निकालपत्र
(द्वारा- मा.सदस्य - श्री.एस.एस.जोशी)
(१) सामनेवाले यांनी विमा दावा नाकारुन सेवेत त्रुटी केली या कारणावरुन तक्रारदार यांनी ग्राहक संरक्षण कायदा कलम १२ अन्वये सदरची तक्रार या मंचात दाखल केली आहे.
(२) तक्रारदार यांची तक्रार थोडक्यात अशी आहे की, तक्रारदार यांनी त्यांच्या एम.एच.१८/एन ५३५७ या मॅक्स टॅक्सीची पॅकेज विमा पॉलिसी सामनेवाले यांच्याकडून काढली होती. तिचा कालावधी दि.११-११-२०१० ते दि.१०-११-२०११ असा होता. पॉलिसी क्रमांक १६०८००३११००१००००१५६८ असा होता. पॉलिसीच्या हप्त्यापोटी तक्रारदार यांनी रु.१०,३६१/- भरले होते. दि.१०-०२-२०११ रोजी तक्रारदार यांच्या वाहनाला करंजी ता.पारोळा, शिवारात अपघात झाला. त्यात वाहनाचे रु.१,२५,०००/- एवढे नुकसान झाले. सामनेवाले यांना अपघाताची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी अपघातग्रस्त वाहनाचा सर्व्हे केला. तक्रारदार यांनी विमा दावा अर्ज भरुन देवून नुकसान भरपाईची मागणी केली. त्यासोबत आवश्यक कागदपत्रेही दाखल करण्यात आली. तथापि दि.२६-०३-२०१२ रोजी सामनेवाले यांनी सदर वाहनाच्या चालकाच्या नावात तफावत आहे असे कारण दाखवून दावा नामंजूर केला. सामनेवाले यांची ही कृती सेवेतील त्रुटी असून सामनेवाले यांना भरपाई देण्याचे आदेश करावेत, मानसिक, शारीरिक त्रासापोटी रु.५०,०००/- मिळावेत, अर्जाचा खर्च मिळावा आणि संपूर्ण रक्कम मिळेपर्यंत त्यावर द.सा.द.शे.१२ टक्के प्रमाणे व्याज मिळावे अशी मागणी तक्रारदार यांनी केली आहे.
(३) आपल्या तक्रारीसोबत तक्रारदार यांनी प्रतिज्ञापत्र, पॉलिसीची प्रत, पोलिसांचा जबाब, घटनास्थळ पंचनामा, वाहन दुरुस्तीच्या पावत्या, सामनेवाले यांनी विमा दावा नाकारल्याबाबतचे पत्र आदी कागदपत्रांच्या छायांकीत प्रती दाखल केल्या आहेत.
(४) सामनेवाले यांनी हजर होऊन खुलासा दाखल केला आहे. त्यात म्हटले आहे की, तक्रारदार यांच्या तक्रारीतील कथन खोटे आणि लबाडीचे आहे. विमा कंपनी विमा पॉलिसी देतांना ठराविक अटी आणि शर्तींच्या अधिन राहून पॉलिसी देत असते. त्या अटी व शर्तींचे पालन करणे विमाधारकास अनिवार्य असते. कोणत्याही अटीचा अथवा शर्तीचा भंग झाल्यास तो कराराचा भंग असतो. अशा परिस्थितीत विमा कंपनी नुकसान भरपाई देण्याच्या जबाबदारीतून मुक्त असते. तक्रारदार यांच्या वाहनाला अपघात झाला त्यावेळी त्यांचे वाहन अनिल राजाराम पाटील रा.नंदाळे ता.धुळे हा चालवित होता. पोलिसांच्या फिर्यादीत त्याचेच नांव आहे. त्याच बरोबर आरोपपत्रातही त्याचे नांव आहे. मात्र तक्रारदार यांनी विमा दावा अर्ज भरतांना त्यात चालकाचे नांव शांताराम देसले असे लिहिले आहे. तक्रारदार यांनी या कृतीतून सामनेवाले यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे. तक्रारदार यांचे वाहन शांताराम देसले हा चालवित होता या बाबतचा कोणताही पुरावा त्यांनी दाखल केलेला नाही. त्यामुळे त्यांच्या वाहनाचा विमा दावा मंजूर करण्याची जबाबदारी सामनेवाले यांच्यावर येत नाही. याच कारणामुळे सामनेवाले यांनी त्यांना विमा दावा देण्यास नकार दिला, असे सामनेवाले यांनी खुलाशात म्हटले आहे.
(५) आपल्या खुलाशाच्या पुष्टयर्थ सामनेवाले यांनी पुराव्याचे प्रतिज्ञापत्र, विमा दावा प्रपत्र, चालकाचा परवाना, दावा मंजुरीबाबतचे नोंदपत्र, सर्व्हे रिपोर्ट, बिल चेक रिपोर्ट आदी कागदपत्रांच्या छायांकीत प्रती दाखल केल्या आहेत.
(६) तक्रारदार यांनी तक्रारीसोबत दाखल केलेली कागदपत्रे, सामनेवाले यांनी खुलाशासोबत दाखल केलेली कागदपत्रे आणि तक्रारदार यांच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद याचा विचार करता आमच्यासमोर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात व त्यांची उत्तरे आम्ही सकारण देत आहोत.
मुद्देः | निष्कर्षः |
(अ) तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत काय ? | : होय |
(ब) सामनेवाले यांनी सेवा देण्यात त्रुटी केली आहे काय ? | : नाही |
(क) तक्रारदार हे वाहनाची विमा दावा रक्कम मिळण्यास पात्र आहेत काय ? | : नाही |
(ड) आदेश काय ? | : अंतिम आदेशाप्रमाणे |
| | | |
विवेचन
(७) मुद्दा क्र. ‘‘अ’’ – तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्याकडून त्यांच्या एमएच १८/एन ५३५७ या वाहनाची विमा पॉलिसी घेतली होती. सामनेवाले यांनी ही बाब नाकारलेली नाही. एवढेच नव्हे तर तक्रारदार यांनी विमा पॉलिसी प्रत व सामनेवाले यांनी विमा दावा अर्जाची प्रत दाखल केली आहे. यावरुन तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्याकडून विमा पॉलिसी घेऊन व्यवहार केला हे स्पष्ट होते. या मुद्यावर उभयपक्षात कोणताही वाद नाही. त्यामुळे तक्रारदार हे सामनेवाले यांचे “ग्राहक” आहेत हे सिध्द होते. म्हणून मुद्दा क्र. ‘‘अ’’ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
(८) मुद्दा क्र. ‘‘ब’’ – तक्रारदार यांच्या वाहनाला दि.१०-०२-२०११ रोजी अपघात झाला. या घटनेत तक्रारदार यांच्या वाहनाचे सुमारे रु.१,२५,०००/- एवढया रकमेचे नुकसान झाले. त्याबाबत सामनेवाले यांच्याकडून नुकसान भरपाई मिळावी यासाठी तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्याकडे विमा दावा अर्ज आणि त्यासोबत आवश्यक कागदपत्रे दाखल केली. तर सामनेवाले यांनी दि.२६-०३-२०१२ रोजी तक्रारदार यांना त्यांचा विमा दावा नाकारीत असल्याचे कळविले. तक्रारदार यांनी विमा दावा अर्जात नमूद केलेले वाहन चालकाचे नांव आणि पोलिसांच्या कागदपत्रांमध्ये नमूद असलेले वाहन चालकाचे नांव यात तफावत असल्याचे कारण त्यासाठी देण्यात आले. या संदर्भात सामनेवाले यांनी तक्रारदार यांच्याकडे खुलासा मागविला होता. मात्र तक्रारदार यांनी कोणताही खुलासा केला नाही आणि विमा दावा अर्जात नमूद केलेला चालकच वाहन चालवित होता हे सिध्द केले नाही. याच कारणामुळे तक्रारदार यांचा विमा दावा अर्ज नाकारण्यात आला असे सामनेवाले यांचे म्हणणे आहे. तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्याकडे विमा दाव्याची मागणी केल्यानंतर त्यांना सामनेवाले यांनी उत्तर कळविले आहे असे दिसून येते. यावरुन हे स्पष्ट होते की, सामनेवाले यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केली असे तक्रारदारांचे म्हणणे सिध्द होत नाही. तक्रारदार आणि सामनेवाले यांनी अनुक्रमे त्यांची तक्रार आणि खुलाशात केलेल्या कथनानुसार आणि दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन सामनेवाले यांनी तक्रारदार यांना त्यांच्या मागणी पत्रावर उत्तर कळविले असल्याचे दिसून येते. म्हणूनच सामनेवाले यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केल्याचे स्पष्ट होत नाही, असे आमचे मत बनले आहे. याच कारणावरुन मुद्दा क्र. ‘‘ब’’ चे उत्तर आम्ही नकारार्थी देत आहोत.
(९) मुद्दा क्र. ‘‘क’’ – तक्रारदार यांनी तक्रारीसोबत विमा पॉलिसी प्रत, पोलिसात दिलेली फिर्याद दाखल केली आहे. तर सामनेवाले यांनी विमा दावा अर्ज, पोलिसांची कागदपत्रे आणि चालकाच्या परवान्याची छायांकीत प्रत दाखल केली आहे. तक्रारदार यांनी दाखल केलेल्या पोलीस जबाबात चालकाचे नांव अनिल राजाराम पाटील रा.नंदाळे, ता.धुळे असे नमूद करण्यात आले आहे. घटनास्थळ पंचनाम्यात चालकाचे नांव अनिल राजाराम पाटील असे नमूद करण्यात आले आहे. तर सामनेवाले यांनी दाखल केलेल्या विमा दावा अर्जात चालकाचे नांव शांताराम देसले असे नमूद करण्यात आले आहे. तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्याकडे चालक परवान्याची जी प्रत दाखल केली तीच प्रत सामनेवाले यांनी मंचात सादर केली आहे. त्यावरही चालकाचे नांव शांताराम देसले असे नमूद असल्याचे दिसते. यावरुन तक्रारदार यांनी स्वत:च दाखल केलेल्या कागदपत्रांमध्ये चालकाच्या नांवात तफावत असल्याचे दिसून येते.
सामनेवाले यांनी आपल्या खुलाशात केलेल्या कथनानुसार कोणतीही विमा पॉलिसी म्हणजे विमाधारक आणि विमा कंपनी या दोघांमधील करार असतो. हा करार करतांना त्यातील अटी आणि शर्तींचे पालन करणे दोन्ही पक्षांवर बंधनकारक असते. कोणत्याही एका पक्षाकडून नियम अथवा अटींचे उल्लंघन झाल्यास संबंधित कराराचाही भंग होत असतो. सदर तक्रारीत तक्रारदार यांच्या वाहनाच्या चालकाच्या नांवात तफावत असल्याचे दाखल कागदपत्रांवरुन स्पष्ट होते. तक्रारदार यांच्या म्हणण्यानुसार शांताराम देसले हे अपघातग्रस्त वाहनाचे चालक होते. मात्र कागदपत्रांमध्ये अनिल राजाराम पाटील यांचे नांव नमूद आहे. या दोन्ही व्यक्ती एकच असल्याचे आणि ही बाब सामनेवाले यांना निदर्शनास आणून देण्यात आली असल्याचे तक्रारदार यांनी त्यांच्या तक्रारीत म्हटले आहे. तथापि, त्या बाबतचा कोणताही पुरावा तक्रारदार यांनी सदर तक्रारीच्या कामकाजादरम्यान मंचासमोर आणलेला नाही. शांताराम देसले आणि अनिल राजाराम पाटील या दोन्ही व्यक्ती एकच असल्याचे त्यांचे कथन तक्रारदार मंचासमोर सिध्द करु शकलेले नाहीत. म्हणूनच सामनेवाले यांच्या म्हणण्यात तथ्य आहे असे मंचाचे मत बनले आहे. सामनेवाले यांनी वाहन चालकाच्या नांवात तफावत असल्याच्या कारणावरुनच तक्रारदार यांचा विमा दावा अर्ज नामंजूर केला आहे. त्यांची ही कृती म्हणजेच अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब किंवा सेवेतील त्रुटी आहे असे म्हणता येणार नाही. सामनेवाले यांनी तक्रारदार यांचा विमा दावा नाकारुन जबाबदारी नाकारलेली आहे, किंवा बेकायदेशीर कृती केली आहे असेही स्पष्ट होत नाही. उलटपक्षी तक्रारदार यांनी विमा पॉलिसीतील अटी आणि नियमांचे उल्लंघन करुन उभय पक्षातील विमा कराराचा भंग केला असल्याचे सिध्द होते. याच कारणामुळे तक्रारदार यांना सामनेवाले यांच्याकडे नुकसान भरपाई मागण्याचा हक्क पोहोचत नाही आणि तक्रारदार यांनी अशी भरपाई मागितल्यास ती देण्याची जबाबदारी सामनेवाले यांच्यावर येत नाही. याच कारणावरुन मुद्दा क्र. ‘‘क’’ चे उत्तर आम्ही नकारार्थी देत आहोत.
(१०) मुद्दा क्र. ‘‘ड’’ – वरील सर्व विवेचनाचा विचार करता, तक्रारदार हे त्यांचे म्हणणे सिध्द करु शकलेले नाही, हे स्पष्ट होते. अशा परिस्थितीत तक्रारदार हे त्यांच्या अपघातग्रस्त वाहनाच्या नुकसानीपोटी भरपाई मागण्यास आणि ती मिळण्यास पात्र ठरत नाहीत असे आमचे मत आहे. याच कारणामुळे तक्रारदार यांचा तक्रार अर्ज नामंजूर करावा या निर्णयाप्रत आम्ही आलो आहोत. सबब आम्ही पुढीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आदेश
(अ) तक्रारदार यांचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येत आहे.
(ब) तक्रार अर्जाचे खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.
धुळे.
दिनांक : ३०-१०-२०१४
(श्री.एस.एस.जोशी) (सौ.व्ही.व्ही.दाणी)
सदस्य अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.