(आदेश पारीत व्दारा - श्री नितीन मा. घरडे, मा. सदस्य)
(पारीत दिनांक : 03 ऑगष्ट 2016)
1. तक्रारकर्ता याने सदरची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अंतर्गत दाखल केली असून, तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालील प्रमाणे.
2. तक्रारकर्ता यांनी विरुध्दपक्ष क्र.1 श्री साई श्रध्दा प्लॉट व जमीन खरेदी विक्री सेवा केंद्र भागिदारी संस्था यांचेकडून भूखंड आरक्षित केला. तसेच विरुध्दपक्ष क्र.2 ते 6 हे संस्थेचे भागीदार असून ते सुध्दा भूखंडाचे खरेदी-विक्रीचे व्यवहार पाहतात. तक्रारकर्ता यांनी विरुध्दपक्ष यांचेकडून मौजा – तरोडी, प.ह.नं.33, शेत नं.29 वर पडलेल्या ले-आऊटमधील भूखंड क्रमांक 29 ज्याची लांबी 25 फट व रुंदी 40 फुट असे एकूण 1000 चौरस फुटचा भूखंड आरक्षित केला. भूखंडाची एकूण किंमत रुपये 75,000/- एवढी ठेवण्यात आली. त्याअनुषंगाने दिनांक 15.12.2006 ला लेखी करार करण्यात आला व कराराचे दिवशी विरुध्दपक्ष यांना रुपये 13,000/- बयाणा म्हणून देण्यात आली व उर्वरीत रक्कम टप्पा-टप्प्याने घेण्याचे विरुध्दपक्षाने कबूल केले. सदर कराराप्रमाणे कराराची मुदत दिनांक 15.12.2008 पर्यंत निर्धारीत करण्यात आले. त्यादरम्यान विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याला आरक्षित भूखंडाचे विक्रपञ करुन देण्याचे मान्य व कबूल केले होते. पुढे तक्रारदाराने दिनांक 27.1.2007 ते 15.3.2008 चे दरम्यान विरुध्दपक्ष यांचेकडे एकूण रुपये 47,000/- भरणा केला. तसेच बयाणाचे वेळी दिलेली रक्कम रुपये 13,000/- व टप्पा-टप्प्याने दिलेली एकूण रक्कम रुपये 47,000/- असे एकूण रुपये 60,000/- विरुध्दपक्ष यांना भूखंडापोटी तक्रारदाराने जमा केलेले आहे व त्याबाबतच्या पावत्या विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याला दिलेल्या आहेत.
3. त्यानंतर, तक्रारकर्ता यांनी दिनांक 15.12.2008 च्या मुदतीप्रमाणे विक्रीखत लावून घेण्याकरीता विरुध्दपक्षाकडे वेळोवेळी विनवनी केली, परंतु विरुध्दपक्षाने कोणतेही कारण सांगून विक्रीपञ लावण्यास टाळाटाळ करु लागले. सरते शेवटी बरीच विनंती करुन सुध्दा विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्यास विक्रीखत लावून दिले नाही, करीता दिनांक 26.7.2010 रोजी विरुध्दपक्षास कायदेशिर नोटीस बजावली. परंतु, विरुध्दपक्षाने सदरच्या नोटीसाला कोणाताही प्रतिसाद दिला नाही, त्यामुळे विरुध्दपक्षाच्या अशा बेकायदेशिर वर्तणूकीमुळे तक्रारकर्त्याला आर्थिक नुकसान, तसेच मानसिक व शारिरीक नुकसान सोसावे लागले. त्यामुळे सरते शेवटी तक्रारकर्त्याने सदरची तक्रार ग्राहक तक्रार निवारण मंचात दाखल करुन आपल्या खालील मागण्या मागितल्या आहेत.
1) विरुध्दपक्षाकडून तक्रारदारा प्रती अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केला, असे घोषीत करावे.
2) तसेच भूखंडाची उर्वरीत रक्कम घेवून तक्रारदाराच्या नावे भूखंडाचे विक्रीपञ करुन द्यावे.
3) तसेच मानसिक व शारिरीक ञासापोटी रुपये 1,00,000/- विरुध्दपक्षाकडून देण्याचे आदेशीत करावे.
4) सदरच्या तक्रारीचा खर्च विरुध्दपक्षाने सोसावा.
4. तक्रारकर्त्याच्या तक्रारीला अनुसरुन विरुध्दपक्ष क्र.1 ते 6 यांना मंचा मार्फत नोटीस बजावण्यात आली. विरुध्दपक्ष क्र.1 यांना मंचाची नोटीस मिळून सुध्दा मंचात उपस्थित होऊन आपले उत्तर दाखल केले नाही, म्हणून त्यांचे विरुध्द मंचा तर्फे निशाणी क्र.1 वर एकतर्फा आदेश दिनांक 9.1.2011 रोजी पारीत करण्यात आला. तसेच विरुध्दपक्ष क्र.2 व 3 यांना सुध्दा मंचाची नोटीस प्राप्त होऊनही मंचात उपस्थित होऊन तक्रारीला आपले उत्तर सादर केले नाही, करीता मंचाने निशाणी क्र.1 वर दिनांक 3.2.2011 रोजी एकतर्फा आदेश पारीत झाला. विरुध्दपक्ष क्र.4, 5 व 6 यांनी निशाणी क्र.17 वर लेखी जबाब दाखल केला.
5. विरुध्दपक्ष क्र.4, 5 व 6 यांनी निशाणी क्र.17 वर दाखल केलेल्या लेखी जबाबबत असे नमूद केले आहे की, तक्रारदाराचे विरुध्दपक्ष यांचेशी दिनांक 15.12.2006 रोजी कोणताही करारनामा झाला नाही. तसेच भूखंड आरक्षित करतेवेळी भूखंडाची किंमत रुपये 75,000/- एवढी कधीच ठरली नाही. तसेच कोणत्याही प्रकारचा करारनामा दिनांक 15.12.2006 ला झाला नाही व तसेच बयाणा रक्कम रुपये 13,000/- तक्रारदाराकडून कधीही घेतली नाही व बाकी इतर सर्व तक्रारदाराने केलेले दोषारोपन विरुध्दपक्षाने आपल्या लेखीउत्तरात फेटाळून काढले आहे. तक्रारदार यांना विरुध्दपक्षाने कोणत्याही प्रकारचे आश्वासन किंवा बेकायदेशिर कृत्य करुन किंवा गैरवर्तणूक करुन त्यांचेशी कोणताही आर्थिक व्यवहार केला नाही. त्यामुळे विरुध्दपक्ष तक्रारदारास आर्थिक नुकसानीचा मोबदला देण्यास पाञ नाही. सदरची तक्रारदाराची तक्रार ही खोट्या स्वरुपाची असून बनावटी आहे, तसेच खोटे आरोप लावले असल्यामुळे तक्रारदाराची तक्रार खर्चासहीत खारीज होण्यास पाञ आहे.
6. तक्रारकर्ता यांनी सदरच्या तक्रारी बरोबर 1 ते 8 दस्ताऐवज दाखल करुन, त्यात प्रामुख्याने भूखंडापोटी स्विकारलेल्या रकमेच्या पावत्या, बयाणापञ, ले-आऊटचे माप इत्यादी दस्ताऐवज दाखल केलेले आहे. तसेच दिनांक 26.7.2010 रोजी विरुध्दपक्ष क्र.1 ते 6 यांना अधिवक्ता मार्फत पाठविलेले नोटीसाची प्रत अभिलेखावर दाखल केलेली आहे. मंचामध्ये निशाणी क्र.17 वर विरुध्दपक्ष क्र.4 ते 6 यांनी आपला लेखी युक्तीवाद सादर केला. अभिलेखावरील दस्ताऐवजाचे अवलोकन करण्यात आले, तसेच मंचा समक्ष दोन्ही पक्षाचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला, त्यावरुन खालील मुद्दे निघतात.
मुद्दे : निष्कर्ष
1) तक्रारकर्ता हे विरुध्दपक्ष यांचे ग्राहक होतात काय ? : होय.
2) विरुध्दपक्ष यांनी अनुचित प्रथेचा अवलंब केला आहे काय ? : होय.
3) आदेश काय ? : अंतिम आदेशा प्रमाणे.
- निष्कर्ष –
7. तक्रारदाराची सदरची तक्रार ही भूखंडाबाबतची असून विरुध्दपक्ष हे एक भूखंड खरेदी-विक्रीचे व्यवहार करतात व खरेदीदारास सेवा पुरविणारी संस्था आहे. तक्रारदार यांनी स्वतःच्या राहण्यासाठी व तेथे बांधकाम करण्यासाठी भूखंड हवा होता, करीता विरुध्दपक्ष यांचे मौजा – तरोडी, प.ह.नं.33, शेत नं.29 वर पडलेल्या ले-आऊटमधील भूखंड क्रमांक 29 त्याचे क्षेञफळ एकूण 1000 चौ.फुट भूखंड आरक्षित केला व त्याची बयाणा रक्कम रुपये 13,000/- बयाणा करतेवेळी देण्यात आले व उर्वरीत रक्कम दिनांक 15.12.2008 पर्यंत टप्या-टप्प्याने देण्याचे ठरले होते. भूखंडाची एकूण किंमत रुपये 75,000/- ठरविण्यात आली होती. तक्रारकर्त्याने आपल्या तक्रारीसोबत दिनांक 15.12.2006 चे तक्रारकर्ता व विरुध्दपक्ष यांच्यात झालेल्या बयाणा पञाची प्रत दाखल केलेली आहे, तसेच टप्या–टप्प्याने विरुध्दपक्ष यांनी भूखंडापोटी रक्कम दिल्या बाबतच्या पावत्या सुध्दा अभिलेखावर दाखल केलेल्या आहे. सदरच्या पावत्या विरुध्दपक्ष यांनी भूखंडाची रक्कम घेवून दिल्या बाबतची दिसून येते. त्यामुळे, विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याकडून भूखंडापोटी रक्कम स्विकारली, ही बाब सिध्द होते. करीता तक्रारकर्ता यांनी अवांटीत भूखंडाचे उर्वरीत रक्कम विरुध्दपक्षास देवून भूखंडाचे विक्रीपञ करुन घेण्यास पाञ आहे, असे मंचाला वाटते.
सबब, खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येते.
// अंतिम आदेश //
(1) तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
(2) विरुध्दपक्ष क्र.1 ते 6 यांनी वैयक्तीकरित्या व संयुक्तीकरित्या भूखंड क्रमांक 29, मौजा - तरोडी, प.ह.नं.33, शेत नं.29, भूखंडाचे एकूण क्षेञफळ 1000 चौरस फुट, तहसिल व जिल्हा नागपूर याचे उर्वरीत रक्कम स्विकारुन त्याचे विक्रीपञ तक्रारकर्त्यास करुन द्यावे.
(3) तसेच विरुध्दपक्ष यांनी, भूखंडाचे कायदेशिररितया विक्रीपञ होण्यास अशक्य असल्यास तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाकडे जमा केलेली रक्कम रुपये 60,000/- दिनांक 15.3.2008 पासून द.सा.द.शे. 15 टक्के दराने तक्रारकर्त्याच्या हातात पडेपर्यंत द्यावे.
(4) तसेच विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्त्यास झालेल्या शारिरीक व मानसिक ञासापोटी रुपये 15,000/- व तक्रार खर्च म्हणून रुपये 5,000/- असे एकूण रुपये 20,000/- द्यावे.
(5) विरुध्दपक्ष यांनी आदेशाचे पालन आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसाचे आत करावी.
(6) उभय पक्षकारांना आदेशाची प्रत निःशुल्क पाठविण्यात यावी.
नागपूर.
दिनांक :- 03/08/2016