निकालपत्र :- (दि.06.12.2010)(द्वारा - सौ.वर्षा एन्. शिंदे, सदस्या) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला क्र.2 यांनी म्हणणे दाखल केले. सामनेवाला क्र.1 हे प्रस्तुत प्रकरणी नोटीस लागू होवूनही हजर झाले. परंतु, त्यांनी म्हणणे दाखल केलेले नाही. सुनावणीचेवेळेस, तक्रारदारांच्या वकिलांनी लेखी युक्तिवाद दाखल केले. सामनेवाला गैरहजर आहेत. (2) दि.18.08.2009 या मंचाच्या आदेशानुसार तक्रारदारांनी दुरुस्ती करुन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ यांना पक्षकार म्हणून समाविष्ट केले आहे. (3) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी, तक्रारदार हे विविध प्रकारच्या धातूच्या चांदी प्लेटेड दागिन्यांचा (इमिटेशन ज्वेलरी) व्यापार करतात. असे दागिने खरेदी करुन ते वेगवेगळया ठिकाणी पाठवित असतात. सामनेवाला हे माल वाहतुकीची सेवा ग्राहकांना देतात. तक्रारदार हे नमूद सामनेवाला क्र.1, कुरिअर सेवेमार्फत त्यांचा माल त्यांच्या व्यापारी ग्राहकांकडे पाठवित असतात. सामनेवाला यांची सेवा सुलभ व चांगली असल्याने तक्रारदार नेहमीच त्यांच्या सेवेचा वापर व्यापारीसाठी करीत असतात. तक्रारदारांनी खालील तपशिलाप्रमाणे सामनेवाला क्र.1 यांचेकडे माल पाठविणेसाठी दिलेला होता :- तारीख | माल पाठविलेले ठिकाण | रिसीट/डाग नंबर | रक्कम | डाग संख्या, वजन | 05.11.2007 | हुपरी ते अहमदनगर | 1781747 | 17,000/- | 1, 23 किलो | 28.01.2009 | कागल ते जालना | 4282439 | 33,000/- | 1, 34 किलो | 07.06.2009 | सांगली ते बीड | 4949136 | 32,088/- | 1, 34 किलो |
(4) प्रस्तुतचा माल नमूद पत्त्यावर आजतागायत पोहोचलेला नाही. त्याबाबत तक्रारदारांनी सामनेवाला यांचेकडे वेळोवेळी लेखी व तोंडी मागणी केली असता तुमचा क्लेम सेटल करु, माल मिळाला नाही तर मालाची जी किंमत होईल ती देऊ अशी आश्वासने दिली. परंतु, त्याप्रमाणे कार्यवाही केली नाही. तक्रारदार त्यांच्यावर विश्वास ठेवून राहिल्याने त्यांनी तक्रार केली नाही. नमूद हरविलेल्या मालाबाबत स्मरणपत्रे नोटीस पाठवूनही त्याची दखल सामनेवाला यांनी घेतली नाही. त्यामुळे त्यांच्या वर्तनाबाबत शंका येवू लागल्याने तक्रारदार स्वत: सामनेवाला यांच्या औरंगाबाद येथील मुख्य कार्यालयात सन 2008-09 च्या दरम्यान एकून तीनवेळा हेलपाटे मारुन जावून आले. नमूद माल ग्राहकांच्या पत्त्यावर न पोहोचल्याने तक्रारदारांच्या व्यवसायावर विपरित परिणाम होवू लागला व व्यावसायिक संबंध अडचणीत आले. तसेच, तक्रारदारांचे भांडवल अडकून पडल्याने त्यांचे आर्थिक कुचंबना झाल्याने त्यांचे प्रकृतीवर परिणाम झालेला आहे. त्यामुळे दि.16.06.2009 रोजी अॅड.ए.जे.देसाई यांचेमार्फत रजि.ए.डी. नोटीस पाठविली, ती मिळूनही सामनेवाला यांनी दखल घेतलेली नाही; तक्रारदार हे सध्या अत्यंत हालाखीच्या आर्थिक परिस्थितीमध्ये असल्याने सामनेवाला दि.28.07.2009 रोजी रक्कम रुपये 12,000/- देताना सामनेवाला यांनी लिहून आणलेल्या मजकूरावर आर्थिक गरजेपोटी न वाचताच सहया केलेल्या आहेत. तसेच, सदर रक्कम स्विकारणेसाठीचा लागणारा रुपये 100/- चा कोरा स्टॅम्प सामनेवाला यांनी स्वत: आणून तक्रारदारांना दिला. सदरचे कृत्य सामनेवाला क्र.1 यांच्या दबावापोटी केले आहे. सामनेवाला यांच्या सेवात्रुटीमुळे तक्रारदाराचे व्यावसायिक व आर्थिक नुकसान झाले आहे. सामनेवाला यांनी दखल न घेतलेने तक्रारदारांना प्रस्तुतची तक्रार या मंचासमोर दाखल करणे भाग पडले आहे. सबब, तक्रारदारांची तक्रार मंजूर व्हावी. तक्रारदारांनी नमूद सामनेवाला क्र.1 कुरिअरमार्फत पाठविलेल्या मालाची किंमत अनुक्रमे रुपये 17,000/-, रुपये 33,000/-, रुपये 32,088/-, तसेच त्यावर द.सा.द.शे.12 टक्के प्रमाणे होणारे व्याज अनुक्रमे रुपये 3230/-, 1980/-, रुपये 321/-, मानसिक त्रासापोटी रुपये 10,000/-, व्यावसायिक नुकसानीपोटी रुपये 25,000/-, औरंगाबाद येथे येणे-जाणेचा झालेला खर्च रुपये 4500/-, तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 3,000/- असे एकूण रुपये 1,30,119/- मधून दि.28.06.2009 रोजी रिसीट नं.1781747 पोटी मिळालेली रक्कम रुपये 12,000/- वजाजाता रुपये 1,18,119/- सामनेवाला यांचेकडून व्याजासह वसुल होवून मिळावी अशी विनंती केली आहे. (5) तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीसोबत दि.16.06.09 रोजी वकिलामार्फत पाठविलेली नोटीस, तक्रारदारांनी दि.04.02.09 रोजी स्वत: सामनेवाला यांचेकडे दिलेला अर्ज, सामनेवाला यांनी दि.05.11.07, दि.28.01.09 व दि.07.06.09 रोजी दिलेल्या पावत्या, पोचपावती इत्यादीच्या प्रती व शपथपत्र दाखल केले आहे. (6) सामनेवाला क्र.2 यांनी दाखल केलेल्या लेखी म्हणण्यानुसार तक्रारदारांची तक्रार नाकारली आहे. दि कॅरिअर्स अक्ट 1865 कलम 10 मधील तरतुदीप्रमाणे सामनेवाला क्र.2 विरुध्द तक्रार दाखल करणेपूर्वी मुदतीची नोटीस देणे अनिवार्य आहे. ती न दिल्याने प्रस्तुतचा अर्ज चालणेस पात्र नाही. तक्रारदारांनी सदर अर्जास आवश्यक पक्षकार केले नसल्याने तक्रार अर्जास नॉन-जॉईन्डरचा बाध येतो. सामनेवाला क्र.2 व तक्रारदार यांचेमध्ये कोणताही व्यवहार झालेला नाही. सामनेवाला क्र.2 यांनी तक्रारदारास कोणतीही सेवा दिलेली नाही. सामनेवाला क्र.2 हे संपूर्ण महाराष्ट्रात लोकांना प्रवाशी वाहतुकीची सेवा पुरवितात. सदर महामंडळावर महाव्यवस्थापकांचे नियंत्रण असते, त्यांना या कामी पक्षकार केलेले नाही. प्रस्तुत महामंडळाने पार्सल कुरिअर व तत्सव वाहतुक सेवा देण्याचा व पुरविण्याचा ठेका मे.बाबा ट्रेडिंग कंपनी, लातूर यांची परवानाधारक म्हणून दि.11.06.2005 ते दि.30.09.2008 कालावधीकरिता नियुक्ती करणेत आली आहे. सदर परवानाधारक व सामनेवाला क्र.1 यांची सदर सेवा पुरविणेकरिता नेमणुक केली आहे. सदर दोहोमध्ये ठरलेल्या अटी व शर्ती त्यांचेवर बंधनकारक आहेत. कुरिअर गहाळ व खराब झालेस त्यांची जबाबदारी महामंडळावर असणार नाही असे स्पष्टपणे ठरले आहे. त्याप्रमाणे विमा उतरविणेची जबाबदारी परवानाधारक, मे.बाबा ट्रेडिंग कंपनी यांची आहे. तक्रारदारांनी कोणत्याही कारणाशिवाय सामनेवाला क्र;2 यांना पक्षकार केल्यान तक्रारदारांकडून कॉम्पेनसेटरी कॉस्ट रुपये 5,000/- मिळावी व प्रस्तुतचा तक्रार अर्ज खर्चासह नामंजूर करावा अशी विनंती केली आहे. मुद्दे :- 1. सामनेवाला यांनी सेवेत त्रुटी ठेवली आहे काय ? -- सामनेवाला क्र.1 यांनी सेवेत त्रुटी ठेवली आहे. 2. काय आदेश ? -- शेवटी दिलेप्रमाणे मुद्दा क्र.1 :- तक्रारदारांनी दाखल केलेल्या निशाणी क्र. 3-सी, डी व ई कडे दाखल केलेल्या रिसीट नं.1781747, 4272439 व 4949136 चे अवलोकन केले असतातक्रारदारांनी अनुक्रमे दि.05.11.2007, दि.28.01.2009, दि.07.06.2009 रोजी सामनेवाला कुरिअर मार्फत अनुक्रमे बिपीन विराणे-अहमदनगर यांचे नांवे इमिटेशन पायल, 1 डाग 23 किलो रुपये 27,000/- हुपरी येथून, संदिप बंजारी-जालना यांचे नांवे इमिटेशन ज्वेलरी 1 डाग 34 किलो रक्कम रुपये 33,000/- कागल येथून, कोहिनूर जनरल स्टोअर्स-बीड यांना 1 डाग 34 किलो किमंत रुपये 32,088/- सांगलीहून संबंधित ठिकाणी माल पाठविलेची वस्तुस्थिती निर्विवाद आहे. तसेच, प्रस्तुत रिसीटवर मालाचे वजन, वर्णन, किंमत स्पष्टपणे नोंदली आहे. पार्सलमधील मालाची माहिती सामनेवाला क्र.1 यांना होती. तक्रारदारांनी वर नमूद माल त्यांचे संबंधित व्यापा-यांना देणेसाठी सामनेवाला कुरिअरच्या ताब्यात दिलेला होता. मात्र प्रस्तुतचा माल संबंधित व्यापा-यांना आजतागायत मिळालेला नाही. सदरचा माल गहाळ झालेला आहे, त्या संदर्भात तक्रारदारांनी सामनेवाला क्र.1 यांचेकडे दि.04.02.2009 रोजी रुपये 17,000/- किंमतीचा डाग हरविलेबाबत तक्रार दिलेली दिसून येते. तसेच, दि.16.06.2009 रोजी सामनेवाला क्र.1 यांना अॅड.ए.जे.देसाई यांचेमार्फत नोटीस पाठवून गहाळ मालाच्या किंमतीची मागणी केल्याचे दिसून येते. प्रस्तुतची नोटीस सामनेवाला यांना मिळालेबाबत पोच प्रस्तुत प्रकरणी दाखल आहे; सदर नोटीसीस सामनेवाला यांनी उत्तर दिलेले नाही. प्रस्तुतची तक्रार दाखल झालेनंतर सामनेवाला दि.03.10.2009 रोजी प्रस्तुत मंचासमोर हजर झालेले आहेत व म्हणणे देण्यासाठी मुदतीचा अर्ज दिलेला आहे. सदरचा अर्ज मंजूर होवूनही सामनेवाला यांनी तदनंतर प्रस्तुतचे प्रकरण दि.04.12.2010 रोजी निकालावर घेईपर्यन्त म्हणणेही दाखल केलेले नाही अथवा युक्तिवाद केलेला नाही. यावरुन सामनेवाला यांना तक्रारदारांची खोडून काढणेसाठी संधी देवूनही सामनेवाला क्र.1 या मंचासमोर उपस्थित झालेले नाही. तसेच, तक्रारदारांनी पाठविलेल्या वकिलामार्फत पाठविलेल्या नोटीसीस उत्तर दिलेले नाही. यावरुन तक्रारदारांची तक्रार मान्य आहे असे म्हणावे लागेल. प्रस्तुत दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता वर नमूद किंमतीचा माल सामनेवाला क्र.1 यांचे ताब्यात दिलेला होता. मात्र सदरचा माल संबंधीत व्यक्तींना आजतागायत मिळालेला नाही ही बाब तक्रारदारांनी शपथेवर प्रतिपादन केली आहे. तसेच, तक्रारदारांनी लेखी व प्रत्यक्ष भेटून सदर तक्रारीसाठी दाद मागितली असता सामनेवाला यांनी त्याची दाद घेतलेली नाही. यावरुन सामनेवाला क्र.1 यांनी सदर कुरिअर सेवेत असलेल्या विश्वासास तडा दिलेला आहे. सबब, तक्रारदारांकडून स्विकारलेला माल संबंधीत व्यक्तींना पोच करणेत कसूर करुन सेवात्रुटी केली आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. तक्रारदारांनी आपल्या लेखी युक्तिवादामध्ये सामनेवाला क्र.2 यांचेमार्फत प्रस्तुतचा माल सामनेवाला क्र.1 हे पाठवित होते व त्यासाठी सामनेवाला हे योग्य ती रक्कम भरुन घेवून तशी पावती देत होते. तसेच, सामनेवाला क्र.2 यांनी आपल्या लेखी म्हणण्यात नमूद केले प्रमाणे त्यांना नोटीस देणे बंधनकारक नाही. असा निकाल मा.सर्वोच्च न्यायालय यांचेकडील सिव्हील अपिल नं.3096/05 मध्ये दिलेला आहे. सबब, सामनेवाला क्र.2 यांनी महाव्यवस्थापक यांना पक्षकार करणे आवश्यक आहे असे म्हटले आहे. अशा प्रकारे सामनेवाला क्र.2 हे आपली जबाबदारी टाळत आहेत. तसेच, मे.बाबा ट्रेडिंग कंपनी, लातूर यांचेशी तक्रारदाराचा कोणताही संबंध नाही. सामनेवाला क्र.2 यांचे लेखी म्हणणे व युक्तिवाद यांचा विचार करता तक्रारदारांचा व्यवहार हा सामनेवाला क्र.1 यांचेशी झालेला आहे. सामनेवाला क्र.1 यांचेकडे सुपूर्द केलेला माल कोणामार्फत पाठविता याचेशी तक्रारदारांचा कोणताही संबंध येत नाही. सामनेवाला क्र.2 यांनी सेवा त्रुटी केली आहे किंवा तक्रारदारांनी त्यांच्याकडून सेवा घेतली आहे असे दाखविणारा सबळ कागदोपत्री पुरावा प्रस्तुत कामी नाही. सबब, सामनेवाला क्र;2 यांनी सेवात्रुटी केली आहे ही बाब तक्रारदारांनी सिध्द केलेली नाही. तसेच, तक्रारदारांनी दुरुस्ती आदेशाप्रमाणे सामनेवाला क्र.2 यांना आवश्यक पक्षकार म्हणून पक्षकार केले आहे. तसेच, तक्रारदार अर्जात त्यांचेविरुध्द विशिष्ट मागणी केलेली नाही. याचा विचार करता सामनेवाला क्र.2 यांनी तक्रारदारास काय सेवा पुरविली ही वस्तुस्थिती या मंचासमोर आलेली नाही. त्यामुळे प्रस्तुत प्रकरणी सामनेवाला क्र.2 यांना जबाबदार धरता येणार नाही या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. मुद्दा क्र.2 :- कुरिअर सेवा या विश्वासावर आधारित आहेत. सामनेवाला क्र.1 यांनी सदर विश्वासावर तक्रारदारांनी त्यांचेकडे सुपूर्द केलेला माल संबंधितांना आजतागायत पोहोच केलेला नाही. सबब सदर विश्वासास तडा गेलेला आहे. त्यामुळे संबंधित माल न मिळाल्याने तक्रारदारांचे आर्थिक नुकसान तर झाले आहे. तसेच, त्यांची व्यावसायिक संबंधही अडचणीत आले आहेत. त्यामुळे तक्रारदार मानसिक त्रासापोटी रक्कम मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. तथापि, त्यांनी व्यावसायिक नुकसान भरपाईचे पुष्टयर्थ कोणताही कागदोपत्री पुरावा प्रस्तुत प्रकरणी दाखल केलेला नसल्याने ते सदर व्यावसयिक नुकसान भरपाई मिळणेस पात्र नाही याही निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. तसेच, प्रस्तुत सेवेदरम्यान सामनेवाला क्र.1 यांनी मुद्दा क्र.1 मधील विवेचनाप्रमाणे हरविल्याल्या डागांची किंमत व्याजासह मिळणेस तक्रारदार हे पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे व खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1. तक्रारदारांची तक्रार मंजूर करणेत येते. 2. सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदारांना त्यांचे रिसीट नं.1781747, 4272439 व 4949136 अन्वये पाठविलेल्या मालाची किंमत अनुक्रमे रुपये 27,000/- (रुपये सत्तावीस हजार फक्त), रुपये 33,000/- (रुपये तेहतीस हजार फक्त) व रुपये 32,088/- (रुपये बत्तीस हजार अठठयाऐंशी फक्त) परत करावेत. सदर रक्कमांवर अनुक्रमे दि.05.11.2007, दि.28.01.2009, दि.07.06.2009 रोजीपासून तक्रारदारांना संपूर्ण रक्कम मिळेपावेतो द.सा.द.शे.6 टक्के व्याज द्यावे. 3. सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रुपये 3,000/- (रुपये तीन हजार फक्त) द्यावेत. 4. सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदारांना तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 1,000/- (रुपये एक हजार फक्त) द्यावेत.
| [HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER | |