(मंचाचा निर्णय: श्री. मिलींद केदार- सदस्य यांचे आदेशांन्वये) -// आ दे श //- (पारित दिनांक : 11/08/2010) 1. प्रस्तुत तक्रार ही तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारां विरुध्द मंचात दिनांक 05.02.2010 रोजी दाखल केली असुन प्रस्तुत तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालिल प्रमाणे :- 2. प्रस्तुत तक्रारीत तक्रारकर्तीने नमुद केले आहे की, तिने गैरअर्जदार संस्थेकडे चिखले ले-आऊट, हुडकेश्वर, नागपूर येथील खसरा नं.54, प.ह.नं.39, मौजा-हुडकेश्वर, मौजा नं.32 येथील प्लॉट क्र. 106, क्षेत्रफळ 1850 चौ.फूट व प्लॉट क्र. 107, क्षेत्रफळ 1745 चौ.फूट रु.50/- प्रमाणे अनुक्रमे एकूण किंमत 99,000/- व रु.87,250/- ला विकत घेण्याचा सौदा केला होता. तक्रारकर्तीने नमुद केले आहे की, तिने प्लॉट क्र.1 चे सगळे हप्ते भरले असुन शेवटची किस्त दि.07.04.2006 रोजी भरलेली आहे. तसेच प्लॉट क्र.106 चे रु.25,000/- गैरअर्जदाराकडे भरलेले आहे. तक्रारकर्तीने नमुद केले आहे की, ती उर्वरित संपूर्ण रक्कम भरण्यांस तयार आहे, परंतु गैरअर्जदारांनी सदर प्लॉटचे विक्रीपत्र करुन ताबा दिलेला नाही व अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब करुन सेवेत त्रुटी दिलेली आहे, म्हणून तक्रारकर्तीने प्रस्तुत तक्रार मंचासमक्ष दाखल केलेली आहे. 3. तक्रारकर्तीने प्रस्तुत तक्रारीव्दारा प्लॉट क्र.106 व 107 चे विक्रीपत्र करुन देण्याबाबत किंवा गैरअर्जदार संस्थेकडे जमा केलेले रु.1,10,000/- दि.04.01.2006 पासुन 18% व्याजासह परत करण्याची मागणी केलेली आहे. तसेच सदर प्लॉटचे विक्रीपत्र करुन न दिल्यामुळे तिला झालेल्या मानसिक व शारीरिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून रु.2,50,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु.10,000/- ची मागणी केलेली आहे. 4. प्रस्तुत प्रकरणी मंचामार्फत गैरअर्जदार क्र.1 व 2 यांना नोटीस बजावण्यांत आली असता, त्यांना नोटीस मिळाल्यानंतर ते मंचात हजर झाले असुन त्यांनी आपले लेखी उत्तर खालिल प्रमाणे दाखल केलेले आहे. 5. गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी आपल्या लेखी उत्तरात तक्रारकर्तीने त्यांचेसोबत दोन प्लॉट विकत घेण्याचा सौदा केल्याची बाब मान्य केलेली आहे. तक्रारकर्तीकडून सदर भुखंडांचे एक वर्षाचे मुदतीत प्रति माह रु.10,000/- घेण्याचे ठरलेले होते परंतु त्यापैकी तक्रारकर्तीने फक्त रु.58,000/- दि.19.01.2004 पर्यंत भरलेले होते व उर्वरित रकमेच्या मागणीची नोटीस तक्रारकर्तीला वारंवार दिल्यावर सुध्दा तिने सदर रकमेचा भरणा केलेला नाही. म्हणून गैरअर्जदारांनी तक्रारकर्तीचे दोन्ही भुखंड रद्द केल्याचे नमुद केले आहे. तसेच तक्रारकर्ती सन 2004 पासुन त्यांची ग्राहक नसल्यामुळे तिला प्रस्तुत तक्रार करण्याचा अधिकार नाही व प्रस्तुत तक्रार 6 वर्षांनंतर दाखल केली असल्यामुळे ती मुदतबाह्य असुन ती खर्चासह खारिज करण्यांत यावी अशी मंचास विनंती केलेली आहे. -// नि ष्क र्ष //- 1. तक्रारकर्तीचे कथन व तक्रारीत दाखल दस्तावेजांवरुन तिने गैरअर्जदारांकडे प्लॉट क्र.106 व 107 रु.99,000/- व रु.87,250/- मध्ये विकत घेण्याचा सौदा केला होता, ही बाब स्पष्ट होते. तक्रारकर्तीने तक्रारीसोबत दाखल केलेल्या दस्तावेज क्र.1 चे अवलोकन केले असता तिने प्लॉट क्र.106 करता रु.25,000/- व प्लॉट क्र.107 करता रु.84,000/- गैरअर्जदारांकडे जमा केल्याचे स्पष्ट होते त्यामुळे तक्रारकर्ती ही गैरअर्जदारांची ‘ग्राहक’ ठरते. 2. प्रस्तुत प्रकरणात दाखल दस्तावेजांचे अवलोकन केले असता तक्रारकर्तीने गैरअर्जदारांकडे दोन्ही प्लॉटची एकूण रक्कम रु.1,09,000/- जमा केल्याचे नमुद केले आहेत. गैरअर्जदारांनी आपल्या उत्तरात तक्रारकर्तीसोबत सदर प्लॉटचा सौदा झाल्याचे व प्रति माह रु.10,000/- तक्रारकर्तीने देण्याबाबत ठरल्याचे नमुद केले आहे. परंतु त्यापैकी रु.58,000/- दि.19.01.2004 पर्यंत भरल्याचे नमुद करुन उर्वरित रकमेची नोटीस वारंवार तक्रारकर्तीला दिल्यानंतर सुध्दा तिने रकमेचा भरणा न भरल्यामुळे प्रस्तुत दोन्ही प्लॉट रद्द केल्याचे म्हटले आहे. परंतु मंचासमक्ष याबाबत कोणतेही दस्तावेज दाखल न केल्यामुळे गैरअर्जदारांचे म्हणणे मान्य करणे मंचास योग्य वाटत नाही. तक्रारकर्तीने गैरअर्जदाराकडून प्लॉटची खरेदी करुन मिळणे बाबत प्रार्थना केलेली आहे. परंतु आजची सदर प्लॉटची काय स्थिती आहे, तसेच प्लॉट उपलब्ध आहे किंवा नाही हे तक्रारकर्तीने मंचासमक्ष सिध्द केलेले नाही. म्हणून मंचाचे असे स्पष्ट मत आहे की, गैरअर्जदारांनी तक्रारकर्तीला तिने जमा केलेली रक्कम रु.1,09,000/- परत करण्याचे आदेशीत करणे कायदेशिर व न्यायोचित राहील. 3. तक्रारकर्तीने प्रस्तुत प्रकरणात तिला प्लॉटचे विक्रीपत्र करुन न दिल्यामुळे व जमा रक्कम परत न केल्यामुळे झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून रु.2,50,000/- ची व तक्रारीच्या खर्चाचे रु.10,000/- मिळण्याबाबत मागणी केलेली आहे. परंतु मंचाचे मते सदर मागणी पुराव्या अभावी अवास्तव असल्यामुळे ती मान्य करता येत नाही. परंतु न्यायोचितदृष्टया ती शारीरिक व मानसिक त्रासापोटी रु.3,000/- व तक्रारीच्या खर्चाचे रु.2,000/- मिळण्यांस पात्र ठरते. 4. प्रस्तुत प्रकरणात दाखल दस्तावेजांचे तसेच युक्तिवादाचे अवलोकन केले असता मंच वरील निष्कर्षांवरुन खालिल प्रमाणे आदेश पारित करण्यांत येते. -// अं ति म आ दे श //- 1. तक्रारकर्तीची तक्रार अंशतः करण्यांत येते. 2. गैरअर्जदारांना आदेश देण्यांत येते की, त्यांनी तक्रारकर्तीला रु.1,09,000/- आदेशाची प्रत मिळाल्याचे दिनांकापासुन 30 दिवसांचे आंत परत करावे. अन्यथा सदर रक्कम तक्रार दाखल दिनांक 05.02.2010 पासुन संपूर्ण रक्कम अदा होई पर्यंत द.सा.द.शे. 9% व्याजासह देय राहील. 3. गैरअर्जदारांना आदेश देण्यांत येते की, त्यांनी तक्रारकर्तीला शारीरिक व मानसिक त्रासापोटी रु.3,000/- व तक्रारीच्या खर्चाचे रु.2,000/- अदा करावे. 4. तक्रारकर्त्याला मा. सदस्यांकरीता दाखल केलेल्या (ब,क) प्रति परत कराव्यात. 5. उभय पक्षांना आदेशाची प्रत निशुल्क उपलब्ध करुन द्यावी. (मिलींद केदार) (रामलाल सोमाणी) सदस्य प्र.अध्यक्ष |