निकालपत्र:- (दि.07/01/2012) (व्दारा-सौ.वर्षा एन.शिंदे,सदस्या) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला वकीलांमार्फत हजर होऊन त्यांनी लेखी म्हणणे दाखल केले. अंतिम युक्तीवादाच्या वेळेस तक्रारदारचे वकीलांचा युक्तीवाद ऐकणेत आला, सामनेवाला व त्यांचे वकील गैरहजर. सदरची तक्रार सामनेवालांनी तक्रारदारांना सदनिकेपोटी रक्कम घेऊन सदनिकेचा ताबा दिलेला नाही अथवा सदनिकेपोटी घेतलेली रक्कमही परत दिलेली नसलेने दाखल करणेत आली आहे. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी:- सामनेवाला फर्मच्या वतीने साईमंदीर आपटेनगर, रिंगरोड, मोरे-मानेनगर या साईटवर घरकुल योजनेचे बांधकाम सुरु असून सदर साईटवर सामनेवाला यांनी ऑफिस बांधून तेथे घरकूल योजनेचे बुकींग सुरु केले. त्यांनी तशी वर्तमानपत्रात जाहिरात देखील दिलेला होती. सदर घरकुल योजना अनुक्रमे 270 व 540 चौ.फु. अशा प्रकारात सुरु होती व आहे. तक्रारदारास घर घेणेचे असलेने त्याने सदर ऑफिस व साईटवर माहे मार्च-2009 मध्ये भेट दिली. सामेनवालाकडील प्लॅन पाहून तक्रारदाराने 270 चौ.फु. युनिट क्र.748 खरेदी करणेचे ठरवले व त्याप्रमाणे सामनेवाला सांगितलेप्रमाणे रु.10,000/- इतकी बुकींग रक्कम दि.04/03/2009 रोजी रोख भरली. तसेच घरकुल योजनेकरता देना बॅकेचे कर्ज उपलब्ध करुन देणेचे व सदर प्रोजेक्टला बॅकेने वित्त पुरवठा करणेचे मान्य केले असलेचे सांगितले. सदर युनिटची किंमत रु.3,30,000/- इतकी निश्चित करुन बुकींग रक्कमेव्यतिरिक्त अजून रु.40,000/- दयावे लागतील असे सामनेवालांनी सांगितलेने दि.09/03/2009 रोजी त्यांचे ऑफिसवर रोख रु.40,000/- दिले. सदर रक्कमेची लेखी पोहोच फर्मच्यावतीने तक्रारदारास दिली आहे. तक्रारदाराने वारंवार सदर सामनेवालांकडे युनीटचे करारपत्रासाठी तगादा लावूनही त्यांनी टाळाटाळ केली. तक्रारदार स्वत: साईटवर गेले. त्यावेळी सदर युनीट अन्य इसमास दिलेचे तक्रारदारास समजून आले. तक्रारदाराने सामनेवालांकडे सन-2011 मध्ये जाऊन बदली युनीट घेणेची तयारी दर्शविली. सामनेवालांनी बदली युनिट देणेबाबत आश्वासित करुनही सामनेवालांनी बदली युनिट दिले नाही अथवा रक्कम परत दिली नाही. त्यामुळे तक्रारदारास जबरदस्त मानसिक आघात झाला. शेवटी तक्रारदाराने दि.05/05/2011 रोजी सामनेवालांना वकील नोटीस पाठवली. सदर नोटीस सामनेवालांना लागू होऊनही त्यांनी त्यास उत्तर दिले नाही. तसेच युनीटसाठी घेतलेली रक्कम परत केली नाही. तक्रारदाराची फसवणूक केलेली आहे. सबब सामनेवाला यांनी सेवेत कसुर केलेने प्रस्तुत तक्रार दाखल करणे भाग पडले आहे. सबब तक्रारदाराची तक्रार खर्चासह मंजूर करुन सामनेवालांनी रिसीट नं.213 व 214 अन्वये स्विकारलेली रक्कम अनुक्रमे रु.10,000/-, व रु.40,000/- तसेच मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- व तक्रारच्या खर्चापोटी रु.5,000/- अशी एकूण रक्कम रु.65,000/- द.सा.द.शे. 15 टक्के व्याजासह सामनेवालाकडून वसुल होऊन मिळावी अशी विनंती तक्रारदाराने सदर मंचास केली आहे. (3) तक्रारदाराने आपल्या तक्रारीसोबत सामनेवाला यांनी स्विकारलेली रक्कम रु.10,000/- ची रिसीट क्र.213 व रु.40,000/- ची रिसिट क्र.214, सामनेवाला यांना वकीलांमार्फत पाठविलेली नोटीस, सदर नोटीस सामनेवाला यांना लागू झालेची पोच पावती इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच दि.29/08/2011 रोजी सामनेवाला यांचे नियोजित जागी असलेले सिध्दनाथ कन्स्ट्रक्शनचा फोटो, युनिट क्र.748 दुस-यास दिलेचा फोटो, सामनेवाला यांचा घरकुल योजनेचा दिलेला नियोजित प्लॅन इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. (4) सामनेवाला क्र. 1 व 2 यांनी एकत्रितपणे म्हणणे दाखल केले आहे. त्यांचे लेखी म्हणणेनुसार तक्रार अर्ज चुकीचा,खोटा व खोडसाळ, साधनीभूत व वस्तुस्थितीचा विपर्यास करणा-या मजकुराचा असलेने मान्य व कबूल नाही. सामनेवालांनी तक्रारदाराची तक्रार परिच्छेदनिहाय नाकारली आहे. सामनेवाला पुढे असे प्रतिपादन करतात की, कसबा करवीर रि.स.नं. 867, 868/1, 878, 879, 880 मधील मिळकत विकसीत करीत असून सदर 25 चौ.मि., 40 चौ.मि. व 80 चौ.मि. घरकुले विकसीत करीत आहेत. तक्रारदाराने सामनेवालांकडे हया युनीटचे केव्हाही बुकींग केले नव्हते अगर नाही. तसेच देना बँकेचे कर्ज उपलब्ध करुन देतो अथवा प्रोजेक्टला बँकेने वित्त पुरवठा करणेचे मान्य केले आहे असे सांगितले नव्हते. वित्तीय संस्था या मागील 3 वर्षाचे इन्कम टॅक्स रिटर्न पाहून वित्त पुरवठा करतात. सामनेवाला पुढे असे प्रतिपादन करतात की, यातील तक्रारदार यांनी त्यांचे आर्थिक अडचणीमुळे सामनेवाला विकसीत करीत असलेल्या युनीट खरेदीची पूर्ण रक्कम देऊन खरेदी करु शकत नसलेबद्दल प्रत्यक्ष भेटून सांगितले. तक्रारदाराने सामनेवालांना भेटून केव्हाही करारपत्र/खरेदीपत्राबाबत विचारणा केलेली नव्हती व नाही. तसेच बदली युनीटबाबत सामनेवालांनी कधीही भाष्य केलेले नाही. मार्च-2011 मध्ये तक्रारदाराने सामनेवालांची भेट घेतली नव्हती. तक्रारदारने सामनेवाला यांना अभिलाषबुध्दीने खोटया मजकूराची वकीलांमार्फत नोटीस पाठवली. त्यावेळी सामनेवाला यांनी तक्रारदाराची भेट घेतली त्यावेळी तक्रारदाराने स्वत:चे आर्थिक अडचणीमुळे घरकुल घेऊ शकत नसलेबाबत सांगितले. सामनेवालांनी तक्रारदाराची फसवणूक केली नव्हती व नाही. सामनेवालांना तक्रारदाराची केव्हाही रक्कम रु.50,000/- मिळाली नव्हती अगर नाही. तक्रारदारानेच सामनेवाला क्र.2 यांना त्यांचे साईटवर जाऊन बदनामीकारक बोलले आहेत. तक्रारदाराची आर्थिक अडचण केवळ व केवळ सामनेवाला यांना त्रास देणेकरिता प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे. सबब तक्रारदाराची तक्रार खर्चासह फेटाळणेत यावी. तक्रारदाराकडून कॉम्पेसेंटरी कॉस्ट रु.10,000/- वसूल होऊन मिळावेत अशी विनंती सामनेवाला यांनी सदर मंचास केली आहे. (5) सामनेवाला यांनी आपले म्हणणेच्या पुष्टयर्थ कोणतेही कागदपत्रे प्रस्तुत कामी दाखल केलेली नाहीत. (6) तक्रारदाराची तक्रार व दाखल कागदपत्रे, सामनेवाला यांचे लेखी म्हणणे तक्रारदारांचा तोंडी युक्तीवाद इत्यादीचे बारकाईने अवलोकन केले असता पुढील महत्वाचे मुद्देनिष्कर्षास येतात. 1. सामनेवाला यांनी सेवात्रुटी केली आहे काय ? --- होय. 2. काय आदेश ? --- शेवटी दिलेप्रमाणे मुद्दा क्र.1:- अ)तक्रारदाराने तक्रार अर्जातील कलम 1 मध्ये सामनेवाला बांधकाम व्यावसायिक यांची सिध्दनाथ कन्स्ट्रक्शन नावाची फर्म असून सामनेवाला क्र. 1 व 2 हे प्रोप्रायटरी असलेचे नमुद केले आहे. सामनेवालांनी त्यांचे लेखी म्हणणेतील कलम 3 मध्ये नमुद मजकूर नाकारला आहे. मात्र सिध्दनाथ कन्स्ट्रक्श्न्स तर्फे प्रोप्रायटर म्हणून श्रीमती निलिमा नंदकिशोर डुबल, धंदा-डेव्हलपर व बिल्डर यांनी शपथपत्रासह लेखी म्हणणे दाखल केले आहे. तसेच सामनेवाला क्र.2 यांनी त्यांचे साईटवर तक्रारदार गेलेचे मान्य करतात. एका बाजूस प्रोप्रायटर असलेचे नाकबूल केले. मात्र सदर सिध्दनाथ कन्स्ट्रक्शनचे प्रोप्रायटरचे शपथपत्र दाखल कसे केले यावरुन सामनेवाला हे स्वच्छ हाताने सदर मंचासमोर आले नसलेचे स्पष्ट होते. ब) तक्रारदाराने दि.04/03/09 व दि.09/03/09 रोजीच्या अनुक्रमे पावती क्र.213 व 214 अन्वये अनुक्रमे रु.10,000/- व रु.40,000/- रोखीत दिलेचे नमुद सामनेवालांनी दिलेल्या पावत्या दाखल केल्या आहेत. सामनेवालांनी त्यांचे लेखी म्हणणेमधील कलम 8 मध्ये रक्कम रु.50,000/- तक्रारदाराकडून सामनेवालांना मिळाली नसलेचे नमुद केले आहे. मात्र सदर पावत्या बनावट,बोगस, खोटया आहेत असे कोठेही प्रतिपादन केलेले नाही. तसेच सदर पावत्या सामनेवालांनी चॅलेंज केलेल्या नाहीत. सदर पावत्या खोटया असतील तर ती सिध्द करणेची जबाबदारी सामनेवालांची आहे; याबाबत सामनेवालांनी मौन बाळगले आहे. तसेच तक्रारदारांनी दि.05/05/2011 रोजी अॅड.प्रशांत देसाई यांचेमार्फत वकील नोटीस पाठवली होती. त्यास सामनेवालांनी उत्तरही दिलेले नाही. मात्र त्यांनी त्यांचे लेखी म्हणणेमधील कलम 7 मध्ये खोटी नोटीस पाठवलेचे तसेच सामनेवालांनी तक्रारदाराची भेट घेतलेचे मान्य केले आहे. तसेच तक्रारदार हे स्वत:चे आर्थिक अडचणीमुळे युनीट घेऊ शकत नसलेचे तक्रारदाराने त्यांना स्वत: सांगितलेचे लेखी म्हणणेमधील कलम 5 मध्ये मान्य केले आहे. याचा अर्थ तक्रारदार व सामनेवाला यांचेमध्ये व्यवहारावर चर्चा झाली होती हे स्पष्ट होते. केवळ सामनेवालांनी त्यांचे लेखी म्हणणेमध्ये तक्रार खोटी आहे असे म्हणता येणार नाही. सदर तक्रार खोटी असलेची सिध्द करणेची जबाबदारी सामनेवालांची आहे. तक्रारदाराने सदर घरकुल योजनेचे फोटो तसेच माहितीपत्रक सादर केली आहेत. याबाबत सदर योजना सामनेवालांनी कार्यान्वीत केली होती हे सामनेवालांनी मान्य केले आहे. तसेच माहितीपत्रकानुसार युनीट नं.748 चा फोटोवरुन सदर योजना तीच होती ही वस्तुस्थिती निर्विवाद आहे. सर्वसामान्य माणसाचे स्वत:चे घर असावे असे स्वप्न असते ते सत्यात आणणेसाठी प्रसंगी बचत करुन, रक्कम साठवून, कर्ज काढून दागदागिने विकून तसेच अन्य मार्गाने पैसा उपलब्ध करुन प्रयत्न करत असतो. तक्रारदारचा धंदा हा वॉचमेकरचा आहे. सामनेवाला यांनी केलेल्या जाहिरातीस अनुसरुन तक्रारदाराने त्यांचेशी संपर्क साधून 274 चौ. फु. युनिट घेणेसाठी बुकींगपोटी रु.10,000/- व तदनंतर रु.40,000/- सामनेवाला यांना दिलेची वस्तुस्थिती दाखल कागदपत्रावरुन निर्विवाद आहे. मात्र सामनेवाला यांनी त्यास सदर युनिट दिलेले नाही. अथवा त्याची रक्कम परत न करुन अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करुन सेवात्रुटी केली आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. तक्रारदारास दयावयाचे युनिट अन्य व्यक्तीस विकलेमुळे तक्रारदार सदर युनिटपोटी सामनेवालांकडे जमा केलेली रक्कम व्याजासह मिळणेस पात्र आहे. सामनेवालांचे सेवात्रुटीमुळे तक्रारदार हा झालेल्या मानसिक त्रासापोटी व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम मिळणेस पात्र आहे. सबब आदेश. आदेश (1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येते. (2) सामनेवालांनी तक्रारदारास त्यांचेकडून घेतलेली एकूण रक्कम रु.50,000/-, रक्कम स्विकारले तारखेपासून ते संपूर्ण अदा करेपर्यंत द.सा.द.शे.15 टक्के व्याजाने अदा करावेत. (3) सामनेवालांनी तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रक्कम रु.2,000/-(रु.दोन हजार फक्त) व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.1,000/-(रु.एक हजार फक्त) अदा करावेत.
| [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |