निकालपत्र :- (दि.09/12/2011) ( सौ.वर्षा एन.शिंदे,सदस्या) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला वकीलांमार्फत सदर मंचापुढे उपस्थित राहिले. त्यांनी लेखी म्हणणे दाखल केले. उभय पक्षकारांचे वकीलांचा अंतिम युक्तीवाद ऐकणेत आला. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी:-तक्रारदार हे नमुद पत्तयावर कायमपणे राहात असून त्यांचे उपजिविकेचे साधन ट्रक व्यवसाय आहे. तक्रारदार यांनी सामनेवाला फानयान्स कंपनी कडून कर्ज रक्कम रु.2,55,000/- इतके घेऊन ट्रक क्र.MH-09-L-9005 खरेदी केला. सदर कर्ज 6 वर्षाचे कालावधीत दरमहा समान हपत्यामध्ये फेडणेचे होते व आहे. तक्रारदार नियमितपणे कर्ज रक्कमेची परतफेड करीत आहेत. परंतु सामनेवाला हे तक्रारदाराकडून गैरमार्गाने आर्थिक लाभ मिळवीत असलेचे तक्रारदार यांचे लक्षात आले आहे. तक्रारदारास सामनेवाना यांनी कर्ज घेतेवेळी 14.22 टक्के इतका व्याजदर असलेची बतावणी केली होती. प्रत्यक्षात सामनेवाला यांचेकडून जबरदस्तीने घेत असलेल्या रक्कमा व व्याज यांचा ताळमेळ पाहिला असता व्याजदर तब्बत 33 टक्के दरमहा असलेचे लक्षात आले. त्यामुळे तक्रारदाराचे अपरिमित नुकसान होत आहे. तक्रारदार यांनी एकूण कर्ज रक्कम रु.2,55,000/- पैकी रक्कम रु.1,13,170/- भरलेले असून सामनेवाला संस्थेमधील मॅनेजर व इतर वसुली अधिकारी यांचेकडून अनुक्रमे रु.3,00,000/- व रक्कमरु.4,00,000/- अद्याप थकबाकी असलेचे तोंडी सांगितले. तक्रारदार यांनी वेळोवेळी मागणी करुनदेखील खाते उतारा कधीही देणेत आलेला नाही. तक्रारदाराने त्रूांचे कर्ज व्यवहाराची तसेच देय रक्कम, व्याज याबाबत सामनेवालांकडे स्पष्टीकरणे मागितले असता त्या त्यावेळी ट्रक जप्त होईल अशी धमकी सामनेवाला क्र.2 यांनी तक्रारदारास दिली. सामनेवाला यांनी खाजगी सावकारीचे धोरण स्विकारुन अनिष्ट व्यापारी प्रथा अवलंबिल्या आहेत. तक्रारदार यांना त्यांचे पध्दतीनुसार कर्ज फेडणे कधीच शक्य होणार नाही अशी परिस्थिती आहे. गेले तीन महिने तक्रारदार यांना ट्रक यार्डात आणून लावा अन्यथा आम्ही तो आमचे माणसांकरवी ताब्यात घेऊ अशी धमकी सामनेवाला क्र.2 देत आहेत. सामनेवालांचे धमकीमुळे तक्रारदार यांना स्थानिक भाडे स्विकारुन तुटपुंजे उत्पन्नात गुजराण करावी लागत आहे. सामनेवाला यांचे आडदांड लोकांकडून कधीही तक्रारदाराचा ट्रक काढून घेतला जाईल या भितीने सुमारे 3 महिने ट्रकचा व्यवसाय अत्यंत घाबरुन प्रसंगी काम बंद करुन ठेवावा लागत आहे. तसेच तक्रारदार हे अल्पशिक्षीत असून त्यांनी पूर्ण विश्वासाने सामनेवाला कंपनीकडून कर्ज स्विकारणेसाठी निरनिराळया कागदांवर सहया दिल्या आहेत. मात्र त्यापैकी कोणत्याही कागदांची प्रत आजअखेर तक्रारदारास दिलेली नाही. सामनेवाला कंपनीने कर्ज व्यवहाराची माहिती न देणे, हिशोबाच्या खोटया नोंदी करुन बेकायदेशीर मार्गे नफा मिळवणे, तक्रारदारांना गुंडगिरीच्या जोरावर वाहन जप्त करणेची धमकी देणे अशा सामनेवालांच्या कारवायांमुळे प्रस्तुतची तक्रार मे. मंचात दाखल करणे भाग पडले आहे. सबब तक्रारदाराची तक्रार मंजूर करुन तक्रारदाराचा ट्रक क्र.MH-09-L-9005 सामनेवाला यांनी ताब्यात घेऊ नये म्हणून कायम मनाई हुकूम व्हावा तसेच व्यवसायिक अप्रतिष्ठा व नुकसानीबाबत रु.1,50,000/-, मानसिक व शारिरीक त्रासापोटी रु.10,000/- व तक्रारीचा खर्च रु.5,000/- सामनेवाला यांचेकडून वसुल हाऊन मिळावेत अशी विनंती तक्रारदाराने सदर मंचास केली आहे. (6) तक्रारदाराने आपल्या तक्रारीच्या पुष्टीप्रित्यर्थ सामनेवाला यांनी तक्रारदारास दिलेला खाते उतारा दाखल केला आहे. (7) सामनेवाला यांनी दाखल केलेल्या लेखी म्हणणेनुसार तक्रारदाराची तक्रार परिच्छेद निहाय नाकारलेली आहे. सामनेवाला आपल्या लेखी म्हणणेत पुढे सांगतात, सामनेवाला हे हेवी कमर्शिअल व्हेईकलसाठी कर्ज देतात. तक्रारदार यांनी ट्रक क्र.MH-09-L-9005 खरेदी करणेकरिता सामनेवालांकडे कर्ज मागणी केली. कर्ज करार क्र.KLPRO9092400 -12 अन्वये सामनेवाला यांनी तक्रारदारास कर्ज अदा केलेले आहे. परंतु तक्रारदार यांनी कराराच्या अटी व शर्तीप्रमाणे कर्ज रक्कम हप्ते भरलेले नाहीत. तक्रार अर्ज कलम 1 मधील मजकूर मान्य असून कलम 2 मधील कर्ज व वाहन क्रमांकाबाबतीतील मजकूर मान्य आहे. तक्रारीतील इतर कलमांतील मजकूर अमान्य असून तो चुकीचा आहे. तो शाबीत करणेची जबाबदारी तक्रारदाराची आहे. वस्तुत: तक्रारदाराने प्रस्तुत सामनेवाला यांचेकडून कर्ज घेतले आहे तर कर्जकराराचे अटी व शर्तीनुसार तक्रारदाराची जबाबदारी आहे की त्याने वेळेवर कर्जाचा हप्ता भरला पाहिजे. परंतु तक्रारदाराने तो भरला नाही. तसेच तक्रारदाराने केलेल्या आरोपामध्ये काहीही तथ्य नाही. तक्रारदाराने जर काही रक्कम मे. मंचात भरली असलेस ती सामनेवाला यांना कर्जखातेस जमा करणेसाठी दयावी. तसेच तक्रारदाराची तक्रार ही दिशाभूल करणारी आहे. त्यामुळे तक्रारदाराची तक्रार खर्चासह नामंजूर करावी अशी विनंती सामनेवाला यांनी सदर मंचास केली आहे. (9) सामनेवाला यांनी आपल्या लेखी म्हणणेच्या पुष्टयर्थ कॅश एक्स्ट्रॅक्ट, डेबीट एक्स्ट्रॅक्ट, व अॅग्रीमेंट इत्यादी कागदपत्रांच्या प्रती दाखल केल्या आहेत. (10) तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, सामनेवालांचे लेखी म्हणणे दाखल कागदपत्रे उभय पक्षकारांच्या वकीलांचा अंतिम युक्तीवाद इत्यादीचे साकल्याने अवलोकन केले असता पुढील महत्वाचे मुद्दे निष्कर्षासाठी येतात. 1. सामनेवाला यांनी सेवात्रुटी केली आहे काय? --- नाही. 2. काय आदेश ? --- शेवटी दिलेप्रमाणे. मुद्दा क्र.1:- तक्रारदाराने त्याचे मालकीचे ट्रक क्र.MH-09-L-9005 खरेदीसाठी रक्कम रु.2,55,000/- इतके कर्ज घेतलेचे मान्य केलेले आहे. तसेच रक्कम रु.1,13,170/- इतकी रक्कम सदर कर्जापोटी भरणा केलेचे मान्य केलेले आहे.तक्रारदाराने व्याजदराबाबत आक्षेप घेतलेला आहे. सामनेवाला यांनी कर्ज देतेवेळी 14.22 टक्के इतके व्याज असलेची बतावणी केली होती. मात्र सामनेवाला यांनी घेतलेली रक्कमा व व्याज याचा ताळमेळ पाहता सदर व्याजदर हा 33.00 टक्के दरमहा असलेचे लक्षात आलेने व अशाप्रकारे सामनेवाला गैरमार्गे बेकायदेशीर अर्थिक नफा कमवत असलेने प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे. सदर बाबींचा विचार करता पुढील महत्वाच्या मुद्दयांचा विचार करावा लागेल. अ) सामनेवाला यांनी दाखल केलेल्या कर्जकरारपत्र क्र. KLPRO9092400 अन्वये तक्रारदारास ट्रक क्र.MH-09-L-9005 साठी रक्कम रु.2,55,000/-इतका कर्ज पुरवठा केलेचे दिसून येते. सदर कर्जप्रकरणासाठी दत्तात्रय बंडूपंत पाटील हे जामीनदार आहेत. सदरचे कर्ज हे रक्कम रु.11,163/- चे 35 व रक्कम रु.11,175/- चा शेवटचा एक हप्ता असे एकूण 36 हप्त्यामध्ये परतफेड करावयाचे होते. सदर करारपत्राच्या शेडयूलप्रमाणे सदर 38 हप्ते हे दि.22/10/2009 ते 22/09/2012 या कालावधीत दर महिन्याचे 22 तारखेस भरणेचे होते. कर्जाचा पहिला हप्ता हा दि.22/10/2009 रोजी भरणेचा होता. परंतु तक्रारदाराने दि.01/02/2010 रोजी रु.20,000/-, दि.02/3/2010 रोजी रु.20,000/-, दि.21/04/2010 रोजी रु.11,000/- व दि.21/4/2010 रोजी रु.170/-, दि.20/07/2010 रोजी रु.22,000/- व दि.29/12/2010 रोजी रु.2,959/- व रु.37,041/- असे एकूण रक्कम रु.1,13,170/- भरलेचे दिसून येते. तसेच सदर रक्कमांची नोंद खातेउता-यावर आहे. तसेच उभय पक्षांचा सदर भरणा केलेल्या रक्कमेबाबत वाद नाही. परंतु सदरची रक्कम ही तक्रारदाराने शेडयूलप्रमाणे दरमहा ठरवून दिलेल्या हप्त्याप्रमाणे नियमितपणे भरलेचे दिसून येत नाही. वस्तुत: नमुद कर्जाचे दि.22/10/2009, 22/11/2009, 22/12/2009 व 22/01/2010 असे पहिले चार हप्ते वेळेवर भरलेले नाहीत. तर दि.01/02/2010 रोजी रक्कम रु.20,0000/- भरलेले आहेत. सबब सदर चार हप्त्याची रक्कम रु.44,652/- पैकी केवळ रु.20,000/- भरलेली असून रु.24,652/- थकीत आहे. तसेच तदनंतरची दि.22/02/2010 चा हप्ता रु.11,163/- भरला नसलेने सदर थकीत रक्कम ही रु.35,815/- पैकी दि.02/03/2010 रोजी तक्रारदाराने रु.20,000/- भरलेले आहेत व तक्रारदार रक्कम रु.15,815/- इतकी रक्कम थकीत आहे. तदनंतर दि.22/03/2010 चा हप्ता न भरलेने सदर रक्कम ही रु.26,978/- इतकी होते. तक्रारदाराने दि.21/04/2010 रोजी रक्कम रु.11,170/- इतकी रक्कम भरणा केलेली आहे. सबब तक्रारदार सदर रक्कमेनंतर रु.15,808/- इतकी रक्कम थकीत देय आहे. तदनंतर तक्रारदाराने दि.22/04/2010, 22/05/2010 व 22/06/2010 रोजी हप्ते न भरलेने रु.49,297/- इतकी थकबाकी आहे. दि.20/07/2010 रोजी तक्रारदाराने रु.22,000/- इतक्या रक्कमेचा भरणा केलेला आहे. तदनंतर 22/07/2010 ते 22/12/2010 अखेर असे एकूण 6 हप्ते तो थकीत आहे. सदर 6 हप्त्याची रु.6,978/- इतकी थकबाकी आहे. तसेच पूर्वथकबाकी रु.27,997/- अशी एकूण रु.94,275/- इतकी थकबाकी दिसून येते. तदंनतर तक्रारदाराने दि.29/12/2010 रोजी रु.40,000/- चा भरणा केलेला आहे. तक्रारदार सदर तारखेअखेर रु.54,275/- इतकी रक्कम थकीत आहे. तसेच सदर थकरक्कमेबरोबरच कराराप्रमाणे असणारे इतर आकारही देय आहेत. तक्रारदार हा थकबाकीदार असलेने सामनेवाला यांना थकीत रक्कम वसुलीसाठी कायदयाने अधिकार प्राप्त होतात. सामनेवाला यांनी बेकायदेशीरपणे वसुली केलेचे दिसून येत नाही अथवा तशी प्रक्रियाही राबवलेली नाही. तक्रारदाराचा ट्रक सामनेवाला यांनी बेकायदेशीररित्या ताब्यात घेतलेला नाही ही वस्तुस्थिती निर्विवाद आहे. तक्रारदाराने तक्रार अर्ज कलम 5 मध्ये खाते उता-याची वेळोवेळी मागणी करुनही खाते उतारा दिलेला नाही. तसेच कर्ज व्यवहाराची स्पष्टता करुन दिलेली नाही. व स्पष्टतेची मागणी केली असता ट्रक जप्त करणेची धमकी दिलेली आहे. तसेच कलम 7 मध्ये नमुद केलेप्रमाणे हिशोबाची मागणी केलेस ट्रक ताब्यात घेणेची धमकी दिलेचे नमुद केले आहे. सदर बाबींचा विचार करता तक्रारदाराने सामनेवालांकडे कागदपत्रांबाबत लेखी मागणी केलेचे दिसून येत नाही. तसा पुरावाही प्रस्तुत प्रकरणी दाखल केलेला नाही; तसेच तक्रारीसोबत त्याने खातेउतारा जोडला असलेने तो खातेउतारा तक्रारदारास प्राप्त झालेला आहे. तसेच आर्श्चयाची बाब म्हणजे तक्रारदाराने तक्रारीतील कलम 16 मध्ये कुठेही कागदपत्रांची मागणी केलेली नाही. केवळ व्यावसायिक अप्रतिष्ठा मानसिक व शारीरीक त्रास तक्रारीचाखर्च इत्यादीपोटी रक्कम रु.1,65,000/- इतक्या रक्कमेची मागणी केलेली आहे. तसेच प्रस्तत ट्रक सामनेवाला यांनी ताब्यात घेऊ नये म्हणून कायम मनाई हुकूम व्हावा अशी विनंती केली आहे. तसेच तसा स्वतंत्र अर्ज दिलेला आहे. वरील विस्तृत विवेचनाचा विचार करता तक्रारदार हा प्रथमपासूनच थकबाकीदार आहे. नियमितपणे कर्ज हप्ते भरलेले नाहीत. तसेच सामनेवाला यांनी वाहन जप्त करणेची धमकी दिली याबाबत दत्तात्रय रामचंद्र पाटील तसेच पांडूरंग बळवंत पाटील यांचे शपथपत्र दाखल केले आहेत. सदर शपथपत्रे ही काटेकोर पुरावा म्हणून विचारात घेता येणार नाही. तक्रारदार हा सामनेवालांविरुध्द फौजदारी कारवाई करु शकला असता मात्र प्रस्तुत शपथपत्रावरुन प्रस्तुत तक्रारदाराचा ट्रक चोरीस गेल्यामुळे तो 7-8 महिन्याने तक्रारदारस मिळालेने तक्रारदार प्रस्तुत कर्ज रक्कम भरु शकला नाही ही वस्तुस्थिती निदर्शनास येते. मात्र सदर वस्तुस्थिती असली तरी ठरले करारप्रमाणे कर्ज फेड करणे ही तक्रारदाराची कायदेशीर जबाबदारी आहे. ती पार न पाडता सामनेवाला विरुध्द कोणत्याही आधाराशिवाय प्रस्तुतची तक्रार दाखल केलेली आहे. वरील विस्तृत विवेचनाचा विचार करता सामनेवाला यांनी कोणत्याही अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केलेला नाही. तसेच कोणतीही सेवात्रुटी केलेली नाही या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1) तक्रारदाराची तक्रार काढून टाकण्यात येते. 2) खर्चाबाबत कोणतेही आदेश नाहीत.
| [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |