( आदेश पारित द्वारा : श्री. विजयसिंह ना. राणे, अध्यक्ष ) आदेश ( पारित दिनांक : 22 आक्टोबर, 2010 ) यातील तक्रारदार श्री रवि विठ्ठलराव मेश्राम यांनी गैरअर्जदारासोबत, जे भुखंड विकसक व विक्रीचा व्यवसाय करतात. दिनांक 10.11.2005 रोजी करार करुन त्यांचेकडील मौजा-म्हसाळा,प.ह.न.15,खसरा नं.4, भुखंड क्रमांक 72 एकुण क्षेत्रफळ 900 चौ.फु. तहसिल कामठी,जिल्हा नागपुर, येथील भुखंड एकुण रुपये 36,000/- मोबदला देऊन विकत घेण्याचा करार केला. त्यापैकी रुपये 5,000/- गैरअर्जदार याना दिले व 31,000/- रुपये पुढे किस्तीप्रमाणे देण्याचे ठरले. पुढे तसे वेळोवेळी अनुक्रम रुपये 1500/-, 3500/-, 4,000/-, 5,000/-, 17,000/-, 5000/-, असे एकुण मोबदला रक्कम रुपये 36000/- गैरअर्जदारास दिले. गैरअर्जदाराने त्यानंतर भुखंडाचे विक्रीपत्र करुन देणे क्रमप्राप्त होते. मात्र त्यांनी तसे केले नाही. उलट दिनांक 24.3.2008 रोजी तक्रारकर्त्याला पत्र पाठविले. तक्रारकर्त्याने केवळ 19,000/- एवढी रुपये रक्कम दिली व रुपये 23,220/- बाकी घेणे आहे असे कळविले. तक्रारकर्त्याने याबाबत गैरअर्जदार यांचे कार्यालयात भेट घेतली मात्र त्यांनी समाधान कारण उत्तर दिले नाही. पुढे तक्रारकर्त्याने दिनांक 4.12.2009 रोजी गैरअरर्जदाराची भेट घेतली असता, त्यांनी लिखीत स्वरुपात विक्री रक्कम म्हणुन रुपये 40,500/- एवढया जास्तीच्या रक्कमेची मागणी केली, व त्यावेळी रुपये 36,000/- एवढी रक्कम मिळाल्याचे मान्य केले आणि भुखंडाची रक्कम रुपये 85/- प्रति चौ.फु.प्रमाणे 76,500/- रक्कमेची मागीतली. गैरअर्जदाराच्या या गैरकायदेशीर कृत्यामुळे शेवटी नाईलाजाने तक्रारकर्त्याने ही तक्रार दाखल केली आणि त्यात गैरअर्जदाराने भुखंडाचे विक्रीपत्र करुन द्यावे. मानसिक व शारिरिक त्रासापोटी रुपये 25,000/-, व तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 5,000/- मिळावे अशी मागणी केली यात गैरअर्जदार यांना नोंदणीकृत डाकेद्वारे नोटीस पाठविण्यात आली. नोटीस प्राप्त होऊन गैरअर्जदार हजर झाले व आपला लेखी जवाब दाखल केला. आपल्या लेखी जवाबात गैरअर्जदाराने तक्रारकर्त्याची सर्व विपरित विधाने नाकबुल केली व सौद्याची बाब मान्य केली. सौदा रुपये 36,000/- चा झाल्याचे मान्य केले. तसेच डेव्हलपमेन्ट खर्च व खरेदीचा खर्च तक्रारकर्त्यास दयावयाचा होता असे नमुद करुन रुपये 40,500/- एवढे डेव्हलपमेंन्ट, रजिस्ट्रेशन खर्च व आकस्किम खर्च तक्रारकर्त्याने दिल्यास ते भुखंडाचे विक्रीपत्र करुन देण्यास तयार आहे, तक्रारकर्त्याने कराराचा भंग केलेला आहे, त्यांनी रक्कमेचा भरणा केलेला नाही, म्हणुन तक्रार खारीज करावी अशी विनंती केली. तक्रारदाराने आपली तक्रार प्रतिज्ञालेखावर दाखल केली असून, दस्तऐवजयादीनुसार बयाणापत्र, रक्कम भरल्याच्या पावत्या, नोटीस, पोस्टाची पोच पावती व पत्र, गैरअर्जदाराचा रक्कमेचा तक्ता केलीत. इत्यादी कागदपत्रे दाखल केली. तर गैरअर्जदार यांनी आपला लेखी जवाब शपथपत्रावर दाखल केला सोबत कोणतेही दस्तऐवज दाखल केले नाही. तक्रारदाराचे प्रतिउत्तर दाखल केले. युक्तिवादाचे वेळी उभयपक्षकार गैरहजर. त्यामुळे तक्रार गुणवत्तेवर निकाली काढली. #####- का र ण मि मां सा -##### गैरअर्जदार यांनी या प्रकरणात असा आक्षेप घेतलेला आहे की, या न्यायालयास अधिकारक्षेत्र नाही. गैरअर्जदाराचे या आक्षेपात तथ्य नाही. तक्रारदार हे गैरअर्जदाराचे ग्राहक आहे. त्यांनी गैरअर्जदारास मोबदला दिलेला आहे. गैरअर्जदार भुखंड विक्रीचा व्यवसाय करीत असल्याने तक्रारदार ग्राहक ठरतात. कारण गैरअर्जदार सेवा देत आहे व अशा प्रकारे न्यायालयास अधिकार क्षेत्र आहे. सदर प्रकरणात तक्रारकर्त्याने गैरअर्जदारासोबत वादातीत भुखंडाचा व्यवहार रुपये 36,000/- एवढया किमतींत सौदा पत्राद्वारे केला व गैरअर्जदारास रुपये 36,000/- प्राप्त झालेले आहे ही बाब गैरअर्जदार यांनी मान्य केलेली आहे. आता गैरअर्जदारांचा मुद्दा एवढाच आहे की, ते तक्रारकर्त्याकडुन रुपये 40,500/- एवढी रक्कम डेव्हलपमेंन्ट, रजिस्ट्रेशन व आकस्किम खर्च असे रक्कम मागण्यास पात्र आहे. याबाबत सदर बयाणापत्रात आधार नाही. बयाणापत्रामध्ये यासंबंधी असलेला उल्लेख की विकासाचा खर्च येईल तो तक्रारकर्त्यास भरावा लागेल यासंबंधी सदर ठिकाणी शासकीय अथोरिटीकडुन अशा विकास खर्चाची मागणी होणे गरजेचे आहे. तसे झाल्याचे दिसुन येत नाही. त्यासंबंधी कोणतेही दस्तावेज गैरअर्जदार यांनी प्रकरणात दाखल केलेले नाही. थोडक्यात त्यांनी अशी विकासाची रक्कम संबंधीत प्राधीकरणाकडे भरलेली आहे, ही बाब सिध्द केलेली नाही, आणि त्यामुळे अशी मागणी करण्याचा अधिकार गैरअर्जदार यांना नाही. तक्रारकर्ती ही विक्रीपत्राच्या खर्चास जबाबदार आहे. विक्रीपत्राचा खर्च आणि डेव्हलपमेंन्ट खर्च म्हणुन रुपये 3,000/- नोंदणीचे वेळी देण्याचे ठरले. अशी बयाणा पत्रात तरतुद आहे. ही बाब प्रत्यक्ष नमुद आहे. थोडक्यात तक्रारदाराची जबाबदारी विक्रीपत्राकरिता येणारा विक्रीपत्राचा खर्च व नोंदणीचा खर्च तसेच विकास शुल्क म्हणुन रुपये 3,000/- ची रक्कम गैरअर्जदार हे मिळण्यास पात्र आहेत. ही बाब दस्तावेजवरुन सिध्द होते. आणि गैरअर्जदार हे तक्रारकर्त्याकडुन अवास्तव व सौदाबाहय रक्कमेची मागणी करीत आहे व विक्रीपत्र करुन देत नाही ही सेवेतील त्रुटी ठरते व हे करारावरुन स्वयंस्पष्ट आहे. वरील परिस्थितीचा विचार करता आम्ही खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. // अं ति म आ दे श //- 1. तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. 2. गैरअर्जदार यांनी आदेश प्राप्त झाल्यापासुन एक महिन्याचे आत तक्रारदारास विक्रीपत्र करुन देण्याची तारीख, त्या विक्रीपत्रास लागणारा खर्च, (मुद्रांक शुल्क व नोदणीचा खर्च) याचा तपशील याबाबत तक्रारदारास पत्र द्यावे. तसेच तक्रारदाराने एक महिन्याचे आत गैरअर्जदार यांना धनाकर्षाद्वारे (डि.डि.) वरील विक्रीपत्राचे खर्चाची रक्कम अधिक रुपये 3000/- जे बयाणा पत्रात देय आहे ती रक्कम गैरअर्जदारास पाठवावी. त्यानंतर गैरअर्जदाराने विहीत तारखेला तक्रारदाराचे वादातीत भुखंडाचे मौजा-म्हसाळा,प.ह.न.15,खसरा नं.4, भुखंड क्रमांक 72 एकुण क्षेत्रफळ 900 चौ.फु. तहसिल कामठी,जिल्हा नागपुर, चे विक्रीपत्र करुन नोंदवुन द्यावे आणि भुखंडाचा ताबा द्यावा. 3. गैरअर्जदाराने रुपये 5,000/- एवढी रक्कम तक्रारदारास झालेल्या मानसिक व शारिरिक त्रासापोटी द्यावी. तक्रारदार सदर रक्कम या आधिच्या परिच्छेद क्रं.2 मधील गैरअर्जदारास देय रक्कमेमध्ये समायोजीत करु शकतील. तसेच तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 1,000/- गैरअर्जदार यांनी द्यावे. ही रक्कम देखील तक्रारदार गैरअर्जदार यांना देय असलेल्या रक्कमेमध्ये समायोजीत करु शकतील.
| [HONABLE MRS. Mrs.Jayshree Yangal] Member[HONORABLE Shri V. N. Rane] PRESIDENT[HONABLE MRS. Mrs. Jayshree Yende] MEMBER | |