::निकालपत्र::
(पारीत व्दारा- शेखर प्रभाकर मुळे, मा.अध्यक्ष.)
(पारीत दिनांक– 05 जानेवारी, 2018)
01. उपरोक्त नमुद तिन्ही तक्रारदारांनी मंचा समक्ष ग्राहक संरक्षण कायदा-1986 चे कलम-12 खाली दाखल केलेल्या तक्रारी हया जरी स्वतंत्ररित्या वेगवेगळया दाखल केलेल्या असल्या, तरी नमुद तक्रारींमधील विरुध्दपक्ष हे एकच आहेत आणि तपशिलाचा थोडाफार भाग वगळता, ज्या कायदे विषयक तरतुदींचे आधारे हया तक्रारी निकाली निघणार आहेत, त्या कायदे विषयक तरतुदी सुध्दा नमुद तक्रारींमध्ये एक सारख्याच आहेत आणि म्हणून आम्ही नमुद दोन्ही तक्रारीं मध्ये एकत्रितरित्या निकाल पारीत करीत आहोत. तिन्ही तक्रारी या विरुध्दपक्ष विश्वभारती गृहनिर्माण सहकारी संस्था मर्यादित नागपूरया संस्थे विरुध्द असून तिन्ही तक्रारदारानीं आरक्षीत केलेल्या भूखंडांचे विक्रीपत्र विरुध्दपक्षानीं नोंदवून दिले नाही या कारणास्तव दाखल केलेल्या आहेत.
02. तक्रारदारांचे संक्षीप्त कथन खालील प्रमाणे-
विरुध्दपक्ष क्रं-1) ते 3) हे विश्वभारती गृहनिर्माण सहकारी संस्था, कामठी, जिल्हा नागपूर यासंस्थेचे अनुक्रमे अध्यक्ष आणि सदस्य असे पदाधिकारी आहेत. विरुध्दपक्ष फर्मने मौजा नारी, तहसिल जिल्हा नागपूर येथील शेत सर्व्हे क्रं-103/6, पटवारी हलका क्रं-11 मधील प्रस्तावित ले आऊट मधील भूखंड कमी किमती मध्ये विक्रीस उपलब्ध असल्याची जाहिरात दिली होती. त्याच प्रमाणे इतर भरपूर आकर्षक प्रलोभने असलेले माहितीपत्रक सुध्दा छापले होते. उपरोक्त नमुद तिन्ही तक्रारदारांनी त्या नुसार विरुध्दपक्ष फर्म कडून परिशिष्ट- अ मध्ये दर्शविल्या प्रमाणे भूखंड विकत घेण्याचे करार केलेत-
परिशिष्ट-अ
अक्रं | ग्राहक तक्रार क्रमांक | तक्रारकर्त्याचे नाव | करार दिनांक | विक्रीपत्र दिनांक | भूखंड क्रंमाक | भूखंडाचे क्षेत्रफळ | करारा प्रमाणे अदा केलेली भूखंडाची किम्मत |
1 | 2 | 3 | / | 5 | 6 | 7 | 8 |
01 | RBT/CC/12/317 | श्री दिपक जांभूळकर | 20//08/1997 | 29/01/2002 | 77 | 1000 Sq.Ft. | 7000/- |
02 | RBT/CC/12/323 | सौ.निना दिपक भैसारे | 03/08/1996 | 29/12/2001 | 36 | 1330 Sq.Ft. | 9310/- |
03 | RBT/CC/12/324 | कु.अंजली सहदेव लाडे | 03/08/1996 | 28/08/2002 | 35 | 1290 Sq.Ft. | 9675/- |
प्रथमतः तक्रारदारानीं विरुध्दपक्ष फर्म सोबत भूखंड विकत घेण्याचे करार केलेत, त्यावेळी त्यांनी प्रत्येकी संस्थेची सभासद फी म्हणून रुपये-560/- मिळून रुपये-610/- विरुध्दपक्षानां दिलेत व वेळोवेळी भूखंडाच्या रकमा विरुध्दपक्षां कडे भरुन पैसे प्राप्त झाल्याची स्विकृती विरुध्दपक्षाने किस्त नोंदीचे दस्तऐवजावर करुन दिली व करारा प्रमाणे भूखंडाची संपूर्ण किम्मत प्राप्त झाल्या नंतर भूखंडाचे नोंदणीकृत विक्रीपत्र विरुध्दपक्ष विश्वभारती गृहनिर्माण सहकारी संस्था मर्यादित तर्फे तिचा अध्यक्ष संजीव बळीराम मेश्राम याने त्या-त्या तक्रारदारांच्या नावे नोंदवून दिले.
तक्रारदारांचे असेही म्हणणे आहे की, जरी विक्रीपत्रात भूखंडाची किम्मत दर्शविलेली असली तरी त्यापेक्षा जास्तीची रक्कम त्यांनी विरुध्दपक्षानां अदा केली.
ग्राहक तक्रार क्रं-RBT/CC/12/317 मधील तक्रारकर्ता श्री दिपक जांभूळकर यांचे तक्रारी प्रमाणे त्यांनी भूखंडापोटी रक्कम रुपये-12,300/- अधिक विक्रीपत्र नोंदणी खर्चा पोटी रुपये-3000/- असे मिळून एकूण रुपये-15,300/- विरुध्दपक्ष क्रं-1) ते 3) यांना अदा केलेत.
तर ग्राहक तक्रार क्रं-RBT/CC/12/323 मधील तक्रारकर्ती सौ.निना दिपक भैसारे यांचे तक्रारी प्रमाणे त्यांनी भूखंडापोटी रक्कम रुपये-12,000/- अधिक विक्रीपत्र नोंदणी खर्चा पोटीरुपये-4500/- व एनआयटी मध्ये भरलेली रक्कम रुपये-1000/-असे मिळून एकूण रुपये-17,500/- विरुध्दपक्ष क्रं-1) ते 3) यांना अदा केलेत.
तर ग्राहक तक्रार क्रं-RBT/CC/12/324 मधील तक्रारकर्ती कु.अंजली सहदेव लाडे यांचे तक्रारी प्रमाणे त्यांनी भूखंडापोटी रक्कम रुपये-12,000/- अधिक विक्रीपत्र नोंदणी खर्चा पोटी रुपये-3000/- व एनआयटी मध्ये भरलेली रक्कम रुपये-1000/- असे मिळून एकूण रुपये-16,000/- विरुध्दपक्ष क्रं-1) ते 3) यांना अदा केलेत.
तक्रारदारांनी पुढे असे नमुद केले की, विक्रीपत्रात जरी भूखंडाचा ताबा दिल्याचे नमुद केलेले असले तरी प्रत्यक्ष्यात भूखंडांचा मोजून ताबा दिलेला नाही. जेंव्हा विरुध्दपक्षां तर्फे भूखंडाचा ताबा प्रत्यक्ष्य देण्यास टाळाटाळ करण्यात आली त्यावेळी तक्रारदारांना शंका उपस्थित झाल्याने त्यांनी चौकशी केली असता, त्यांना माहिती पडले की, त्यांच्या प्रमाणे इतर भूखंड धारकां कडून सुध्दा विरुध्दपक्षानीं पैसे स्विकारुन भूखंडाचे ताबे दिलेले नाहीत, त्या बद्दलच्या तक्रारी नागपूर सुधार प्रन्यास, पोलीस विभाग आणि जिल्हाधिकारी यांना दिल्यात तरी विरुध्दपक्षां तर्फे कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. त्यानंतर तक्रारदारानां असे माहिती पडले की, त्या ले-आऊटचा मूळ मालक अशोक माणिकराव पांडे याने तो ले-आऊट विरुध्दपक्ष क्रं-4) सौ.रत्नाबाई नरहरी मोहाडीकर यांना विकला आहे. तसेच विरुध्दपक्ष क्रं-1) ते 3) यांची त्या ले-आऊटवर कुठलीही मालकी नव्हती तरी सुध्दा त्यांनी त्यातील भूखंड ब-याच लोकांना विकून धोखाघडी केली आहे.
सबब या तक्रारीं व्दारे तक्रारदारांनी खालील प्रमाणे विनंती केली आहे की-
(1) विरुध्दपक्ष क्रं-1) ते क्रं-3) यांनी जेवढया क्षेत्रफळाचे भूखंडाचे विक्रीपत्र तक्रारदारांचे नावे नोंदवून दिलेले आहे तेवढयाच क्षेत्रफळाचे आकाराचे भूखंड विरुध्दपक्ष क्रं-4) सौ.रत्नाबाई नरहरी मोहाडीकर यांनी टाकलेल्या ले-आऊट मध्ये खरेदी करुन त्या भूखंडांचे तक्रारदारांच्या नावे विक्रीपत्रे नोंदवून द्दावीत.
(2) विरुध्दपक्ष क्रं-1) ते क्रं-3) यांना असे करणे शक्य नसल्यास त्यांनी आसपास लगतच्या अन्य ले आऊट मधील करारातील तेवढयाच क्षेत्रफळाच्या आकाराची भूखंडे खरेदी करुन त्यांची विक्रीपत्रे तक्रारदारांच्या नावे नोंदवून द्दावीत
(3) आणि ते ही विरुध्दपक्ष क्रं-1) ते क्रं-3) यांना शक्य नसल्यास ग्राहक तक्रार क्रं-RBT/CC/12/317 मधील तक्रारकर्ता श्री दिपक जांभूळकर यांना भूखंडाचे विक्रीपत्र नोंदविण्यासाठी आलेला एकूण खर्च रुपये-15,300/- व भूखंडाची आजचे बाजारभावा नुसार असलेली अंदाजे किम्मत रुपये-4,00,000/- असे मिळून एकूण रुपये-4,15,300/- तर ग्राहक तक्रार क्रं-RBT/CC/12/323 मधील तक्रारकर्ती सौ.निना दिपक भैसारे यांना भूखंडाचे विक्रीपत्र नोंदविण्यासाठी आलेला एकूण खर्च रुपये-17,500/- व भूखंडाची आजचे बाजारभावा नुसार असलेली अंदाजे किम्मत रुपये-5,00,000/- असे मिळून एकूण रुपये-5,17,500/- तर ग्राहक तक्रार क्रं-RBT/CC/12/324 मधील तक्रारकर्ती कु.अंजली सहदेव लाडे यांना भूखंडाचे विक्रीपत्र नोंदविण्यासाठी आलेला एकूण खर्च रुपये-16,000/- व भूखंडाची आजचे बाजारभावा नुसार असलेली अंदाजे किम्मत रुपये-5,00,000/- असे मिळून एकूण रुपये-5,16,000/- अशा रकमा तक्रारदारांना परत करण्याचे विरुध्दपक्षांना आदेशित व्हावे.
(4) त्याशिवाय तक्रारदारांना झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल प्रत्येकी रुपये-2,00,000/- आणि तक्रारीचा खर्च म्हणून प्रत्येकी रुपये-20,000/- प्रमाणे विरुध्दपक्ष क्रं-1) ते 3) यांनी देण्याचे आदेशित व्हावे.
03. विरुध्दपक्ष क्रं-1) ते 3) यांना ग्राहक मंचा तर्फे नोटीस मिळूनही ते मंचा समक्ष उपस्थित झाले नाहीत म्हणून त्यांचे विरुध्द उपरोक्त नमुद प्रकरणां मध्ये तक्रार एकतर्फी चालविण्याचे आदेश पारीत करण्यात आलेत, त्या आदेशा विरुध्द त्यांनी मा.राज्य ग्राहक आयोगा मध्ये रिव्हीजन पिटीशन दाखल केली परंतु ते खारीज झाले. सबब नमुद तक्रारी या विरुध्दपक्ष क्रं-1) ते 3) यांचे विरुध्द एकतर्फी चालविण्यात आल्यात.
04. विरुध्दपक्ष क्रं-4) सौ.रत्नाबाई नरहरी मोहाडीकर हिने आपल्या लेखीउत्तरात असे नमुद केले की, तक्रारदार हे तिचे ग्राहक होत नाहीत कारण तिच्या सोबत भूखंड विक्री संबधाने तक्रारदारांचा कोणताही व्यवहार झालेला नव्हता. त्या शिवाय नमुद तक्रारीं मध्ये विरुध्दपक्ष क्रं-4) विरुध्द कुठलीही मागणी केलेली नाही. हया तक्रारी विरुध्दपक्ष क्रं-1) ते 3) यांनी तक्रारदारांची फसवणूक आणि धोखाघडी केल्या संबधीच्या असल्याने तक्रारदारानीं फौजदारी न्यायालयात त्यांचे विरुध्द दाद मागावयास हवी होती.
विरुध्दपक्ष क्रं-4) हिने पुढे असे नमुद केले की, तिने साई ले-आऊट नोंदणीकृत विक्रीपत्राव्दारे खरेदी केला होता परंतु त्या ले-आऊटचे विरुध्दपक्ष क्रं-1) ते 3) कधीही मालक नव्हते आणि तसे असून सुध्दा त्यांनी त्यातील भूखंड हे बेकायदेशीररित्या विकलेत, त्यामुळे ते बेकायदेशीर व्यवहार विरुध्दपक्ष क्रं-4) वर बंधनकारक ठरीत नाही. विरुध्दपक्ष क्रं-4) हिने ले-आऊट मधील सर्व भूखंड विकले असल्याने आता कुठलाही भूखंड विक्रीसाठी शिल्लक नाही म्हणून या सर्व कारणास्तव नमुद तक्रारी खारीज करण्याची विनंती विरुध्दपक्ष क्रं-4) हिने केली.
05. उपरोक्त नमुद तक्रारीं मध्ये तक्रारदारां तर्फे वकील श्री बागडे यांचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला. विरुध्दपक्ष क्रं-4) तर्फे मौखीक युक्तीवादाचे वेळी कोणीही उपस्थित नव्हते. दाखल दस्तऐवज आणि लेखी युक्तीवादाचे अवलोकन करण्यात आले, यावरुन अतिरिक्त ग्राहक मंचा तर्फे खालील प्रमाणे निष्कर्ष देण्यात येतो-
::निष्कर्ष::
06. तक्रारदारानीं स्वतःच असे नमुद केले आहे की, ज्या ले-आऊट मधील भूखंड विकत घेण्याचे त्यांनी विरुध्दपक्ष क्रं-1) ते 3) यांचेशी करार केलेत, त्या ले-आऊटचा मालकी हक्क विरुध्दपक्ष क्रं-1) ते क्रं-3) यांचेकडे नव्हता, त्यामुळे विरुध्दपक्ष क्रं-1) ते क्रं-3) यांनी केलेले ते व्यवहार हे कायदेशीर व्यवहार ठरत नाहीत, तर ते सरळ-सरळ एक प्रकारची फसवणूक आणि धोखाघडीचे व्यवहार होते असे म्हणणे गैर ठरणार नाही.
07. विरुध्दपक्ष विश्वभारती गृहनिर्माण सहकारी संस्थे तर्फे विरुध्दपक्ष क्रं-1) ते क्रं-3) यांनी खोटी जाहिरात देऊन, तक्रारदार व ईतरानां भूखंड विकत घेण्या बद्दल प्रवृत्त केले आणि त्यांचे कडून पैसे स्विकारुन त्यांची फसवणूक केली हे स्पष्ट दिसून येते. विरुध्दपक्ष क्रं-1) ते क्रं-3) यांनी, तक्रारदारांना भूखंडाची जी विक्रीपत्रे नोंदवून दिलीत, त्यांना कायद्दा नुसार कुठलेही महत्व प्राप्त होत नाही किंवा त्याच्या मुळे तक्रारदारांना कुठलेही मालकी हक्क प्राप्त होत नाहीत. तो ले-आऊट विरुध्दपक्ष क्रं-4) सौ. रत्नाबाई नरहरी मोहाडीकर हिने मूळ मालका कडून विकत घेतला होता, तिचे विक्रीपत्र कायदेशीर आणि खरे असल्याने ती त्या ले-आऊटची कायदेशीर मालक होती परंतु तक्रारदार आणि विरुध्दपक्ष क्रं-4) सौ.रत्नाबाई मोहाडीकर यांचे मध्ये त्या ले आऊट मधील भूखंडे विकत घेण्याचे कुठलेही करार झालेले नव्हते, त्यामुळे नमुद तक्रारदार हे विरुध्दपक्ष क्रं-4) सौ.रत्नाबाई मोहाडीकर हिचे ग्राहक होत नाहीत. तक्रारदारांनी त्यांच्या-त्यांच्या तक्रारीं मध्ये विरुध्दपक्ष क्रं-4) सौ.रत्नाबाई हिचे विरुध्द कुठलेही आरोप केलेले नाहीत किंवा तिचे विरुध्द कुठलीही मागणी केलेली नाही, त्यामुळे या तक्रारी विरुध्दपक्ष क्रं-4) सौ.रत्नाबाई हिचे विरुध्द चालण्या योग्य नसल्याने तिचे विरुध्द या तक्रारी खारीज करण्यात येतात.
08. विरुध्दपक्ष क्रं-1) ते क्रं-3) यांचे विरुध्द सदरच्या तक्रारी एकतर्फी चालविण्यात आल्यामुळे नमुद तक्रारीं मध्ये विरुध्दपक्ष क्रं-1) ते क्रं-3) कडून कुठलेही आव्हान किंवा हरकती आल्या नाहीत. विरुध्दपक्ष क्रं-1) ते क्रं-3) यांचा वादातील ले-आऊट संबधी मालकी हक्क असल्या बाबतचा एकही दस्तऐवज अभिलेखावर नाही, त्यामुळे या तक्रारींवर आणखी काही भाष्य करण्याची गरज उरत नाही. एकंदरीत वस्तुस्थिती पाहता तक्रारदारानां त्यांनी भूखंडाचे किम्मतीपोटी तसेच विक्रीपत्र नोंदणी आणि नागपूर सुधार प्रन्यास मध्ये भूखंड नियमितीकरण आवेदनापोटी भरलेली रक्कम अशाप्रकारे दिलेली रक्कम परत करण्याचे आदेश देणे न्यायोचित होईल.
09. वरील सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन, आम्ही, नमुद तक्रारीं मध्ये खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत-
::आदेश::
(1) उपरोक्त नमुद तक्रारदारांच्या तक्रारी, विरुध्दपक्ष विश्वभारती गृहनिर्माण सहकारी संस्था मर्यादित, नागपूर तर्फे तिचे पदाधिकारी विरुध्दपक्ष क्रं-1) संजीव बळीराम मेश्राम, अध्यक्ष. तसेच विरुध्दपक्ष क्रं-2) श्रीकांत रामचंद्रजी बोरकर, सदस्य आणि विरुध्दपक्ष क्रं-3) प्रशांत शांताराम उके, सदस्य यांचे विरुध्द वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या (Jointly & Severally) अंशतः मंजूर करण्यात येतात.
(2) विरुध्दपक्ष क्रं-1) ते क्रं-3) यांना आदेशित करण्यात येते की, त्यांनी ग्राहक तक्रार क्रं-RBT/CC/12/317 मधील तक्रारकर्ता श्री दिपक जांभूळकर यांना भूखंडाचे विक्रीपत्र व नियमितकरण आवेदनापोटी भरलेली रक्कम असे मिळून आलेला एकूण खर्च रुपये-15,300/- (अक्षरी रुपये पंधरा हजार तीनशे फक्त) तर ग्राहक तक्रार क्रं-RBT/CC/12/323 मधील तक्रारकर्ती सौ.निना दिपक भैसारे यांना भूखंडाचे विक्रीपत्र व नियमितकरण आवेदनापोटी भरलेली रक्कम असे मिळून आलेला एकूण खर्च रुपये-17,500/- (अक्षरी रुपये सतरा हजार पाचशे फक्त) तर ग्राहक तक्रार क्रं-RBT/CC/12/324 मधील तक्रारकर्ती कु.अंजली सहदेव लाडे यांना भूखंडाचे विक्रीपत्र व नियमित करण आवेदनापोटी भरलेली रक्कम असे मिळून आलेला एकूण खर्च रुपये-16,000/- (अक्षरी रुपये सोळा हजार फक्त) नमुद तक्रारदारांनी करार केल्याचे दिनांक अनुक्रमे दिनांक-20/08/1997, दिनांक-03/08/1996 व दिनांक-03/08/1996 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे.18% दराने व्याजासह येणा-या रकमा त्या-त्या तक्रारदारांना परत कराव्यात.
(3) तक्रारदारांना झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल प्रत्येकी रुपये-25,000/- (अक्षरी प्रत्येकी रुपये पंचविस हजार फक्त) आणि तक्रारखर्च म्हणून प्रत्येकी रुपये-5,000/-(अक्षरी प्रत्येकी रुपये पाच हजार फक्त) विरुध्दपक्ष क्रं-1) ते क्रं-3) यांनी उपरोक्त नमुद तक्रारदारांना द्दावेत.
(4) सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष क्रं-1) ते क्रं-3) यांनी वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या (Jointly & Severally) निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्त झाल्या पासून 30 दिवसांचे आत करावे.
(5) विरुध्दपक्ष क्रं-4) सौ. रत्नाबाई नरहरी मोहाडीकर यांचेशी तक्रारदारांचा भूखंड विक्री संबधाने कोणताही व्यवहार झालेला नसल्याने व त्यांचा कोणताही संबध नसल्याने त्यांना या तक्रारीं मधून मुक्त करण्यात येते.
(6) निकालपत्राच्या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारांना निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात. निकालपत्राची मूळ प्रत ग्राहक तक्रार क्रं-CC/12/317 मध्ये लावण्यात यावी आणि अन्य ग्राहक तक्रारी मध्ये निकालपत्राच्या प्रमाणित प्रती लावण्यात याव्यात.