::: आ दे श :::
( पारीत दिनांक : 20/10/2016 )
आदरणीय, अध्यक्ष श्रीमती एस.एम.उंटवाले यांचे अनुसार
1. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम : 12 अन्वये, सादर करण्यात आलेल्या, सदर तक्रारीचा सारांश येणेप्रमाणे, …
तक्रारकर्त्याला त्याची मुलगी कु. वंदना हिचे लग्न समारंभ साजरा करण्यासाठी दि. 10/6/2015 रोजी मंगल कार्यालयाची आवश्यकता होती. त्याकरिता तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाचे मंगल कार्यालयाबाबत चौकशी केली. त्यावेळी विरुध्दपक्षातर्फे असे सांगण्यात आले की, बुकींगच्या वेळी रु. 40,000/- भरावे लागतील व लग्न समारंभाच्या आधी रु. 15,000/- हे अनामत रक्कम म्हणून भरावे लागतील. विज, साफसफाई बिछायत, भांडे व इतर सर्व सोयींचा खर्च वगळता कार्यानंतर रु. 25,000/- परत मिळतील. तसेच कार्यालय हे सकाळी 8.00 वाजेपासून दुसऱ्या दिवशी सकाळी 7.00 वाजेपर्यंत वापरता येईल. विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्त्याला मंगल कार्यालयात कुठलीही गैरसोय व त्रास होणार नाही, असे आश्वासन दिल्यानुसार तक्रारकर्त्याने दि.13/3/2015 रोजी विरुध्दपक्षाकडे संघवीवाडी मंगल कार्यालयाचे दि. 10/6/2015 या दिवसाच्या बुकींगसाठी रक्कम 40,000/- जमा केले व त्यानंतर लग्नाच्या एक दिवस आधी दि. 9/6/2015 रोजी विरुध्दपक्ष यांच्या कडे पुन्हा रु. 15,000/- जमा केले. दि. 10/6/2015 रोजी तक्रारकर्ता आपल्या संपुर्ण परिवारासह सकाळी 8.00 वाजता सदर मंगल कार्यालयात पोहचला व त्याचे सर्व पाहुणे दिवसभर आले. संध्याकाळचे भोजन 7.30 वाजेपासून सुरु करण्यात आले. भोजन समारंभानंतर लग्न समारंभ व त्यानंतर विधी या प्रमाणे कार्यक्रम होणार होते. परंतु रात्री 9.00 वाजताच्या दरम्यान विरुध्दपक्ष यांच्या कर्मचाऱ्यांनी तक्रारकर्त्यास मंगल कार्यालयाचा परीसर त्वरीत खाली करावा, असे सांगितले व काही वेळातच तक्रारकर्त्याचे व पाहुण्यांचे सामान तसेच तयार असलेले भोजन अन्न फेकण्यास सुरुवात केली. विरुध्दपक्षाच्या कर्मचाऱ्यांनी जवळपास 300 थालीचे अन्न फेकुन दिले व त्यामुळे तक्रारकर्त्याची मानहानी झाली, तसेच संपुर्ण समारंभामध्ये अडथळा निर्माण होवून पुढील सर्व विधी करणे अशक्य झाले. सदर समारंभ थोडक्यात आटोपून तक्रारकर्त्याला रात्रीच कार्यालय सोडणे भाग पडले. तक्रारकर्त्याने संपुर्ण अटींचे पालन केल्यानंतर सुध्दा विरुध्दपक्ष यांनी सदर प्रकार केल्यामुळे तक्रारकर्त्यास प्रचंड मानसिक त्रास झाला. अशा प्रकारे विरुध्दपक्ष यांनी सेवेमध्ये न्युनता दर्शविली व अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केला आहे. विरुध्दपक्षाने उर्वरित रक्कम परत करण्यास सुध्दा टाळाटाळ केलेली आहे. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष यांना दि. 19/8/2015 रोजी रजिस्टर नोटीस पाठवून, मानसिक, शारीरिक व आर्थिक त्रासापोटी तसेच उर्वरीत रक्कम मिळून एकूण रु. 2,25,000/- नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. परंतु विरुध्दपक्ष यांनी सदर नोटीसला दि. 5/10/2015 रोजी उत्तर देऊन नोटीसला नाकारलेले आहे. त्यामुळे तक्रारकर्त्याने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल करुन विनंती केली आहे की, तक्रारकर्त्याची तक्रार मंजुर करण्यात यावी व तक्रारकर्त्यास झालेल्या मानसिक, शारीरिक व आर्थिक त्रासापोटी एकूण नुकसान भरपाई रु. 2,00,000/-देण्याचा व उर्वरित रक्कम रु. 25,000/- तक्रारकर्त्यास परत देण्याचा आदेश पारीत व्हावा, तसेच न्यायीक खर्चासाठी रु. 10,000/- देण्याचा आदेश व्हावा.
सदर तक्रार शपथेवर दाखल असून त्यासोबत एकंदर 06 दस्तऐवज पुरावे म्हणून जोडण्यात आले आहेत.
विरुध्दपक्ष यांचा लेखीजवाब :-
2. विरुध्दपक्ष यांनी लेखी जबाब दाखल करुन तक्रारीतील आरोप नाकबुल केले व असे नमुद केले की, विरुध्दपक्ष ही सामाजीक संस्था असून त्यांचे अकोला येथे संघवीवाडी ह्या नावाने ओळखली जाणारी वाडी आहे व ती वाडी समाजाच्या लोकांकरिता आहे. ही संस्था कोणतेही पैसे कमविण्याचे उद्देशाने बनविण्यात आलेली नाही. सदर वाडी देण्याबाबतचे नियम बनविण्यात आलेले आहे व त्याची प्रत तक्रारकर्त्यास देण्यात आली. तक्रारकर्त्याने ते वाचून समजुन मान्य असल्यावर त्यावर सही केली होती. सदर वाडीचे एक दिवसाचे भाडे रु. 40,000/- होते, तसेच विद्युत वापराकरिता रु. 10,110/- झाले होते. साफसफाई खर्च रु. 1500/- व कमी पडलेल्या सामानाचे रु. 4800/- होते, अशा प्रकारे एकूण रु. 51,658/- इतकी झाली होती. तक्रारकर्त्याने रु. 55,000/- जमा केले होते व संस्थेला घेणे असलेली रक्कम रु. 51,658/- वजा जाता रु. 3,342/- विरुध्दपक्ष संस्था तक्रारकर्त्यास देण्याकरिता तयार असल्यावरही व ती घेवून जाण्याबाबत कळविल्यावर सुध्दा तक्रारकर्त्याने ती रक्कम घेतली नाही व संस्थेकडून तो जास्त रक्कम वसुल करणार असे त्यांनी संबंधीताला सांगितले. तक्रारकर्त्याने आपल्या मनामध्ये असे निश्चित करुन ठेवले होते की, त्याला भवनाचा वापर, सामान, विद्युत वापर इत्यादी सर्व बाबी करिता फक्त रु. 40,000/- प्रतिदरानेच देणे आहे व ह्या रकमे व्यतिरिक्त त्यास काहीही देणे नाही. तक्रारकर्त्यास रात्री 9.00 वाजता किंवा दि. 10/6/2015 रोजी कोणीही मंगल कार्यालय खाली करण्याबाबत सांगितले नाही व कोणतेही सामान फेकलेले नाही. जर असे असते तर तक्रारकर्ता गप्प राहीला नसता. लग्नानंतर त्वरीत त्या बाबतीत त्याने कार्यवाही केली असती. तक्रारकर्त्याकडील लग्न दि. 10/6/2015 रोजी होते व त्याने विरुध्दपक्षाला दि. 29/8/2015 रोजी नोटीस पाठविली. जर असे खरोखरच काही झाले असते तर तक्रारकर्ता इतक्या मोठ्या काळाकरिता गप्प बसला नसता व त्याने त्वरीत लेखी तक्रार नोंदविली असती. तक्रारकर्ता हा विरुध्दपक्षाचा ग्राहक होवू शकत नाही. विरुध्दपक्ष हे पैसे कमविण्याचे उद्देशाने कोणताही व्यापार करीत नाहीत. तक्रारकर्त्याचा उद्देश फक्त पैसे उकळण्याचा आहे. त्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार, तक्रार खर्च व अधिकचा खर्च रु. 25,000/- बसवून खारीज करण्यात यावी.
3. त्यानंतर तक्रारकर्त्याने प्रतिज्ञालेख, साक्षीदारांची शपथपत्रे, व प्रतिशपथपत्र दाखल केले, तसेच विरुध्दपक्षातर्फे प्रतिज्ञालेख दाखल करण्यात आला व साक्षीदारांचे शपथपत्रे दाखल केले. तसेच उभय पक्षांतर्फे तोंडी युक्तीवाद करण्यात आला.
::: का र णे व नि ष्क र्ष :::
4. या प्रकरणात तक्रारकर्ते यांची तक्रार, विरुध्दपक्ष यांचा लेखी जबाब, उभय पक्षाने दाखल केलेले सर्व दस्तऐवज, तक्रारकर्ते यांचे प्रतिउत्तर, उभय पक्षांतर्फे दाखल केलेले साक्षीदारांचे शपथपत्रे, उभय पक्षांचा तोंडी युक्तीवाद व तक्रारकर्ते यांचे तर्फे दाखल न्यायनिवाडे यांचे काळजीपुर्वक अवलोकन करुन खालील निष्कर्ष कारणे देऊन नमुद केला.
उभय पक्षात वाद नसलेल्या बाबी अशा आहेत की, तक्रारकर्ते यांनी विरुध्दपक्षाकडे मंगल कार्यालय दि. 13/3/3015 रोजी, दि. 10/6/2015 रोजी होणाऱ्या त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी, रक्कम रु.40,000/- भरुन, एका दिवसासाठी बुकींग केले होते. तसेच या व्यतिरिक्त दि. 9/6/2015 रोजी रु. 15,000/- अनामत रक्कम म्हणून विरुध्दपक्षाकडे जमा केले होते. वरील रकमेत सदर मंगल कार्यालय चोवीस तासासाठी वापरण्यासाठी देण्यात आले होते.
तक्रारकर्ते यांचे असे म्हणणे आहे की, विरुध्दपक्षाकडे भरलेल्या रकमेमधुन विजेचा खर्च, साफसफाई खर्च तसेच बिछायत, भांडे व इतर सर्व सोयींचा खर्च वगळता कार्यानंतर रु.25,000/- भरलेल्या रकमेपैकी परत मिळतील, असे आश्वासन विरुध्दपक्षाने दिले होते. तसेच तक्रारकर्त्याच्या समाजामध्ये लग्न समारंभ झाल्यानंतर संध्याकाळचे भोजन व त्यानंतर त्यांच्या धर्मातील इतर कार्यक्रम रात्रभर साजरे केले जातात. दि. 10/6/2015 रोजी तक्रारकर्ता परीवारासह सकाळी 8.00 वाजता मंगल कार्यालयात पोहचले. त्यानंतर सर्व पाहुणे व वराती दिवसभर आले. संध्याकाळचे भोजन 7.30 पासून सुरु करण्यात आले. भोजन समारंभानंतर लग्न समारंभ व विधी होणार होता. भोजन सुरु झाल्यानंतर रात्री 9.00 वाजताच्या दरम्यान विरुध्दपक्षाच्या कर्मचाऱ्यांनी तक्रारकर्त्यास, मंगल कार्यालयाचा परिसर त्वरीत खाली करावा, असे सांगितले व काही वेळातच तक्रारकर्त्याचे व पाहुण्यांचे सामान, तसेच तयार असलेले भोजन अन्न फेकण्यास सुरुवात केली. जवळपास 300 थालीचे अन्न व गोड मिष्ठान्न फेकून दिले, त्यामुळे तक्रारकर्त्याची मानहानी झाली व नुकसान झाले.
यावर, विरुध्दपक्षाचा युक्तीवाद असा आहे की, विरुध्दपक्ष एक सामाजिक संस्था आहे व कोणतेही पैसे कमविण्याच्या उद्देशाने बनविण्यात आलेली नाही. विरुध्दपक्षाची नियमावली आहे. तक्रारकर्ते यांना स्पष्ट सांगण्यात आले होते की, भवनाचे एक दिवसाचे भाडे रु. 40,000/- राहील. त्याप्रमाणे त्याने ती रक्कम भरुन, भवन बुक केले व विरुध्दपक्षाच्या नियमानुसार सदर भवन प्रत्यक्ष ताब्यात घेतांना इलेक्ट्रीक, साफसफाई इत्यादी बाबींकरिता रु. 15,000/- एका दिवसाचे जमा करुन घेण्यात येतात, ज्याचा पुर्ण हिशोब, संपुर्ण वापर झाल्यानंतर, सर्व बाबींचा विचार करुन पुर्ण करण्यात येतो व जर काही रक्कम वरील बाबींकरिता घेणे असल्यास ती बुक करणाऱ्याकडून घेतली जाते व जर काही रक्कम विरुध्दपक्षास देणे असेल तर विरुध्दपक्ष ही रक्कम वापस करतो. या प्रकरणात तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाकडे रु. 40,000/- + रु. 15,000/- इतकी रक्कम जमा केली होती. हिशोबापोटी विरुध्दपक्षास रु. 51,658/- घेणे होते, म्हणून उर्वरित रु. 3,342/- देण्यास विरुध्दपक्ष तयार असतांना देखील, तक्रारकर्त्याने ही रक्कम घेतली नाही. उलट संस्थेकडून ते जास्त रक्कम घेणार, असे तक्रारकर्त्याने संबंधीतांना सांगितले. तक्रारीतील नमुद घटना घडलेली नाही. भवनात संध्याकाळी 7.00 नंतर कोणतेही सदस्य जात नाही, फक्त एक रोजंदारीचा कर्मचारी तेथे असतो. त्यामुळे विरुध्दपक्षाने कोणतेही भोजन अन्न किंवा सामान फेकले नाही.
अशा प्रकारचा युक्तीवाद उभय पक्षांचा आहे. तसेच तक्रारकर्ते यांनी त्यांच्या तक्रारीच्या सिध्दतेकरिता रेकॉर्डवर एकंदर पाच वकीलांचे प्रतिज्ञालेख व आचारी यांचे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.
विरुध्दपक्षाने त्यांच्या बचावाच्या सिध्दतेकरिता भवनाच्या व्यवस्थापकाचे व सुपरवायझरचे प्रतिज्ञापत्र रेकॉर्डवर दाखल केले आहे.
तक्रारकर्ते यांनी त्यांची भिस्त खालील न्यायनिवाडयांवर ठेवली आहे.
- 1991 (2) CPJ 705
H.R. Gill Vs. Suryavanshi Kshatriya Dnyati Samaj
- I (2003) CPJ 155
S.Rajam Vs. Manager, Chennai Battar Thottam
तक्रारकर्ते यांनी जी घटना/कृत्य विरुध्दपक्षाने केले असे म्हणतात त्याबद्दल कोणतेही कारण किंवा उभय पक्षात नेमका कोणता वाद झाला होता? तो नमुद केलेला नाही. व विरुध्दपक्षाने फक्त असा कोणताही वाद / घटना घडली नाही, असे कथन केले आहे. दोघांनीही प्रतिज्ञापत्रे दाखल केली आहेत, अशा परिस्थितीत मंचाला असे वाटते की, तक्रारकर्ते यांनी या घटनेची पोलिस फिर्याद नोंदविलेली नाही, तसेच घटना दि. 10/6/2015 रोजीची असतांना, त्याबद्दलची प्रथम नोटीस दि. 29/8/2015 रोजी विरुध्दपक्षाला पाठविली, तर विरुध्दपक्षाने नोटीस उत्तरात तक्रारकर्त्याने त्यांचे भवन लग्नाकरिता भाडयाने घेतले होते, ह्या बाबीपासूनच सर्व बाबी नाकारलेल्या आहेत, फक्त तक्रारकर्त्याने जो न्यायनिवाडा दाखल केला जसे की, 1991 (2) CPJ 705 H.R. Gill Vs. Suryavanshi Kshatriya Dnyati Samaj यातील निर्देशानुसार असे आहे की, जर प्रकरणात वकीलांनी एखाद्या घटने बद्दल शपथपत्र / प्रतिज्ञालेख दिले असतील तर वकील हे समाजातील प्रतिष्ठीत व्यक्ती असल्यामुळे व त्यांना खोटे शपथपत्र देण्याचे काही कारण् नसल्यामुळे, असे प्रतिज्ञालेख दुर्लक्षित करता येणार नाही. या प्रकरणात जवळपास पाच वकीलांची शपथपत्रे दाखल करण्यात आली आहेत व त्यातील मजकुर असा आहे की, “ भोजन टेबल कडे गेलो असता, बफे टेबल वरील भांडे खाली पडल्याचे व अन्न सांडलेले दिसले, तसेच अन्नाचे मोठे भांडे खाली उलटल्याचे दिसून आले. गावातील व नातेवाईक मंडळी भोजन न करता परत जातांना आम्ही पाहीले. उपस्थित सर्व पाहुण्यांमध्ये गोंधळ होऊन अव्यवस्था झाल्याचे दिसले. उपस्थित पाहुणे, कार्यालयाने भवन खाली करण्यासाठी गोंधळ करुन भोजनाची नासाडी केली, असे सांगत होते व आम्ही भोजन न करता समारंभातुन परत आलो.”
अशा प्रकारची घटना व परिस्थिती या प्रकरणात उद्भवल्यामुळे मंचाने असा निष्कर्ष काढला की, विरुध्दपक्षाने अनुचित प्रथा अवलंबुन, लग्नात अडथळे (Disturbances) घडवून आणले आहे.
विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याकडून कार्यालयाचे मुल्य स्विकारुन त्यांना सेवा दिली होती. त्यामुळे तक्रारकर्ते विरुध्दपक्षाचे ग्राहक होतात, असे मंचाचे मत आहे.
तक्रारकर्ते यांनी आचा-याचा प्रतिज्ञालेख प्रकरणात दाखल केला आहे. त्यांचे शपथेवर असे कथन आहे की, लग्नाच्या घटनेच्या दिवशी त्यांनी गोड पक्वान्नासह जवळपास 400 लोकांचे संध्याकाळचे मुख्य भोजन तयार केले होते. भोजन समारंभ संध्याकाळी 7.30 पासून सुरु झाला होता व वादातील घटना रात्री अंदाजे 9.00 वाजताची आहे. त्यामुळे मंचाने अंदाजे 200 लोकांच्या भोजन सामुग्रीच्या नुकसान भरपाईपोटी रु. 30,000/- विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्यास दिल्यास ते न्यायोचित होईल, तसेच हिशोबाची राहिलेली रक्कम विरुध्दपक्षाला द्यावी लागेल असा निष्कर्ष काढला. तसेच शारीरिक, मानसिक व आर्थिक नुकसान भरपाई, प्रकरण खर्चासह रु. 5,000/- विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्यास द्यावे, असे मंचाचे मत आहे.
सबब अंतीम आदेश पारीत केला, तो खालील प्रमाणे…
:::अं ति म आ दे श:::
- तक्रारकर्त्याची तक्रार अंशत: मंजुर करण्यात येते.
- विरुध्दपक्षाने तक्रारकर्ते यांना लग्न समारंभाच्या दरम्यान मंगल कार्यालय सोडण्यास भाग पाडले, असे मंचाने गृहीत धरले आहे, त्यामुळे झालेल्या सर्व नुकसान भरपाईसाठी, तसेच मानसिक, शारीरिक व आर्थिक त्रासापोटी, प्रकरणाच्या न्याईक खर्चासहीत एकुण नुकसान भरपाई रु. 35,000/- ( रुपये पस्तीस हजार फक्त ) इतकी रक्कम विरुध्दपक्षाने तक्रारकर्ते यांना द्यावी. व हिशोबाची राहिलेली रक्कम रु. 3,342/- (रुपये तिन हजार तिनशे बेचाळीस फक्त) तक्रारदारास परत करावी.
- सदर आदेशाची पुर्तता, आदेशाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसाच्या आंत करावी.
- सदर आदेशाच्या प्रती संबंधीतांना निशुल्क देण्यात याव्या.