नि.16 मे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा यांचेसमोर तक्रार क्र. 132/2010 नोंदणी तारीख – 05/05/2010 निकाल तारीख – 12/08/2010 निकाल कालावधी – 97 दिवस श्री विजयसिंह दि. देशमुख, अध्यक्ष श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्या श्री सुनिल कापसे, सदस्य (श्री विजयसिंह दि. देशमुख, अध्यक्ष यांनी न्यायनिर्णय पारीत केला) ------------------------------------------------------------------------------------ श्री संजय रामचंद्र हिंगमिरे रा. पाटील रेसिडेन्सी, रो हाऊस क्र.4, वाखाणरोड, कराड ता.कराड ----- अर्जदार (अभियोक्ता श्री आर.पी.गांधी) विरुध्द श्री संजय तुकाराम पाटील रा.एस.पी.कन्स्ट्रक्शन्स, पूजा कॉम्प्लेक्स, फलॅट नं.7, रुक्मिणीनगर, वाखाणरोड, कराड ता. कराड जि. सातारा ----- जाबदार (अभियोक्ता श्री प्रशांत बहुलेकर) न्यायनिर्णय अर्जदार यांनी प्रस्तुतचा अर्ज ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 नुसार केलेला आहे. अर्जदार यांचे अर्जातील कथन थोडक्यात खालीलप्रमाणे - 1. कराड ग्रामीणचे हद्दीतील पाटील रेसिडेन्सी रो हाऊस क्र.4 ही दुमजली इमारत अर्जदार यांचे मालकीची आहे. सदरचे मिळकतीसंदर्भात अर्जदार यांनी जाबदार यांचेबरोबर दि.9/1/2009 रोजी साठेखत करारनामा केला होता. त्यानुसार अर्जदार यांनी जाबदार यांना रक्कम रु.11,50,000/- दिलेले होते. या साठेखतावरुन जाबदार यांनी अर्जदार यास खरेदीपत्र करुन दिलेले होते. जाबदार यांनी सदरचे मिळकतीचे बांधकाम करताना उपविभागीय अधिकारी, कराड यांची दिशाभूल करुन बांधकामाची पूर्तता करुन घेतली. जाबदार यांनी अद्यापही बांधकाम पूर्णत्वाचा दाखला घेतलेला नाही. सदरचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असलेचे अर्जदार यांना जुलै 2009 मध्ये निदर्शनास आले. त्याचा सविस्तर तपशील अर्जदार यांनी अर्जामध्ये नमूद केलेला आहे. सदरच्या त्रुटी दूर करुन देण्यास अर्जदार यांनी जाबदार यांना सांगितले असता जाबदार यांनी त्यास टाळाटाळ केली. म्हणून अर्जदार यांनी जाबदार यांना नोटीस पाठविली परंतु तरीही जाबदार यांनी सदरच्या त्रुटी दूर करुन दिल्या नाहीत. सबब विनंती कलमामध्ये नमूद केलेल्या त्रुटी जाबदार यांनी दूर करुन द्याव्यात, किंवा वैकल्पिक दाद म्हणून रु.4,50,000/- मिळावेत, तसेच मानसिक त्रासापोटी व अर्जाचे खर्चापोटी रक्कम मिळावी यासाठी अर्जदार यांनी प्रस्तुतचा अर्ज दाखल केला आहे. 2. जाबदार यांनी प्रस्तुतचे कामी त्यांचे लेखी म्हणणे/कैफियत नि.9 ला दाखल केली आहे. त्यामध्ये त्यांनी अर्जदारचे तक्रारअर्जातील बहुतांश मजकूर नाकारलेला आहे. जाबदार यांनी अर्जदार यांना जो खरेदी दस्त लिहून दिला आहे त्यामध्ये अर्जदार यांनी मंजूर बांधकाम परवानगीप्रमाणे बांधकाम पूर्ण झालेबाबत तसेच साठेखतात नमूद सुविधांबाबत तक्रार नसलेचे अर्जदार यांनी मान्य करुन खरेदीखतावर सही केलेली आहे. जाबदार यांनी बांधकामामध्ये त्रुटी ठेवल्याबाबतचे कथन खोटे आहे. जाबदार यांनी सदनिकेचे बांधकामाबाबत तज्ञाचे मत घेण्याचा प्रस्ताव मांडला होता. सदर मत घेतले असते तर अर्जास कारण घडले नसते. पैसे उकळण्यासाठी अर्जदार यांनी प्रस्तुतचा तक्रारअर्ज दाखल केलेने तो फेटाळणेत यावा असे जाबदार यांनी त्यांचे कैफियतीमध्ये कथन केले आहे. 3. अर्जदारतर्फे अभियोक्ता श्री गांधी यांनी व जाबदारतर्फे अभियोक्ता श्री बहुलेकर यांनी केलेला युक्तिवाद ऐकला. 4. अर्जदारतर्फे दाखल करण्यात आलेले शपथपत्र नि. 2 ला पाहिले. अर्जदारतर्फे दाखल केलेली नि. 5 सोबतची कागदपत्रे पाहिली. जाबदारतर्फे दाखल शपथपत्र नि. 10 ला पाहिले. तसेच जाबदारतर्फे दाखल नि. 11 सोबतची कागदपत्रे पाहिली. 5. प्रस्तुतचे कामी प्रामुख्याने खालीलप्रमाणे मुद्दे उपस्थित होत आहेत. हे मुद्दे व त्यांना दिलेली उत्तरे खालीलप्रमाणे आहेत. मुद्दे उत्तरे अ) अर्जदार व जाबदार यांचे दरम्यान ग्राहक व सेवा देणारे असे नाते आहे काय ? होय ब) जाबदार यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केली आहे काय ? नाही क) अंतिम आदेश - खाली दिलेल्या कारणास्तव अर्जदार यांचा तक्रारअर्ज नामंजूर करणेत येत आहे. कारणे 6. या प्रस्तुतचे अर्जप्रकरणात काही निर्विवाद गोष्टींची पाहणी करणे जरुरीचे आहे. अर्जदार व जाबदार यांचेमध्ये पाटील रेसिडेन्सी रो हाऊस क्र.4 चे खरेदीबाबत साठेखत करारनामा झालेला आहे. सदरचे करारनाम्यास अनुसरुन अर्जदार यांनी जाबदार यांचेकडून खरेदीपत्र करुन घेतलेले आहे. अर्जदार यांनी बांधकामामधील तथाकथित त्रुटींबाबत जाबदार यांना दि.27/3/2010 रोजी नोटीस दिलेनंतर जाबदार यांनी तात्काळ म्हणजे दि.15/4/2010 रोजी त्यास सविस्तर उत्तर देवून अर्जदारचे नोटीसीमधील मजकूर नाकारला आहे. अर्जदार यांनी दाखल केलेला श्री संजय ओसवाल या तज्ञ व्यक्तीमार्फत बांधकामाचे केलेल्या पाहणीचा अहवाल तक्रारअर्जासोबत दाखल केलेला नसून तो दि.7/7/2010 रोजी दाखल केलेला आहे. 7. वर नमूद निर्विवाद गोष्टींमध्ये एक महत्वाची बाब अशी की, अर्जदारतर्फे दाखल करण्यात आलेल्या तज्ञ व्यक्ती श्री संजय ओसवाल यांचा मिळकत पाहणीचा तथाकथित अहवाल पाहिला असता असे दिसते की, श्री संजय ओसवाल यांनी संबंधीत मिळकतीस दि.13/4/2010 रोजी भेट देवून पाहणी केलेली होते. जर सदरची पाहणी ही खरोखरच योग्य व बरोबर असती तर हा अहवाल तक्रारअर्जदार यांनी तक्रारअर्ज दाखल करतेवेळी तक्रारअर्जासोबतच म्हणजे दि.5/5/2010 रोजीच दाखल करणे जरुर होते. परंतु तक्रारअर्जदार यांनी सदरचा अहवाल तक्रारअर्जासोबत का दाखल केलेला नाही, याचे योग्य ते कारण वा खुलासा तक्रारअर्जात नमूद केलेला नाही. या संशयास्पद बाबींवरुन असे दिसते की, तक्रारअर्जदार हे या मंचासमोर स्वच्छ हाताने आलेले नाहीत. 8. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की, तक्रारअर्जदार यांनी खरेदीपत्रात असे नमूद केलेले आहे की, तक्रारअर्जदार यांना संबंधीत साठेखतात नमूद केलेल्या व तक्रारअर्जदार यांना पाहिजे असलेल्या सर्व सोयीसुविधा संबंधीत सदनिकेमध्ये उपलब्ध आहेत व त्या समाधानकारक आहेत, त्याबद्दल त्यांची तक्रार नाही असे स्पष्टपणे नमूद केलेले आहे व त्याप्रमाणे खरेदीपत्रही करुन ताबाही घेतलेला आहे. अशा परिस्थितीत बांधकामामधील तथाकथित त्रुटी नमूद करुन केलेला प्रस्तुतचा तक्रारअर्ज सकृतदर्शनी योग्य व बरोबर आहे असे दिसत नाही, सबब तो फेटाळणेस पात्र आहे. 9. त्यातही महत्वाची गोष्ट अशी आहे की, जाबदार यांनी त्यांचे कैफियतीमध्ये असे स्पष्ट कथन केलेले आहे की, संबंधीत सदनिकेमध्ये काही किरकोळ दुरुस्त्या/दोष राहिले असतील तर ते दूर करुन देण्यास जाबदार तयार आहेत. 10. महत्वाची गोष्ट अशी आहे की, जाबदार यांनी तक्रारअर्जदार यांना जे नोटीस उत्तर दिले आहे, त्याची प्रत तक्रारअर्जदार यांनी तक्रारअर्जासोबत दाखल केलेली नाही. हीही गोष्ट असे स्पष्टपणे दर्शविते की, वर नमूद केलेप्रमाणे तक्रारअर्जदार हे स्वच्छ हाताने मे. मंचासमोर आलेले नाहीत. तक्रार दाखल करण्यास काहीही कारण घडलेले नसतानाही ओढूनताणून जाबदार यांना त्रास देण्याचे उद्देशाने अर्जदार यांनी प्रस्तुतचा तक्रारअर्ज दाखल केलेला आहे असे या मंचाचे स्पष्ट मत आहे. 11. गोष्ट खरी आहे की, तक्रारअर्जदार यांनी तक्रारअर्जातील कथनांचे समर्थनार्थ काही फोटोग्राफस दाखल केलेले आहेत. परंतु महत्वाची गोष्ट अशी आहे की, संबंधीत फोटो कोणत्या फोटोग्राफरने काढले आहेत, कोणत्या जागेचे/मिळकतीचे काढले आहेत, याबाबत स्पष्ट कथन असणारे संबंधीत फोटोग्राफरचे शपथपत्र तक्रारअर्जदार यांनी दाखल करणे जरुर होते. परंतु तसे ते दाखल न केलेमुळे संबंधीत फोटोंवर विश्वास ठेवून तक्रारअर्जदार यांचा प्रस्तुतचा तक्रारअर्ज मंजूर करता येणार नाही. उलटपक्षी जाबदार यांनी त्यांचे कैफियतीतील कथनांचे समर्थनार्थ काही फोटो दाखल केलेले आहेत. ते फोटो ज्या व्यक्तीने काढले आहेत त्याचे शपथपत्र जाबदार यांनी दाखल केलेले आहे. 12. या सर्व कारणास्तव व वर नमूद मुद्दयांच्या दिलेल्या उत्तरास अनुसरुन अर्जदार यांचा तक्रारअर्ज नामंजूर करणेत येत आहे. आदेश 1. अर्जदार यांचा तक्रारअर्ज फेटाळणेत येत आहे. 2. खर्चाबाबत काहीही आदेश करणेत येत नाहीत. 3. सदरचा न्यायनिर्णय खुल्या न्यायमंचात जाहीर करणेत आला. सातारा दि. 12/8/2010 (श्री सुनिल कापसे) (सुचेता मलवाडे) (विजयसिंह दि. देशमुख) सदस्य सदस्या अध्यक्ष
| Smt. S. A. Malwade, MEMBER | HONABLE MR. Vijaysinh D. Deshmukh, PRESIDENT | Mr. Sunil K Kapse, MEMBER | |