथन केले आहे. त्याकारणाने तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत का ? हा वादाचा मुद्दा उपस्थित होतो त्या अनुषंगाने या मंचाने वि.प. यांनी दि. 27-04-2015 रोजी दाखल केलेल्या मा. उपनिबंधक यांचेकडील दि. 1-11-2012 रोजीच्या विलिनीकरणाचे आदेशाचे अवलोकन केले असता, सदर आदेशाच्या तारखेपासून श्री. शिवशक्ती अर्बन को. ऑप. क्रेडीट सोसायटी लि कोल्हापूर या संस्थेत असणा-या सर्व मत्ता व दायित्वे श्री. सोन्या मारुती नागरी सहकारी पतसंस्था मर्या, कोल्हापूर यांचेकडे हस्तांतरीत करुन त्याप्रमाणे श्री सोन्या मारुती नागरी सहकारी पतसंस्था मर्या, कोल्हापूर या पतसंस्थेचे कामकाज पुढे सुरु राहील असे आदेश दिलेले आहेत. प्रस्तुत विलिनीकरणाचे आदेशावरुन श्री. शिवशक्ती अर्बन को. ऑप. क्रेडीट सोसायटी लि, कोल्हापूर यांचेकडे असणा-या ठेवीदारांचे ठेवी परस्पर श्री. सोन्या मारुती नागरी सहकारी पतसंस्था मर्या, कोल्हापूर यांचेकडे वर्ग झालेल्या आहेत हे स्पष्टपणे दिसून येते. तक्रारदारांनी सदरची शिवशक्ती मुदतबंद ठेव पावती ठेव स्वरुपात श्री. शिवशक्ती अर्बन को. ऑप. क्रेडीट सोसायटी लि, कोल्हापूर यांचेकडे गुंतविलेली होती. सदरच्या ठेव प्रतीच्या छांयाकिंत प्रत या मंचात दाखल केलेली आहे. सबब, श्री. शिवशक्ती अर्बन को. ऑप. क्रेडीट सोसायटी लि, कोल्हापूर ही वि.प. सोन्या मारुती नागरी सहकारी पतसंस्था मर्या., कोल्हापूर या संस्थेमध्ये विलिनीकरण झालेले असलेमुळे कायदेशीर तरतुदीनुसार वि.प. नं. 1 सोन्या मारुती नागरी सहकारी पतसंस्था मर्या, कोल्हापूर या संस्थेचे तक्रारदार हे ‘ग्राहक’ आहेत असे या मंचाचे मत आहे. सबब, मुद्दा क्र. 1 चे उत्तर हे मंच होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र. 2 –
उपरोक्त मुद्दा क्र. 1 मधील विस्तृत विवेचनाचा विचार करता, सदरचे ठेव रक्कमेची मुदत संपताच सव्याज परत करण्याचे आश्वासन व हमी वि.प. नं. 1 संस्थेने दिलेली होती. सदरची ठेवीची मुदत संपलेनंतर दि. 22-12-2014 रोजी ठेव पावतीचे नियमाने होणारे रक्कमेची वि.प. यांचेकडे तक्रारदारांनी मागणी केली असता, सदरची ठेव रक्कम सव्याज परत करणेस टाळाटाळ केली. सबब, वि.प. यांनी तक्रारदारांची सदरची ठेव रक्कम सव्याजासह परत न देऊन तक्रारदारांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केली का ? हा वादाचा मुद्दा उपस्थित होतो. त्याअनुषंगाने या मंचाने दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता, दि. 14-08-2009 रोजी शिवशक्ती अर्बन को.ऑप. सोसायटी यांनी जनरल बॉडी बोलावून, वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये केलेल्या ठरावाचे या मंचाने अवलोकन केले असता, एप्रिल 2005 पासून कर्जे वाटप पुर्णपणे बंद केलेने एप्रिल 2007 पासून ठेवी स्विकारणे पुर्णपणे बंद केले आहे. त्याचा परिणाम संस्थेला मिळणारे उत्पन्नाचे साधन बंद झाले आहे. ठेवीचे व्याज दर नाईजास्तव कमी करावे लागलेले आहेत असा ठराव वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये झालेला आहे. त्याअनुषंगाने ‘दैनिक समाज’ या वृतपत्रामध्ये दि. 15-09-2009 रोजी जाहीर नोटीस देऊन सर्व सभासदांना कळविले देखील आहे. सदर ठरावाबाबत तक्रारदारांनी त्यासमयी कोणतीही तक्रार अथवा हरकत आजतागायत घेतलेची दिसून येत नाही अथवा त्याअनुषंगाने कोणताही कागदोपत्री पुरावा दाखल नाही. सबब, वरील सर्व बाबींचा विचार करता सदरचा ठराव हा तक्रारदार यांचेवर बंधनकारक आहे असे या मंचाचे मत आहे. तसेच मा. उपनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर यांनी वि.प. यांना दि. 17-03-2015 रोजी पत्राअन्वये तक्रारदार यांचे मुलीचे नावे असलेली ठेव रक्कम देय व्याजासह एकरकमी परत करणेचे वि.प. नं. 1 यांना कळविलेले आहे. वरील सर्व बाबींचा विचार करता तक्रारदारांनी वि.प. यांचेकडे वेळोवेळी ठेव रक्कमेची मागणी करुन देखील सदरची रक्कम व्याजासह आजतागायत वि.प. यांनी परत न देऊन तक्रारदारांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेली आहे असे या या मंचाचे मत आहे.
प्रस्तुत कामी तक्रारदारांनी मुदत बंद ठेव पावतीची व्याजासह होणारी रक्कम वि.प. नं. 1 व 2 यांनी वैयक्तीक व संयुक्तिकरित्या द्यावी अशी मंचास विनंती केलेली आहे. मा. राज्य आयोग यांचेकडील Writ Petition No. 117/2011 मंदाताई संभाजी पवार वि. स्टेट ऑफ महाराष्ट्र व Writ Petition NO. 11351/2010 चंद्रकांत हरी बडे वि. दि युनियन इंडिया व इतर या न्यायनिवाडयाचा विचार करता, वि.प. यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेने वि.प. नं. 1 वैयक्तीक व संयुक्तिकरित्या, वि.प. नं. 2 यांना संयुक्तिकरित्या तक्रारदारांची मुदत बंद ठेव रक्कम व्याजासहीत अदा करणेची जबाबदारी निश्चित करणे न्यायोचित होईल या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब, मुद्दा क्र. 2 चे उत्तर हे मंच होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र. 3 –
मुद्दा क्र. 1 व 2 मधील विस्तृत विवेचनाचा विचार करता वि.प. नं. 1 व 2 यांनी तक्रारदारांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केली आहे. प्रस्तुत प्रकरणी या मंचाने तक्रारदारांचा खाते उतारा क्र. 2197 चे अवलोकन केले असता “शिवशक्ती मुदत बंद ठेव” ठेव पावतीवर व्याज दर द.सा.द.शे. 15.5 % नमूद आहे तथापि सदरचा व्याज दर हा वार्षिक सर्वसाधारण सभेमधील ठरावानुसार दि. 1-10-2007 रोजीपासून द.सा.द.शे. 15.5 % व्याजदरावरुन द.सा.द.शे. 9 % इतका करणेत आलेचा दिसून येतो. सबब, वरील सर्व बाबींचा विचार करता वि.प. नं. 1 यांनी वैयक्तीक व संयुक्तिकरित्या, वि.प. नं. 2 यांनी संयुक्तिकरित्या तक्रारदारांना न्यायनिर्णय कलम 2 मध्ये नमूद केलेली मुदत ठेव पावतीची रक्कम अदा करावी. सदर ठेव पावती ठेवलेल्या तारखेपासून ते दि. 30-09-2007 रोजीपर्यंत द.सा.द.शे. 15.5% व्याजदराने अदा करावे, तदनंतर संपूर्ण रक्कम मिळेपावेतो द.सा.द.शे. 9% प्रमाणे व्याज अदा करावे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. तसेच तक्रारदारांना वि.प. नं. 1 व 2 यांनी सेवेत त्रुटी ठेवलेमुळे या मंचात तक्रार दाखल करणे भाग पडले. तक्रारदारांना मानसिक त्रास झाला त्यामुळे वि.प. नं. 1 यांनी वैयक्तीक व संयुक्तिकरित्या, वि.प. नं. 2 यांनी संयुक्तिकरित्या मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 3,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रु. 2,000/- तक्रारदारांना अदा करावे असे या मंचाचे मत आहे. सबब, मुद्दा क्र. 3 चे उत्तर हे मंच होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र. 4 –
सबब, हे मंच पुढीलप्रमाणे आदेश देत आहे. सबब, आदेश.
आ दे श
1 . तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो.
2 . वि.प. नं. 1 वैयक्तीक व संयुक्तिकरित्या, वि.प. नं. 2 यांनी संयुक्तिकरित्या तक्रारदार यांचे न्यायनिर्णयातील परिच्छेद कलम- 2 मध्ये नमुद असलेली ठेव पावतीवरील रक्कम व सदर रक्कमेवरील ठेव ठेवलेल्या तारखेपासून ते दि. 30-09-2007 रोजीपर्यंत द.सा.द.शे. 15.5 % व्याजदराने अदा करावे. तदनंतर सदर ठेव पावतीवर संपूर्ण रक्कम मिळेपावेतो द.सा.द.शे. 9 % दराने व्याज अदा करावे.
3. वि.प. नं. 1 वैयक्तीक व संयुक्तिकरित्या, वि.प. नं. 2 यांनी संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना मानसिक त्रासापोटी रु. 3,000/- (अक्षरी रुपये तीन हजार फक्त) तसेच तक्रार अर्जाचा खर्च रक्कम रु. 2,000/- (अक्षरी रुपये दोन हजार फक्त) अदा करावेत.
4. वर नमूद सर्व आदेशांची पुर्तता वि.प. नं. 1 वैयक्तीक व संयुक्तिकरित्या, वि.प. नं. 2 यांनी संयुक्तिकरित्या पतसंस्था यांनी आदेश पारीत तारखेपासून 45 दिवसांत करावी.
5. वरील आदेशांची पूर्तता वि.प. यांनी विहीत मुदतीत न केलेस तक्रारदार यांना वि.प. यांचेविरुध्द ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 कलम 25 व 27 प्रमाणे कारवाई करणेची मुभा राहील.
6. आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.