Exh.No.9
सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
तक्रार क्र. 35/2012
तक्रार दाखल झाल्याचा दि. 27/02/2013
तक्रार निकाल झाल्याचा दि. 13/08/2013
श्री सदानंद तुकाराम नाचणकर
वय वर्षे 70 वर्षे, धंदा- सेवानिवृत्त,
राहणार- मु.पो.ता. देवगड,
जि.सिंधुदुर्ग ... तक्रारदार
विरुध्द
1) रमेश गुंडू गोंधळी
वय वर्षे- 48, धंदा- ठेकेदार,
मु.पो.जामसंडे, ता. देवगड,
जि.सिंधुदुर्ग.
2) श्री प्रमोद तुकाराम नाचणकर
वय वर्षे -64, धंदा- सेवानिवृत्त,
राहणार- मु.पो.ता. देवगड,
जि. सिंधुदुर्ग. ... विरुध्द पक्ष.
गणपूर्तीः- 1) श्री. डी.डी. मडके, अध्यक्ष
2) श्रीमती वफा जमशीद खान, सदस्या.
3) श्रीमती उल्का अंकुश पावसकर (गावकर), सदस्या
तक्रारदारातर्फेः- विधिज्ञ श्री अभिषेक गोगटे
विरुद्ध पक्ष- एकतर्फा गैरहजर.
निकालपत्र
(दि.13/08/2013)
श्री डी.डी. मडके, अध्यक्षः - तक्रारदार यांचेकडून घर दुरुस्तीसाठी करारानुसार आगावू रक्कम स्वीकारुन देखील विरुध्द पक्ष क्र.1 यांनी दुरुस्तीचे काम केले नाही व सेवेत त्रुटी केली म्हणून तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रार मंचात दाखल केली आहे.
2) तक्रारदार यांचे तक्रारीची थोडक्यात हकीगत अशी की, त्यांना गांव मौजे देवगड, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग येथे घराच्या दुरुस्तीचे बांधकाम करावयाचे होते. त्यामुळे तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष यांना घर बांधण्याचे कंत्राट दिले होते. उभयतांमध्ये बोलणी होऊन रु.1,45,000/- रक्कमेचा बांधकामाबाबतचा करार करणेत आला. त्याप्रमाणे तक्रारदार यांनी रु.70,000/- विरुध्द पक्ष यांना आगावू पोच केले; परंतू विरुध्द पक्ष यांनी तक्रारदाराच्या घराचा बांधकामाचा मक्ता घेऊनही घराचे बांधकाम पूर्ण करुन न दिल्याने सदरची तक्रार दाखल करण्यात आलेली आहे.
3) तक्रारदार यांनी तक्रारीत पुढे असेही म्हटले आहे की, विरुध्द पक्ष यांनी घराच्या दुरुस्तीचे काम सामान आणून सुरु करणे आवश्यक होते, परंतू ते त्यांनी केलेले नाही अथवा दुरुस्तीसाठी लागणारे साहित्य तक्रारदार यांना पुरवलेले नाही. त्यामुळे तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष क्र.1 यांचेशी वारंवार संपर्क साधूनही तक्रारदार यांना घराचे साहित्य पुरवलेले नाही अथवा स्वीकारलेली रक्कम परत केलेली नाही व विरुध्द पक्ष हे तक्रारदार यांची स्वीकारलेली रक्कम परत करणेस टाळाटाळ करीत असल्यामुळे सदरची तक्रार या जिल्हा मंचात दाखल करण्यात आलेली आहे.
4) तक्रारदार यांनी मंचाला अशी विनंती केली आहे की, विरुध्द पक्ष क्र.1 यांनी स्वीकारलेली रक्कम रु.70,000/- वसुल होऊन मिळावेत तसेच सदर रक्कमेवर दि.02/03/2010 पासून 18% दराने व्याज वसूल होऊन मिळावे तसेच तक्रारदारास झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासापोटी रु.30,000/- तसेच तक्रार खर्च रु.10,000/- विरुध्द पक्ष क्र.1 यांचेकडून वसुल होऊन मिळावा.
5) तक्रारदार यांनी आपल्या म्हणण्याच्या पुष्टयर्थ नि.4 वरील कागदपत्रांच्या यादीनुसार पाच कागदपत्रे दाखल केली आहेत. त्यात नि.4/1 वर करारपत्र, नि.4/2 वर पावती, नि.4/3 वर नमूना नं.8 चा उतारा, नि.4/4 वर नोटीसची स्थळप्रत आणि नि.4/5 वर पोहोचपावती दाखल केली आहे.
6) सदरची तक्रार दाखल झाल्यावर विरुध्द पक्ष यांना नोटीसा काढण्यात आल्या. विरुध्द पक्ष यांना अनुक्रमे नि.6 व 7 अन्वये नोटीसांची बजावणी झाली. परंतु विरुध्द पक्ष यांना पुरेशी संधी देऊनही त्यांनी म्हणणे दाखल न केल्याने त्यांचेविरुध्द दि.25/04/2013 रेाजी त्यांचेविरुध्द एकतर्फा चौकशीचे आदेश पारीत करणेत आले.
7) तक्रारदार यांची तक्रार व दाखल कागदपत्रे पाहता आमच्यासमोर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात व त्याची उत्तरे आम्ही सकारण खालीलप्रामाणे देत आहोत.
अ.क्र. | मुद्दे | निष्कर्ष |
1 | विरुध्द पक्ष क्र.1 यांनी तक्रारदार यांना दयावयाच्या सेवेत त्रुटी केली आहे काय ? | होय |
2 | तक्रारदार कोणता अनुतोष मिळणेस पात्र आहे ? | खालीलप्रमाणे |
3 | आदेश काय ? | अंतीम आदेशाप्रमाणे |
8) मुद्दा क्रमांक 1 - तक्रारदार व त्यांचे भाऊ विरुध्द पक्ष क्र.2 यांनी विरुध्द पक्ष क्र.1 रमेश गोंधळी यांचेशी त्यांचे मु.पो.देवगड येथील राहते घराचे दुरुस्तीचे काम करणेबाबत रीतसर करार करुन रु.1,45,500/- मध्ये करण्याचे ठरवण्यात आले. पंरतू सदरचे काम विरुध्द पक्ष क्र.1 यांनी केले नाही अशी तक्रारदार यांची मुख्य तक्रार आहे. यासंदर्भात तक्रारदार यांनी करार केला होता हे सिध्द करण्यासाठी नि.4/1 वर करारपत्राची मूळ प्रत दाखल केली आहे. तक्रारदार यांचे म्हणण्यानुसार वि.प.क्र.1 यांनी दि.2/3/2010 रोजी रु.70,000/- रोख स्वीकारुन काम सुरु करण्याचे कबुल केले होते, पंरतु त्यांनी कुठलेही काम हाती घेतलेले नाही व रक्कमही परत केली नाही. यासंदर्भात वि.प.1 यांना नोटीस पाठवण्यात आली परंतू ते हजर झाले नाहीत. त्यामुळे त्यांचेविरुध्द प्रकरण एकतर्फा चालवण्याचा आदेश करण्यात आला. त्यामुळे तक्रारदार यांचे म्हणणे वि.प. यांना मान्य आहे असाच निष्कर्ष निघतो.
9) आम्ही करारपत्र (नि.4/1) व पावती नि.4/2 चे बारकाईने अवलोकन केले आहे. त्यावरुन तक्रारदार आणि विरुध्द पक्ष क्र.2 या दोघा भावांनी विरुध्द पक्ष क्र.1 यांना वेगवेगळया कामांसाठी रु.1,45,500/- इतकी रक्कम देण्याचे मान्य केले होते असे दिसून येते. तसेच दि.2/3/2010 रोजी तक्रारदार यांनी वि.प.क्र.1 यांना रु.70,000/- रोख दिल्याचे दिसून येते. तक्रारदार यांनी वकीलामार्फत दि.8/5/2012 रोजी वि.प.क्र.1 यांना नोटीस पाठवून घराच्या दुरुस्तीपोटी घेतलेली आगावू रक्कम रु.70,000/- व इतर खर्च दयावा अशी नोटीस दिल्याचे दिसून येते. परंतू सदरच्या नोटीसचे उत्तरही वि.प.1 यांनी दिलेले नाही. यावरुन वि.प.क्र.1 यांनी तक्रारदार यांच्याकडून करारानुसार घराच्या दुरुस्तीचे काम करण्याचे मान्य करुन व आगावू रक्कम घेऊन देखील काम केले नाही व सेवेत त्रुटी केली आहे असे दिसून येते. त्यामुळे मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही ‘होकारार्थी’ असे देत आहोत.
10) मुद्दा क्रमांक 2- तक्रारदार यांनी मंचाला अशी विनंती केली आहे की, विरुध्द पक्ष क्र.1 यांनी स्वीकारलेली रक्कम रु.70,000/- वसुल होऊन मिळावेत तसेच सदर रक्कमेवर दि.02/03/2010 पासून 18% दराने व्याज वसूल होऊन मिळावे तसेच तक्रारदारास झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासापोटी रु.30,000/- तसेच तक्रार खर्च रु.10,000/- विरुध्द पक्ष क्र.1 यांचेकडून वसुल होऊन मिळावा. तसेच वि.प.क्र.2 हे त्यांचे सख्ये भाऊ आहेत व तक्रार दाखल करतेवेळी सही करण्यास ते उपस्थित नाहीत म्हणून त्यांना विरुध्द पक्ष क्र.2 करण्यात आलेले आहे असे म्हटले आहे. तक्रारदार यांचेकडून वि.प.क्र.1 यांनी दि.2/3/2010 रोजी रु.70,000/- स्वीकारले आहेत हे नि.4/2 वरील पावतीवरुन स्पष्ट आहे. त्यामुळे तक्रारदार वि.प. यांचेकडून रक्कम रु.70,000/- व त्यावर दि.2/3/2010 पासून रक्कम परत करेपर्यंत 18% दराने व्याज देण्यास वि.प.क्र.1 जबाबदार आहेत. तसेच तक्रारदार यांना मानसिक त्रास व तक्रार करण्यासाठी खर्च झालेला आहे हे मान्य करावे लागेल. म्हणून तक्रारदार मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रु.5,000/- मिळण्यास पात्र आहेत.
11) मुद्दा क्रमांक 3 - वरील विवेचनावरुन आम्ही खालीलप्रमाणे आदेश देत आहोत.
आदेश
- तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2) विरुध्द पक्ष क्र.1 यांनी तक्रारदार व विरुध्द पक्ष क्र.2 यांना रक्कम रु.70,000/- (रुपये सत्तर हजार मात्र) व त्यावर दि.2/3/2010 पासून रक्कम परत करेपर्यंत 18% दराने व्याज या आदेशाच्या प्राप्तीपासून 30 दिवसांच्या आत दयावेत.
3) विरुध्द पक्ष क्र.1 यांनी तक्रारदार व विरुध्द पक्ष क्र.2 यांना मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/-(रुपये दहा हजार मात्र) व तक्रार अर्जाचा खर्च रु.5,000/- (रुपये पाच हजार मात्र) या आदेशाच्या प्राप्तीपासून 30 दिवसांच्या आत दयावेत.
ठिकाणः सिंधुदुर्गनगरी
दिनांकः 13/08/2013
(वफा खान) (डी. डी. मडके) (उल्का अंकुश पावसकर (गावकर),
सदस्या, अध्यक्ष, सदस्या,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
प्रत तक्रारदार यांना हातपोहोच/रजि पोस्टाने रवाना दि.
प्रत विरुद्ध पक्ष यांना हातपोहोच/रजि. पोस्टाने रवाना दि.