Exh.17
सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
तक्रार क्र.55/2010
तक्रार दाखल झाल्याचा दि. 07/08/2010
तक्रार निकाल झाल्याचा दि.28/09/2010
सौ. प्रियांका गोविंद चव्हाण
वय 38 वर्षे, धंदा – शेती,
रा.बिबवणे, नाईकवाडी,
ता.कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग ... तक्रारदार
विरुध्द
1) श्री एस.व्ही पत्की, मॅनेजर,
वय सज्ञान, धंदा- नोकरी,
भिसे इलेक्ट्रॉव्हेईकल्स,
’अ’ डिव्हिजन ऑफ भिसे इन्फो इलेक्ट्रीकल प्रा.लि.,
सातेरी कमर्शिअल कॉम्प्लेक्स,
कुडाळ-सावंतवाडी रोड, ता.कुडाळ,
जि.सिंधुदुर्ग
सद्या रा.शॉप नंबर5,
कृपल सिध्दार्थ को.ऑप.सोसायटी,
सहस्त्रबुध्दे हॉस्पीटलच्या मागे,
पनवेल-410 203.
2) श्री अरुण भिसे,
वय 55 वर्षे, धंदा – व्यापार
प्रोप्रायटर भिसे इलेक्ट्रॉव्हेईकल्स,
’अ’ डिव्हिजन ऑफ भिसे इन्फो इलेक्ट्रीकल प्रा.लि.,
सातेरी कमर्शिअल कॉम्प्लेक्स,
कुडाळ-सावंतवाडी रोड, ता.कुडाळ,
जि.सिंधुदुर्ग
3) इलेक्ट्रॉ थर्म (इंडिया) लिमिटेड,
ऑटो डिव्हीजन 72,
अलोडीया व्हाया थालनेज,
अहमदाबाद मुजरात – 382 115. ... विरुध्द पक्ष.
गणपूर्तीः-
1) श्री. महेन्द्र म. गोस्वामी, अध्यक्ष
2) श्रीमती उल्का राजेश गावकर, सदस्या
3) श्रीमती वफा जमशीद खान, सदस्या
तक्रारदारातर्फे - विधिज्ञ श्री एस.के. तायशेटे, विधिज्ञ श्री एस.एस. राऊळ.
विरुद्ध पक्षातर्फे - श्री एस.व्ही. पत्की, श्री अरुण भिसे व्यक्तीशः उपस्थित.
(मंचाच्या निर्णयाद्वारे श्री महेंद्र म. गोस्वामी, अध्यक्ष)
निकालपत्र
(दि.28/09/2010)
1) तक्रारदाराने विरुध्द पक्षाकडून खरेदी केलेल्या दुचाकी वाहनात वॉरंटी कालावधीत बिघाड झाल्याने वाहनाची किंमत किंवा नवीन गाडी मिळावी, यासाठी तक्रारदाराने सदरची तक्रार दाखल केली आहे. तक्रारदाराची तक्रार अशी आहे की, तक्रारदाराने विरुध्द पक्ष क्र.3 यांनी उत्पादित केलेली इलेक्ट्रॉन ई.आर. विन नंबर MNTEl O-2009 K 000223 बॅटरीवर चालणारी गाडी दि.2/7/2009 रोजी विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांचेकडून खरेदी केली. सदरची गाडी ही बॅटरीवर चालणारी असून 6 तास बॅटरी चार्जींगकरिता रु.4.50 एवढा खर्च येणार असल्याचे सांगण्यात आले होते. तसेच 6 तास चार्ज केल्यानंतर 70 ते 80 किमी. धावेल असे देखील सांगण्यात आले. त्यामुळे तक्रारदाराने रु.33,800/- मध्ये वाहन खरेदी केले; परंतु वाहन खरेदी केल्याच्या 1 महिन्याच्या कालावधीत बॅटरीचे चार्जींग पटकन संपावयास लागल्यामुळे तक्रारदाराने विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांचेशी संपर्क साधला असता, बॅटरी अधीक चार्ज करा असे सांगण्यात आले; परंतु एकूण 10 तास बॅटरी चार्ज करुन देखील बॅटरी चार्ज झाली नाही. त्यावेळी विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांचेशी संपर्क साधला असता गाडीचे रनिंग 1000 कि.मी. होऊ दया नंतर पाहू असे उत्तर दिले; परंतु गाडीची समस्या दूर करुन दिली नाही. त्यामुळे तक्रारदाराने विरुध्द पक्षाकडे लेखी अर्ज दिला; परंतु त्याप्रमाणे सेवा दिली नाही व समस्येचे निराकरण केले नाही. त्यामुळे सदरचे वाहन बंद स्थितीत असून पार्टस खराब होऊ लागले आहेत. तसेच विरुध्द पक्षाने आपले कुडाळ येथील शोरुम बंद केले असून आगावू रु.150/- भरुन श्री अमित राणे यांचेकडून सर्व्हीस घ्यावी असे पत्र तक्रारदारास पाठविणेत आले. त्यामुळे तक्रारदाराने आपले वकीलामार्फत दि.7/4/2010 रोजी रजिस्टर नोटीस पाठविले; परंतु आपणांस विरुध्द पक्षाने योग्य ती सेवा न दिल्यामुळे वाहनाची किंमत रु.33800/- आपणास परत मिळावी किंवा नवीन वाहन मिळावे. तसेच मानसिक व शारीरिक त्रासापोटी रु.25,000/- मिळावेत अशी मागणी तक्रारदाराने तिच्या तक्रारीत केली आहे.
2) तक्रारदाराने तिच्या तक्रारीसोबत नि.3 वरील दस्तऐवजाच्या यादीसोबत वाहनाचे माहितीपत्रक, वाहन खरेदी केल्याची पावती, विरुध्द पक्षाने तक्रारदारास पाठविलेले पत्र, तक्रारदाराने विरुध्द पक्षास पाठविलेले पत्र व वकीलामार्फत पाठविलेली नोटीस, सर्व्हीस बुकाची प्रत इ. कागदपत्रे दाखल केली. सकृतदर्शनी तक्रारदाराची तक्रार दाखल होण्यास पात्र असल्यामुळे विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांना नोटीस पाठविण्याचे आदेश मंचाने दि.7/8/2010 रोजी पारीत केले. त्यानुसार विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांना तक्रारीची नोटीस पाठविण्यात आली. त्यानुसार विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 हे मंचासमोर हजर झाले. विरुध्द पक्ष क्र.3 तर्फे त्यांचे अधिकृत प्रतिनिधी बिपिन इंदापुरे मंचासमोर हजर झाले व त्यांनी नि.8/1 वर कंपनीने दिलेले अधिकारपत्र दाखल केले. तर विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांचेतर्फे विरुध्द पक्ष क्र.2 हे हजर झाले. तसेच विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांचे वतीने लेखी म्हणणे नि.9 वर दाखल करण्यात आले.
3) विरुध्द पक्षाने आपल्या लेखी म्हणण्यात तक्रारदाराचे वाहन सुस्थितीत तक्रारदाराला दि.14/01/2010 रोजी परत देण्यात आले होते व दि.21/1/2010 रोजी शोरुम बंद करणार असल्याचे पत्राद्वारे कळविण्यात आले होते तसेच कंपनी नियमाप्रमाणे दयावयाच्या फ्री सर्व्हीसेस दिलेल्या आहेत व वॉरंटीप्रमाणे पार्टस बदलून देण्यास पूर्वी तयार होतो व आताही आहोत असे म्हणणे मांडले. त्याचप्रमाणे नि.10 वरील दस्तऐवजाच्या यादीनुसार जॉबकार्डच्या प्रती दाखल केल्या व नोटीशीला दिलेल्या उत्तराची प्रत दाखल केली. दरम्यान तक्रारदाराने तिचे प्रतिउत्तराचे शपथपत्र नि.12 वर दाखल केले व अन्य कोणताही तोंडी पुरावा नसल्याची पुरसीस नि.13 वर दाखल केले. तर विरुध्द पक्षाने तक्रारदाराचे मागणीनुसार आपण गाडी बदलून देऊ शकत नाही; परंतु गाडीची पूर्ण तपासणी करुन योग्य प्रकारे विनामुल्य दुरुस्ती करुन देण्यास तयार असल्याबाबतचे शपथपत्र नि.14 वर दाखल केले. प्रकरणाच्या अखेरच्या टप्प्यात तक्रारदाराने तिचे लेखी युक्तीवाद नि.16 वर दाखल केले व तक्रारदाराने स्वतः तोंडी युक्तीवाद देखील केला. तसेच विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 तर्फे विरुध्द पक्ष क्र.2 व 3 यांनी विस्तृत स्वरुपात तोंडी युक्तीवाद केला. त्यानुसार खालील मुद्दे निष्कर्षासाठी निघतात.
अ.क्र. | मुद्दे | निष्कर्ष |
1 | तक्रारदार हे नवीन वाहन मिळण्यास किंवा वाहनाची किंमत मिळण्यास पात्र आहेत काय ? | नाही |
2 | तक्रारदार वाहनाची दुरुस्ती विनामुल्य करुन मिळण्यास पात्र आहेत काय ? | होय |
-कारणमिमांसा-
4) मुद्दा क्रमांक 1 - तक्रारदाराने विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांचे भिसे इलेक्ट्रीकल्स यांचेकडून विरुध्द पक्ष क्र.3 ने उत्पादित केलेले बॅटरीवर चालणारे दुचाकी वाहन इलेक्ट्रॉन ई.आर. विन नंबर MNTEl O-2009 K 000223 दि.2/7/2009 रोजी रु.33800/- ला खरेदी केले. सदर वाहनाची बॅटरी चार्ज होत नसल्यामुळे संपूर्ण वाहन बदलून आपणांस नवीन वाहन मिळावे किंवा वाहनाची किंमत आपणांस मिळावी अशी मागणी तक्रारदाराने तिच्या तक्रारीत केली आहे; परंतु विरुध्द पक्षाने दाखल केलेल्या नि.10 वरील जॉबकार्डचे अवलोकन केल्यास तक्रारदारास फ्री सर्व्हीसिंग दिल्याचे दिसून येते; परंतु 16/9/2009 चे जॉबकार्डवरील (नि.10/2) चार्जीग प्रॉब्लेमची तक्रार वगळता अन्य कोणत्याही जॉबकार्डवर बॅटरी चार्जींगची तक्रार नमूद केल्याचे दिसून येत नाही. तक्रारदाराने तिच्या ताब्यातील जॉबकार्डच्या प्रती मंचासमोर दाखल केल्या नाहीत व विरुध्द पक्षाने दाखल केलेले जॉबकार्ड नाकारले नाही. तसेच तक्रारदाराने तिच्या दुचाकी वाहनात बॅटरीबाबतचे किंवा अन्य कोणकोणते दोष निर्माण झाले आहेत व ते दोष दुरुस्त करण्यापलिकडचे आहेत हे दर्शविण्यासाठी तज्ज्ञ ऑटोमोबाईल इंजिनिअरमार्फत आपल्या वाहनाची तपासणी करुन घेतली नाही व त्यासंबंधाने मंचासमोर साधा अर्ज देखील दाखल केला नाही. त्यामुळे वाहनामध्ये निर्मितीदोष आहेत किंवा वाहनाच्या बॅटरीमध्ये दोष आहेत हे तक्रारदार सिध्द करु शकला नाही. त्यामुळे तक्रारदार हे वाहनाची किंमत परत मिळण्यास किंवा नवीन वाहन मिळण्यास पात्र नाहीत असे आमचे स्पष्ट मत आहे.
5) मुद्दा क्रमांक 2 – सदर प्रकरणात विरुध्द पक्षाने मंचासमोर हजर झाल्याच्या तारखेपासूनच तक्रारदाराच्या वाहनात बिघाड असल्यास आपण तक्रारदाराच्या वाहनाची विनामुल्य दुरुस्ती करुन देण्यास तयार आहोत असे स्पष्ट केले व त्यासंबंधाने विरुध्द पक्षाने नि.9 वर दाखल केलेल्या लेखी म्हणण्यात वॉरंटीप्रमाणे पार्टस बदलून देण्याची तयारी दर्शविली. एवढेच नव्हेतर नि.14 वर शपथपत्र दाखल करुन वाहनाची विनामुल्य दुरुस्ती करुन देण्यास तयार असल्याचे देखील मान्य केले; परंतु तक्रारदाराने वाहनाची दुरुस्ती करुन घेण्यापेक्षा वाहन बदलून मिळावे याबाबत आग्रही भूमिका घेऊन विरुध्द पक्षाचा प्रस्ताव फेटाळला. विरुध्द पक्षाने मंचासमोर मान्य व कबुल केल्यानुसार तक्रारदाराचे वाहनात निर्माण झालेला कोणताही बिघाड किंवा दोष विनामुल्य निवारण करुन वाहनाची दुरुस्ती विनामुल्य करुन देण्याची तयारी दर्शविल्यामुळे आम्ही तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करीत असून त्या दृष्टीकोनातून खालील अंतीम आदेश पारीत करीत आहोत.
अंतिम आदेश
1) तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2) विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांनी वैयक्तिक वा संयुक्तिकरित्या तक्रारदाराचे दुचाकी वाहन इलेक्ट्रॉन ई.आर.विन नंबर MNTEl O-2009 K 000223 ची संपूर्ण तपासणी करुन त्यामध्ये असलेला दोष पूर्णतः विनामुल्य निवारण करुन दयावा तसेच तक्रारदाराच्या वाहनाची विनामुल्य दुरुस्ती करुन सदोष असलेले पार्टस विनामुल्य बदलून देण्याचे आदेश पारीत करणेत येतात.
3) आदेश क्र.2 मध्ये नमूद आदेशाची अंमलबजावणी विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांनी आदेश प्राप्तीच्या 30 दिवसांच्या आत करावी.
4) तक्रारदाराची नवीन वाहन मिळण्याची किंवा वाहनाची किंमत रु.33800/- (रुपये तेहतीस हजार आठशे मात्र) मिळण्याची मागणी व शारीरिक व मानसिक त्रासाबद्दलची नुकसान भरपाईची मागणी फेटाळण्यात येते.
5) खर्चाबद्दल काही हुकूम नाही.
ठिकाणः सिंधुदुर्गनगरी
दिनांकः 28/09/2010.
सही/- सही/- सही/-
(उल्का गावकर) (महेन्द्र म.गोस्वामी) ( वफा खान)
सदस्या, अध्यक्ष, सदस्या,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
प्रत तक्रारदार यांना हातपोहोच/रजि पोस्टाने रवाना दि.
प्रत विरुद्ध पक्ष यांना हातपोहोच/रजि. पोस्टाने रवाना दि.
Ars/-