जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.
ग्राहक तक्रार क्रमांक : 360/2015.
तक्रार दाखल दिनांक : 08/10/2015.
तक्रार आदेश दिनांक : 17/01/2017. निकाल कालावधी: 01 वर्षे 3 महिने 05 दिवस
शिवाजी मारुती शिंदे, वय 70 वर्षे, व्यवसाय : सेवानिवृत्त,
रा. शुक्रवार पेठ, तुळजापूर, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद. तक्रारकर्ता
विरुध्द
(1) श्री. एस.जे. धाबेकर, शहर अभियंता, म.रा.वि.वि.कं., तुळजापूर.
(2) श्री. विष्णू रा. ढाकणे, कार्यकारी अभियंता,
म.रा.वि.वि.कं., तुळजापूर. विरुध्द पक्ष
गणपुर्ती :- श्री. एम.व्ही. कुलकर्णी, अध्यक्ष
श्री. मुकूंद बी. सस्ते, सदस्य
तक्रारकर्ता यांचेतर्फे विधिज्ञ : यू.सी. देशमुख
विरुध्द पक्ष यांचेतर्फे विधिज्ञ : व्ही.बी. देशमुख
न्यायनिर्णय
श्री. एम.व्ही. कुलकर्णी, अध्यक्ष यांचे द्वारा :-
1. तक्रारकर्ता यांचेद्वारे उपस्थित वादविषय थोडक्यात असा आहे की, त्यांनी राहत्या घरामध्ये विरुध्द पक्ष यांच्याकडून घरगुती वापरासाठी विद्युत पुरवठा घेतला असून त्यांचा ग्राहक क्रमांक 593350168061 असा आहे. विरुध्द पक्ष यांनी दि.15/8/2014 ते 15/9/2014 कालावधीकरिता तक्रारकर्ता यांना मीटर क्र.9800509138 ची प्रत्यक्ष रिडींग न घेता रु.2,527.31 पैसे अशा देयकाची आकारणी केली. त्याबाबत तक्रार केली असता दि.15/9/2014 ते 15/10/2014 या कालावधीकरिता रु.36,350/- रकमेचे मोघम देयक दिले आणि ते देयक तक्रारकर्ता यांना मान्य नाही. त्यानंतर दि.4/1/2015 रोजी मीटर सदोष असल्यामुळे नवीन मीटर क्रमांक 3294654 बसवण्यात आले. सदोष मीटरची दि.25/12/2014 रोजी प्रत्यक्ष रिडींग 55209 होती आणि मीटर बदलतेवेळी 55289 रिडींग होती. परंतु सदोष मीटर रिडींगप्रमाणे दि.15/11/2014 ते 15/12/2014 कालावधीकरिता रु.13,490/- व एकूण रु.52,260/- रकमेचे देयक आकारणी करण्यात आले. त्यानंतर दि.15/12/2014 ते 15/1/2015 या कालावधीकरिता एकूण रु.40,980/- रकमेचे देयक मोघम स्वरुपात कमी करुन देण्यात आले. तक्रारकर्ता यांचे पुढे असे वादकथन आहे की, दि.4/1/2015 रोजी बसवण्यात आलेले नवीन मीटर क्रमांक 3294654 देखील सदोष आहे. विरुध्द पक्ष हे तक्रारकर्ता यांना वारंवार मोघम स्वरुपात वीज देयक आकारणी करीत आहेत. दि.10/9/2015 रोजी विरुध्द पक्ष यांनी नोटीस पाठवून रु.52,376/- रक्कम भरणा न केल्यास वीज पुरवठा खंडीत करण्याबाबत कळवले.
त्यामुळे उपरोक्त वादविषयाचे अनुषंगाने तक्रारकर्ता यांनी वीज देयक दुरुस्त करण्यासह त्यांचा वीज पुरवठा बेकायदेशीररित्या खंडीत न करण्याचा व मानसिक व आर्थिक नुकसानीकरिता रु.50,000/- देण्याचा विरुध्द पक्ष यांना आदेश करण्यात यावा, अशी विनंती केली आहे.
2. तक्रारकर्ता यांनी तक्रारीसोबत वीज आकार देयके व विरुध्द पक्ष यांनी पाठवलेली नोटीस दाखल केली आहे.
3. विरुध्द पक्ष यांनी अभिलेखावर लेखी उत्तर दाखल केले आहे. त्यांच्या कथनाप्रमाणे तक्रारकर्ता यांनी घरगुती वापराकरिता वीज पुरवठा घेतलेला असून त्यांचा ग्राहक क्रमांक 593350168061 आहे. तक्रारकर्ता यांना दि.15/9/2014 ते 15/10/2014 या कालावधीकरिता रु.36,350/- चे योग्य वीज आकार देयक दिले होते. तक्रारकर्ता यांचे तक्रारीनुसार मीटरची पाहणी केली असता तक्रारकर्ता यांचा ऑगस्ट 2014 मध्ये 5438 युनीट वीज वापर दिसून आला. तक्रारकर्ता यांनी ऑगस्ट 2014 पूर्वी वापरलेल्या युनीटपेक्षा कमी युनीट वापराचे बिले भरलेली होती. तक्रारकर्ता यांचे ऑगस्ट 2014 मध्ये एकदम युनीट घेतलेले निदर्शनास आल्यामुळे त्या युनीटची विभागणी मार्च 2013 ते सप्टेंबर 2014 या 19 महिन्यात विभागणी करुन त्यावर दंड, व्याज न आकारता रु.36,147/- रकमेचे देयक दुरुस्त करुन दिले असून जे योग्य होते. तक्रारकर्ता हे थकबाकीत आहेत आणि थकबाकी भरल्यास विद्युत पुरवठा खंडीत करण्याचा प्रश्न येत नाही. तक्रारकर्ता यांनी जानेवारी 2014 पासून थकबाकी भरलेली नाही. तक्रारकर्ता यांना दुरुस्त देयक दिल्यामुळे नुकसान भरपाई मागण्याचा त्यांना हक्क नाही. शेवटी तक्रारकर्ता यांची तक्रार खर्चासह नामंजूर करण्यात यावी, अशी विनंती विरुध्द पक्ष यांनी केली आहे.
4. विरुध्द पक्ष यांनी अभिलेखावर तक्रारकर्ता यांचा कंझ्युमर पर्सनल लेजर उतारा दाखल केला आहे.
5. तक्रारकर्ता यांची तक्रार, विरुध्द पक्ष यांचे लेखी उत्तर व अभिलेखावर दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता, तसेच उभय विधिज्ञांचा मौखिक युक्तिवाद ऐकल्यानंतर तक्रारीमध्ये उपस्थित वादविषयाचे निवारणार्थ उपस्थित होणा-या वादमुद्दयांची कारणमीमांसा त्यांच्यापुढे दिलेल्या उत्तराकरिता खालीलप्रमाणे देण्यात येते.
मुद्दे उत्तर
1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना द्यावयाच्या सेवेमध्ये
त्रुटी केल्याचे सिध्द होते काय ? होय.
2. तक्रारकर्ता अनुतोषास पात्र आहेत काय ? होय.
3. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमीमांसा
6. मुद्दा क्र. 1 व 2 :- तक्रारकर्त्याने आपल्या तुळजापूर येथील घरामध्ये वापरासाठी विरुध्द पक्षाकडून वीज पुरवठा घेतला, याबद्दल वाद नाही. तक्रारकर्त्याचा वाद दि.15/8/2014 ते 15/9/2014 या कालावधीच्या वीज बिलाबद्दल आहे. त्या महिन्याचे बील रु.2,527/- व थकबाकी धरुन रु.77,270/- असे बील दिले. त्यानंतर कमी करुन रु.36,350/- चे बील दिले; ते सुध्दा अवास्तव असल्याचे तक्रारकर्त्याचे म्हणणे आहे. मीटर दि.4/1/2015 रोजी बदलण्यात आले, असे तक्रारकर्त्याचे म्हणणे आहे. मात्र त्यावेळेस रु.40,980/- असे मोघम बील दिले, असे त्याचे म्हणणे आहे. दि.4/1/2015 रोजी नवीन मीटर बसवले, हे विरुध्द पक्षाला मान्य नाही. उलट ऑगस्ट 2014 मध्ये प्रत्यक्ष रिडींग घेतले, तेव्हा 5438 युनीट वीज वापर नोंदवला गेला, असे म्हटले. मात्र त्यापूर्वी वापरलेल्या युनीटपेक्षा कमी युनीटचे बिले तक्रारकर्त्याने भरली, असे विरुध्द पक्षाचे म्हणणे आहे. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की, विरुध्द पक्षातर्फेच तक्रारकर्त्याला चुकीचे व कमी वीज वापराची बिले देण्यात आले होते. त्यामुळे विरुध्द पक्ष सुध्दा आपली जबाबदारी टाळू शकणार नाही.
7. तक्रारकर्त्याने ऑक्टोंबर 2013 पासून ते ऑगस्ट 2015 पर्यंतचे नोंदवलेले वीज वापराचे आकडे दिलेले आहेत. त्यामध्ये कमीत कमी वीज वापर नोंदवलेला 30 युनीट तर जास्तीत जास्त 353 युनीट दिसून येतो. मात्र एकदा 5438 युनीट तर एकदा 1101 युनीट वीज वापर नोंदवल्याचे म्हटलेले आहे. विरुध्द पक्षातर्फे तक्रारकर्त्याचा पर्सनल लेजर अकाऊंटचा उतारा हजर केलेला आहे. तो जानेवारी 2014 पासून हजर केलेला आहे. जानेवारी 2014 मध्ये मागील रिडींग 6590 व चालू रिडींग 6590 व वीज वापर 47 युनीट, थकबाकी रु.206/- मिसळून मागणी रु.546/- दाखवली आहे. जुलै 2014 मध्ये मागील रिडींग 6939, चालू रिडींग 7032, वापर 91 युनीट, मागील येणे रु.1,860/- व संपूर्ण बील रु.2,440/- दाखवले आहे. ऑगस्ट 2014 मध्ये मागील रिडींग 1 व चालू रिडींग 5439 व वापर 5438 युनीट, चालू बील रु.2,281/- व एकूण बील रु.73,322/- दाखवले आहे. ऑक्टोंबर 2014 मध्ये रु.43,978/- कमी करुन मागणी रु.36,347/- झाली आहे. सप्टेंबर 2014 पासून नोंदवलेला वापर 353, 323 व 333 युनीट होता. डिसेंबर 2014 मध्ये मीटर 6448 युनीटला थांबल्याचे दाखवून वापर 1101 युनीट, एकूण बील रु.53,246/- दाखवल्याचे दिसते. जानेवारी 2015 मध्ये ते कमी होऊन रु.40,977/- केले आहे. तेथे 1 युनीट पासून 31 युनीटपर्यंत मीटर पुढे गेल्याचे दाखवले आहे. त्यानंतर वीज वापर 166 युनीट, 182 युनीट, 192 युनीट, 79 युनीट व 341 युनीट असा दाखवललेला आहे. मागणी वाढत जाऊन शेवटी रु.50,268/- झाल्याचे दिसते. जानेवारी 2015 मध्ये मीटर बदलले, हे कंझ्युमर पर्सनल लेजरच्या उता-यावरुन दिसून येत आहे. विरुध्द पक्षाने हे म्हणणे का नाकारले, हे समजून येत नाही.
8. विरुध्द पक्षाचे म्हणणे आहे की, मार्च 2013 ते सप्टेंबर 2014 या कालावधीत तक्रारकर्त्याचा दरमहा सरासरी वापर 286 युनीट दिसून आला. त्यामुळे ऑगस्ट 2014 मध्ये जास्त लागलेले बील कमी करुन दंड व व्याज न लावता वापरलेल्या युनीटचे रु.36,147/- बील दिले. वर म्हटल्याप्रमाणे ऑगस्ट 2014 मध्ये मागील रिडींग 1 व चालू रिडींग 5439 दाखवले आहे. जुलै 2014 मध्ये मागील रिडींग 6939 व चालू रिडींग 7032 दाखवलेले आहे. त्यानंतर पुन्हा मागील रिडींग 1 कसे येईल, याचा काहीही खुलासा विरुध्द पक्षाने दिलेला नाही. पुढे जानेवारी 2015 मध्ये 1 पासून रिडींग सुरु होऊन वर म्हटल्याप्रमाणे वीज वापर नोंदला गेला. मनात येईल तशी मीटर रिडींग नोंदवून विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याकडे वीज बिलाची मागणी केल्याचे दिसून येत आहे. मात्र त्याचे समर्थन करण्यास विरुध्द पक्षाला अपयश आलेले आहे.
9. तक्रारकर्ता हा तुळजापूर शहराचा रहिवाशी असून सेवानिवृत्त आहे. त्यामुळे त्याच्या घरी वीज वापर हा साधारणच असणार. तक्रारकर्त्याने म्हटले आहे की, दि.4/1/2015 रोजी बसवलेले मीटर देखील सदोष आहे. मात्र त्यानंतर जास्तीचा वीज वापर नोंदला गेला नाही, हे लक्षात घ्यावे लागेल. मुख्य वाद हा ऑगस्ट 2014 मध्ये दाखवलेली रिडींग व नोंदवलेला वीज वापर याबद्दल आहे. त्याचा खुलासा देण्यास विरुध्द पक्ष हा अपयशी ठरला आहे व अशाप्रकारे अवास्तव बील देऊन विरुध्द पक्षाने सेवेत त्रुटी केली, असे आमचे मत आहे. म्हणून आम्ही मुद्दा नं.1 व 2 चे उत्तर होकारार्थी देतो व खालीलप्रमाणे आदेश करतो.
आदेश
(1) विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला दिलेले ऑगस्ट 2014 चे बील रद्द करण्यात येते. त्याऐवजी त्या पूर्वीच्या 3 वर्षातील मासिक सरासरी वीज वापराप्रमाणे तक्रारकर्त्याला त्या महिन्याचे बील देण्यात यावे. विरुध्द पक्षाने दुरुस्त देयकावर कोणतेही दंड अगर व्याज आकारणी करु नये.
ग्राहक तक्रार क्र.360/2015.
(2) विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याच्या प्रत्यक्ष वीज वापराची पाहणी करावी व प्रत्यक्ष वीज वापर काढून त्याप्रमाणे ऑगस्ट 2014 नंतरची बिले तक्रारकर्त्याला द्यावीत.
(3) विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला या तक्रारीचा खर्च म्हणून रु.3,000/- द्यावेत.
(4) उपरोक्त आदेशाची अंमलबजावणी विरुध्द पक्ष यांनी आदेश प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत करावी.
(श्री. मुकूंद बी. सस्ते) (श्री. एम.व्ही. कुलकर्णी)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.
-00-