निकालपत्र
(घोषीत द्वारा- मा. श्री आर. एच. बिलोलीकर, सदस्य )
1. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांच्या विरुध्द सेवेत त्रुटी दिल्याच्या कारणावरुन तक्रार दाखल केलेली आहे. अर्जदाराची तक्रार थोडक्यात खालील प्रमाणे आहे.
2. अर्जदार चऊत्राबाई भ्र. बळीराम हिवराळे हे जांभळी ता. मुखेड जि. नांदेड येथील रहिवाशी आहेत. अर्जदाराने दिनांक 23/10/2010 रोजी अर्जदाराच्या बँकेत रक्कम फिक्स डिपॉझीटमध्ये ठेवलेली एफ.डी. क्र. 00297 व खाते क्र. SSUB/4/RDLF.2/95 A/C No. 3/297 असा आहे जिचा मॅच्युरिटी दिनांक 23/10/2010 आहे, ची रक्कम घेण्यासाठी बँकेत गेली असता गैरअर्जदार यांनी तांत्रिक कारण सांगून अर्जदारास पळवून लावले. गैरअर्जदार हे सदर रक्कम देण्यास टाळाटाळ करीत आहेत म्हणून अर्जदाराने वकीलामार्फत दिनांक 13/06/2014 रोजी नोटीस पाठविली परंतू गैरअर्जदार यांनी आजपर्यंत नोटीसचे उत्तर देणे उचित समजले नाही म्हणून अर्जदाराने मंचात तक्रार दाखल केलेली आहे व मंचास विनंती केली आहे की, अर्जदाराचा अर्ज मंजूर करण्यात यावा व अर्जदाराच्या एफ.डी.आर. ची रक्कम व्याजासह परत करण्याचा आदेश गैरअर्जदार यांना करावा. तसेच मानसिक शारीरिक त्रासापोटी रक्कम रु. 50,000/- अर्जदारास देण्याबाबत गैरअर्जदार यांना आदेशीत करावे.
3. गैरअर्जदार यांना मंचाची नोटीस प्राप्त झाल्यानंतर गैरअर्जदार हे आपल्या वकीलामार्फत हजर होऊन आपले लेखी म्हणणे दाखल केले. गैरअर्जदार यांचे थोडक्यात म्हणणे पुढील प्रमाणे आहे.
4. गैरअर्जदार यांनी अर्जदाराच्या तक्रारीतील बहुतांश कथन अमान्य केलेले आहे. गैरअर्जदार यांचा मुख्य अक्षेप असा आहे की, अर्जदाराने त्याची तक्रार मुदतीत आणण्यासाठी दिनांक 13/06/2014 रोजी वकिलामार्फत नोटीस पाठविली. अर्जदाराने तक्रार तक्रार करण्यास 2 वर्षे 11 महिने इतका विलंब केलेला आहे म्हणून अर्जदाराचा तक्रार अर्ज कायदयाने चालविण्यायोग्य नाही म्हणून अर्जदाराची तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी. गैरअर्जदार यांचे पुढे असे म्हणणे आहे की, अर्जदाराचे कथन की, गैरअर्जदाराने अर्जदारास एफ.डी.आर. ची रक्कम देण्यास टाळाटाळ केलेली आहे हे खोटे आहे. गैरअर्जदाराने अर्जदारास सेवेत कोणतीही त्रुटी दिलेली नाही. अर्जदाराचा अर्ज हा काल्पनिक मुदयांवर आधारीत अवास्तव रक्कमेची खोटी मागणी करणारा असल्याने तो रक्कम रु. 10,000/- चे खर्चासह फेटाळून लावावा.
5. अर्जदार व गैरअर्जदार यांनी आपल्या म्हणण्याच्या पुष्टयर्थ आपले शपथपत्र व कागदपत्र दाखल केली आहेत. दोन्ही बाजुंचा युक्तीवाद ऐकला. दोन्ही बाजुंनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता पुढील बाबी स्पष्ट होतात.
6. अर्जदार ही गैरअर्जदार बँकेची ग्राहक होती हे अर्जदारांनी दाखल केलेल्या पासबुकाच्या झेरॉक्स प्रतीवरुन स्पष्ट होते. अर्जदाराने दिनांक 23/10/1999 रोजी गैरअर्जदार बँकेत फिक्स डिपॉझीट करण्यासाठी रक्कम रु.20,000/- भरली हे अर्जदाराने दाखल केलेल्या पावतीवरुन स्पष्ट आहे. गैरअर्जदाराने अर्जदारास फिक्स डिपॉझीटची पावती दिलेली आहे. सदर पावतीचा एफ.डी. क्र. 00297 असा असून खाते क्र. SSUB/4/RDLF.2 /95 A/C No. 3/297 असा आहे. सदर पावतीचे अवलोकन केले असता असे दिसते की, सदर पावतीची मॅच्युरिटी रक्कम रु.1,01,048/- एवढी आहे व मॅच्युरिटी दिनांक 23/10/2010 असा आहे. गैरअर्जदाराने अर्जदारास टर्म डिपॉझीट मॅच्युअर्ड झाल्यानंतर रक्कम रु.1,01,048/- दयावयास हवी होती अथवा गैरअर्जदार यांच्याकडे अर्जदाराचे असलेल्या सेव्हींग खात्यात रक्कम जमा करावयास पाहिजे होती. गैरअर्जदारांनी तसे केलेले दिसून येत नाही. तसेच अर्जदाराने दिनांक 13/06/2014 रोजी वकिलामार्फत नोटीस पाठवूनही सदर रक्कम दिलेली नाही. गैरअर्जदार यांनी असा अक्षेप घेतलेला आहे की, अर्जदाराची तक्रार मुदतबाहय आहे. गैरअर्जदाराचा सदर अक्षेप मान्य करता येत नाही कारण अर्जदाराचे सदरचे मुदत ठेव खाते क्र. SSUB/4/RDLF.2/95 A/C No. 3/297 बंद झालेले नाही. गैरअर्जदाराने आजपर्यंत अर्जदारास परिपक्वता रक्कम दिलेली नसल्यामुळे अर्जदाराच्या तक्रारीस आजही कारण घडत आहे. गैरअर्जदार यांनी अर्जदारास परिपक्वता रक्कम न देवून सेवेत त्रुटी दिलेली आहे व मानसिक त्रास दिलेला आहे, असे मंचाचे मत आहे.
वरील विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आ दे श
1. अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो.
2. गैरअर्जदार यांनी अर्जदारास एफ.डी. खाते खाते क्र. SSUB/4/RDLF.2/95 A/C No. 3/297 ची मॅच्युरीटी रक्कम रु. 1,01,048/- दिनांक 23/10/2010 पासून रक्कम अदा करेपर्यंत 15 टक्के व्याजासह आदेश तारखेपासून 30 दिवसांच्या आत दयावेत.
3. गैरअर्जदार यांनी अर्जदारास झालेल्या मानसिक त्रासापोटी रु.5,000/- व दावा खर्चापोटी रु.2,000/- आदेश तारखेपासून 30 दिवसांच्या आत दयावेत.
4. आदेशाची पूर्तता झाल्याबद्दलचा अहवाल दोन्ही पक्षांनी 45 दिवसानंतर मंचात दाखल
करावा.प्रकरण 45 दिवसानंतर पुन्हा आदेशाच्या पूर्ततेच्या अहवालासाठी ठेवले जाईल.
5. निकालाच्या प्रती दोन्ही पक्षकारास मोफत देण्यात याव्यात.