::: नि का ल प ञ:::
(मंचाचे निर्णयान्वये, मा. सौ. कल्पना जांगडे (कुटे) मा.सदस्या)
(पारीत दिनांक :- 11/08/2017)
1. तक्रारकर्त्याने सदरची तक्रार ग्राहक सरक्षंण कायदा 1986 चे कलम 12 अन्वये दाखल केली आहे. सदर तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे.
2. तक्रारदारकर्ती ही चंद्रपूरची रहिवासी असून ती नागपूर येथे शिक्षण घेत आहे. स्वतःचा नित्य उपयोग व अडी अडचणीत संपर्कासाठी तक्रारकर्तीने दिनांक 1/11/2013 रोजी विरूध्द पक्ष क्र.3 मायक्रोमॅक्स कंपनीने निर्मित केलेला बोल्ट ए-67 मॉडेलचा मोबाईल, विरूध्द पक्ष क्र.3 चे चंद्रपूर येथील अधिकृत विक्रेता गैरअर्जदार क्र.1 यांच्याकडून किंमत रू.5350/- ला विकत घेतला. विरूध्द पक्ष क्र.2 हे विरूध्द पक्ष क्र.3 कंपनीचे ऑथेाराइझ्ड सर्विस सेंटर आहे. मोबाईल विकत घेतल्यानंतर थोडयाच कालावधीत त्यामध्ये वारंवार सिम नेटवर्क बंद होणे, कॅमेरा बंद, हॅंडसेट ओव्हरहिटींग, डिस्प्ले टचस्क्रिन कॅलिबरेशन, सॉफ्टवेअर, मदरबोर्ड इत्यादि अनेक बिघाड उत्पन्न झाले. तक्रारकर्त्याने विरूध्द पक्ष क्र.1 यांच्याकडे तक्रार केली असता त्यांच्या सांगण्यावरून तक्रारकर्त्याने विरूध्द पक्ष क्र.2 यांच्याकडे दिनांक 10/12/2013 रोजी मोबाईल जॉबशिटनुसार दुरूस्तीकरीता दिला, व विरूध्द पक्ष क्र.2 ने तो दुरूस्त करून तक्रारकर्त्याला परत केला. परंतु मोबाईलमध्ये थोडया थोडया कालावधीनंतर पुन्हा पुन्हा बिघाड झाल्यामुळे अनुक्रमे दिनांक 7/5/2014, दिनांक 13/5/2014, दिनांक 10/6/201 व दिनांक 23/6/2014 रोजीदेखील तो दुरूस्तीकरीता विरूध्द पक्ष क्र.2 कडे द्यावा लागला व विरूध्द पक्ष क्र.2 ने तो दुरूस्त करून तक्रारकर्त्याला परत केला. सदर मोबाईलमध्ये वारंवार दोष निर्माण झाले असून त्यात निर्मीती दोष असल्याने त्याची वारंवार दुरूस्ती करूनही त्यातील दोष दुर झालेले नाहीत व त्यामुळे तक्रारकर्तीला अडचणींना तोंड द्यावे लागले. म्हणून तक्रारकर्तीच्या वडिलांनी दिनांक 5/9/2014 रोजी विरूध्द पक्ष क्र.1 ते 3 यांना पंजीकृत डाकेने तक्रार नोटीस पाठवला. परंतु सदर नोटीस प्राप्त होवूनही विरूध्द पक्ष क्र.1 ते 3 यांनी नोटीसची पुर्तता केली नाही व उत्तरदेखील दिले नाही. सबब तक्रारकर्त्याने मंचासमक्ष विरूध्द पक्षकारांविरूध्द तक्रार दाखल करुन त्यामध्ये अशी मागणी केली आहे की, विरूध्द पक्षांनी तक्रारकर्त्यांस न्युनतापूर्ण सेवा दिलेली आहे असे घोषित करावे, विरूध्द पक्ष क्र.1 ते 3 यांनी तक्रारकर्त्याला मोबाईलची किंमत रू.5350/- परत करावी किंवा हॅंडसेट बदलून नवीन हॅंडसेट द्यावा तसेच मानसीक व आर्थीक त्रासापोटी नुकसान-भरपाई रू.50,000/- व तक्रारीचा खर्च रू.15,000/- विरूध्द पक्ष क्र.1 ते 3 यांनी तक्रारकर्त्यांला द्यावे असे आदेश पारीत करण्यांत यावेत अशी विनंती केली.
3. अर्जदाराची तक्रार स्विकृत करुन विरूध्द पक्ष क्र.1 ते 3 यांचेविरुध्द नोटीस काढण्यात आले. गैरअर्जदार क्र.1 यांना नोटीस प्राप्त होउनसुध्दा ते मंचासमक्ष हजर झाले नाहीत. सबब दि. 15/06/2017 रोजी नि.क्र.19 वर त्यांचेविरूध्द प्रकरण एकतर्फी चालविण्याचा आदेश मंचाने पारीत केला.
4. गैरअर्जदार क्र. 3 ला नोटीस प्राप्त झाल्यानंतर ते प्रकरणात उपस्थीत झाले परंतु त्यांनी लेखी उत्तर दाखल न केल्यामुळे दिनांक 6/5/2016 रोजी, गैरअर्जदार क्र.3 यांचे लेखी उत्तराशिवाय प्रकरण पुढे चालविण्यांत येत आहे असा नि.क.1 वर आदेश पारीत करण्यांत आला.
5. विरूध्द पक्ष क्र.2 ने मंचासमक्ष हजर होवून आपले लेखी म्हणणे दाखल केले आहे. त्यामध्ये त्यांनी मान्य केले की विरूध्द पक्ष क्र.2 हे विरूध्द पक्ष क्र.3 कंपनीचे अधिकृत सर्व्हीस सेंटर म्हणून काम पहात होते.त्यांनी पुढे नमूद केले की, तक्रारकर्त्याने मोबाईलच्या वॉरंटी कालावधीत जेंव्हा जेंव्हा सदर मोबाईल विरूध्द पक्ष क्र.2 यांच्याकडे दुरूस्तीसाठी दिला त्या त्या वेळी त्यांनी तक्रारकर्त्याला मोबाईल विनामुल्य दुरूस्त करून दिलेला आहे. सदर मोबाईलमध्ये क्षमतेपेक्षा जास्ती फाईल्स सेव्ह केल्याने मोबाईल ओव्हर हिटींग होत होते. तक्रारकर्त्याने दि.23/6/2014रोजी विरूध्द पक्ष क्र.2 कडे मोबाईल दुरूस्तीकरीता दिला असता त्याचे सॉफ्टवेअर अपडेट करून अर्जदाराला मोबाईल परत करण्यांत आला. आपल्या विशेष कथनात विरूध्द पक्ष क्र.2 यांनी नमूद केले की, दिनांक 15/10/2014 पर्यंत विरूध्द पक्ष क्र.2 हे विरूध्द पक्ष क्र.3 कंपनीचे अधिकृत सर्व्हीस सेंटर म्हणून काम पहात होते परंतु त्यानंतर विरूध्द पक्ष क्र.3 यांनी साई उर्जा इंडो लिमिटेड यांना मोबाईल सर्व्हीसींग सेंटरची जबाबदारी दिल्यामुळे विरूध्द पक्ष क्र.2 यांचा विरूध्द पक्ष क्र.3 यांच्याशी दिनांक 15/10/2014 पासून कोणताही संबंध राहिलेला नाही. त्यांनी पुढे नमूद केले की, विरूध्द पक्ष क्र.2 हे विरूध्द पक्ष क्र.3 कंपनीचे अधिकृत सर्व्हीस सेंटर म्हणून काम पहात होते आणि प्रस्तूत तक्रार ही मोबाईल हॅंडसेटमधील निर्मिती दोषाबाबत आहे. त्याकरीता सर्व्हीस सेंटरची कोणतीही जबाबदारी नसून, निर्मिती दोषाकरीता केवळ निर्माता हा जबाबदार असल्यामुळे विरूध्द पक्ष क्र.2 यांना प्रस्तूत तक्रारीत अनावश्यकरीत्या पक्ष करण्यांत आले आहे. शिवाय विरूध्द पक्ष क्र.2 यांनी तक्रारकर्त्याकडून मोबाईल दुरूस्तीबाबत कोणताही मोबदला स्विकारलेला नाही.त्यामुळे तक्रारकर्ता हा विरूध्द पक्ष क्र.2 यांचा ग्राहक नाही. सबब प्रस्तूत तक्रार विरूध्द पक्ष क्र.2 यांच्याविरूध्द खारीज करण्यांत यावी अशी त्यांनी मंचास विनंती केली आहे.
6. अर्जदाराने दाखल केलेली तक्रार, दस्तावेज, शपथपत्र, लेखी युक्तिवाद तसेच विरूध्द पक्ष क्र.2 यांचे लेखी उत्तर,लेखी उत्तरालाच शपथपत्र समजण्यांत यावे असा दाखल केलेला पुरसीस व लेखी युक्तिवाद तसेच अर्जदार व विरूध्द पक्ष क्र.2 यांचे परस्परविरोधी कथनावरून खालील मुद्दे मंचाच्या विचारार्थ घेण्यात आले. त्यावरील निष्कर्ष आणि त्याबाबतची कारण मिमांसा पुढील प्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
- तक्रारकर्ती ही विरूध्द पक्ष क्र.1 ते 3 यांची ग्राहक आहे काय ? होय
- विरूध्द पक्ष क्र.1 व 3 यांनी तक्रारकर्तीस न्युनतापूर्ण सेवा दिली
आहे काय ? होय
- विरूध्द पक्ष क्र.1 व 3 यांनी अर्जदाराप्रती अनुचित व्यापार पध्दतीचा
अवलंब केला आहे काय ? होय
- आदेश काय ? अंतीम आदेशाप्रमाणे
कारण मिमांसा
मुद्दा क्रं. 1 बाबत ः-
7. तक्रारकर्तीने दिनांक 1/11/2013 रोजी विरूध्द पक्ष क्र.3 मायक्रोमॅक्स कंपनीने निर्मित केलेला बोल्ट ए-67 मॉडेलचा मोबाईल, विरूध्द पक्ष क्र.3 चे चंद्रपूर येथील अधिकृत विक्रेता गैरअर्जदार क्र.1 यांच्याकडून किंमत रू.5350/- ला विकत घेतला. विरूध्द पक्ष क्र.2 हे विरूध्द पक्ष क्र.3 कंपनीचे ऑथेाराइझ्ड सर्विस सेंटर आहे. मोबाईलमध्ये दोष निर्माण झाल्यानंतर तक्रारकर्तीने सदर मोबाईल विरूध्द पक्ष क्र.2 यांच्या सर्व्हीस सेंटरला दुरूस्तीला दिला. यासंदर्भात तक्रारकर्तीने मोबाईल खरेदी केल्याची पावती, वॉरंटी कार्ड तसेच सर्व्हीस जॉबशिट दाखल केली आहे. यावरून तक्रारकर्ती ही विरूध्द पक्ष क्र.1 ते 3 यांची ग्राहक आहे हे सिध्द होते. सबब मुद्दा क्रंमाक 1 चे उत्तर हे होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. 2 व 3 बाबत ः-
8. तक्रारकर्तीची तक्रार व तिने दाखल केलेल्या दस्तावेजांचे अवलोकन केले असता असे निदर्शनांस येते की, तक्रारकर्तीने विरूध्द पक्ष क्र.3 चा निर्मीत बोल्ट ए-67 मॉडेलचा मोबाईल गैरअर्जदार क्र.1 कडून दिनांक 01/11/2013 रोजी खरेदी केला. सदर मोबाईलची वॉरंटी ही मोबाईल खरेदी केल्याच्या दिनांकापासून एक वर्षाच्या कालावधीकरीता आहे. सदर मोबाईल वॉरंटी कालावधीमध्ये असतांनाच त्यामध्ये दोष निर्माण झाले. सदर मोबाईलचा कॅमेरा व अॅप्लीकेशन्स, डिस्प्ले टचस्क्रिन, बॅटरी लो व इतर दोष असल्याने योग्य पध्दतीने काम करीत नव्हते व वारंवार नादुरूस्त होत असल्यामुळे तक्रारकर्तीने विरूध्द पक्ष क्र.2 यांच्याकडे अनुक्रमे दिनांक 10/12/2013, दिनांक 7/5/2014, दिनांक 13/5/2014, दिनांक 10/6/2014 व दिनांक 23/6/2014 रोजी तो दुरूस्तीकरीता विरूध्द पक्ष क्र.2 कडे दिला. याबाबत विरूध्द पक्ष क्र.2 यांनी दिनांक 13/5/2014 व 10/06/2014 रोजीच्या दिलेल्या जॉबशिटमध्ये मोबाईलमधील दोष नमूद करण्यांत आलेले असून तक्रारकर्तीने सदर जॉबशीटस् प्रकरणात दाखल केल्या आहेत. त्यामधील दुरूस्तीचे कारण या कॉलममध्ये, टचस्क्रिन नॉट वर्कींग, बॅड इमेज, डिस्प्ले ब्लॅक, बॅटरी लो चार्जींग, ओव्हर हिटींग, कॅमेरा नॉट वर्कींग इत्यादि दोष नमूद आहेत. मोबाईलच्या वॉरंटी कालावधीत विरूध्द पक्ष क्र.2 यांनी प्रत्येक वेळी सदर मोबाईल दुरूस्त करून तक्रारकर्तीला परत केला व त्याचे सॉफ्टवेअरदेखील बदलून दिले. परंतु सदर मोबाईलची वारंवार दुरूस्ती करूनही त्यातील दोष दुर झालेले नाहीत. यावरून सदर मोबाईलमध्ये निर्मिती दोष आहे हे सिध्द होते. शिवाय विरूध्द पक्ष क्र.1 विक्रेता व विरूध्द पक्ष क्र.3 मोबाईलचे निर्माता यांनी तक्रारकर्तीचे सदर म्हणणे खोडून काढलेले नाही. त्यामुळे तक्रारकर्तीला मोबाईलच्या वापरापासून वंचीत रहावे लागले व तिला गैरसोय व मनस्ताप सहन करावसा लागला हे तक्रारकर्तीचे म्हणणे ग्राहय धरण्यायोग्य आहे असे मंचाचे मत आहे. तक्रारकर्तीने दिनांक 23/6/2014 रोजी मोबाईल पुन्हा दुरूस्तीकरीता विरूध्द पक्ष क्र.2 यांच्याकडे दिला असता विरूध्द पक्ष क्र.2 यांनी तो दुरूस्ती न करताच तक्रारकर्तीला परत केला असे तक्रारकर्तीने शपथपत्रामध्ये परिच्छेद क्र.3 मध्ये नमूद केले आहे तसेच विरूध्द पक्ष क्र.2 ने सुध्दा आपल्या कथनात नमूद केले आहे.
तक्रारकर्तीने दाखल केलेले विरूध्द पक्ष क्र.3 यांचे वॉरंटी कार्डची पडताळणी केली असता त्यातील कॉलम क्र.2 मध्ये नमूद आहे की,
“For the entire warranty period, Micromax or its authori
\ed service centre/personal will at their discretion, without any charges and subject to clause 6 repair or replace the defective product. Repair or replacement may involve the use of same or equivalent reconditioned unit. Micromax will return the repaired handset or can replace with another same or equivalent handset to the Customer in full working condition. All replaced, faulty parts or components will become the property of Micromax.”
9. विरूध्द पक्ष क्र.1 व 3 यांनी अर्जदाराच्या उपरोक्त वादातील मोबाईलमध्ये निर्मीती दोष असूनही दोष दुर न झाल्यामुळे वॉरंटी अटींनुसार मोबाईल बदलून देणे आवश्यक होते. परंतु त्यांनी मोबाईल बदलूनही दिला नाही अथवा पैसेदेखील परत केले नाहीत व ही विरूध्द पक्ष क्र.1 व 3 यांनी तक्रारकर्तीप्रती अवलंबीलेली अनुचीत व्यापार पध्दती व न्युनतापूर्ण सेवा आहे हे सिध्द होते असे मंचाचे मत आहे. विरूध्द पक्ष क्र.2 सर्व्हीस सेंटर असल्यामुळे मोबाईलमधील निर्मीती दोषाकरीता त्यांना जबाबदार ठरविता येत नाही असे मंचाचे मत आहे. सबब मुद़्दा क्रंमाक 2 व 3 चे उत्तर हे होकारार्थी दर्शविण्यात येत आहे.
- मुद्दा क्रं. 1 ते 3 च्या विवेचनावरुन खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे..
अंतीम आदेश
- तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजुर करण्यात येत आहे.
2. विरूध्द पक्ष क्र.1 व 3 यांनी वैयक्तिक अथवा संयुक्तरीत्या तक्रारकर्तीला वादातील मायक्रोमॅक्स बोल्ट ए-67 मॉडेलचा मोबाईल बदलवून त्याऐवजी त्याच मॉडलेचा दुसरा नवीन दोषरहीत मोबाईल द्यावा अथवा मोबाईलची किंमत रू.5350/- तक्रारकर्तीला सदर आदेशाची प्रत प्राप्त झाल्याचे तारखेपासुन 30 दिवसाचे आत परत करावी.
3. विरूध्द पक्ष क्र.1 व 3 यांनी , तक्रारकर्तीला झालेल्या शारिरीक, मानसीक ञास व तक्रारीच्या खर्चापोटी एकूण रू.10,000/- वैयक्तिक अथवा संयुक्तरीत्या आदेशाची प्रत प्राप्त झाल्याचे तारखेपासुन 30 दिवसाचे आत तक्रारकर्तीला दयावी.
4. तक्रारकर्तीला निर्देश देण्यांत येतात की तक्रारकर्तीने वादातील मायक्रोमॅक्स बोल्ट ए-67 मॉडेलचा मोबाईल विरूध्द पक्ष क्र.1 यांना प्रस्तूत आदेशाची प्रत प्राप्त झाल्याचे तारखेपासुन 30 दिवसाचे आत परत करावा.
5. विरूध्द पक्ष क्र.2 यांच्याविरूध्द कोणताही आदेश नाही.
6. आदेशाची प्रत उभय पक्षांना विनामुल्य पाठविण्यात यावी.
चंद्रपूर
दिनांक – 11/08/2017
( अधि.कल्पना जांगडे (कुटे) ) ( अधि. किर्ती गाडगिळ (वैदय) )( श्री उमेश व्ही.जावळीकर)
मा.सदस्या. मा.सदस्या. मा. अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, चंद्रपूर.