नि.29 मे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा यांचेसमोर तक्रार क्र. 209/2010 नोंदणी तारीख – 02/09/2010 निकाल तारीख – 12/11/2010 निकाल कालावधी – 70 दिवस श्री विजयसिंह दि. देशमुख, अध्यक्ष श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्या श्री सुनिल कापसे, सदस्य (श्री सुनिल कापसे, सदस्य यांनी न्यायनिर्णय पारीत केला) ------------------------------------------------------------------------------------ श्री निलेश जालींदर कदम मु.पो.शिंगणापूर ता.माण जि. सातारा ----- अर्जदार (अभियोक्ता श्री. आर.सी.शिंदे) विरुध्द 1. श्री शंभू महादेव ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या. शिंगणापूर ता.माण जि. सातारा अ. चेअरमन, श्री हरीभाऊ नारायण बडवे ब. व्यवस्थापक, श्री अर्जुन नामदेव दडस रा.मु.पो. शिंगणापूर ता.माण जि. सातारा 2. सहायक निबंधक, ता.माण जि. सातारा तर्फे अवसायक श्री एस.एल.काकडे रा. सहायक निबंधक कार्यालय, ता.माण जि. सातारा ----- जाबदार क्र.1 व 2 (अभियोक्ता श्री.व्ही.ए.चव्हाण) (अभियोक्ता श्री.एस.डी.शिंदे) न्यायनिर्णय अर्जदार यांनी प्रस्तुतचा अर्ज ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 नुसार केलेला आहे. अर्जदार यांचे अर्जातील कथन थोडक्यात खालीलप्रमाणे - 1. अर्जदार यांनी जाबदार संस्थेमध्ये बचत खाते उघडले असून सदरचे खात्यामध्ये रक्कम रु.54,801/- शिल्लक आहेत. सदरच्या रकमेची मागणी अर्जदार यांनी जाबदार यांचेकडे केली असता जाबदार यांनी फक्त रु.5,000/- अर्जदार यांना दिले. परंतु उर्वरीत रक्कम देण्यास जाबदार यांनी टाळाटाळ केली आहे. अर्जदार यांनी जाबदार यांना दि. 8/2/2010 रोजी वकीलांचेमार्फत रजिस्टर्ड पोस्टाने नोटीस पाठवून रकमेची मागणी केली. सदरची नोटीस जाबदार यांना मिळाली. तथापि जाबदार यांनी नोटीशीला उत्तर दिले नाही अथवा अर्जदार यांची रक्कमही परत दिलेली नाही. थोडक्यात जाबदार यांनी अर्जदार यांना देण्यात यावयाची रक्कम न दिल्यामुळे सेवेत त्रुटी केली आहे. अर्जदार हे जाबदार संस्थेचे ग्राहक आहेत. त्यामुळे जाबदार संस्थेकडून बचत खात्यातील उर्वरीत रक्कम वसूल होऊन मिळण्यासाठी अर्जदार यांनी प्रस्तुतचा अर्ज केला आहे. सदरचे अर्जामध्ये अर्जदार यांनी एकूण रक्कम रु. 49,801/- व त्यावरील व्याज तसेच मानसिक त्रासापोटी रक्कम रु.5,000/- व अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.1,000/- ची मागणी केलेली आहे. 2. जाबदार क्र.1अ व 1ब यांनी त्यांचे लेखी म्हणणे नि.14 ला दाखल करुन अर्जदारचे तक्रारअर्जातील मजकूर नाकारला आहे. जाबदार संस्थेवर अवसायकांची नेमणूक झाली असून त्यांनी संस्थेचा ताबा घेतल्याने अर्जदारची रक्कम परत करण्याची जबाबदारी संबंधीत अवसायकांची आहे. अवसायकांना आवश्यक पक्षकार केलेले नाही. शासनाचे आदेशानुसार जाबदार क्र.1अ व 1ब यांचेकडून ठेवीदारांची वसुली थांबविण्याचे आदेश झालेले आहेत. सबब तक्रारअर्ज फेटाळणेत यावा असे जाबदार क्र.1अ व 1ब यांनी कथन केले आहे. 3. जाबदार क्र. 2 यांनी याकामी त्यांचे लेखी म्हणणे नि.15 ला दाखल करुन अर्जदारचे तक्रारअर्जातील मजकूर नाकारला आहे. जाबदार संस्थेचा कारभार नियमानुसार संस्थेचे चेअरमन व व्यवस्थापक व संचालक मंडळ यांनी पाहिला नाही. म्हणून सदरची संस्था सहायक निबंधक, सहकारी संस्था, दहिवडी यांनी अवसायानात काढली आहे. परंतु संस्थेचे चेअरमन व व्यवस्थापक यांनी संस्थेचे दप्तर अवसायक यांचे ताब्यात दिलेले नाही. तसेच अर्जदार यांनी महाराष्ट्र सहकारी संस्थांचा कायदा 1960 चे कलम 107 नुसार रजिस्ट्रार सहकारी संस्था यांची पूर्वपरवानगी घेतलेली नाही. अर्जदार यांची तक्रार मुदतीत नाही. अवसायक यांना अर्जदार यांनी विनाकारण या अर्जात सामील केले आहे. अर्जदारची रक्कम देण्यास अवसायक जबाबदार नाहीत. सबब तक्रारअर्ज फेटाळणेत यावा असे जाबदार क्र.2 यांनी कथन केले आहे. 4. अर्जदारतर्फे दाखल लेखी युक्तिवाद तसेच कागदपत्रे पाहिली. तसेच जाबदारतर्फे अभियोक्त्यांनी केलेला युक्तिवाद ऐकला तसेच दाखल कागदपत्रे पाहिली. 5. प्रस्तुतकामी महत्वाची निर्विवाद बाब अशी आहे की, जाबदार संस्थेवर अवसायकांची नेमणूक करण्यात आलेली आहे. सदरचे अवसायक जाबदार क्र.2 यांनी त्यांचे कैफियतीमध्ये असे कथन केले आहे की, अर्जदार यांनी महाराष्ट्र सहकारी संस्थांचा कायदा 1960 चे कलम 107 नुसार प्रस्तुतची तक्रार दाखल करणेपूर्वी अर्जदार यांनी रजिस्ट्रार सहकारी संस्था यांची परवानगी घेणे आवश्यक होते. तशी परवानगी अर्जदार यांनी घेतलेली नाही. सबब प्रस्तुतचा तक्रारअर्ज फेटाळणेस पात्र आहे. जाबदार यांनी त्यांचे सदरचे कथनाचे पृष्ठयर्थ वरिष्ठ न्यायालयाचे खालील निवाडे दाखल केलेले आहेत. 1) 1992 Co-op.C.166 Bombay High Court 2) 1980 C.T.J. 371 वर नमूद दोन्ही निवाडयांमध्ये अवसायकांविरुध्द कोणताही दावा दाखल करणेपूर्वी महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 चे कलम 107 नुसार उपनिबंधक, सहकारी संस्था यांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे असे स्पष्ट नमूद करण्यात आले. परंतु प्रस्तुतचे प्रकरणात अर्जदार यांनी तशी कोणतीही परवानगी घेतलेली नाही. सबब सदरचे दोन्ही निवाडे प्रस्तुत प्रकरणास लागू होत असल्याने अर्जदार यांचा तक्रारअर्ज फेटाळणेस पात्र आहे असे या मंचाचे मत आहे. 6. या सर्व कारणास्तव खालीलप्रमाणे अंतिम आदेश करण्यात येत आहे. आदेश 1. अर्जदार यांचा तक्रारअर्ज फेटाळणेत येत आहे. 2. खर्चाबाबत आदेश नाही. 3. सदरचा न्यायनिर्णय खुल्या न्यायमंचात जाहीर करणेत आला. सातारा दि.12/11/2010 (सुनिल कापसे) (सुचेता मलवाडे) (विजयसिंह दि. देशमुख) सदस्य सदस्या अध्यक्ष
| Smt. S. A. Malwade, MEMBER | HONABLE MR. Vijaysinh D. Deshmukh, PRESIDENT | Mr. Sunil K Kapse, MEMBER | |