नि.32
मे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष – श्री ए.व्ही.देशपांडे
मा.सदस्या - श्रीमती वर्षा शिंदे
ग्राहक तक्रार अर्ज क्र. 336/2010
तक्रार नोंद तारीख : 13/07/2010
तक्रार दाखल तारीख : 14/07/2010
निकाल तारीख : 18/07/2013
----------------------------------------------
गुलाबहुसेन अब्दुल शिलेदार
रा.कसबे डिग्रज, ता.मिरज जि.सांगली ....... तक्रारदार
विरुध्द
1. श्री शिवसाई नागरी सहकारी पतसंस्था मर्या. सांगली
श्रीनिवास आर्केड, 840, मेनरोड, सराफकट्टा
सांगली साठीचे चेअरमन श्री दत्तात्रय रामचंद्र भोसले
2. श्री दत्तात्रय रामचंद्र भोसले, चेअरमन
रा.साईनाथनगर, जुना धामणी रोड,
दत्तनवनाथ मंदिराजवळ, सांगली
3. श्री मानसिंग राजाराम शिंदे, व्हा.चेअरमन
रा.माळगेवाडा, खोली नं.1,
राममंदिराजवळ, डॉ चोपडे हॉस्पीटलशेजारी, सांगली
4. श्री महादेव रामचंद्र हारेकर, संचालक
रा.चांदणी चौक, अजिंक्य नगर पतसंस्थेसमोर,
माळी चित्रमंदिर शेजारी, सांगली
5. श्री नालसाब मौलाली मुल्ला, संचालक
रा.100 फुटी रोड, ड्रेनेज पॉइंटशेजारी,
हनुमाननगर, गुलाब कॉलनी, सांगली
6. श्री शहाजी रामचंद्र भोसले, संचालक
रा. 100 फुटी रोड, ड्रेनेज पॉइंटशेजारी,
हनुमाननगर, गुलाब कॉलनी, सांगली
7. श्री संजय बाळासाहेब मगदूम, संचालक
रा.विकास चौक, 100 फुटी रोड, सांगली
8. श्री पवन आण्णा सुर्यवंशी, संचालक
रा.मु.पो.धामणी, ता.मिरज जि. सांगली
9. श्री इजाज इसाक रहिमतपुरे, संचालक
रा.चांदणी चौक, स्टार मटन शॉप, सांगली
10. श्री संजय बापू मोरे, संचालक
रा.चेंबर ऑफ कॉमर्स बिल्डींग समोर,
महावीर नगर, आशिर्वाद पान शॉप, सांगली
11. श्री दिपक कल्लाप्पा गिड्डे, संचालक
रा.मु.पो. कसबे डिग्रज, इंदिरानगर, जि. सांगली
12. श्री विठ्ठल महादेव हुग्गे, संचालक
रा.मु.पो. शिरटी, ता.शिरोळ, जि. कोल्हापूर
13. सौ सुलोचना विठ्ठल मोरे, संचालिका
रा.मु.पो.गारगोटी, ता.भुदरगड जि.कोल्हापूर
14. सौ शोभा बाळासो गवळी, संचालिका
मु.पो.दुधगांव ता.मिरज जि. सांगली
15. श्री डी.जी.कुलकर्णी, प्रशासक,
श्री शिवसाई नागरी सहकारी पतसंस्था मर्या. सांगली
रा.कृष्णा अपार्टमेंट, दुसरा मजला, गल्ली नं.2,
विद्यानगर, वारणाली, सांगली ..... जाबदार
तक्रारदार तर्फे : अॅड श्री यू.एच.निकम
जाबदार क्र.6 व 15 तर्फे : अॅड श्री डी.बी.कांबळे
जाबदार क्र.11 तर्फे : अॅड श्री एस.जी.कोठावळे
जाबदारक्र.1 ते 5, 7 ते 9, 10, 12 ते 14 : एकतर्फा
- नि का ल प त्र -
द्वारा: मा. सदस्या : श्रीमती वर्षा शिंदे
1. प्रस्तुतची तक्रार सामनेवाला यांनी मागणी करुनही ठेव रक्कम अदा न केलेने दाखल केली आहे. सामनेवाला क्र.1 ते 15 यांना नोटीस आदेश झाला. सामनेवाला क्र.6, 11 आणि 15 हे नोटीस लागू झाल्यानंतर वकीलांमार्फत हजर झाले व त्यांनी म्हणणे दाखल केले. सामनेवाला क्र.15 यांनी नि.26 ला म्हणणे दाखल केले तर नि.22 वर सामनेवाला क्र.6 ने म्हणणे दाखल केले. नि.24 वर सामनेवाला क्र.11 यांनी म्हणणे दाखल केले. सामनेवाला क्र.2, 7, 8, 9 हे नोटीस लागू होऊनही हजर नसल्याने त्यांचेविरुध्द एकतर्फा आदेश करण्यात आला. नि.19 वरील आदेशानुसार सामनेवाला क्र.1, 3, 5, 10, 12, 13, 14 यांना जाहीर नोटीस काढलेली आहे. प्रस्तुत दैनिकाची प्रत नि.21/1 वर दाखल आहे. उर्वरीत सामनेवालांविरुध्द हे मंच एकतर्फा आदेश पारीत करीत आहे.
2. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात अशी –
तक्रारदार यांचे नावे खालील तपशीलाप्रमाणे ठेवी ठेवल्या होत्या. सामनेवाला क्र.1 ही महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्यान्वये नोंदणीकृत संस्था असून सामनेवाला क्र.2 हे चेअरमन, सामनेवाला क्र.3 हे व्हाईस चेअरमन तर सामनेवाला क्र.4 ते 14 हे संचालक आहेत व सामनेवाला क्र.15 हे प्रशासक आहेत. सामनेवाला क्र.1 तक्रारदाराने सामनेवाला क्र.1 पतसंस्थेमध्ये मुदत ठेव अंतर्गत खालील तपशीलाप्रमाणे ठेवी ठेवलेल्या होत्या.
अ.क्र. |
नाव |
रक्कम |
ठेवतारीख |
पावती क्र. |
मुदत संपणेची तारीख |
1 |
गुलाबहुसेन अब्दुल शिलेदार |
10000 |
17/11/04 |
262 |
18/11/05 |
2 |
गुलाबहुसेन अब्दुल शिलेदार |
30000 |
17/11/04 |
261 |
18/11/05 |
3 |
गुलाबहुसेन अब्दुल शिलेदार |
25000 मुदतीनंतर रु.50000 |
30/11/04 |
34 |
30/6/10 |
पावती नं.262 ची दि.17/11/04 पासून दावा तारखेपर्यंत होणारी व्याजाची रक्कम रु. 6,800/-, पावती नं.261 ची दि.17/11/04 पासून दावा दाखल पर्यंत होणारी व्याजाची रक्कम रु. 20,400/- असे मिळून एकूण रक्कम रु.1,17,200/- वसूल होवून येणेचे आहेत.
नमूद संस्थेवर नमूद सामनेवाला क्र.15 हे प्रशासक म्हणून काम करीत असलेचे समजलेवर तक्रारदार माहे जून 2009 मध्ये त्यांना समक्ष भेटले व वर नमूद ठेवीबाबतची माहिती दिली. त्यांना तीन मुदत ठेवपावत्या दाखविल्या. सदर वेळी सामनेवाला क्र.15 यांनी कर्जदारांच्याकडून वसुल होणा-या रकमेतून तक्रारदाराचे सर्व पैसे परत करता येतील असे सांगून सदर ठेवीच्या रकमा तक्रारदारास त्यांच्या आय.डी.बी.आय. बँकेतील खात्यावर जमा करीत असल्याचे सांगून व नमूद बँकेची शाखा लोणंद येथील तक्रारदाराचा खाते नंबर चलनावरती लिहून घेवून त्यांचेकडून 10 चलने घेतली व सदर तिनही मूळ ठेवपावत्या तक्रारदाराच्या सहया करुन घेवून समनेवाला क्र.15 ने त्याच्याकडे ठेवून घेतल्या व तसे दि.12/6/09 रोजी तक्रारदाराकडून लिहून घेतले. याबाबत सामनेवाला यांनी दि.13/6/09 रोजी तक्रारदारास पोच दिलेली आहे.
सदर रकमा निवृत्तीनंतर जीवन जगण्यास उपयोगी व्हाव्यात या विश्वासापोटी तक्रारदाराने सामनेवाला संस्थेत ठेवलेल्या होत्या. सदर रकमांची मागणी करुनही रकमा न दिल्याने तक्रारदारास मानसिक त्रास झालेला आहे. शेवटी दि.25/5/10 रोजी वकील श्री यू.एच.निकम यांचेमार्फत नोटीस पाठवून रकमा देणेबाबत कळविले असता त्यास सामनेवाला क्र.15 यांनी दि.8/6/10 रोजी उत्तरी नोटीस पाठवून तक्रारदाराने वर नमूद केलेली कथने मान्य केली आहेत. तदनंतरही तक्रारदाराने ठेवीची मागणी करुनही कोणतीही दाद न दिल्याने प्रस्तुतची तक्रार दाखल करणे भाग पडले. प्रस्तुत मागणी केलेल्या रकमा देणेस सामनेवाला क्र.1 ते 15 वैयक्तिक व संयुक्तरित्या जबाबदार आहेत. सबब तक्रारदाराची तक्रार खर्चासह मंजूर होवून तक्रारदारास तक्रारअर्ज कलम 7 मध्ये नमूद केलेप्रमाणे तक्रार दाखल करेपर्यंतची एकत्रित रक्कम रु.1,17,200/- व तक्रारअर्ज दाखल तारखेपासून संपूर्ण रक्कम अदा होईपर्यंत सदर रकमेवर द.सा.द.शे.12 टक्केप्रमाणे होणारे व्याज सामनेवाला यांना तक्रारदारास देणेबाबत हुकूम व्हावा तसेच तक्रारीचा खर्च रु.5,000/- व मानसिक त्रासापोटी रु.10,000/- देणेबाबतही हुकूम व्हावा अशीही विनंती केली आहे.
3. तक्रारदाराने तक्रारीच्या पुष्ठयर्थ नि. 3 वर शपथपत्र व नि.5 चे फेरिस्तसोबत नि.5/1 ला संचालकांची यादी, नि.5/2 ते 5/4 ला ठेवपावत्यांच्या सत्यप्रती, नि.5/5 वर वकील नोटीस, नि. 5/6 ला पोस्टाची पोचपावती, नि.5/7 वर नोटीस न स्वीकारता परत आलेला नोटीस लिफाफा, नि.5/8 ला सामनेवाला क्र.2 यांनी दिलेली उत्तरी नोटीस इ. कागदपत्रे दाखल केली आहेत. नि.30 वर पुराव्याचे शपथपत्र दिले आहे व नि.31 वर पुरसीस दिली आहे.
4. सामनेवाला क्र.6 व 11 यांनी दाखल केलेल्या लेखी म्हणणेमध्ये साम्य असलेने त्यांनी म्हणण्यात नमूद केलेला वेगळा मुद्दा वगळता साम्य असलेले म्हणणे पुढीलप्रमाणे – सामनेवाला 6 व 11 यांनी मान्य केले कथनाखेरिज तक्रारदाराची तक्रार परिच्छेदनिहाय नाकारली आहे. सामनेवाला क्र.1 ही पतसंस्था असून सामनेवाला क्र.15 हे सन 2007 पासून सदर संस्थेवर प्रशासक होते. दि.31/3/09 रोजी ते सेवानिवृत्त झाले. त्यांनी दि.30/3/09 व 25/8/09 रोजीचे पत्राने उपनिबंधक, सहकारी संस्था, मिरज यांना अन्य अधिका-यांची नेमणूक करणेबाबत कळविले होते व आहे. तक्रारदाराचे ठेव पावत्यांचे कथन मान्य केलेले आहे. मात्र त्याबाबतचे अन्य कथन नाकारले आहे. सामनेवाला क्र.6 पुढे असे प्रतिपादन करतात की, वस्तुतः नमूद संस्थेवर सामनेवाला क्र.15 प्रशासक असल्याने संस्थेमधील अनेक अडचणींचा विचार करुन सामनेवाला यांनी यथाशक्ती प्रत्येक ठेवीधारकास कर्जदाराकडून रक्कम वसूल होईल तशी ठेव रक्कम परत करण्यासाठी प्रयत्न करीत होते. तक्रारदारांनी सामनेवाला यांना दि.13/6/09 रोजी प्रत्यक्ष भेटण्यास आले असता संस्थेतील अडचणी लक्षात घेवून त्यावरील उपाय म्हणून तक्रारदारानेच आपल्या लेखी हस्ताक्षरात अर्ज देवून तक्रारदार हे बाहेरगावी रहात असलेने तसेच वरचेवर सांगली येथे येणे शक्य नसलेने तक्रारदारच्या ठेवपावत्या संस्थेतील कोणाही कर्जदाराच्या खात्यावरती जमा करण्यास तयार आहे व कर्जदारकाडून वसूल होईल अशी रक्कम त्याचे आय. डी.बी.आय.बॅंकेकडील खाते क्र.462100-109000981 या खातेवरती ठेव रक्कम जमा करणेबाबत स्पष्टपणे लेखी स्वरुपात दिले आहे व तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.15 यांना जमा करणेविषयी स्पष्ट लेखी स्वरुपात अधिकार दिले आहेत व तसे अर्जात नमूद केले आहे. सदर व्यवहार तक्रारदाराने स्वेच्छेने केला आहे. तशी पोच 13/6/09 रोजी घेतली आहे. त्यास संचालक मंडळ जबाबदार नाही. सामनेवाला क्र.15 तक्रारदारास वारंवार फोनवरुन संस्थेची स्थिती कळवित होते तरीही सामनेवालांना नाहक त्रास देण्याच्या उद्देशाने प्रस्तुतचा तक्रारअर्ज दखल केला आहे.
5. सामनेवाला क्र.11 यांनी सामनेवाला क्र.6 चे म्हणण्यामधील मुद्याव्यतिरिक्त त्याने पुढील वेगळे कथन त्यांचे म्हणण्यात केले आहे. सामनेवाला क्र.11 याने सामनेवाला क्र.1 पतसंस्थेच्या संचालकपदाचा राजीनामा दि.15/5/2004 रोजी संस्थेकडे दिला होता. तो दि.20/5/04 च्या संचालक मंडळाच्या सभेमध्ये मंजूर करण्यात आला. तसेच सदरचा राजीनामा सामनेवाला क्र.12 यांनी मंजूर केलेबाबत मा.उपनबंधक सहकारी संस्था, मिरज यांना लेखी पत्र देवून सामनेवाला क्र.2 यांच्या सहीने कळविले आहे. राजीनाम्यानंतर सामनेवाला क्र.11 चा सामनेवाला क्र.1 या संस्थेशी कोणताही हितसंबंध राहिलेला नव्हता व नाही. सामनेवाला क्र.11 स्वतः त्याचे कुटुंब अथवा नातेवाईक नमूद संस्थेचे कर्जदार किंवा थकबाकीदार नाहीत तसेच महाराष्ट्र राज्य सहकार खात्याने अथवा मा. उपनिबंधक सहकारी संस्था, मिरज यांनी सामनेवाला क्र.11 याला त्याचे कारकीर्दीबाबत जबाबदार धरुन कोणतीही तक्रार कोणत्याही न्यायालयात दाखल केलेली नाही, तशी नोटीस अथवा समन्स काढलेले नाही तसेच जबाबदारीही निश्चित केलेली नाही. त्यामुळे सामनेवाला क्र.11 यांनी राजीनामा दिला असल्याने व तो मंजूर झालेला असल्यामुळे त्यांचेविरुध्दची तक्रार फेटाळण्यात यावी अशी विनंती केली आहे.
6. सामनेवाला क्र.6 व 11 यांनी आपल्या म्हणण्याच्या पुष्ठयर्थ अनुक्रमे नि.23 व 25 ला शपथपत्र दाखल केलेले आहे. या व्यतिरिक्त कोणताही पुरावा सामनेवाला क्र.6 व 11 यांनी दाखल केलेला नाही.
7. सामनेवाला क्र.15 यांनी त्यांच्या लेखी म्हणण्यात मान्य केले कथनाखेरीज अन्य तक्रार परिच्छेदनिहाय नाकारली आहे. सामनेवाला पुढे असे प्रतिपादन करतात की, सामनेवाला क्र.15 हे या पतसंस्थेवर प्रशासक म्हणून होते हे तक्रारदाराचे कथन बरोबर आहे. दि.31/3/2009 रोजी ते सेवानिवृत्त झालेले आहेत. त्यांनी दि.30/3/2009 व 25/8/009 च्या पत्राने उपनिबंधक सहकारी संस्था, मिरज यांना प्रशासक म्हणून अन्य अधिका-यांची नेमणूक करण्याबाबत कळविले होते व आहे. तक्रारदाराची ठेव पावत्यांबाबतची कथने सर्वसाधारणपणे बरोबर आहेत. तक्रारदाराने त्यांचे वकील यू.एच.निकम यांचेमार्फत पाठविलेल्या दि.25/5/10 रोजीचे नोटीसीस सामनेवाला यांनी वकीलांचेमार्फत दि.8/6/10 रोजी उत्तरी नोटीस पाठविलेली आहे. नमूद ठेवरकमा देणेबाबत सामनेवाला क्र.15 हे वैयक्तिक व संयुक्तरित्या जबाबदार नाहीत. सामनेवाला पुढे असेही प्रतिपादन करतात की वस्तुतः सामनेवाला यांनी संस्थेमध्ये असलेल्या अनेक अडचणींचा विचार करुन इतर सामनेवालांच्या सहकार्याने यथाशक्ती प्रत्येक ठेवीदारास कर्जदाराकडून रक्कम वसूल होईल तशी ठेव रक्कम परत करणेबाबतचा पुरेपूर प्रयत्न करीत होते. दि.13/6/09 रोजी तक्रारदाराने त्यांचे समक्ष भेट घेवून व संस्थेतील अडचणी लक्षात घेवून त्यावर उपाय म्हणून तक्रारदाराचे लेखी हस्ताक्षरात अर्ज देवून व तो बाहेरगावी रहात असल्याने, वरचेवर सांगली येथे येणे शक्य नसल्याने तक्रारदार यांनी संस्थेकडे कोणत्याही कर्जदाराच्या खात्यावरती मूळ ठेवपावत्या जमा करण्यास तयार आहे व कर्जदाराकडून वसुल होईल तशी रक्कम तक्रारदाराचे आय.डी.बी.आय.बॅंकेतील खाते नं.462100-109000981 या खातेवरती ठेवीची रक्कम जमा करणेबाबत स्पष्टपणे लेखी स्वरुपात दिले आहे व त्याप्रमाणे समक्ष भेटीअंती हिशेब पाहण्याचा व कोणत्याही कर्जदारास सदर ठेवी जमा करण्याविषयी स्पष्ट लेखी स्वरुपात आदेश दिला आहे व तसे त्याचे अर्जात स्पष्टपणे नमूद केले आहे. सदर व्यवहार स्वेच्छेने केलेला असल्याने तक्रारदाराचे कोणतेही वैयक्तिक व्यवहार राहिले नाहीत. त्यामुळे सामनेवाला क्र.1 ते 15 व सामनेवाला क्र.1 चे संचालक मंडळ जबाबदार नाही. सदर तक्रारदारास सदर व्यवहाराची पोच दि.13/6/09 रोजी घेतलेली आहे तसेच तक्रारदारास फोनवरुन सत्य वस्तुस्थिती कळवित होते. दि. 31/3/09 रोजी सामनेवाला क्र.15 सेवानिवृत्त झालेले असल्याने सामनेवाला क्र.15 यांना जबाबदार धरता येणार नाही. सबब त्यांचेविरुध्दची तक्रारदाराची तक्रार फेटाळण्येत यावी अशी विनंती केली आहे. सामनेवाला क्र.15 याने त्यांचे म्हणण्याचे पुष्टयर्थ नि.26अ वर शपथपत्र दाखल केले आहे. तसेच 27 चे फेरिस्तप्रमाणे एकूण 4 कागदपत्रे दाखल केलेली आहेत. नि.27/1 वरील उत्तरी नोटीस, नि.27/2 व 27/3 वर उपनिबंधक सहकारी संस्था यांना दिलेले पत्र, नि. 27/4 वर तक्रारदाराने सामनेवाला क्र.15 यांना दिलेले पत्र अशी कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
8. तक्रारदाराची तक्रार, सामनेवालाचे म्हणणे व पुराव्यादाखल कागदपत्रे यांचा विचार करता सदर प्रकरणी खालील मुद्दे आमच्या निष्कर्षाकरिता उपस्थित होतात.
मुद्दे उत्तरे
1. तक्रारदार हे सामनेवाला क्र.1 ते 15 यांचे ग्राहक होतात काय ? होय.
2. सामनेवाला क्र.1 ते 15 यांनी तक्रारदार यांना सेवा देण्यामध्ये त्रुटी
केली आहे काय ? होय.
3. तक्रारदार ठेव रकमा व्याजासह व अन्य मागण्या मिळण्यास पात्र
आहे काय ? होय.
4. अंतिम आदेश खालीलप्रमाणे
कारणे
मुद्दा क्र.1 ते 4
9. तक्रारदाराने सामनेवाला क्र.1 यांचेकडे तीन मुदतबंद ठेवपावत्या ठेवलेल्या होत्या ही वस्तुस्थिती नमूद सामनेवाला क्र.1 संस्थेचे संचालक अनुक्रमे सामनेवाला क्र.6 व 11 तसेच सामनेवाला क्र.15 प्रशासक यांनी मान्य केलेले आहे. सबब तक्रारदार हा सामनेवाला यांचा ठेवीदार ग्राहक आहे या निष्कर्षाप्रत हे मंच आले आहे.
10. तक्रारदाराने सामनेवाला यांचेकडे खालील तपशीलाप्रमाणे ठेवी ठेवलेल्या होत्या.
अ.क्र. |
नाव |
रक्कम |
ठेवतारीख |
पावती क्र. |
मुदत संपणेची तारीख |
1 |
गुलाबहुसेन अब्दुल शिलेदार |
10000 |
17/11/04 |
262 |
18/11/05 |
2 |
गुलाबहुसेन अब्दुल शिलेदार |
30000 |
17/11/04 |
261 |
18/11/05 |
3 |
गुलाबहुसेन अब्दुल शिलेदार |
25000 मुदतीनंतर 50000 |
30/11/04 |
34 |
30/6/10 |
सदर ठेवींची रक्कम तक्रारदाराने मागणी करुनही त्यास प्राप्त झालेली नाही. तक्रारदाराने नमूद संस्थेवर असलेले प्रशासक श्री डी.जी.कुलकर्णी यांचेकडे प्रस्तुत ठेवपावत्यांच्या मूळ प्रती रक्कम मिळणे सोयीचे व्हावे म्हणून जमा केलेल्या होत्या. कर्जदारांकडून रक्कम जशी वसूल होईल तशी रक्कम तक्रारदाराचे आय.डी.बी.आय.बँकेचे सेव्हिंग्ज खाते क्र. 46210010900981 या खातेवर जमा करणेबाबत कळविलेचे दाखल नि.27/4 वरुन दिसून येते. तसेच प्रस्तुत अर्जामध्ये तक्रारदाराने दामदुप्पट रक्कम मिळण्याची अपेक्षा नसून गुंतवलेली मूळ रक्कम तरी मिळावी तसेच बाहेरगावी रहात असलेने व वरचेवर सांगलीस येणे शक्य नसल्याने प्रशासकांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे सदर पावत्या जमा करणेस तयार असून वसुलीतून येणा-या रकमेतून वर नमूद खातेवर रक्कम जमा करणेसाठी 10 चलने नंबर टाकून दिल्याचे स्पष्टपणे नमूद केलेले आहे. तसेच भेटीअंती हिशेब पहाण्याचे ठरलेचे दिसून येते. तसेच सदर मुदत ठेव पावत्या कोणत्याही कर्जदारास जमा करुन घेवून येणारी वसूल रक्कम खातेवर भरणेबाबतचे अधिकार लिहून दिलेले आहेत. प्रस्तुत वर नमूद मूळ ठेवपावत्या या सामनेवाला क्र.15 यांचे ताब्यात असल्याची वस्तुस्थिती निर्विवाद आहे. त्यामुळे प्रस्तुत प्रकरणी सदर ठेवपावत्यांच्या फक्त सत्यप्रती दाखल केलेल्या आहेत या तक्रारदाराच्या कथनास पुष्टी मिळाते. याचा विचार करता तक्रारदाराने असे लिहून देवून सुध्दा व मूळ ठेवपावत्या जमा करुन सुध्दा रकमा अदा केलेल्या नाहीत ही वस्तुस्थिती मंचाच्या निदर्शनास आलेली आहे.
11. सामनेवाला क्र.15 प्रशासक जरी निवृत्त झाले असले तरी सदर संस्थेवरील प्रशासकांचा कार्यभार काढून टाकलेबाबतचा कोणताही पुरावा प्रस्तुत प्रकरणी त्यांनी दाखल केलेला नाही. केवळ उपनिबंधक सहकारी संस्था, मिरज यांना दि.30/3/2009 व 25/8/09 रोजी दिलेली पत्रे फक्त दाखल केलेली आहेत. सामनेवाला क्र.15 यांचा प्रशासकत्व रद्द केलेचा कोणताही आदेश दिसून येत नाही. सबब सदर संस्थेवर सामनेवाला क्र.15 हे अद्यापही प्रशासक आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे.
12. सामनेवाला क्र.11 यांनी त्यांचे लेखी म्हणणेमध्ये त्यांनी दि.15/5/2004 रोजी नमूद संस्थेच्या संचालकपदाचा राजीनामा संस्थेकडे दिला होता व तो दि.20/5/04 रोजीच्या संचालक मंडळाच्या मिटींगमध्ये मंजूर करण्यात आला असल्याने त्यांचा सदर संस्थेशी व व्यवहारांशी कोणताही संबंध राहिला नसल्याचे म्हणण्यातील कलम 3 पान 2 वर कथन केले आहे. मात्र त्यांनी राजीनामा दिलेबाबतचे पत्र तसेच प्रस्तुत ठराव मंजूर झालेबाबतचा ठराव अथवा प्रशासकाकडून तशा कोणत्याही प्रकारची कागदपत्रे किंवा संचालक पद रद्द झालेबाबतचा कोणताही कागदोपत्री पुरावा दाखल केलेली नाहीत. सबब केवळ त्यांचे म्हणणेतील कथनावर ते संचालक नव्हते असा विश्वास ठेवता येणार नाही या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब सामनेवाला क्र.11 हे प्रस्तुत व्यवहारास तितकेच जबाबदार आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. तसेच सामनेवाला क्र.6 व 11 यांना नमूद संस्थेवर प्रशासक आल्यामुळे त्यांना जबाबदार धरु नये असे म्हणण्यात कथन केले आहे. याचा विचार करता नमूद संस्थेवर प्रशासक जरी आले असले तरी नमूद संचालकांच्या काळात तक्रारदाराने सदरच्या ठेवी ठेवलेल्या आहेत. सबब सदर ठेव रकमा परत करण्याचे जबाबदारीतून सामनेवाला क्र.1 ते 14 यांना मुक्त होता येणार नाही. तसेच सामनेवाला क्र.15 यांनी सुध्दा त्यांच्या अधिकारकक्षेबाहेर जावून तक्रारदाराकडून रकमा न देता ठेवीच्या मूळ पावत्या घेतलेल्या आहेत. तसेच कर्जवसुली झाली नाही त्यामुळे रकमा दिल्या नाहीत असे दाखविणारा कोणताही पुरावा प्रस्तुत प्रकरणी त्यांनी दाखल केलेला नाही. त्यामुळे सदर रकमा देण्यास सामनेवाला क्र.15 हेही तितकेच जबाबदार आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे.
13. तक्रारदारने अत्यंत विश्वासाने त्यांच्या मूळ ठेवपावत्या सामनेवाला क्र.15 यांच्या ताब्यात दिल्या. मात्र सदर मूळ मुद्दलाचीसुध्दा परतफेड त्यांचेकडून झालेली नाही तसेच सामनेवाला क्र.1 ते 14 यांनी त्याअनुषंगे कोणतीही कार्यवाही केल्याचे दिसून येत नाही. याचा विचार करता सदर ठेव रकमा त्यावेळी तक्रारदाराने मूळ मुद्दलासह मागितल्या असल्या तरी त्या अदा न केल्याने प्रस्तुत तक्रार दाखल करुन त्याने इतर ठेवरकमांची व्याजासहीत तसेच दामदुप्पट रकमेचीही व्याजासहीत मागणी केली आहे व सदरची मागणी रास्त आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे.
14. वरील विस्तृत विवेचन व दाखल पुराव्यांचा विचार करता तक्रारदाराच्या ठेवी सामनेवाला यांनी मान्य केल्या आहेत तसेच मूळ पावत्या त्यांचेकडे जमा असूनही सदर रकमा अदा न केल्याने सदर ठेवपावत्या आजही अस्तित्वात आहेत. त्यामुळे त्यावरील नमूद तपशीलाप्रमाणे रकमा देणेस सामनेवाला क्र.1 ते 14 वैयक्तिक व संयुक्तरित्या तर सामनेवाला क्र.15 हे केवळ संयुक्तरित्या जबाबदार आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. तक्रारदाराने तडजोडीचे योग्य ते सहकार्य करुनही रक्कम न दिल्याने दि.25/5/10 रोजी नोटीस पाठवूनही सामनेवाला याने ठेव रकमा अदा न करुन सेवेत गंभीर त्रुटी ठेवलेली आहे. त्यामुळे तक्रारदारास त्याच्या सेवानिवृत्तीनंतरचे जीवन जगण्यास आलेल्या आर्थिक अडचणींमुळे झालेल्या मानसिक त्रासापोटी तसेच तक्रारीच्या खर्चापोटी रकमा मिळणेस तक्रारदार पात्र आहेत.
15. प्रस्तुत वर नमूद केलेप्रमाणे रकमा देणेबाबत सामनेवाला क्र.1 ते 14 वैयक्तिक व संयुक्तरित्या व सामनेवाला क्र.15 हे संयुक्तरित्या जबाबदार आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे व खालील आदेश पारीत करण्यात येत आहे.
आदेश
1. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज मंजूर करणेत येत आहेत.
2. तक्रारदार यांना सामनेवाला क्र.1 ते 14 यांनी वैयक्तिक व संयुक्तरित्या तर सामनेवाला क्र.15 याने संयुक्तरित्या तक्रारदाराची वर नमूद कलम 11 मध्ये नमूद केलेप्रमाणे ठेवपावती क्र.262 व 261 ची अनुक्रमे रु.10,000/- व रु.30,000/- ही ठेवरक्कम ठेवपावतीवरील दि.17/11/04 ते 18/11/05 या कालावधीसाठी नमूद व्याजदर 12 टक्केप्रमाणे व्याजासहीत अदा करावी व तदनंतरच्या कालावधीसाठी ते संपूर्ण रक्कम मिळेपावेतोपर्यंत मूळ ठेवरकमेवर द.सा.द.शे. 6 टक्केप्रमाणे व्याज अदा करावे. तसेच ठेवपावती नं.34 मध्ये नमूद केलेप्रमाणे दि.30/6/10 रोजी म्हणजे ठेव परतीच्या तारखेदिवशी मिळणारी दामदुप्पट रक्कम रु.50,000/- अदा करावी व दि.1/7/10 पासून ते संपूर्ण रक्कम मिळेपर्यंत सदर मुळ मुद्दल ठेवरकमेवर द.सा.द.शे. 6 टक्केप्रमाणे व्याज अदा करावे.
3. तक्रारदार यांना सामनेवाला क्र.1 ते 14 यांनी वैयक्तिक व संयुक्तरित्या तर सामनेवाला क्र.15 याने संयुक्तरित्या मानसिक ञासापोटी रुपये 5,000/- अदा करावेत.
4. तक्रारदार यांना सामनेवाला क्र.1 ते 14 यांनी वैयक्तिक व संयुक्तरित्या तर सामनेवाला क्र.15 याने संयुक्तरित्या तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 2,000/- अदा करावेत.
5. वर नमूद आदेशाची पुर्तता जाबदार यांनी या आदेशाच्या तारखेपासून 45 दिवसांत करणेची आहे.
6. जाबदार यांनी आदेशाची पुर्तता विहीत मुदतीत न केल्यास तक्रारदार त्यांचे विरुध्द ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतूदीनुसार दाद मागू शकतील.
सांगली
दि. 18/07/2013
( वर्षा शिंदे ) ( ए.व्ही.देशपांडे )
सदस्या अध्यक्ष