1. अर्जदाराने ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 अंतर्गत गैरअर्जदाराविरूध्द प्रस्तूत तक्रार दाखल केली आहे. 2. अर्जदार उपरोक्त पत्त्यावर राहत असून गैरअर्जदार क्र. 1 हे श्री समृद्ध शिक्षण विकास मंडळ चंद्रपुर चे विश्वस्त अध्यक्ष असून सदर संस्था ताराशक्ती प्रायव्हेट आयटीआय या नावाने नागपूर रोड स्थित ताडाळी येथे खाजगी आयटीआय चालवीत आहेत. या आयटीआयला गैरअर्जदार क्र. 2 ने परवानगी दिलेली असल्यामुळे अर्जदाराने 2014 चे जून महिन्यात फिटर या अभ्यासक्रमात प्रवेश घेतला. त्यावेळी अर्जदाराकडून गैरअर्जदार क्र. 1 ने रुपये ३०,०००/-फी रुपी मोबदला घेतलेला आहे. अर्जदाराने 2017 मध्ये तिसऱ्या सेमिस्टर ची परीक्षा दिली या परीक्षांमध्ये अर्जदार उत्तीर्ण झाले असताना सुद्धा गैरअर्जदार यांनी जाणीवपूर्वक अर्जदार अनुत्तीर्ण झाल्याची गुणपत्रिका दिली त्यामुळे अर्जदाराला मोठा धक्का बसला व त्याने नागपूर येथील सहसंचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण सिव्हिल लाईन नागपूर यांच्या कार्यालयात जाऊन चौकशी केली असता अर्जदाराला ओ.एम आर .ची कल्पना देण्यात आली व त्यामध्ये धक्कादायक माहिती अर्जदारास मिळाली असून अर्जदार हे वरील नोंदणीनुसार वरील परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेला आहे अशी माहिती मिळाल्यामुळे अर्जदाराने लगेच गैरअर्जदार क्र. 1 कडे सदर माहिती दिली असता गैरअर्जदार क्र. 1 ने वरील बाब कबूल करून गैरअर्जदार क्र. 2 चे कार्यालयाची ही चूक आहे सांगितले. त्यानंतर गैरअर्जदार क्र. 1 च्या सूचनेनुसार दिनांक 2.1.2018 रोजी अर्जदार व गैरअर्जदार क्र. 2 चे कार्यालयात कार्यासन अधिकारी श्री. झावरे यांच्याशी संपर्क केला असता सदर अधिकाऱ्यांने ही चूक गैरअर्जदार क्र. 1 ची आहे, योग्य कागदपत्राची पूर्तता गैरअर्जदार क्र. 1 ने न केल्यामुळे अशी परिस्थिती उद्भवली आहे असे अर्जदारास सांगितले. गैरअर्जदार क्र. 2 ने वरील माहिती दिल्यावर अर्जदाराने गैरअर्जदार क्र. 1 कडे व प्राचार्य श्री.वाकडे यांच्याकडे सुधारित गुणपत्रिका देण्यासाठी पाठपुरावा केला असता त्यांनी सांगितले की संस्थेकडून सहकार्य नसल्यामुळे सुधारित गुणपत्रिकेची पुढील कारवाई करणे शक्य नाही. अर्जदाराचे शैक्षणिक नुकसान झाले व याकरिता गैरअर्जदार क्र. 1 व 2 हे जबाबदार आहेत. गुणपत्रिका देण्याकरिता अर्जदाराने वेळोवेळी गैरअर्जदार क्र. 1 व 2 कडे मागणी केली असताना सुद्धा त्यांनी ती मागणी पूर्ण न केल्यामुळे अर्जदाराने त्यांच्या वकिलामार्फत दिनांक 5. 2.2018 रोजी गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांना नोटीस पाठवून सुधारित गुणपत्रिकेची मागणी केली. दिनांक 22. 2 2018 रोजी गैरअर्जदार क्र. 1 ने खोट्या आशयाचे पत्र पाठवून गुण पत्रिकेकरिता करता गैरअर्जदार क्र. 1 ची जबाबदारी नाही.तसेच गैरअर्जदार क्र. 2 ने गैरअर्जदार क्र. 1 ने अर्जदाराची हॉल टिकीट इलिजिबिलिटी क्रायटेरिया पूर्ण करण्यासंबंधीची प्रक्रिया पूर्ण न केल्यामुळे अर्जदारास पेपर 1 मध्ये उत्तीर्ण असून देखील त्याचे गुण डिजिटी नवी दिल्ली यांना अपलोड करता आले नाही व त्यामुळे सदर अर्जदारांचा निकाल डिजिटी, नवी दिल्ली यांच्या मार्फत घोषित करण्यात आला नाही असे नमूद केले. गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांच्या कृतीमुळे अर्जदार उत्तीर्ण होऊन सुद्धा त्याला अनुत्तीर्ण झाल्याची गुणपत्रिका देण्यात आलेली आहे. सदर कृती ही सेवेत न्यूनता असल्यामुळे तिन्ही अर्जदारांचे 1 वर्षाचे शैक्षणिक नुकसान झाल्यामुळे अर्जदाराने गैरअर्जदार क्र. 1 व 2 विरुद्ध सदर तक्रार मंचात दाखल केलेली आहे. 3. अर्जदाराची मागणी अशी आहे की गैरअर्जदार क्र. 2 ने अर्जदार उत्तीर्ण झाला आहे असे दिनांक 21. 2 .2018 चे पत्रात अर्जदारास कळविले असल्यामुळे गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी अर्जदाराला जुलै, 2017 मध्ये दिलेल्या तृतीय सत्राची परीक्षा पास झालेला आहे अशी गुणपत्रिका अर्जदारास द्यावी असा आदेश देण्यात यावा तसेच गैरअर्जदारांमुळे अर्जदारांचे शारीरिक-मानसिक व आर्थिक नुकसान झालेले असल्यामुळे सदर नुकसानभरपाईपोटी रुपये प्रत्येकी रु.५०,०००/- गैरअर्जदाराने तिन्ही अर्जदारास द्यावी व तक्रारीचा खर्च २५,०००/- रुपये अर्जदारास देण्यात यावा. 4. गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांना मंचातर्फे नोटीस पाठवण्यात आली गैरअर्जदार क्र. 1 यांनी अर्जदाराचे तक्रारीतील कथन खोडून काढत पुढे विशेष कथन केले की, गैरअर्जदार क्र.१ ची खाजगी ओद्योगिक प्रशिक्षण संस्था ही गैरअर्जदार क्र. २ चे तसेच केंद्र शासनाअंतर्गत कार्य करते. शासनाचा निर्देशनाप्रमाणे नियमितपणा आणण्याच्या दृष्टीने इंटरनेट द्वारे एन सी व्ही टी एम आय एस पोर्टल सुरू केले. त्या पोर्टलवर पूर्ण माहिती देण्याची जबाबदारी तीन भागांमध्ये विभाजित केली आणि त्याप्रमाणे प्रत्येक अधिकाऱ्याने त्याबाबतची माहिती त्या ग्रुपवर टाकायची जबाबदारी असते त्याची माहिती फक्त गैरअर्जदार क्र. १ कडून त्या पोर्टल वर माहिती भरली जाते त्यानंतर विद्यार्थ्यांनी भरलेली परीक्षा फी ही गैरअर्जदार क्र. 2 कडे पाठवावी लागते आणि त्याबद्दलची माहिती सुद्धा पोर्टलवर पूर्ण पाठवावी लागते केंद्र शासनाने 6 जुलै, 2015 रोजी तशा प्रकारचा आदेश निर्गमित केला आहे.पोर्टल वर माहिती भरल्यानंतर विद्यार्थी जर परीक्षेला बसू शकणार (इफ एलिजिबल) असेल तरच त्याला परीक्षेला बसण्याच्या प्रवेशपत्राची छापील प्रत काढून विद्यार्थ्याला या गैरअर्जदाराने द्यावी लागते. माहिती भरून दिल्यानंतर विद्यार्थी पात्र असेल तरच त्याने परीक्षेला बसायचे प्रवेश पत्र हे गैरअर्जदार क्र. 2 कडून मंजूर झाल्यानंतरच प्रवेश पत्र तयार होऊन त्या वेबसाईटवर गैरअर्जदार क्र. 1 ला माहिती होते. गैरअर्जदार क्र. 1 कडून पूर्ण माहिती भरली नसल्यास त्याचे प्रवेश पत्र निघू शकत नाही अशा प्रकारचे निर्देश केंद्र शासनामार्फत 5 जुलै २०१६ रोजी निर्गमित करण्यात आले. त्यात महाराष्ट्र शासनाची जबाबदारी व डिजिटी ची जबाबदारी सुद्धा निश्चित करण्यात आलेली आहे. परीक्षा घेण्याची आणि त्यानंतर निकाल लावण्याची जवाबदारी गैरअर्जदार क्र. २ ची आहे. त्याच्या कडून परिक्षेचा निकाल लावताना चूक झालेली आहे. तसेच त्यांनी शुल्क गैरअर्जदार क्र. 2 कडे भरलेली आहे, त्यामुळे गैरअर्जदार क्र.१ ह्यांचे तिन्ही अर्जदार ग्राहक होऊ शकत नाहीत. गैरअर्जदार क्र.1 कडे असलेली माहिती ही केंद्र केंद्र शासनाच्या पोर्टलवर आधीच भरण्यात आलेली आहे आणि त्यानंतर त्यांचे परीक्षा प्रवेश पत्र तयार होऊन अर्जदाराला देण्यात आलेले आहे. या गैरअर्जदारातर्फे तिन्ही अर्जदारांना सेवेत कोणतेही न्यूनता देण्यात आलेली नाही. सबब अशी कोणतीही तक्रार या गैरअर्जदारा विरुद्ध चालू शकत नाही. 5. गैरअर्जदार क्र. 2 यांनी तक्रारीत त्यांचे उत्तर दाखल करून आक्षेप घेतला की ग्राहक तक्रार निवारण कायद्याच्या 2(1) (D) नुसार अर्जदाराला सदरहू मागणी मागण्याचा किंवा प्रार्थना करण्याचा कोणताच अधिकार व हक्क नाही. सदर अर्ज हा कपोलकल्पीत व खोटा आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरू करण्यास सन 2011 मध्ये वीजतंत्री व जोडारी या व्यवसायात परवानगी देण्यात आलेली आहे व प्रवेश सत्र 2012 पासून सुरू झालेले आहे. अर्जदाराने सत्र 2014मध्ये तारा शक्ती खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था ताडली जिल्हा चंद्रपूर येथे प्रवेश घेतला होता. त्यामध्ये प्रथम सत्र परिक्षा जानेवारी 2015 द्वितीय सत्र परिक्षा जुलै 2015 व तिसरी सत्रपरीक्षा जानेवारी 2016 मध्ये अर्जदाराने दिली. त्यापैकी तिसरी सत्र परीक्षे मध्ये तो अनुत्तीर्ण झाला. त्यानंतर त्याने जुलै 2017 मध्ये तिसरी सत्र परीक्षा दिली त्यात तो उत्तीर्ण झाला असे तक्रारअर्जामध्ये नमूद आहे. सदर प्रकरणात डिजिटी नवी दिल्ली ही परीक्षेसंबंधी सर्वोच्च कार्यालय आहे त्यामध्ये एम आय एस पोर्टल वर वेळोवेळी परीक्षेसंबंधी दिलेल्या सूचनांचे पालन विहित मुदतीत संस्थेकडून करणे क्रमप्राप्त आहे. परीक्षेसंबंधी आवश्यक सूचना मध्ये परीक्षा हजेरी सत्र गुण परीक्षा शुल्क इत्यादी हे गैरअर्जदार क्र. 1 यांच्याकडून विहित मुदतीत भरणे आवश्यक असते सदर तिन्ही अर्जदार जुलै 2017 च्या परीक्षेत बसला त्याची सर्व माहिती ही ऑनलाइन एम आय एस पोर्टल वर अपलोड करणे हॉल तिकीट जनरेट करणे गैरअर्जदार क्र. १ चे काम होते. त्याबाबत सुचना गैरअर्जदार क्र. २ यांनी दिनांक 15. 6. 2017 चे पत्रान्वये गैरअर्जदार क्र. 1 यांना दिल्या होत्या. अर्जदाराने दिलेल्या जुलै 2017 च्या परीक्षेचा एलिजिबिलिटी क्राईटरिया तपासला असता त्यामध्ये नॉट एलिजिबल असे निदर्शनांस आले. ही बाब डिजिटी नवी दिल्ली व गैरअर्जदार क्र. 1 यांच्या अखत्यारीत येत असल्यामुळे कुठल्या कारणास्तव निकालात गुण दर्शविण्यात आले नाही हे गैरअर्जदार क्र. 2 यांच्या कक्षेत मोडत नाही. गैरअर्जदार क्र. 2 यांनी दिनांक 20. 2. 2018 रोजी डिजीटी नवी दिली यांना निकालात गुण दिसत नाही व हॉल तिकीट जनरेशन क्रायरिया पुर्ण न केल्याची शंका उपस्थित केली तसेच डिजीटी नवी दिल्ली यांना निकालाची प्रक्रिया पूर्ण करण्याबाबत विनंती पत्र पाठवले. त्यामुळे गैरअर्जदार क्र. 2 यांच्यावर लावलेले आरोप चुकीचे आहे. गैरअर्जदार क्र. 1 यांनी तिन्ही अर्जदारांचे जुलै 2017 तृतीय सत्राबाबतचे हॉल तिकीट जनरेट केलेले होते व त्याचा सर्व पुरावा गैरअर्जदार क्र. 2 यांनी डिजिटी नवी दिल्ली यांना दिनांक 6. 4 2018 रोजी च्या पत्रान्वये सादर करण्यात आला व तिन्ही अर्जदारांचे निकाल जाहीर करण्याबाबत पुन्हा विनंती करण्यात आली.डिजीटी नवी दिल्ली यांनी दिनांक 10. 4. 2018 रोजी चे इमेल द्वारे गैरअर्जदार क्र. 2 यांना कळवण्यात आले की गैरअर्जदार क्र. 2 यांचे ई-मेल पत्र दिनांक 20 2 2018 व 6 4 2018 च्या अनुषंगाने तिन्ही अर्जदाराचे गुण एन सी व्ही टी एम आय एस पोर्टल वर अपलोड झालेले आहे व त्याचा निकाल जानेवारी 2018 च्या परीक्षेची सोबत जाहीर करण्यात येईल असे कळवले त्यामुळे ज्या कारणास्तव अर्जदाराने माननीय ग्राहक निवारण म्हणजे चंद्रपूर येथे दाखल तक्रारीत केलेल्या मागणीची पूर्तता झालेली आहे. गैरअर्जदार क्र. 2 ने दिनांक 15. 5. 2018 रोजी एक पत्र प्राचार्य, ताराशक्ती अशासकीय औद्योगिक केंद्र, ताडाली, चंद्रपुर यांना पाठवून अखील भारतीय व्यवसाय सत्र परीक्षा 2018 चा निकाल दिनांक 1. 5. 2018 रोजी घोषित करण्यात आला आणि सदर निकालात आपल्या संस्थेतील अर्जदार यांचा निकाल घोषित केलेला असून सदर प्रशिक्षणार्थी सदर परीक्षेत पास झाले आहेत असे कळविण्यात आले. तसेच त्यानंतर उपरोक्त प्रशिक्षणार्थ्यांची पास झाल्याची गुणपत्रिकांचे वाटप करून त्यांना त्यांची पोहोच पावती या कार्यालयास सादर करावी असे कळविण्यात आले. सबब गैरअर्जदार क्र. 2 कडून कोणतीही चूक झालेली नसून सदर तक्रार गैरअर्जदार क्र. 2 विरुद्ध खारीज करण्यात यावे अशी विनंती
| | |
मुद्दे निष्कर्ष 1. गैरअर्जदार क्र. १ यांनी तिन्ही अर्जदाराप्रती सेवेत न्यूनता केल्याची केल्याची बाब अर्जदार सिद्ध करतात काय ? होय 2. गैरअर्जदार क्र. 2 यांनी तिन्ही अर्जदाराप्रती सेवेत न्यूनता केल्याची केल्याची बाब अर्जदार सिद्ध करतात काय ? नाही 3. आदेश काय ? अंशत: मान्य कारण मिमांसा मुद्दा क्र. १ बाबत :- 6. अर्जदार ह्यांनी गैरअर्जदार क्र.१ श्री समृद्धी शिक्षण विकास मंडळ ह्या संस्थेत ताराशक्ती प्रायव्हेट आय टी आय या नावाने खाजगी आय टी.आय. ला सन २०१४ चे जुन महिन्यात फिटर या अभ्यासक्रमासाठी दाखला घेतला व या आय टी.आय. ला गैरअर्जदार क्र. २ ने परवानगी दिली आहे . गैरअर्जदार क्रमाक १ ने अर्जदाराकडून दाखला करिता रु.३०,०००/- घेतले हि बाब वादात नाही. अर्जदाराने जुलै २०१७ मध्ये तिसरि सेमिस्टर ची परीक्षा दिली असताना उत्तीर्ण असूनही अनुत्तीर्ण झाल्याची गुणपत्रिका अर्जदारांना देण्यात आली अशी माहिती तिन्ही अर्जदारांना ओ एम आर शिटवरील नोंदी वरून कळली. त्यानुसार अर्जदाराने गैरअर्जदार क्र.2 ला सुधारीत गुणपत्रिकेची मागणी केली परंतु गैरअर्जदार क्र. १ संस्थेकडून सहकार्य न मिळाल्यामुळे त्यांनी सुधारीत गुणपत्रिका देण्यास असमर्थता दाखवली. गैरअर्जदार क्र. १ ने नमूद केले कि परीक्षा घेण्याची आणि त्यानंतर निकाल लावण्याची जवाबदारी हि गैरअर्जदार क्र. २ ची आहे . अर्जदाराने परीक्षा शुल्क पण गैरअर्जदार क्र.2 कडे भरले त्यामुळे अर्जदार हे गैरअर्जदार क्र. १ चे ग्राहक नाही. गैरअर्जदार क्र. २ ने त्याच्या युक्तिवादात असे नमूद केले कि डिजीटी नवी दिल्ली हे परीक्षेसंबंधी सर्वोच्च कार्यालय आहे .त्यामध्ये MIS पोर्टल वर वेळोवेळी परीक्षेसंबंधीच्या सूचना द्यायच्या असतात. परीक्षेसंबंधी सुचानामध्ये विद्यार्थ्याची हजेरी ,सत्र गुण, परीक्षा शुल्क इत्यादी माहिती गैरअर्जदार क्र. १ यांच्याकडून विहित मुदतीत भरणे आवश्यक असते. अर्जदार व गैरअर्जदार क्र. १ व २ ह्या दोन्ही पक्षांचे युक्तीवाद ऐकल्यावर मंच या निष्कर्षाप्रत येत आहे कि अर्जदारा ह्यांनी गैरअर्जदार क्र. १व २ कडून शुल्क देवून सेवा घेतलेली असल्यामुळे अर्जदार हे गैरअर्जदार क्र.1 व 2 चे ग्राहक आहे. तसेच अर्जदार ह्यांनी दिनांक १२/०७/२०१८ रोजी प्रकरणात दाखल केलेला डेप्युटी डायरेक्टर ऑफ ट्रेनींग, नवी दिल्ली यांचे दि. १६.०३.२०१८ तसेच उपसंचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, म.रा. मुंबई यांचे पत्र दिनांक 21.3.2018 या दस्तांवरुन असे स्पष्ट होत आहे कि गैरअर्जदार क्र. १ आय.टी.आय ह्यांनी उपरोक्त तिन्हि अर्जदारांची माहिती पूर्णपणे NCVT MIS पोर्टल वर न भरल्यामुळे तिन्ही अर्जदार परीक्षेत पास असूनही त्यांचे गुण डि जी टी, नवी दिल्ली यांना अपलोड करता आले नाही. परिणामतः अर्जदार हे परीक्षेत उत्तीर्ण असूनही त्यांना अनुत्तीर्ण दाखविण्यात आले ही बाब कागदोपत्री पुराव्यांवरून सिध्द होत आहे. गैरअर्जदार क्र.1 यांच्या वरील सेवेतील त्रुटीमुळे तिन्ही अर्जदारांचे प्रत्येकी एका वर्षाचे कुठेही भरून न निघणारे शैक्षणीक नुकसान झालेले आहे तसेच त्यांना मानसीक व शारिरीक त्रास सहन करावा लागलेला आहे, हि बाब स्पष्ट होत आहे. सबब गैरअर्जदार क्र.1 यांनी तक्रारकर्त्यांप्रती न्युनतापूर्ण सेवा दिलेली आहे ही बाब सिध्द होत असून मुददा क्र.1 चे उत्तर होकारार्थी देण्यांत येते. मुद्दा क्र. 2 बाबत :- वरील मुद्दयावरील निष्कर्षानुसार गैरअर्जदार क्र. १ आय.टी.आय ह्यांनी उपरोक्त तिन्हि अर्जदारांची माहिती पूर्णपणे NCVT MIS पोर्टल वर न भरल्यामुळे तिन्ही अर्जदार परीक्षेत पास असूनही त्यांचे गुण डि जी टी, नवी दिल्ली यांना अपलोड करता आले नाही. परिणामतः अर्जदार हे परीक्षेत उत्तीर्ण असूनही त्यांना अनुत्तीर्ण दाखविण्यात आले. मात्र त्यानंतर गैरअर्जदार क्र. २ ह्यांनी तिन्ही गैर अर्जदारांना जानेवारी,२०१८ च्या सेशन मध्ये उत्तीर्ण झाल्याची गुणत्रिका देऊ केलेली आहे ही बाब गैरअर्जदार क्र.2 यांनी आपल्या लेखी उत्तरात नमुद केली असून ही बाब अर्जदारांनाही मान्य आहे. वरील परिस्थितीत गैरअर्जदार क्र.2 यांनी वेळोवेळी उचीत पावले उचलली असून त्यासंदर्भातील पत्रव्यवहार प्रकरणात दाखल आहे. सबब गैरअर्जदार क्र.2 चे सेवेत कोणतीही न्युनता निदर्शनांस येत नाही. सबब मुद्दा क्र.2 चे उत्तर नकारार्थी नोंदविण्यात येते. मुद्दा क्र. 3 बाबत :- ७. मुद्दा क्र. १ व 2 च्या विवेचनावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश (1) तक्रारकर्त्याची तक्रार क्र. 55,56 व 57/2018 अंशत: मंजूर करण्यात येते. (2) गैरअर्जदार क्र.1 यांनी तक्रार क्र. 55,56 व 57/2018 मधील तक्रारकर्त्यांना शैक्षणीक, शारिरीक व मानसीक नुकसानाबददल नुकसान भरपाईदाखल प्रत्येकी रु.25,000/- तसेच तक्रार खर्चपोटी प्रत्येकी रु.5,000/- द्यावेत. (3) गैरअर्जदार क्र.2 विरूध्द कोणताही आदेश देण्यांत येत नाही. (4) उभय पक्षांना आदेशाची प्रत तात्काळ पाठविण्यात यावी . चंद्रपूर दिनांक – 06/06/2019 (श्रीमती.कल्पना जांगडे(कुटे)) (श्रीमती. किर्ती वैदय (गाडगीळ)) (श्री. श्री.अतुल डी. आळशी) सदस्या सदस्या अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, चंद्रपूर. |