::निकालपत्र ::
(पारित व्दारा- श्री नितीन माणिकराव घरडे, मा.सदस्य.)
(पारित दिनांक-24 मार्च, 2017)
01. तक्रारदारांनी प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 खाली ते राहत असलेल्या लक्ष्मी अपार्टमेंट या ईमारतीचे मागील बाजूचे पश्चीमेकडील भागात विरुध्दपक्ष क्रं-3) चे वैयक्तिक लाभासाठी अनधिकृतरित्या लोखंडी गेट बसविल्याचे आरोपा वरुन मंचा समक्ष दाखल केली.
02. तक्रारदारांची थोडक्यात तक्रार खालील प्रमाणे-
तक्रारदार क्रं-1) ते 8) हे लक्ष्मी अपार्टमेंट नावाच्या ईमारती मध्ये आप-आपल्या निवासी गाळयां मध्ये मालकी हक्काने राहत आहेत. सदर ईमारत ही प्लॉट क्रं-61-अ वर विरुध्दपक्ष क्रं-2) आणि विरुध्दपक्ष क्रं-4) ते क्रं-8) यांनी तयार केलेली असून त्यातील निवासी गाळे तक्रारदारानीं सन-2005 मध्ये खरेदी केलेले आहेत. विरुध्दपक्ष क्रं-1) श्री शिवनाथ राठोड हा विरुध्दपक्ष क्रं-4) हरीष शिवराम राठोड यांचा मुलगा असून तो राठोड बिल्डर्स
एवं डेव्हलपर्स या नावाने सदनीका विक्रीचा व्यवसाय करतो. विरुध्दपक्ष क्रं-2) झाकीर खान शब्बीर खान हा देखील सदनीका विक्रीचा व्यवसाय ग्रीन सिटी बिल्डर्स या नावाने करतो. सदर निवासी गाळयांमध्ये तक्रारदारां शिवाय विरुध्दपक्ष क्रं-3) श्री ज्ञानेश्वर श्रावण मेटांगळे हा सुध्दा सदनीका एस-1 मध्ये मालक या नात्याने राहत आहे. विरुध्दपक्ष क्रं-1) श्री शिवनाथ हरीष राठोड व विरुध्दपक्ष क्रं-3) श्री ज्ञानेश्वर श्रावण मेटांगळे हे सदर लक्ष्मी अपार्टमेंट इमारतीचे मागील भागातील पश्चीमे कडील कम्पाऊंड वॉलला गेट बसविण्याचे उद्देश्याने त्याचे मोजमाप घेत असताना तक्रारदारानीं त्यांना मनाई केली परंतु विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-3) ने तुम्हाला जे करायचे ते करा, आम्ही भिंत तोडून गेट बनवू अशी धमकी दिली. विरुध्दपक्ष क्रं-1) श्री शिवनाथ हरीष राठोड आणि विरुध्दपक्ष क्रं-3) श्री ज्ञानेश्वर मेटांगळे व त्याची पत्नी तसेच मुले व साळा श्री दिगांबर नौकरकर यांनी , तक्रारदारांची पूर्व परवानगी न घेता, मजूरां मार्फतीने लक्ष्मी अपार्टमेंटच्या पश्चीमेकडील कम्पाऊंड वॉल तोडली, तक्रारदारांनी त्यास विरोध दर्शविला असता विरुध्दपक्ष क्रं-3) श्री मेटांगळे याने असे सांगितले की, त्याला बिल्डर शिवराम राठोड याने परवानगी दिली असून त्याने बिल्डरच्या लगतच्या अन्य लक्ष्मी रॉयल ईमारती मधील एक सदनीका खरेदी केलेली असून या गेटचा वापर तो त्या सदनीकेत जाण्या-येण्यासाठी करेन. वॉल तोडते वेळी विरुध्दपक्ष क्रं-1) शिवराम राठोड तेथे उपस्थित होता. तक्रारदारानीं या संदर्भात गिट्टीखदान पोलीस स्टेशन येथे तक्रार केली परंतु पोलीसानीं काहीच कारवाई केली नसल्याने विरुध्दपक्ष क्रं-1 ते 3 यांनी पश्चीमेकडील कम्पाऊंड वॉलला लोखंडी गेट बसविले. गेट बसविल्यामुळे तक्रारदारांचे खाजगी जीवन तसेच कुटूंबियांची सुरक्षा धोक्यात आलेली आहे तसेच वॉलचे नुकसान झालेले आहे. तक्रारदार राहत असलेल्या लक्ष्मी अपार्टमेंटच्या मागे प्लॉट क्रं-63 वर लक्ष्मी रॉयल सदनीका बांधली असून त्याचे मेन गेट त्या सदनीकेच्या पश्चीमेला आहे. तक्रारदार राहत असलेल्या ईमारतीचा प्लॉट क्रं 61-अ आणि लक्ष्मी रॉयल ईमारतीचा प्लॉट क्रं-63 हे वेगवेगळे आहेत व त्याचा एकमेकाशी कोणताही संबध नाही.
तक्रारदारांचे असे म्हणणे आहे की, विरुध्दपक्षानां लोखंडी गेट बसविण्याचा कोणताही अधिकार नाही व तसा रस्ता नकाशात सुध्दा दर्शविलेला
नाही. विरुध्दपक्षानीं पश्चीमेकडील वॉलला लोखंडी गेट बसवून गैरकायदेशीर कृत्यू केलेले आहे म्हणून त्यांनी प्रस्तुत तक्रार ग्राहक मंचा समक्ष दाखल करुन पुढील मागण्या केल्यात-
(1) विरुध्दपक्षानीं बेकायदेशीररित्या मागील पश्चिमेकडील कम्पाऊंड वॉल तोडून बसविलेले लोखंडी गेट स्वखर्चाने काढून तेथे पूर्ववत वॉल बांधून देण्याचे आदेशित व्हावे. विरुध्दपक्षानी कम्पाऊंड वॉल तोडून अपमिरीत नुकसान केल्याने रुपये-50,000/- नुकसान भरपाई देण्यात यावी.
(2) तेथे भविष्यात बेकायदेशीररित्या गेट बसविण्यास विरुध्दपक्षानां प्रतिबंधीत करण्यात यावे.
(3) तक्रारदारांना झालेल्या मानसिक त्रासा बद्दल प्रत्येकी रुपये-50,000/- आणि तक्रारीचा खर्च विरुध्दपक्षा कडून मिळावा.
03. विरुध्दपक्ष क्रं-1), 2), 4), 5), 6) व क्रं-8) यांनी एकत्रित लेखी उत्तर दाखल केले. त्यांनी हे म्हणणे मान्य केले की, सर्व तक्रारदार लक्ष्मी अपार्टमेंटच्या ईमारती मधील सदनीकां मध्ये राहत असून ते मालक आहेत. विरुध्दपक्ष क्रं-4) ते 8) यांनी प्लॉट क्रं-61-अ यावर लक्ष्मी अपार्टमेंट नावाची ईमारत बांधलेली आहे. तसेच विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) आणि विरुध्दपक्ष क्रं-4) ते 8) यांचा सदर ईमारतीशी काहीच संबध नाही कारण सर्व तक्रारदार हे आप-आपल्या सदनीकेचे पूर्णतः मालक आहेत व मालक या नात्याने संयुक्तीक जागेचा तसेच कम्पाऊंड वॉलसह उपभोग घेत आहेत. विरुध्दपक्ष क्रं-1) ने तक्रारदारानां कोणत्याही प्रकारची धमकी दिली नाही व कोणतीही भिंत तोडून गेट बसविलेले नाही. दिनांक-30/12/2011 रोजी विरुध्दपक्ष यांनी कोणतीही कम्पाऊंड वॉल तोडून गेट बसविलेले नाही. तक्रारदारांची तक्रार खोटया स्वरुपाची आहे.
विरुध्दपक्षानीं पुढे असे नमुद केले की, सदरचा वाद हा या मंचाचे अधिकारक्षेत्रात येत नाही कारण सदरची तक्रार ही दिवाणी स्वरुपाची असल्याने ती मंचाचे अधिकारक्षेत्रात येत नसल्याने ती खारीज करण्याची विनंती करण्यात आली.
04. विरुध्दपक्ष क्रं-3) ज्ञानेश्वर श्रावण मेटांगळे याने आपल्या लेखी उत्तरात असे नमुद केले की, सर्व तक्रारदार हे त्याचे ग्राहक होत नाहीत तसेच सदरची तक्रार ग्राहक मंचात चालू शकत नाही. तक्रारदारांनी केलेले आरोप नाकबुल केलेत. तक्रारदारांनी पोलीस स्टेशन मध्ये केलेल्या तक्रारी वरुन पोलीसानीं घटनास्थळी येऊन चौकशी केली परंतु त्यांनी कोणताही गुन्हा दाखल केला नाही. तक्रारदारांची तक्रार ही खोटी असून ती खारीज करण्याची विनंती केली.
05. विरुध्दपक्ष क्रं-7) रमेश शिवराम राठोड याने आपल्या उत्तरात असे नमुद केले की, भूखंड क्रं-61-ए वर बांधलेली लक्ष्मी अपार्टमेंटची जागा त्याचे मालकीची होती, त्याने ग्रीन सिटी बिल्डरचे जाकीर खान व शिवनाथ हरीश राठोड यांचेशी बांधकामाचा करारनामा करुन तेथे ईमारत बांधून सदनीका उभारण्या करीता दिल्या होत्या, त्या प्रमाणे सदनीका सन-2005 मध्ये विकण्यात आल्यात. त्या एकूण 09 सदनीका असून त्या निरनिराळया ग्राहकानां विकण्यात आल्यात व त्यानंतर लक्ष्मी रॉयल या नावाची अन्य ईमारत लगतच्या भूखंड क्रं-62 वर बांधण्यात आली, त्या ईमारती मध्ये विरुध्दपक्ष क्रं-3) श्री ज्ञानेश्वर मेटांगळे याने एक सदनीका विकत घेतली. त्या ईमारती मध्ये येण्या जाण्या करीता इतर सदनीकाधारकाचीं परवानगी न घेता श्री ज्ञानेश्वर मेटांगळे व शिवनाथ हरीष राठोड यांनी दिनांक-25/12/2011 रोजी लक्ष्मी अपार्टमेंटची मागील बाजूची पश्चीमे कडील कम्पाऊंड वॉल तोडून गेट बसविण्याचा प्रयत्न केला, त्याला माझे कुटूंबियानीं व इतर सर्व सदनीकाधारकानीं विरोध केला परंतु न जुमानत सदरचे कृत्यू सदर विरुध्दपक्षानीं केलेले आहे व त्याला विरुध्दपक्ष क्रं-7 ची परवानगी नाही.
06. तक्रारदारांची तक्रार, विरुध्दपक्षांची लेखी उत्तरे, उभय पक्षां तर्फे दाखल दस्तऐवज, फोटोग्राफ्स, दाखल लेखी युक्तीवाद आणि तक्रारदारांचे वकीलांचा मौखीक युक्तीवाद यावरुन न्यायमंचाचा निष्कर्ष पुढील प्रमाणे-
:: निष्कर्ष ::
07. उभय पक्षांचे म्हणणे, दाखल दस्तऐवज यावरुन सदर प्रकरणात मंचाचे विचारार्थ खालील मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दा उत्तर
(1) तक्रारदार हे विरुध्दपक्षांचे
ग्राहक होतात काय. ...........................................नाही.
(2) काय आदेश.........................................................तक्रार खारीज.
08. तक्रारदारांची सदरची तक्रार ही ते राहत असलेल्या लक्ष्मी अपार्टमेंट मधील मागील बाजूस असलेली पश्चीमेकडील कम्पाऊंड वॉल विरुध्दपक्ष क्रं-1) श्री शिवनाथ हरीष राठोड आणि विरुध्दपक्ष क्रं-3) श्री ज्ञानेश्वर मेटांगळे तसेच त्याची पत्नी आणि मुले व साळा श्री दिगांबर नौकरकर यांनी मजूरां मार्फतीने तोडली व तेथे नकाशात कोणतीही मंजूरी नसताना गैरकायदेशीररित्या लोखंडी गेट बसविले, तक्रारदारांनी त्यास विरोध केला परंतु कोणताही प्रतिसाद न मिळाल्यामुळे त्यांनी पोलीस मध्ये तक्रार केली परंतु कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही अशी आहे. तक्रारदारांचे असेही म्हणणे आहे की, ते राहत असलेल्या लक्ष्मी अपार्टमेंटच्या बाजूला आणखी एक ईमारत लक्ष्मी रॉयल बांधण्यात आली व त्या ईमारती मधील एक सदनीका विरुध्दपक्ष क्रं-3) ज्ञानेश्वर मेटांगळे याने विकत घेतली, जो तक्रारदारांच्या ईमारती मध्ये
राहत आहे व त्या सदनीके मध्ये जाण्या-येण्या करीता विरुध्दपक्ष क्रं-3 याने सदर लोखंडी गेट गैरकायदेशीररित्या बसविले तसेच कम्पाऊंड वॉलला सुध्दा क्षती पोहचविली.
09. तक्रारीतील वादाचा मुद्दा आणि उभय पक्षांचे म्हणणे तसेच दाखल दस्तऐवजांचे मंचा तर्फे अवलोकन केल्या नंतर असे दिसून येते की, सदरचा वाद हा “ग्राहक वाद” म्हणून ग्राहक मंचा समक्ष चालू शकत नाही कारण सर्व तक्रारदार हे विरुध्दपक्षांचे आता “ग्राहक” राहिलेले नाहीत याचे कारण असे की, तक्रारदारांच्याच तक्रारी प्रमाणे त्यांनी लक्ष्मी अपार्टमेंट मधील निवासी गाळे हे सन-2005 मध्ये विरुध्दपक्ष क्रं-2) आणि विरुध्दपक्ष क्रं-4) ते क्रं-8) यांचे कडून खरेदी खताने विकत घेतलेले आहेत व तेंव्हा पासून ते सदनीकेचे मालक या नात्याने आपल्या कुटूंबियांसह तेथे राहत आहेत तसेच विरुध्दपक्ष बिल्डरने त्यांना तेथे सर्व सोयी व सुविधा पुरविलेल्या आहेत, तक्रारदार आणि विरुध्दपक्ष बिल्डर यांचा सदरचा वाद हा सोयी व सुविधा पुरविल्या संबधीचा नसल्याने “ग्राहक आणि सेवा पुरविणारे” या सज्ञे खालील नाही. तक्रारदारांचा वाद हा मूळात ते राहत असलेल्या लक्ष्मी अपार्टमेंट मधील मागील बाजूस असलेल्या पश्चीमेकडील भिंत तोडून तेथे पूर्व परवानगी न घेता अनधिकृतपणे विरुध्दपक्ष क्रं-3) ने मेटांगळे याने लोखंडी गेट बसविल्या संबधीचा आहे, त्यामुळे सदरचा वाद हा ग्राहक संरक्षण कायद्दातील तरतुदी प्रमाणे “ग्राहक वाद” “ होत नसल्यामुळे तक्रारदारांची तक्रार ग्राहक मंचा समक्ष चालू शकत नाही त्यामुळे मुद्दा क्रं-1) चे उत्तर हे “नकारार्थी” येते.
10. तक्रारदारांचा वाद हा “ग्राहक वाद” म्हणून ग्राहक मंचा समक्ष चालू शकत नसल्यामुळे प्रकरणातील अन्य कोणत्याही विवादीत मुद्दानां स्पर्श न करता आम्ही ही तक्रार खारीज करीत आहोत, म्हणून मुद्दा क्रं-2) अनुसार आम्ही तक्रार खारीज करीत आहोत, तक्रारदारांना योग्य वाटल्यास ते सक्षम न्यायालयात जाऊन तेथे दाद मागू शकतील.
11. उपरोक्त नमुद वस्तुस्थितीचा विचार करुन मंच तक्रारीत खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे-
::आदेश::
(01) तक्रारदार क्रं-1) श्री हमीद हुसेन शेख गुलाम हुसेन शेख आणि इतर-07 तक्रारदार या तक्रारदारांची तक्रार, विरुध्दपक्ष क्रं-1) शिवनाथ हरीष राठोड आणि इतर-07 विरुध्दपक्ष यांचे विरुध्दची “ग्राहक वाद” होत नसल्याचे कारणा वरुन खारीज करण्यात येते. तक्रारदारानां योग्य वाटल्यास ते आपल्या वादाचे निराकरणार्थ सक्षम अशा न्यायालयात जाऊन तेथे दाद मागू शकतील.
(02) खर्चा बद्दल कोणतेही आदेश नाहीत.
(03) निकालपत्राच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारानां निःशुल्क उपलब्ध
करुन देण्यात याव्यात.